जातीच्या नावाने शोषणाची व्यवस्था उभी करणा-यांचे विषारी दात आपल्याला तोडायचे आहेत-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“स्वातंत्र्यचळवळ अशा वर्गाच्या हातात होती की, ज्यांच्यापैकी बहुतेकांना फक्त सत्तांतरात रस होता. मूलभूत सामाजिक संरचनाच बदलायला हवी, याविषयी त्यांना कळकळ नव्हती. मात्र, पुढे या प्रक्रियेत असे लोकही सहभागी झाले, की ज्यामुळे हा लढा व्यापक झाला.”
हे अन्य कोणी नाही, साक्षात पं. नेहरूंनी म्हटले आहे. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’त तसा थेट उल्लेख आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते, तर ते फक्त सत्तांतर झाले असते आणि खुद्द्द विन्स्टन चर्चिल यांनी म्हटल्याप्रमाणे ब्रिटिशांऐवजी ब्राह्मणशाहीच्या हातात सगळी सूत्रे गेली असती. ब्रिटिश परवडले, पण ही व्यवस्था नको, असे म्हणण्याची वेळ आली असती.
बाबासाहेबांनी कोरेगाव भीमाच्या स्मृतिस्तंभावर बोलताना सांगितले होते- ब्रिटिशांना आपला विरोधच आहे. पण, आपला विरोध आधी इथल्या जातपितृसत्ताक व्यवस्थेला आहे. आणि, एकाच वेळी आपण दोन शत्रूंशी लढू शकत नाही. ब्रिटिशांमुळे का असेना, पण इथल्या शोषक व्यवस्थेवर अंकुश आहे. ब्रिटिश गेले, तर हे सगळे मोकाट होतील. म्हणून ब्रिटिश जाताना, नवी व्यवस्था ही समतेवर आधारित आहे, याची ग्वाही पटायला हवी. कोरेगाव भीमाच्या युद्धात महारांनी पेशव्यांचा पराभव केला, हे महत्त्वाचे. कारण, जातीच्या नावाने शोषणाची व्यवस्था उभी करणा-यांचे विषारी दात आपल्याला तोडायचे आहेत. हेच शूर महार उद्या ब्रिटिशांचाही पराभव करतील. ब्रिटिशांविषयी आम्हाला प्रेम नाही. पण, समतेची ग्वाही, ही पूर्वअट आहे.”
गांधी-नेहरू आणि कॉंग्रेसच्या अजेंड्यावर हा मुद्दा आला, तो बाबासाहेबांमुळे. ‘मला जन्मभूमीच नाही’, असे म्हणणारे बाबासाहेब भेटल्यानंतरच राष्ट्रपित्याला ख-या अर्थाने ‘राष्ट्र’ समजले असेल. बाबासाहेबांचे अनेक मुद्दे गांधी वा नेहरूंनी नाकारले असतीलही, पण त्या दबावाचा परिणाम होत गेला. हृदयपरिवर्तन होत गेले. देशाच्या राजकारणाच्या मुख्य भूमीवर हा मुद्दा आला. त्यासाठी बाबासाहेबांना करावा लागलेला संघर्ष विलक्षण होता.
आजवर आपल्या विरोधात बोलण्याची एकही संधी न सोडणारे बाबासाहेब देशाच्या उभारणीविषयी बोलताना मात्र आपल्याच भाषेत बोलतात, हे नेहरूंना समजले ते १३ डिसेंबर १९४६ रोजी. स्वतंत्र भारताच्या मागणीचा ठराव सभागृहात मंजूर झाला, तेव्हा बाबासाहेबांनी केलेले भाषण ऐतिहासिक होते. हा ठराव मांडला नेहरूंनी आणि मग बाबासाहेब बोलले. “आज आपण सगळे वेगवेगळ्या शिबिरांचे सेनापती आहोत. मीही एका छावणीचा नेता आहे. पण, ही वेळ छावण्यांची नाही. नवा एकसंध देश उभारण्याची आहे. आणि, त्यासाठी आपण सगळे एकत्र आहोत”, हे बाबासाहेबांचे शब्द, त्यांची मांडणी याने भलेभले त्यांच्या प्रेमात पडले. आपल्या विरोधात काल-परवा निवडणुका लढवून कॉंग्रेसला पळता भुई थोडी करणारा हा नेता देश उभारताना मात्र आपल्यासोबत आहे, हे समजल्यानंतर नेहरूंसह अनेकांना धक्का बसला. या नेत्याचे खरे मोल त्यांच्या लक्षात आले.
