अहिल्यामाई होळकर
(जन्म ३१ मे १७२५ मृत्यू १३ ऑगस्ट १७९५)
प्रा गौतम निकम, विमलकीर्ती प्रकाशन चाळीसगाव जि जळगाव मो.9423915510
३१ मे १७२५ रोजी नगर जिल्ह्यातील चौंडी या गावी धनगर जातीत अहिल्याबाईंचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे. त्यांच्याकडे गावची पाटीलकी होती. आईचे नाव सुशिलाबाई.
सुभेदार मल्हारराव होळकर यांचा पुत्र खंडेराव, वय १२ वर्षे यांच्याबरोबर अहिल्याबाईंचा विवाह २० मे १७३३ मध्ये वयाच्या ८व्या वर्षीच झाला. मल्हारराव होळकर अतिशय शूर, कर्तबगार, उदार असल्याने या गुणांचा प्रभाव अहिल्यामाईंच्या व्यक्तीमत्त्वावर पडला. अहिल्यामाईंना बाळबोध वाचन आणि मोडी लेखन, गणितातील हिशेब इत्यादी शिक्षण दिले जात होते. घोड्यावर स्वार होणे, दांडपट्टा चालविणे, युद्धाचे, राजकारणाचे डावपेच आखणे, स्वारी करणे, तह करणे, सूचक पत्र व्यवहार करणे, कर वसुली, न्यायदान, राजकारभाराचे धडे इत्यादी प्रशिक्षण अहिल्यामाईंनी त्यांचे सासरे मल्हाररावांकडून घेतले होते. पती खंडेराव हे व्यसनी, शिकारीचा नाद असल्याने त्यांच्यापासून अहिल्यामाई यांना संसारसुख म्हणावे तसे लाभले नाही. असे इतिहासकार सांगतात. (पहा भारतीय संस्कृतीकोश, खंड १०, पान. नं.४२६) तर दुसरीकडे खंडेराव राजवाड्यात असतांना अथवा अहिल्यामाईस भेटतांना कधीही मांसाहार करीत नसे व नशापाणी करीत नसे असेही इतिहासकार सांगतात. अनेक मोहिमा सर करणारा व वडील मल्हाररावांचा खांद्याला खांदा लावून लढाई करणारा खंडेराव व्यसनी असते तर केव्हाच संपले असते. खंडेराव यांना त्यांच्या शौर्याबद्दल शिलेदारीचा सन्मान १५ ऑगस्ट १७३५ रोजी मिळाला होता असे असतांना खंडेराव यांच्याबद्दल इतिहासकार विकृतीकरण करतात हे स्पष्ट होते. अहिल्यामाईला मोठे करण्यामागे पती खंडेरावांचा पाठिंबा होता. अहिल्यामाई यांना १७४५ मध्ये मुलगा मालेराव तर १७४८ मध्ये मुलगी मुक्ताबाई ही दोन अपत्ये झाली. सुरजमल जाटाबरोबर कुंभेरी येथे झालेल्या लढाईत खंडेराव यांना २४ मार्च १७५४ रोजी वीरमरण आले. खंडेरावांच्या बरोबर अहिल्यामाईंनी सती जाण्याचे नाकारून आपल्या पुरोगामीत्वाचा परिचय दिला. सनातनी ब्राह्मणी धर्माप्रमाणे विधवेला अग्नीत फेकण्याची क्रूर पद्धत होती. स्वेच्छेने सती न गेल्यास विधवेला चिताग्न्नीत उचलून फेकण्याची क्रूर पद्धत होती. अहिल्यामाईंच्या सती न जाण्याच्या निर्णयामुळे धर्माच्या ठेकेदारांनी बरेच रणकंदन केले पण अहिल्यामाईंच्या चेहऱ्यावरील दृढ निश्चय बघून तिच्या समोर जाऊन बोलण्याची कुणा ब्राह्मणाची हिंमत झाली नाही. अहिल्यामाईंनी रूढी परंपरेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजून निर्णय घेतला. धर्म, रूढी, परंपरा या पलिकडे कर्तव्य महत्त्वाचे मानून लोककल्याणासाठी जगण्याचा निर्धार केला. केवळ २९ व्या वर्षी अहिल्यामाईंच्या पदरी वैधव्य आले त्यावेळी मुलगा ९ वर्षांचा तर मुलगी मुक्ताई ६ वर्षांची होती.
इ.स. १७५४ मध्ये खंडेराव होळकर यांचे निधन झाल्यानंतर सती गेलेल्या काही मुस्लिम बायका होत्या. त्यांच्या श्राद्धाच्या वेळी मुस्लिम बायकांची नावे घेऊन पाणी सोडण्यास ब्राह्मण भटजींनी नकार दिला. तेव्हा अहिल्यामाई तात्काळ म्हणाल्या, “नाती काय धर्मानेच बांधतात का? चराचरात ईश्वर पहायला धर्म सांगतो. ज्या स्वामी मागे त्या जळून खाक झाल्यात त्यांच्या नावे दोन पळ्या पाणी सोडणे जमत नसेल तर बंद करा तो श्राद्धविधी.” अशा कडक शब्दात ब्राह्मण भटजींची कान उघडणी केली. खंडेरावास रणांगणावर युद्ध करतांना आलेल्या मृत्युचा अहिल्यामाईस सार्थ अभिमान वाटत होता. यालढाईत स्वतः अहिल्यामाई हातात तलवार घेऊन लढल्या होत्या. (संदर्भ – पुरोगामी राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर – होमेश भुजाडे, पृ. १२) वयाच्या २९ व्या वर्षी वैधव्य आल्याने सुद्धा न डगमगता जीवनाच्या पुढील प्रवासाकरीता अहिल्यामाई स्वतःच सावरल्या. मल्हारराव नेहमी मोहिमेत गुंतलेले असल्याने घरची सर्व कामे व वसुली, फौजेची व्यवस्था, शत्रूच्या हालचाली इत्यादी कामे अहिल्यामाईंना करावी लागत असत. मल्हारराव होळकर यांना पानीपतच्या लढाईत मराठ्यांना पराभवास कारणीभूत ठरणारे इतिहासकार पेशवा लढाईवर जाण्याऐवजी आठ वर्षाच्या मुलीबरोबर लग्न करीत होते. तसेच पेशव्याचा नातू सदाशिव याने पानीपतच्या लढाईच्या वेळी जातीवाचक शिवीगाळ करून मल्हाररावांची अवहेलना केली होती. मल्हाररावांच्या युद्धनितीचा प्रदिर्घ अनुभवाचा सल्ला पेशव्यांनी विचारात घेतला नसल्यामुळे पराभव झाला. परंतू इतिहासकार हे सत्य सांगत नाही. दि. २६ मे १७६६ रोजी मल्हारराव होळकरांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे अहिल्यामाईंवर मोठे संकट कोसळले. मल्हाररावांच्या नंतर अहिल्यामाईंचा मुलगा मालेरावांना पेशव्यांनी सरदारकी बहाल केली. मात्र मालेरावाने कारभार जेमतेम केला असेल कारण तो वेडसर, विलासी, व्यसनी असल्याचे इतिहासकार सांगतात. खंडेरावाचे व मालेरावाचे इतिहासकारांनी विकृतीकरण केलेले आहे यांना व्यसनी, चरित्रहीन, रंगेल, पैशाची अफरातफर करणारे होते असे सांगितले जाते हे ब्राह्मणी षडयंत्र आहे.
राजे मालेराव होळकर यांना संस्थानातील ब्राह्मण घाबरून राहत होते. मालेरावाने त्यांच्या मनमानीस पायबंद घातला होता. ब्राह्मणांची दलाली करणाऱ्या एका व्यक्तीस मालेरावाने मृत्युदंडाची शिक्षा दिली हा सत्य इतिहास दडविण्यासाठी त्या गृहस्थाचे भूत मालेरावास झोंबले त्यामुळे तो वेडा झाला होता आणि त्यातच त्याचा मृत्यु झाला अशी कहाणी रंगविण्यात आली. एवढेच नव्हे तर ब्राह्मणांनी अशी अफवा पसरवली की, अहिल्यामाईंनी स्वतःच्या मुलास मालेरावास हत्तीच्या पायी देऊन ठार केले. मालेरावास विष देऊन ठार केले असा एक प्रकारे मुलाचा खून केल्याचा आरोप अहिल्यामाईंवर लावण्यात येतो तो निराधार आहे. भट-ब्राह्मणांचे पितळ उघडे पाडणाऱ्या राजे मालेरावांचा कपटनितीने भटांनी विष पाजून खून केला हे उघडकीस येऊ नये यासाठी मनुवाद्यांनी विकृत इतिहास लिहून आपले कुकर्म अहिल्यामाईंवर थोपवले. (संदर्भ – पुरोगामी राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर – होमेश भुजाडे, पृ. २६) होमेश भुजाडे लिहितात – “पेशवाई मध्ये अस्पृश्यता व जातीविषमतेला अतिशय ऊत आले असतांना देखील समकालीन राष्ट्रमाता अहिल्यामाईंच्या राज्यात अस्पृश्यतेला व जातीभेदाला वाव नव्हता. तिने अस्पृश्यांन जवळ केले. ममतेची फुंकर घालून त्यांना हृदयाशी लावले. अहिल्यामाईचा जनकल्याणाचा आदर्श समोर ठेवत महात्मा फुले यांनी भारतात अस्पृश्यांसाठी जी पहिल्या शाळा उघडली तीचे नाव ‘अहिल्याश्रम’ ठेवले. अहिल्यामाईपासून लोक कल्याणाचा आदर्श घेत राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात गोरगरीबांसाठी जो दवाखान उघडला त्याचे नामकरण ‘अहिल्यामाई होळकर स्मरणार्थ दवाखाना’ असे केले होते. अहिल्यामाईने मस्जिदींना न तोडता जवळच सोमनाथ व विश्वनाथाचे मंदीर बनविले. मंदिर-मस्जिदींची भांडणं निर्माण करून आतंक माजविणाऱ्या व रक्तपात घडवून आणणाऱ्या राजकारण्यांनी आणि धर्मांधता पसरविण्याऱ्या धर्माच्या ठेकेदारांनी अहिल्यामाईंपासून समतेचा व बंधूभावाचा धडा घ्यावा.” (संदर्भ – राष्ट्रमाता महाराणी अहिल्याबाई होळकर – होमेश भुजाडे : मौर्य क्रांती प्रकाशन, वर्धा)
होळकरांच्या मालमत्तेची अफरातफर करणारा गंगाधरपंत चंद्रचूड नावाचा ब्राह्मण होता हे विशेष. मालेराव वयाच्या बाविसाव्या वर्षी इ.स.१७६७ मध्ये मृत्यु पावला. प्रथम पती, नंतर सासरे व एक वर्षाच्या आतच एकुलत्या एक तरूण तडफदार शूरवीर मुलाचे निधन झाल्यामुळे संपूर्ण होळकर संस्थानातील प्रजा दुःखाने व्याकूळ झाली होती. राजगादीला वारस नाही व ब्राह्मणी हिंदू धर्मात स्त्रियांनी राजपाट चालविणे निषिद्ध मानले जात होते ही संधी साधून श्रीमंत राघोबा पेशवे आणि चाळीस वर्षांपासून होळकर संस्थानात दिवाणजीपद सांभाळणारे गंगाधरपंत यशवंत चंद्रचूड या ब्राह्मणाने राजगादीसाठी दत्तक घेण्याचा आग्रह धरला व राजपाट दत्तक पुत्राचे स्वाधीन करून अहिल्यामाईस काशीला जाऊन मागील जन्माच्या पापाचे प्रक्षालन करण्याचा सल्ला दिला. मालेराव यांच्या निधनामुळे अहिल्यामाईंनी विश्वासू सेवक तुकोजी होळकर यांना दत्तक घेऊन त्यांना फौजेची व मोहिमांची जबाबदारी सांभाळावयास दिली. स्वतः खाजगीतच दौलतीचा कारभार पाहू लागल्या. मल्हाररावांच्या मृत्युनंतर अहिल्यामाईंनी इंदौरवरून संस्थानाची राजधानी इंदौरच्या जवळच नर्मदा नदीच्या काठी ‘महेश्वर’ या ठिकाणी करून येथूनच राज्यकारभार सुरू केला. मे १७६७ मध्ये राज्यकारभार अहिल्यामाईंनी हाती घेतला. त्यांनी केवळ एका महिन्यात राज्याची घडी नीट बसविली. सर्व अपप्रवृत्ती ठेचून काढल्या. जनतेवर अत्याचार करणाऱ्यांवर जरब बसविली. अहिल्यामाईंनी अनेक कायद्यात सुधारणा करून त्यांच्या कार्यकाळात करपद्धती सौम्य केली. शेतकऱ्यांकडून उत्पन्नानूसार सारा वसुल केला जाई. पाटील-कुलकर्णीच्या हक्कांचे संरक्षण केले व ग्रामीण भागात गावोगावी न्याय निवाडा करण्यासाठी पंचाधिकारी नेमले. डोंगराळ भागातून जाणाऱ्या-येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून भिल्ल व गोंड भीलकवडी स्वरूपात कर वसूल करीत होते त्यांचा तो हक्क मान्य करून उपद्रव मूल्य कमी करण्यात अहिल्यामाईंना यश आले. भिल्ल व गोंड लोकांकडून पडित जमिनींची लागवड करून घेतली त्यामुळे त्या लोकांना उदरनिर्वाह झाल्याने त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावला. अहिल्यामाई होळकरांनी आपल्या कारकिर्दीत हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये भावनिक व सामाजिक ऐक्य निर्माण केले होते. मुस्लिमांना सैनिकांत व प्रशासनात स्थान दिले. नेहमी दूष्काळ असणाऱ्या भागात अहिल्यामाईंनी तलाव, विहीरी, घाट व कुंडांची निर्मिती करून लोकांच्या गैरसोयी दूर केल्या. शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली. भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी घेण्यात आली.
त्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली स्त्रियांची एक फौज उभी केली. सर्व गोष्टींची पाहणी व देखरेख त्या जातीने अविश्रांतपणे करीत. अहिल्यामाईंनी ‘महेश्वर’ येथे वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी पुष्कळच कार्य केले. कोष्टी आणि विणकर यांना पैसा, व्यापार व जमीन वगैरे सर्व सोयी मोठ्या सढळ हातांनी करून दिल्या. इतकेच नव्हे तर कारागीर मजूर व विणकर यांच्यासाठी स्वतःच घरे बांधून घेऊन ती त्यांना वाटून दिली. या उदार सहकार्यामुळे महेश्वराचा वस्त्रोद्योग चांगलाच नावाजला महेश्वरची लुगडी व पातळे देशभर प्रसिद्धी पावली. येथील विणकरांची ख्याती अत्यंत उत्कृष्ट व कलाकुसरीची वस्त्रे निर्माण करणारे कारागीर म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरली. ह्या सर्व कारणांमुळे महेश्वराचा वस्त्रोद्योग आजही सर्वत्र प्रसिद्ध आहे. होळकर राज्याची राजधानी महेश्वर असल्यामुळे महेश्वरला देशातील इतर राज्यांच्या वकिलांची व मुत्सद्यांची वर्दळ नेहमीच असायची. पुण्याचा तर महेश्वरशी फारच जवळचा संबंध होता. कित्येक राज्यांचे वकिल महेश्वरला कायम वस्तीला होते. यामुळे त्याकाळी महेश्वराचे महत्त्व फारच वाढले होते.
अहिल्यामाईंनी जाहिर केले की, ‘माझ्या राज्यातून चोर-दरोडेखोरांचे हे संकट जो वीर दूर करील, त्याच्याशी मी माझी एकूलती एक आणि मला प्राणाहून प्रिय असलेली मुलगी मुक्ताबाई हिचा विवाह करून देईल.’ ही घोषणा ऐकताच दरबारात शांतता पसरली मात्र यशवंतराव फणसे नावाचा एक तरूण म्हणाला, “मी हे काम करीन या राज्यातून चोर-दरोडेखोरांचे कायमचे उच्चाटन करीन अशी मी प्रतिज्ञा करतो, परंतू या कामी मला राज्याकडून सैन्य व पैसा यांचे पूर्ण सहकार्य मिळाले पाहिजे.” अहिल्यामाईंनी सर्व व्यवस्था करून दिली. चोर-दरोडेखोरांचे पारिपत्य करून यशवंतराव फणसे महेश्वरला परतला तेव्हा अहिल्यामाईने अत्यंत आनंदाने त्यांची मुलगी मुक्ताबाई हिचा विवाह यशवंतराव फणसे या तरूणाबरोबर लावून दिला. तत्कालीन विवाह विषयक सर्व सामाजिक रूढी आणि नियम धाब्यावर बसवून निव्वळ गुणांचाच विचार करून श्रेष्ठतम् तरूणाची निवड केली.
उत्तम जीवन जगण्यास जातपात आड येऊ नये म्हणून आंतरजातीय विवाहास संमती दिली व याची सुरूवात स्वतःच्या घरापासून केली. १८ पगड जातीच्या लोकांना जे मुख्य प्रवाहापासून गावगड्यापासून लांब हलाखीचे जीवन जगत होते त्यांना एकत्र करून मानवता हाच खरा धर्म आहे व आपण सर्व एकच आहोत व एक होवून कार्य करू या. अशी शिकवण दिली त्यामुळे पेशवाईत बोकाळलेल्या जातीयवादाला होळकर संस्थानात स्थान नव्हते तर न्याय, समता, बंधुत्व प्रस्थापित करून उच्चनीचतेचे उच्चाटन केले होते.
एकेकाळी ज्या स्त्रिया शिक्षणाला व माणुसकीच्या हक्काला पारख्या होत्या त्याकाळी स्त्रियांना लढाईचे प्रशिक्षण व मूल दत्तक घेण्याचे महत्त्वपूर्ण हक्क देणाऱ्या ताकदीच्या त्या राजकर्त्या होत्या. स्त्रियांना दरबारात पडदा प्रथा न पाळण्याचा पायंडा त्यांनी पाडला होता. तसेच त्यांनी स्वतः दोनच अपत्यांना जन्म देऊन मर्यादीत कुटूंबाचा आदर्श घालून दिलेला होता. अहिल्यामाईंनी वर्णवर्चस्वाद्वारे लादलेल्या गुलामगिरी व ब्राह्मणी श्रेष्ठत्वांना लाथाडून स्वातंत्र्य, समता, बंधूता या उदात्त मुल्यांना रूजविण्याचा प्रयत्न केला होता.
अपुर्ण
संदर्भ -अहिल्यामाई होळकर प्रा गौतम निकम विमलकीर्ती प्रकाशन चाळीसगाव जि जळगाव मो.9423915510
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत