दिन विशेषमुख्यपानविचारपीठ

सेवाभावी माईसाहेब, सविता आंबेडकर 29 मे स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

माईसाहेब सविता आंबेडकर यांच्याबद्दल समज व गैरसमज? उमेश गजभिये.

29 मे 2003 हा माईसाहेब सविता आंबेडकर यांचा स्मृतिदिन. आधुनिक भारतात बौद्ध धर्मक्रांतीचा पाया रचणाऱ्या प्रथम उपासक श्रेष्ठ स्त्री. ज्या भारतात बौद्धांच्या आईसाहेब आहेत. 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या प्रथम बौद्ध महिला उपासक श्रेष्ठ त्यागमूर्ति आईसाहेब सविता आंबेडकर यांना विनम्र अभिवादन .

आयुष्यमान विठ्ठल बयाजी कदम हे सिद्धार्थ कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून 1950 मध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटी तर्फे शिष्यवृत्ती देऊन बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना लंडनला उच्च शिक्षणासाठी सप्टेंबर 1952 ला पाठवले. ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे. कदम लंडनमध्ये असताना बाबासाहेब आंबेडकर व कदम यांच्यात नेहमी पत्र व्यवहार होत असे. एका पत्राव्यवहार मध्ये बाबासाहेब कदमला लिहितात. दिल्लीहून 19. 4 .1954 ला लिहिलेल्या पत्रात बाबासाहेबांनी कदमला कळवले होते की, 1953 नंतर त्यांची प्रकृती फारच बिघडली होती. त्यांना असं वाटत होते की त्यांच्या त्यातच अंत होणार आहे. पण बुद्धाच्या कृपेतून त्या आजारातून त्यांची सुटका झाली.
निवडणूक प्रचाराचे एक उत्कृष्ट भाषण बाबासाहेबांनी सोमवार दिनांक 26 नोव्हेंबर 1951 ला संध्याकाळी सर गावसजी जहागीर हॉलमध्ये भरवण्यात आलेल्या जाहीर सभेत केले. या सभेचे अध्यक्ष बॅरिस्टर पुरुषोत्तम त्रिकमदास हे होते. यावेळी बाबासाहेब डोळे व गुडघे यांच्या आजाराने हैराण झालेले होते. त्यांनी डोळ्यावर घड्या ठेवून दोन दिवस झाकून ठेवलेले होते. सभेत ते आले ते डोळ्यावर घड्या घालून व वर काळा चष्मा लावून. त्यांना दोन-तीन माणसाच्या खांद्यावर हातांनी स्वतःचा भार टाकून ते आले. त्यांनी भाषण बसून करावे असा समाजवादी व फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला. तरी बाबासाहेबांनी उभे राहून भाषण केले.

बाबासाहेब आंबेडकर यांचे लग्न 15 एप्रिल 1948 ला सविता (माईसाहेब) यांच्यासोबत झाले! तो काळ बाबासाहेब आंबेडकरांसाठी एक कठीण काळ होता. बाबासाहेब आंबेडकरांना असाध्य रोगाने ग्रासले होते व त्यामुळे त्यांना सतत डॉक्टरांच्या देखरेखीखाली व हॉस्पिटलमध्ये आजारीपणाने राहावे लागत होते. डॉक्टरांनी बाबासाहेबांना सल्ला दिला होता की त्यांच्यासोबत 24 तास देखरेख करणारी एखादी व्यक्ती असली पाहिजे किंवा मेडिकल क्षेत्रातील अनुभव असणारी एक व्यक्ती सतत असणे गरजेचे आहे. अश्या परिस्थितीत बाबासाहेबांची ओळख सविता (माईसाहेब) यांच्याशी झाली. 1952 चा निवडणूक निकाल जाहीर झाला तेव्हा कम्युनिस्ट पक्षाचे डांगे व शेड्युल कास्ट फेडरेशनचे बाबासाहेब आंबेडकर अयशस्वी झाले. या संदर्भात सिद्धार्थ कॉलेजमध्ये बाबासाहेब आंबेडकर बोलत असताना त्यांच्या तोंडून निघालेले उद्गार असे, “निवडणुकीतील यश अपयश हे लायकी वर अवलंबून नस.ते तर ते विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीवर अवलंबून असते. मला या अपयशाचे फारसे वाईट वाटत नाही. वाईट कशाचे वाटत असेल तर काँग्रेसचे लोक नालायकांनाही निवडून देतात व लायक लोकांना पाडतात. पण या निवडणुकीतील माझा अपयशामुळे माझ्या पत्नीला काय वाटले असेल? ती बिचारी दिल्लीत आहे. या प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी माईसाहेब त्यांची घेत असलेल्या काळजी बद्दल मत व्यक्त केलेले आहे. प्रकृती खूपच ढासळली असताना बाबासाहेबांनी जून 1952 ला अमेरिकेत अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. तोही एकटेच. Elestreted विकली ऑफ इंडिया (रविवार) या साप्ताहिकाच्या 1 जून 1952 च्या अंकात Pollux या लेखका समोर बाबासाहेबंनी माईसाहेब बद्दल असे उद्गार काढले. Dr. Ambedkar will be visiting the United State of America, after 20 year he told Pollux that Mrs. Ambedkar was not accompanying him on the trip for lack of an adequate supply of dollar. While in New York he planes to enter a clinic for medical treatment. न्यूयॉर्क येथे एखाद्या तज्ञ डॉक्टरांकडून स्वतःची प्रकृती तपासून घेण्याचे बाबासाहेब आंबेडकर यांनी मनात योजले होते. आपल्या खर्चाला लागतील इतके डॉलर बँकेकडून मिळत नाही. म्हणून आपण आपल्या पत्नीला न्यूयॉर्कला नेऊ शकत नाही असा खुलासा वरील पत्रकाराला बाबासाहेबांनी केला. पत्नी बद्दल बाबासाहेबांच्या मनात अत्यंत काळजी होती हे यात जाणवते. कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभ संपल्यानंतर बाबासाहेबांनी आपली प्रकृती सुप्रसिद्ध अशा दोन डॉक्टर कडून तपासून घेतली. डॉक्टरांनी त्यांना न्यूयॉर्कमध्ये एक महिना उपचारासाठी राहावे लागेल असे सांगितले. पण एक महिना उपचारासाठी राहण्याचा खर्च करणे इतके पैसे त्यावेळेस बाबासाहेबांकडे नव्हते. कमीत कमी त्यांना त्यावेळेस दहा-पंधरा हजार खर्च करावा लागला असता. महत्त्वाचे म्हणजे भारतात त्यांना पीपल एज्युकेशन सोसायटीच्या व इतर सामाजिक व राजकीय कामे करायची होती. या कामामुळे त्यांनी आपल्या प्रकृतीला कधीच महत्त्व दिलेले नव्हते. आणि यावेळी सुद्धा त्यांनी संपूर्णपणे खालावलेली प्रकृती असताना व डॉक्टरांच्या हातून दुरुस्त होण्याची खात्री असतानाही. त्यांच्या नेहमीच्या स्वभावानुसार उचल खाल्ली. त्या दोन अमेरिकन डॉक्टरांनी औषधे लिहून दिले ले कागद बरोबर घेऊन बाबासाहेब विमानाने न्यूयॉर्क येथून मुंबईला 21 जून 1952 ला संध्याकाळी परत आले. लग्नापूर्वी माईसाहेब (शारदा कबीर उर्फ सविता) आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांची पहिली भेट, मुंबईतल्या पार्ल्यात डॉ. एस. राव नावाचे मैसू तील गृहस्थ राहत. परदेशातून शिक्षण घेऊन परतलेले डॉ. राव हे अर्थतज्ज्ञ होते. बाबासाहेबांची या डॉ. रावांशी 1942 पासून घनिष्ठ मैत्री होती. बाबासाहेब मुंबईत आले की, ते वेळ काढून डॉ. रावांच्या घरी जात असत. अगदी व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूर मंत्री असतानाही बाबासाहेब जेव्हा मुंबईत येत. तेव्हा डॉ. रावांच्या घरी जात असत. दोघांमध्ये तासन् तास बौद्धिक चर्चा घडत असे. तेव्हाच्या शारदा कबीर (माईसाहेब नंतरच्या) डॉ. राव यांच्या मुली शारदा कबीर (माईसाहेबांच्या) मैत्रिणी होत्या. कबीर कुटुंबाचा राव कुटुंबीयांशी चागंला परिचय होता. त्यामुळे त्यांचे एकमेकांकडे येणे-जाणे होत असे. बाबासाहेब आणि शारदा कबीर (माईसाहेबांची) पहिली भेट डॉ. राव यांच्या घरी झाली. माईसाहेब म्हणजे पूर्वीच्या शारदा कबीर. शारदा कबीर या कृष्णराव विनायकराव कबीर आणि जानकीबाई कबीर दाम्पत्याच्या पोटची मुलगी. सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील शारदा यांचा जन्म 27 जानेवारी 1912 रोजी झाला. घरात शारदा कबीर व मिळून एकूण आठ भावंडं. लगणापूर्वी माईसाहेब भारतीय राजकारण व दलित चळवळ पासून कोसो दूर राहिल्या. त्यानी स्वतःचे वैद्यकीय शिक्षण आणि नंतर वैद्यकीय सेवेत गुंतवून घेतले होते. माईसाहेबांना बाबासाहेबांबद्दल जी माहिती होते ती, ‘ते मजूर मंत्री आहेत’ एवढीच माहिती होती. 1947 सालच्या सुरुवातीला बाबासाहेब दिल्लीतून मुंबईत आल्यानंतर पार्ल्याला डॉ. राव यांच्या घरी गेलेत. तेथे त्यावेळी शारदा कबीर होत्या. त्यावेळी डॉ. एस. राव यांनी बाबासाहेबांना माईसाहेबांची ओळख करून देताना म्हटलं की, “ही माझ्या मुलींची मैत्रीण. अत्यंत हुशार आहे. एमबीबीएसचं शिक्षण घेतलंय. डॉ. मालवणकरांसारख्या विख्यात डॉक्टरांकडे ज्युनियर डॉक्टर म्हणून काम करते.” बाबासाहेब आणि माईसाहेब यांच्या प्रत्यक्ष भेटीचा हा पहिला क्षण. या भेटीचे वर्णन करताना माईसाहेबांनी त्यांच्या ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’ या आत्मचरित्रात नोंदवलंय की, ‘डॉ. आंबेडकरांचे व्यक्तिमत्व अत्यंत भारदस्त होते. त्यांचे भव्य कपाळ, तेजस्वी व भेदक डोळे, धारदार नजर, अत्याधुनिक व टापटीप पोषाख, चेहऱ्यावर असलेले विद्वत्तेचे तेज पाहून प्रथमदर्शनीच त्यांच्या असामान्यत्त्वाची खात्री पटत असे.’ याच काळात बाबासाहेबांची तब्येत फारशी बरी नसे. त्यात त्यांच्या खांद्यावर एकाचवेळी बऱ्याच जबाबदाऱ्या आल्या होत्या. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. जवाहरलाल नेहरूंच्या अंतरिम मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकर कायदेमंत्री झाले. 29 ऑगस्ट 1947 रोजी त्यांच्याकडे राज्यघटनेचा मसुदा बनवण्याची जबाबदारीही आली. या काळात माईसाहेब मुंबईतल्या गिरगावमधील ह्युजेस रोडवरील डॉ. मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये काम करत होत्या. एकेदिवशी बाबासाहेब अचानक डॉ. मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये आले. बाबासाहेब अचानक तिथं आल्यानं माईसाहेबांना आश्चर्य वाटलं. नंतर त्यांना कळलं की, डॉ. रावांनीच बाबासाहेबांना तिथं पाठवलं होतं. डॉ. रावांनी बाबासाहेबांना त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉ. मालवणकरांची शिफारस केली होती. माईसाहेब तिथं ज्युनियर डॉक्टर म्हणून काम करत होत्या. त्यांनीच बाबासाहेबांची तपासणी केली आणि त्यांच्या लक्षात आलं की, बाबासाहेब मधुमेह, रक्तदाब, न्यूरायटीस, सांधेदुखी अशा विविध व्याधींनी अनेक वर्षांपासून त्रस्त होते. त्यात मधुमेहानं त्यांचं शरीर पोखरून जर्जर केलं होतं. संधिवातामुळे व त्याच्या दुखण्यामुळे ते रात्री बिछान्यात तळमळत पडून राहत असत. बाबासाहेबांच्या तपासणीत आढळलेल्या या आजारांबद्दल माहिती आत्मचरित्रात देताना माईसाहेब म्हणतात की, ‘समता प्रस्थापनेच्या आपल्या परम प्रिय ध्येयासाठी व पददलितांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी स्वतःच्या प्रकृतीची कधीही पर्वा केली नाही.’ बाबासाहेबांनी डॉ. मालवणकरांकडे उपचारास सुरुवात केल्यानंतर बाबासाहेबांना त्याचे चांगले परिणाम दिसू लागले होते. त्यामुळे बाबासाहेब भारतीय राज्यघटना लिहिण्याचे कार्यात व्यस्त झाले. तसेच मंत्रिपदाच्या जबाबदारी सोबत सांभाळावी लागे. बाबासाहेब दिल्लीत असताना, डॉ. मालवणकरांना फोन करून स्वतःच्याआरोग्यसंबंधी गोष्टी विचारत राहत. डॉ. मालवणकर त्यांना तातडीनं प्रतिसाद देत व उपचार सांगीत. जेव्हा बाबासाहेब मुंबईत येत तेव्हा आठवणीने दोन ठिकाणी आवर्जून जात, एक म्हणजे डॉ. एस. राव यांच्या इथं आणि दुसरं म्हणजे गिरगावात डॉ. मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये. या दोन्ही ठिकाणी माईसाहेबांची व बाबासाहेबांची भेट होत असे. 1947 च्या डिसेंबर महिन्यात बाबासाहेब मुंबईत आले असताना, डॉ. मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये गेले होते. तिथून तपासणी करून बाबासाहेब दादारमधील राजगृहात जाणार होते. माईसाहेब दादरमध्येच पोर्तुगीज चर्चसमोर राहत असत. त्यामुळे बाबासाहेबांनी विचारलं की, “चला तुम्हाला दादरला घरी सोडतो. मलाही राजगृहाला जायचं आहे.” याच दिवशी बाबासाहेब माईसाहेबांना म्हणाले, “हे पाहा डॉक्टर, माझे लोक व सहकारी मला आग्रह करत आहेत की सहचारिणी करा. परंतु, मला माझ्या आवडीची, योग्यतेची व अनुरूप स्त्री मिळणे फार कठीण आहे. पण माझ्या लोकांसाठी मला अधिक जगायला पाहिजे. अशावेळी काळजी घ्यायला कोणी तरी असणे आवश्यक आहे. अशा सुयोग्य स्त्रीचा शोध घेणे, मी तुमच्यापासूनच सुरू करतो.” हे ऐकल्यावर माईसाहेब संकोचल्या आणि त्यावर काय उत्तर द्यावं त्यांना कळलं नाही. बाबासाहेबांनी तातडीनं उत्तराची अपेक्षा ठेवली नाही आणि ते दिल्लीत निघून गेले. नंतर 25 जानेवारी 1948 रोजी दिल्लीतून माईसाहेबांच्या नावे एक पत्र आलं. ते बाबासाहेबांचं पत्र होतं. पत्रात त्यांनी लिहिलं होतं की, ‘मला सहचारिणी शोधण्याची सुरुवात तुझ्यापासूनच सुरू करीत आहे. अर्थात, जर तू तयार असशील तरच! तरी तू याचा विचार करून मला कळव’ याच पत्रात बाबासाहेबांनी लिहिलं होतं की, ‘तुझ्या नि माझ्या वयातील फरक व माझी प्रकृती ही अशी, या कारणांनी तू मला नकार जरी दिलास तरी मला बिलकूल दु:ख होणार नाही.’ दरम्यानच्या काळात माईसाहेब मोठ्या विचारात पडल्या. त्यांनी आधी डॉ. मालवणकरांशी चर्चा केली. डॉ. मालवणकर म्हणाले की, “आंबेडकरांनी जबरदस्ती केली नाहीय, त्यामुळे शांतपणे विचार करून योग्य काय ते तुम्ही स्वत:च ठरवा.” मग त्या गोंधळलेल्या अवस्थेत माईसाहेब यांनी स्वतःच्या मोठ्या भावाला बाबासाहेबांच्या लग्नाच्या मागणीबाबत सांगितलं. त्यावर माईसाहेबांचे ज्येष्ठ बंधू म्हणाले, “म्हणजे तू भारताची कायदेमंत्रीण होणार तर! अजिबात नकार देऊ नकोस. पुढे जा.” भावाच्या वाक्यांनी माईसाहेबांना आधार मिळाला आणि त्यांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं आणि होकार कळवला. लग्नासाठी होकार देऊन दीन-दलितांच्या राजाची जबाबदारी मी स्वीकारली होती,’ असं माईसाहेब आत्मचरित्रात म्हणतात. माईसाहेबांच्या होकाराचं पत्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बाबासाहेबांना मिळालं. त्याच आठवड्यात बाबासाहेबांनी माईसाहेबांना एक सोन्याची साखळी पाठवली. त्या साखळीच्या पॅडॉलवर नांगर (बोटी नांगरणारा) कोरलेला होता. ही साखळी बाबासाहेबांचे निकटवर्तीय शंकरानंद शास्त्रींनी माईसाहेबांकडे आणून दिली. त्यानंतर दोघांमध्ये नियमित पत्रव्यवहार सुरू झाला. या पत्रांमध्ये माईसाहेब आणि बाबासाहेब एकमेकांना अनुक्रमे ‘शरू’ आणि ‘राजा’ असा उल्लेख करत. 20 फेब्रुवारी 1948 रोजी लिहिलेल्या पत्रात बाबासाहेबांनी ‘राजा’ शब्दाबद्दल लिहिलंय. ‘Dearest Sharu…’ अशी सुरूवात करून पत्राच्या शेवटी ‘With Fondest and Deepest Love, from Raja’ असं लिहिलं आहे. बाबासाहेब इतरांना पत्र लिहिताना ‘भीमराव आंबेडकर किंवा बी. आर. आंबेडकर’ असं शेवटी लिहित. केवळ माईसाहेबांच्या पत्रांमध्ये ते स्वत:चा ‘राजा’ असा उल्लेख करत. ‘राजा’ शब्दाबद्दल या पत्रात बाबसाहेब म्हणतात की, “एलफिन्स्टन महाविद्यालयातील माझे विद्यार्थी मला या नावानं हाक मारत. तुलाही ते कसं सूचलं? आणि तुला आवडत असेल ते तर तू ‘राजा’ म्हण.” पुढे एकमेकांना पाठवलेली सर्व पत्रं ‘शरू’ने तिच्या ‘राजा’ला आणि ‘राजा’नं त्याच्या ‘शरू’ला लिहिलेलीच होती. माईसाहेबांसोबत लग्न करण्याचे ठरल्यानंतर बाबासाहेबांनी कमलाकांत चित्रे, डॉ. मालवणकर, दौलत जाधव, भाऊराव गायकवाड यांसारख्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा केली तसेच ‘फ्री प्रेस जर्नल’चे डॉ. नायर यांनाही त्यांनी कळवले. डॉ. नायर आणि बाबासाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध असण्याला कारण होतं ते डॉ. नायरांचं बुद्धाबाबतचं आकर्षण. मुंबई सेंट्रलच्या नायर हॉस्पिटलच्या आवारात बुद्ध विहार होत. बाबासाहेब मुंबईत असताना त्यांना विश्रांतीची गरज वाटल्यास, ते डॉ. नायरांच्या जुहू येथील बंगल्यात राहायला जात असत. लग्न आधी मुंबईत करण्याचं ठरल होतं. मात्र, ते दिल्लीत पार पडलं. दिल्लीत गुरुवारी, 15 एप्रिल 1948 रोजी बाबासाहेब आणि माईसाहेबांचं लग्न झालं. भारत व पाकिस्तान या देशाची फाळणी, गांधी हत्या या सर्व पार्श्वभूमीवर देशातील वातावरण तणावाचे होते. त्यामुळे लग्नाचा समारंभ छोटेखानीच असावा आणि या समारंभाला अधिक प्रसिद्धी मिळू नये, असं मत बाबासाहेबांचं होतं. त्यावेळी बाबासाहेब दिल्लीतील ‘1, हार्डिंग्ज अव्हेन्यू’ या सरकारी बंगल्यात राहत असत. नोंदणी पद्धतीनं याच बंगल्यात लग्नाची प्रक्रिया पार पडली. निवडक लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. त्याच दिवशी संध्याकाळी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी भारताचे तत्कालीन गव्हर्नर-जनरल लॉर्ड माऊट बॅटन यांचा खास दूत पाठविला होता. स्वागतसमारंभ आटोपल्यावर बाबासाहेब आणि माईसाहेब सरदार पटेलांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी सरदार पटेल हृदयविकाराच्या त्रासामुळे आजारी होते. आजारामुळे बेडवरूनच पटेलांनी बाबासाहेब-माईसाहेबांना शुभेच्छा दिल्या. लग्नावेळी बाबासाहेबांचं वय 57 वर्षे, तर माईसाहेबांचं वय 36 वर्षे होतं. त्यात आधी उल्लेख केल्याप्रमाणे बाबासाहेब नाना आजारांनी त्रस्त होते. आपल्या लोकांसाठी जगलं पाहिजे, त्यामुळे आपली काळजी घेणारी सहचारिणीची गरज आहे, असं ते म्हणत. बाबासाहेबांनी माईसाहेबांशी लग्न केलं. त्यांना त्यांच्या प्रकृतीची नीट कल्पना होती. त्माईसाहेबांना 21 फेब्रुवारी 1948 रोजी लिहिलेल्या एका पत्रात बाबासाहेब त्यांची काळजी व्यक्त करतात. बाबासाहेब त्या पत्रात लिहितात, ‘सार्वजनिक कार्यास वाहून घेतल्यामुळे राजाने कसलाच द्रव्यसंग्रह केला नाही. पोटापुरता व्यवसाय या पलिकडे शरूच्या राजाला काही करत आले नाही. शरूच्या राजाला पेन्शन नाही. शरूचा राजा निरोगी असता तर काही विपदा नव्हती. परंतु रोगपीडित असल्यामुळे संशय वाटतो आणि शरूचे काय होईल, याची आठवण झाली म्हणजे मन उद्विग्न होते. भगवान बुद्ध यातून काहीतरी मार्ग काढील, असा शरूच्या राजाला विश्वास आहे.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सानिध्यात माईसाहेबांना नऊ वर्षांचा सहवास लाभला. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचं परिनिर्वाण झालं. बाबासाहेबांच्या संघर्षात माईसाहेब मित्र, परिचारिका व डॉकटर बनल्या. मात्र, बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतरही त्यांना संघर्ष व होणारा मानसीक त्रास हा प्रचंड होता. ‘माझ्यानंतर माझ्या शरूचे काय होईल?’ ही बाबासाहेबांची चिंता खरीच ठरली. आंबेडकरी जनता बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी यांना न्याय देऊ शकले नाही. उलट त्यांच्यावर घाणेरडे आरोप करण्यात या जनतेने धन्यता मानली. बाबासाहेबांच्या निधनानंतर काही दिवसातचं हे असे घाणेरडे कृत्य’ सुरू नि बाबासाहेबांच्या परिनिर्वाणा हे घडवलं गेलं, असा प्रत्यक्ष प्रश्न उपस्थित केला गेला. हा आरोप बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक सहकारी करीत होते. आरोपी पिंजऱ्यात माईसाहेब आंबेडकरांकडे अंगुली निर्देश होता. बाबासाहेबांचं एक वाक्य आहे. बाबासाहेब म्हणाले होते : “The Successful rekindling of this dying flame is due to the medical skill of my wife and Dr. Malvankar. I am immensely grateful. They alone have helped me to complete the work.” (“माझ्या विझणाऱ्या प्राणज्योतीला हे तेज प्राप्त झालं आहे त्याचं श्रेय माझी पत्नी आणि डॉ. मालवणकरांना जातं. मी त्यांचा ऋणी आहे. माझं कार्य त्यांच्यामुळे पूर्ण होऊ शकलं.”) बाबासाहेबांच्या या लिखाणावरून माईसाहेबांचं त्यांच्या आयुष्यातील महत्व बाबासाहेबांनी अधोरेखित केलेले आहे. 1947 ला भारतीय घटनेचा कच्चा खर्डा पूर्ण केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना विश्रांतीची आवश्यकता वाटू लागली, औषधोपचारासाठी ते मुंबईस आले. म्हातारपणी आपली काळजी घेईल अशी सोबत त्यांना पाहिजे होती. ज्या रुग्णालयात ते विश्रांती घेत होते, त्यातच कुमारी शारदा कबीर नावाच्या डॉक्टर काम करीत होत्या. ऑगस्ट 1947 पासून बाबासाहेब स्वतःच्या प्रकृतीविषयी चिंताक्रांत झाले होते. त्यांची प्रकृती झपाट्याने ढासळत होती. मागील पंधरा दिवस बाबासाहेबांच्या डोळ्याशी डोळा लागलेला नाही, असे त्यांनी ऑगस्ट 1947 मध्ये एका पत्रात लिहिले. रात्र पडली म्हणजे त्यांना मोठी भीती वाटत असे. अनेक दिवस त्यांचे मज्जातंतूचे असाध्य दुखणे रात्री सुरू होई. त्यांना कण्हत सर्व रात्र काढावी लागे. त्या दिवसांत ते इन्शुलीन घेत असत. होमिओपाथिक औषधेही घेत असत. परंतु बाबासाहेबांना कुठलेच औषध लागू पडेना. त्यामुळे नाईलाजाने ते म्हणत, ‘जे बरे होत नाही ते सहन करावयास मी आता शिकत आहे.’ ऑगस्ट 1947 मध्ये मुंबईचे डॉक्टर काय म्हणतात याविषयी बाबासाहेबांनी या पत्रात चौकशी केली होती. जानेवारी 1948 मध्ये बाबासाहेबांनी लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी अशी कहाणी सांगितली आहे. त्यांच्या पायांतील वेदना पहाटे सुरू होऊन दिवसभर चालू राहतात. त्यानंतर एका महिन्याने कमलाकांत चित्रे यांना लिहिलेल्या पत्रात बाबासाहेब म्हणतात, ‘माझी प्रकृती एकाएकी ढासळली आहे आणि दुखण्याने फिरून उचल खाल्ली आहे. चार दिवस डोळ्याशी डोळा लागलेला नाही. पायांतील वेदना तर असह्य झाल्या आहेत. रात्रभर जागरण करून नोकरांना त्यांची सेवा करावी लागली. दिल्लीतील दोन नामांकित वैद्यांनी मला तपासले. त्यांचे मत असे पडले की, पायांतील वेदना त्वरित थांबल्या नाहीत, तर त्या नेहमीच राहतील आणि कधीच बऱ्या होणार नाहीत. माझ्या प्रकृतीची काळजी घ्यायला कोणीतरी माणूस पाहिजे. या तुमच्या सूचनेचा मी पूर्वीपेक्षा आता अधिक आस्थेने विचार करीत आहे. मी डॉक्टर कबीर हिच्याशी विवाहबद्ध व्हायचे ठरविले आहे. माझ्या आढळात तिच्याइतकी योग्य जोड दुसरी नाही. बरोबर किंवा चूक असो, हा मी निर्णय ठरविला आहे. याविषयी तुम्हांस काही सांगावयाचे असल्यास तसे कळवा. नाशिकचे भाऊराव गायकवाड यांनाही बाबासाहेब आंबडकरांनी स्वतःच्या संकल्पित विवाहासंबंधी माहिती दिली. त्यात ते म्हणाले, ‘पहिल्या पत्नीच्या निधनानंतर पुन्हा लग्न न करण्याचा मी निर्धार केला होता. परंतु आता दुसरा विवाह करण्याचा मी निर्णय ठरविला आहे. (सविता कबीर) जी सुगृहिणी असून वैद्यकशास्त्रातही पारंगत आहे. अशा पत्नीची मला आवश्यकता आहे. दलित समाजात अशी स्त्री सापडणे अशक्य असल्याने मी एका सारस्वत बाईची निवड केली आहे. “आपला एक सहकारी, माझा मुलगा यशवंत आणि माझी नियोजित पत्नी डॉ. कबीर यांची मने एकमेकांविषयी कलुषित करीत आहे. हे मला कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे” असे त्यांनी कमलाकांत चित्रे यांना लिहून पुढे म्हटले, ‘लग्न पुढे ढकलले तर याविषयी लोकांत दिवसेंदिवस जास्त वभ्रा होईल. आणि दुष्ट लोक माझी बदनामी करावयास ती एक मोठी पर्वणीच साधतील, अशी मला भीती वाटते. त्यामुळे एप्रिल १५ ला मी विवाहबद्ध होण्याचे निश्चित केले आहे. लग्नसमारंभाला चित्र्यांनी उपस्थित राहावे अशी विनंती करून बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्रात पुढे म्हणतात, ‘ही गोष्ट करण्यात मी काही नैतिक गुन्हा करीत आहे असे मला वाटत नाही. तक्रार करायला मी कोणालाही जागा ठेवलेली नाही. यशवंतला सुद्धा नाही.. त्याला मी आजपर्यंत सुमारे तीस हजार रुपये दिले असून, कमीत कमी ऐशी हजार रुपये किंमतीचे एक घरही दिले आहे. माझी खात्री आहे की कुठल्याही बापाला आपल्या मुलाकरिता जे करता येईल त्यापेक्षा मी माझ्या मुलाकरिता जास्त केले आहे.’ लग्न ठरल्यावर डॉ. कु. शारदा कबीर या विमानाने नवी दिल्ली येथे गेल्या. 15 एप्रिल 1948 ला सकाळी आंबेडकरांच्या दिल्ली येथील हार्डिज एव्हिन्यू या निवासस्थानी त्यांच्याशी त्यांचा विवाह झाला. दोन दिवसांपूर्वी बाबासाहेब आंबेडकरांना 56 वर्षे पूर्ण होऊन त्यांनी 57 व्या वर्षात त्यानी पदार्पण केले होते. त्यांच्या विवाहाच्या प्रसंगी काही थोडे निवडक मित्र उपस्थित होते. त्यांना दुपारी आंबेडकरांनी लग्नाप्रीत्यर्थ भोजनही दिले. या लग्नाविषयी न्यूयॉर्क टाइम्स लिहितो. “एखाद्या संस्थानिकाने सामान्य बाईशी लग्न करण्यात जे वैशिष्ट्य आहे त्यापेक्षा जास्त वैशिष्ट्य आंबेडकरांच्या ह्या विवाहाला आहे.” बाबासाहेब आंबेडकर व माईसाहेब यांच्यात 15 एप्रिल 1948 लग्नापूर्वी झालेल्या पत्रव्यवहार मध्ये असे स्पष्टपणे दिसून येते की त्या दोघांत एक अतूट मैत्रीचे नाते निर्माण झालेले होते. (टीप: बाबासाहेब आंबेडकर व माईसाहेब आंबेडकर यांचे जवळपास 30 पत्र संग्राहक लोकांकडे जपून ठेवलेली आहेत. जे प्रकाशित करायला आजपर्यंत कोणीही दखल घेतलेली नाही.) या पत्रात त्यांनी व्यक्त केलेले विचार हे मैत्रीपूर्ण व तात्विक होते. याचा दाखला आहे. यात माईसाहेब यांचे अनेक क्षेत्रांत असलेले वाचन, माहिती व बौद्ध धर्मात असलेली आवड स्पष्टपणे निदर्शनास येते. (संग्राहक अभ्यासका कडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे) यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सवितामाई यांना तावून, तपासून अनेक महिन्याच्या संवादानंतर व बाबासाहेबांची आजारी परिस्थितीची जाणीव ठेवून लग्न करण्यासाठी दोघांनी समंती दिली. बाबासाहेब आंबेडकरांनी माईसाहेब यांच्यासंदर्भात आज प्रकाशित झालेले उपलब्ध दस्तावेज “द बुद्ध अँड हिज धम्म” या धम्म ग्रंथाची प्रस्तावना जी प्रथम (सुरुवाती) छापलेल्या या धम्मग्रंथात मुद्दाम हेतुपुरस्सर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वानानंतर छापल्या गेली नव्हती!” कारण माईसाहेब यांच्याविरोधात काही राजकिय नेत्यांनी स्वार्थपूरक हेतू ही प्रस्तावना लपवून ठेवली होती. माईसाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात प्रशंसा केलेली ही प्रस्तावना जवळपास 1995 काळात प्रथमच ही प्रस्तावना छापण्यात आली! तोपर्यंत माईसाहेब आंबेडकर यांच्याविरोधात अनेक लिखाण झालेले होते व पुस्तक लिहिण्यात आलेले होते. “धम्मग्रंथातील या प्रस्तावानेवर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 डिसेंबर 1956 ला शेवटचा हात फिरवला होता, ही माहीती नानकचंद स्वतः सांगत असत व उपलब्द आहे!” “या प्रस्तावने मध्ये बाबासाहेब आंबेडकर हे माईसाहेब सविता आंबेडकर यांच्याबद्दल प्रशंसा करीत आहेत!” यात बाबासाहेब लिहतात, “या पुस्तकाचे कार्य मी जेव्हा आरंभले तेव्हां मी आजारी होतो. आणि आजही आजारी आहे, काही वेळेस माझी स्थिती इतकी गंभीर झाली की डॉक्टर मला विजवती ज्योत समजायचे. या विझवणाऱ्या ज्योतीला पुन्हा जीवन देणे याकरीता माझ्या पत्नीच्या (माईसाहेब सविता आंबेडकर) आणि डॉ मालवणकर यांच्या ‘वैद्यकीय कौशल्याने’ शक्य झाले. मी त्यांचा हार्दिक आभारी आहे त्यांनी हे कार्य पूर्ण करण्यास मला मदत केली.” 5 डिसेंबर 1956 चे बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचा हात फिरवलेले दस्तावेज म्हणजे ही प्रस्तावना एकप्रकारे माईसाहेब यांचे कर्तृत्व सांगणारी आहे. सोबत ते माईसाहेब यांना निर्दोष शाबीत करणारे एक ऐतिहासिक दस्तावेज आहे. ज्याला मृत्यूपूर्वीचे दस्तावेज म्हणजेच “विल” म्हणतात ते आहे. धम्मग्रंथातील या प्रस्तावनेत बाबासाहेब आंबेडकर हे स्पष्टपणे माईसाहेब आंबेडकर यांच्यामुळे मी 1948 नंतर चे जीवन जगत आहेत असे म्हणत आहेत व आभार प्रकट करून कृतज्ञता व्यक्त करत आहेत! त्यामुळे जे ही माईसाहेब सविता आंबेडकर यांच्यावर आरोप लावणारे अज्ञानी लोक आहेत, ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्त केलेल्या आभार या कृतज्ञे बद्दल अवहेलना करून बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान व विरोध करीत आहेत हे निदर्शनास स्पष्टपणे येते! असे लोक स्वतःच्या आईवर संशय घेत आहेत असेच दिसते. आईसाहेब सवितामाई ही प्रथम धर्मांतरित उपसिका बौद्ध स्त्री आहे हे यांना विसर पडतो आहे. 1948 च्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांचे आरोग्या हे तंदुरुस्त होते असे काही लोकांना वाटत. (1) ज्यावेळेस बाबासाहेब व माईसाहेब यांचे लग्न झाले त्यावेळी बाबासाहेब यांचे वय 57 वर्ष होते व बाबासाहेब यांचे परिनिर्वाण समयी वय हे 65 वर्ष होते! बाबासाहेब हे 1948 ला अनेक आजारांनी त्रस्त व अस्वस्थ होते! त्यांना नियमित डाक्टर ची आवश्यकता होती व तोही त्यांच्या सतत 24 तास सोबत राहूनच आरोग्या ची काळजी घेणारा! बाबासाहेब याना मधुमेह, Bp, पायाचा त्रास व इतर आजार होते! बाबासाहेबाना रोज जेवण्यापूर्वी इन्सुलिन चे इंजेक्शन घ्यावे लागत असे! डॉक्टर च्या सल्ल्याने रोज नियमित वेळेवर औषध घ्यावे लागत असे! बाबासाहेब यांना चालण्याचा त्रास होता, असाध्य गुडघे दुखी व पायातील असह्य वेदना मुळे त्यांना चालणेही मुश्किल झाले होते! (2) 24 तास बाबासाहेब याांना त्यांना काळजी घेण्याकरिता सोबतीची व एका प्रगत मित्राची अत्यंत आवश्यकता होती. जो विचाराची आदान व प्रदान करू शकेल व ज्याला इंग्रजी व इतर भाषेवर ज्याचे प्रभुत्व आहे. हे सर्व गुण माईसाहेब यांच्यात होते. भारतीय घटना/संविधान लिहण्याची महत्वाची जबाबदारी बाबासाहेब यांनी स्वतःच्या शिरावर घेतलेली होती! “या महत्वाच्या क्षणी बाबासाहेब यांचे आरोग्य व्यवस्थित राहणे गरजेचे होते!” त्यामुळे बाबासाहेब यांनी त्यांचे मैत्रीचे संबंध असणाऱ्या माईसाहेब सविता कबीर यांच्याशी लग्न केले! माईसाहेब यांनी ही जबाबदारी समर्थ पणे सांभाळली. संपूर्ण भारताचे संविधान मान्य होत असताांना बाबासाहेब यांचे आरोग्य व स्वास्थ चांगले ठेवण्याकरिता माईसाहेब यांनी अहोरात्र मेहनत घेतली व प्रयत्न केले. त्यामुळे बाबासााहेबांना आज सारा जग भारतीय संविधान निर्माते म्हणून मान्यता देतो. याच्या श्रेयात माईसाहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. बाबासाहेब यांच्या संविधान लिखाण करताना अनेक वेळा त्यांना माईसाहेब यांनी स्वतः लेखनामध्ये मदत केलेली आहे असे पुरावे उपलब्द आहेत. (3) भारताच्या संविधान लिहण्यापूर्वी बाबासाहेबांचे काही बरे वाईट झाले असते किंवा त्याची हत्या केली असती, तर आज भारताचे संविधान निर्माते व संविधान हे वेगळ्याच स्वरूपात असते व ती वेळ बाबासाहेबांची हत्या करण्यात योग्य वेळ होती! हे आरोप करणारे सांगत नाहीत यावरून त्यांचा हेतुवर संशय निर्माण होतो. भारतीय संविधान लिहिन्यापूर्वी व पूर्ण करण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्य झाला असता तर एकवेळ बाबासाहेब यांची हत्या केली हा आरोप लावता येऊ शकत होता व त्याला योग्य कारणे होती! परन्तु ज्या माईसाहेब यांनी बाबासाहेबाना संविधान निर्मितीस साहाय्य केले! त्या माईसाहेब यांच्यावर बाबासाहेब यांच्या हत्या करण्याचा आरोप करणे म्हणजेच बिन बुडाचा आरोप करणे होय व तो विसंगत व अतार्किक आहे व सिद्द ही होत नाही! स्वतःचा स्वार्थ पूर्तीसाठी माईसाहेब यांचा नाहक बळी या द्वेषमूलक लोकांनी केलेला दिसत आहे. (4) 26 नोव्हेम्बर 1950च्या पूर्वी बाबासाहेब यांचा मृत्यू झाला असता तर हत्या माईसाहेब यांनी केली असती असे गृहीत धरले जाऊ शकत होते. कारण संविधान निर्मिती बाबासाहेब यांनी करू नये म्हणून, माईसाहेब यांनी बाबासाहेब यांची हत्या केली असा आरोप सिद्ध करता आला असता! परन्तु माईसाहेब यांनी त्यावेळेस बाबासाहेब याना साहाय्य करून त्यावेळच्या आम्हा “अस्पृश्य समाजावर व भारतीय जनतेवर न फेडणारे ऋण केले आहे.” व याची कृतज्ञता कोणीही दाखवत नसेल व उलटे माईसाहेब यांच्यावरच बाबासाहेब यांच्या हत्येचा आरोप लावत असेल तर त्यांनी स्वतःची कुवत प्रथम तपासावी व स्वतःची बाबासाहेब यांच्यावर असणारी इमानदारी तपासावी!
5) 1950 नंतर हिंदु कोड बिल पर्यंत माईसाहेब यांनी बाबासाहेब यांच्या आरोग्याची काळजी अत्यंत इमाने इतबारे केली त्यामुळे बाबासाहेब हिंदू कोड बिल लिहू शकले!
(6) बाबासाहेब यांनी लिहलेले अनेक महत्वपूर्ण लिखाण जसे क्रांती व प्रतिक्रांती, बुद्ध आणि त्यांचा धम्म व इतर महत्वपूर्ण लिखाण हे माईसाहेब यांच्या मदती विना बाबासाहेबांना लिहणे अशक्य होते!
आरोग्य व्यवस्थित राहिले तर मनुष्याचे मन व शरीर ही तंदुरुस्त असते! व बाबासाहेबांचे मन व शरीर तंदुरुस्त ठेवण्याची महत्वपूर्ण कार्य माईसाहेब यांनी केलेले आहे!
(7)1956 च्या बौद्ध धर्म दीक्षा घेण्याकरिता बाबासाहेब आंबेडकर यांना जीवित ठेवण्याचे महत्वपूर्ण कार्य हे माईसाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. हे आम्ही जे ही आंबेडकरी बौद्ध आहोत ते विसरू शकत नाही!
(8) आम्ही जे ही आज स्वतः ला बौद्ध म्हणवतो “त्यात सिहांचा वाटा एकट्या माईसाहेब आंबेडकर यांचाच आहे!” बाकी कोणाचा असेल हे सिद्ध होत नाही! त्यामुळे आज आम्ही हिंदू नाहीत व बौद्ध आहोत. “त्याचे पूर्ण श्रेय बाबासाहेब आंबेडकर यांनाच जाते” तर ते सोबतच माईसाहेब आंबेडकर यांनाही द्यावे लागते!
कारण माईसाहेब या त्यावेळेस हिंदू होत्या त्यामुळे बाबासाहेब यांची हत्या माईसाहेब यांनी बौद्ध धम्म दीक्षेपूर्वी केली असती तर त्यांच्यावर चा आरोप सिद्ध करता आला असता.
(9) बाबासाहेब आंबेडकर व माईसाहेब आंबेडकर या दोघांनी भिक्खू चंद्रमणी कडून बौद्ध धर्माची दीक्षा एकाच वेळेस घेतलेली आहे. त्यामूळे माईसाहेब या आम्हां आंबेडकरी बौद्ध जनतेच्या बौद्ध आई किंवा माता आहेत! त्यांच्या विरोधात बाबासाहेब यांच्या हत्येचा आरोप करणारे अनेक लोक हे राजकिय स्वार्थाने ग्रस्त व विकृत मानसिकतेचे लोक होते!
या लोकांनी बाबासाहेब यांच्या बौद्ध धर्म दीक्षेला विरोध केलेला आहे व स्वतःचे महत्व व स्वार्थ साधण्याचे प्रयत्न केलेला आहे!
बौद्ध धर्मीय माईसाहेब आंबेडकर या राजकीय लोकांना अडसर झालेल्या होत्या व यातील अनेक मंडळी ही हिंदू होती व त्यांनी त्यावेळे पर्यंत बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली नव्हती!
त्यामुळे स्वतः च्या राजकीय हेतूंची पूर्तता करण्याकरिता सुशिक्षित , “डॉक्टर व नेतृत्व गुण असणाऱ्या माईसाहेब यांच्यावर हत्येचा आरोप लावण्याकरिता यांनी नानकचंद्र रतु , सोहनलाल शास्त्री व इतर तसेच दिल्ली येथील लोकांच्या मदतीने माईसाहेब आंबेडकर यांच्यावर हत्येचा आरोप” लावला. सामान्य बौद्ध व त्यावेळच्या अस्पृश्य जनतेस जाऊन प्रचार केला व माईसाहेब यांच्या विरोषात जनतेस भडकावले व हे सर्व त्यावेळच्या राजकीय नेत्यांनी केलेले वाईट व नीच कृत्य आहे!
सर्वसाधारण जनता ही नेत्यांचे म्हणणे ऐकणारी व बहुतांश अशिक्षित असल्यामुळे माईसाहेब आंबेडकर यांच्यावर बाबासाहेब यांच्या हत्येचा आरोप लावण्यात आला! परंतु माईसाहेब आंबेडकर यांच्यावर तो सिद्ध करता आलेला नाही व तो सिद्दच होत नाही! कारण हत्या करण्याकरिता जो हेतू लागतो तो बौद्ध धर्मीय माईसाहेब आंबेडकर यांच्याजवळ 5 डिसेंबर 1956 ला नव्हता!.
आज जे ही माईसाहेब आंबेडकर यांच्यावर बाबासाहेब यांच्या हत्येचा आरोप लावत आहेत ते बहुतांश मंडळी ही दलित स्वतःला म्हणवून घेणारी व आजपर्यंत बौद्ध धर्मदीक्षा न घेणारी हिंदू मंडळी आहे!

उमेश गजभिये.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!