मग, बॅरिस्टर एम. आर. जयकरांनी मुंबई प्रांतातल्या संविधान सभेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला, तेव्हा खुद्द नेहरू आणि पटेलांनी १९४७ मध्ये या जागेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव सुचवले. अशा प्रकारे कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर आंबेडकर संविधान सभेत आले. एकमेकांना टोकाचा विरोध करणारे नेते संविधान सभेत एकवटले आणि मग संविधान साकार झाले. तपशीलांबद्दल विरोध होतेच, पण मूळ आशयाबाबत या नेत्यांमध्ये काही मतभेद नव्हते.
“भक्ती हा आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकतो. मात्र, राजकारणात भक्ती हा अधोगतीकडे घेऊन जाणारा आणि हुकुमशाहीच्या दिशेने नेणारा मार्ग बनू शकतो”, हे बाबासाहेबांनी २५ नोव्हेंबर १९४९ च्या राज्यघटनेविषयीच्या अंतिम भाषणात सांगितले, तेव्हा नेहरूंनी दाद दिली. (बाबासाहेब द्रष्टे होते, हे तर खरेच!)
मुद्दा असा की, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या अधिष्ठानाविषयी, राष्ट्रवादाच्या मांडणीविषयी दोघांमध्ये मूलभूत मतभेद नव्हते. आजच्या प्रबुद्ध भारताचा पाया तिथे रचला गेला.
*
आज हे सारं मांडण्याचं कारण आहे – गेल ऑम्व्हेट यांचं नवं पुस्तक. ‘Ambedkar- Towards an Enlightened India’. मूळ इंग्रजी पुस्तक माझ्याकडं नव्हतं. पण सचिन वाघमारे यांनी केलेला ‘आंबेडकर- प्रबुद्ध भारताच्या दिशेने’ हा मराठी अनुवाद मिळाला. खूप चांगलं चरित्र आणि तेवढाच उत्तम अनुवाद. छोटंसं, पण महत्त्वाचं पुस्तक.
मधुश्री प्रकाशनाचे शरद अष्टेकर यांचे हे केवढे उपकार आहेत, की अशी एकापेक्षा एक थोर पुस्तकं ते मराठी वाचकांना देताहेत. खूप मोठं काम आहे हे.
*
आणि, भाई अविनाश इंगळे हा तर अशी पुस्तकं डोक्यावर घेऊन जगभर पोहोचवणारा अवलिया तरूण आहे. अविनाशला सांगायचा अवकाश की शरद पाटील, डॉ. आ. ह. साळुंखे, हमीद दलवाई, डॉ. नरेंद्र दाभोलकर, न्या. पी. बी. सावंत अशी कोणत्याही लेखकाची पुस्तकं तो क्षणार्धात मिळवून देतो. त्यानंच त्याच्या शॉपमध्ये बोलावून हे पुस्तक दिलं.
परिवर्तनवादी नवी-जुनी अशी कोणतीही पुस्तकं हवी असतील, तर अविनाश हा हक्काचा वाटाड्या. अप्पा बळवंत चौकात त्याचं पुस्तक दालन तर आहेच, पण लंडनपासून दुबईपर्यंत त्याची पुस्तक पार्सल्स रोज जात असतात. शिवाय, हा तरणाबांड गडी (चक्क) समाजवादी- साम्यवादी वगैरे असूनही, एकदम उत्तम व्यवस्थापन करणारा. तगडा जनसंपर्क असलेला. चोख व्यवसाय करणारा. त्याचं पार्सलही असं असतं की त्या पॅकेजिंगनंच वाचक सुखावून जावा.
‘लोक वाचत नाहीत’, हा समज भाई अविनाशला भेटल्यावर गळून पडतो. अशा लॉकडाऊनमध्येही तो रोज शेकडो पुस्तकं पार्सल करतोय, विकतोय. (त्याचंही बरं चाललंय!)
याचा अर्थ चित्र आश्वासक आहे.
प्रबुद्ध भारताच्या दिशेने हा प्रवास आहे!
-संजय आवटे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत