आज ज्यांना स्वामी विवेकानंद आठवले खास त्यांच्यासाठी…!
हिंदुराष्ट निर्माण करून रामराज्य आणण्याच्या वल्गना करणारांना जाहीर सवाल- हासरतची मनिषा हिंदू नव्हती का ? मणिपूरची ‘ती’ भगिनी कोण होती ? कर्नाटकात उज्ज्वल रेवणाने नासवलेल्या भगिनी कोण होत्या ? हिंदुत्वाचा पुरस्कार करणारांच्या त्या बहिणी नव्हत्या का ?
होत्या. आहेत ! पण… आणि या ‘पण’मध्येच सारं दडलं आहे…!!
हिंदुराष्ट्र या संकल्पनेआडून ब्राम्हण्याधिष्ठित हिंदुस्तान निर्माण करणारांचे मनसुबे उधळून लावायचे असतील तर स्वामी विवेकानंद काय म्हणतात ते वाचा, शांत डोक्याने विचार करा अन् अनुषंगिक वाटचाल किमान आता तरी सुरू करा. 1893 साली अमेरिकेतील शिकागो परिषदेत भाषणाची सुरुवात ‘बंधू आणि भगिनिंनो…’ अशी करून अवघ्या जगाची मनं त्यांनी लीलया जिंकली होती.
स्वामी विवेकानंद म्हणतात- “बुद्धांचा हजारावा अंश माझ्यात असता; तर मी स्वतःला धन्य समजलो असतो”
बुद्ध तेच होत, ज्यांनी सर्वप्रथम समता, स्वातंत्र्य, बंधुताचा पुरस्कार करून जगाला बौद्धधर्म दिला. पुढे बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हीच मूल्ये संविधानाच्या सरनाम्यात अंतर्भुत करून #समताधिष्ठित भारतनिर्माणाचा हमरस्ता दाखविला.
परंतु पुढे संघाने विवेकानंदाच्या हिंदुत्वाला केराची टोपली दाखवून ब्राम्हण्याचा अंगिकार करत ‘हिंदूराष्ट्रा’ची बहुजनांना नियमित घुटी पाजत मनूच्या दिशेनं परतीचा प्रवास सुरू केला. आज ते कुठपर्यंत पोहचले आहेत याचं वर उल्लिखित ताजं उदाहरणं होत. इतःपर बहुजन आणि त्यातही अनुसूचित जाती/जमाती सुधरणार नसतील तर त्यांचं भलं रामच करो !
कारण आता भारतातील कुठल्याही यंत्रणेपुढे आक्रोश करून त्याचा काही उपयोग होईल याची सूतराम शक्यताही मावळली आहे.
पण संविधान आपण स्वीकारलं असून त्यावर आपल्या बावनकशी निष्ठा आहेत. आणि म्हणून किमान आपण तरी सनदशीर मार्गानेच पुढं गेलं पाहिजे असं वाटतं…
बघा पटतं का…?
एका कवीच्या चार ओळी आठवल्या…
अशी निराश होऊ नकोस
जातील हेही दिवस
बघ…
दिवसालाच गेलेत दिवस !
नमो बुद्धाय !
भवतु सब्बं मंगलं !!
चलो समताधिष्ठित भारत की ओर…!
जय संविधान !!
जय भारत !!!
भीमप्रकाश गायकवाड,
‘मूकनायक’
रविराजपार्क, परभणी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत