धर्मचिकित्सेचे स्वातंत्र्य देणारा जगातील एकमेव धर्मसंस्थापक : तथागत बुद्ध ( बुद्ध जयंती, 23 मे 2024 )
प्रा. डॉ. आर.जे. इंगोले
भारतात अनेक धर्म आहेत आणि धर्मात कोणत्याही अनुयायांना त्यांचे धार्मिक ध्येय साध्य करण्यासाठी अनेक प्रार्थना ,उपासना कराव्या लागतात. हिंदू आणि इतर कांही धर्मात ईश्वर प्राप्ती करणे हे सामान्य अनुयायांचे उद्दीष्ट असते. आणि ते सतत प्रयत्न करीत असतात. आपल्याकडे संत परंपरा आहे यात अनेक धर्माचे अनुयायी भजन कीर्तन आणि इतर मार्गाचा अवलंब करतात. पण याचा आपण जास्त खोलवर विचार केला तर कोणाला काही प्राप्त झाले आहे असे एक तरी उदाहरण आजपर्यंत तरी दिसत नाही. म्हणजे कोणत्याही धर्माचा अनुयायी असेल तर त्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याने त्याच्या धर्माचे कितीही पालन केले म्हणजे सर्व प्रार्थना , पूजा–अर्चा केल्या अनेक विधी केले असतील आणि असे लोक आहेत अनेक धर्मात पण त्याचे अंतिम उद्दीष्ट जे आहे म्हणजे ईश्वर प्राप्तीचे हे मात्र साध्य झालेले नाही. आणि मग काय होते तर त्याचे वर्तन चांगले असल्यामुळे त्याला इतर फायदे होतात जसे: त्याला कोणतेही व्यसन नसते , तो खोटे बोलत नाही ,कोणाला फसवत नाही आणि अशा वर्तनामुळे त्याला जीवनात काही प्रमाणात समाधान मिळते आणि असे समाधान कोणालाही मिळू शकते. कारण हा चांगल्या वर्तनाचा परिणाम आहे. म्हणजे एखाद्या कोणत्याही धर्माच्या अनुयायायाने इतर पूजा-पाठ न करता त्याचे वर्तन जरी चांगले ठेवले तरी त्याला त्याचे चांगले परिणाम दिसणार आहेत. याला वैज्ञानिक सत्य म्हणतात किंवा बुद्ध धम्मात कार्यकारणभाव म्हणतात. परंतु कार्यकारणभाव आणि धर्मातील विचार आणि तत्व याची चिकित्सा करायची नाही अशी आपल्या भारतीय अनेक धर्माने शिकवण दिली आहे. त्याला अपवाद फक्त बौद्ध धर्म (धम्म) हा एकच आहे. इतर धर्मात तुम्हाला असे सांगितले जाते की, ईश्वर प्राप्त करून घ्यायचा असेल तर एक मध्यस्थ आहे त्याला मान्यता द्यावी लागेल आणि तरच तुमचे ध्येय साध्य होईल. परंतु बौद्ध धम्मात या सर्व काल्पनिक बाबींना फाटा दिला आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यात ईश्वराचे अस्तित्वच नसल्यामुळे सर्व सरळ आणि पारदर्शक आहे. हा प्रमूख फरक असल्यामुळे आज अनेक बौद्ध राष्ट्रे पुढे जात आहेत. आणि बौद्ध अनुयायी सुद्धा प्रगती करीत आहेत. कारण यांना कर्मकांड नाही , कोणतीही पूजा विधी ज्यात काहीतरी प्राप्त करण्यासाठी पुरोहित वर्ग असतो तसे काही नाही. आणि त्यामुळे आर्थिक फसवणूक नाही. तसेच बुद्धाला विहारात गेल्यावर काही दक्षिणा द्यावी लागत नाही. हे अगोदरच गरीब असणार्या समाजाचे आर्थिक शोषण होत नाही. आणि सतत प्रार्थना केल्यावर त्या अनुयायाला काही विशेष लाभ मिळणार आहे अशी भावना नाही. यामुळे तथागत बुद्धाने सरळ सांगितले आहे की, तुम्ही तुमचे जीवनाचे ध्येय साध्य करू शकता पण यात मी तुम्हाला विशेष असे काहीच देणार नाही तर ते तुम्हालाच स्वप्रयत्नाने साध्य करायचे आहे.
बौद्ध अनुयायांना एक स्पष्ट लक्षात आले की, आपण आपल्या जीवनात जर काही प्रयत्न केले तर काहीतरी प्रगती होणार आहे. आपण पुजा–अर्चा आणि इतर कर्मकांड करून काहीच फायदा नाही. त्यामुळे बौद्धचे अनुयायी प्रयत्नवादी तयार झाले. आज जगात अनेक बौद्ध राष्ट्रे प्रगतीवर आहे तसेच भारतात अनेक बौद्ध अनुयायी प्रगतीवर आहेत त्याचे कारण, त्यांचा पुजा–अर्चा आणि इतर कर्मकांडात वेळ,पैसा आणि श्रम वाया जात नाहीत तर ते तो वेळ इतर कार्यात वापरतात आणि यशस्वी होतात. आपल्या देशात अनेक काळापासून असेच सांगितले आहे की, आपण पुजा–अर्चा आणि ब्रह्मामण म्हणतील ते केले पाहिजे आणि त्यामुळे आज देशातील सर्व आर्थिक सत्ता , धार्मिक सत्ता आणि पर्यायाने राजकीय सत्ता या 3.50 टक्के ब्रह्मामण वर्गाच्या हातात आहे. आणि आपला बहुजन समाज दारिद्रयात जीवन जगत आहे. या बहुजन समाजाकडे सर्व काही आहे फक्त विचार नाहीत. आणि ब्रह्मामनांनी असे समाजात वातावरण तयार केले आहे की, बौद्ध धम्म हा हिदूविरोधी आहे. म्हणजे बौद्ध धम्मात वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आणि तो जर बहुजन समाजाने स्वीकारला तर या ब्रह्मामण वर्गाला भारतात कोणीच महत्व देणार नाही. कारण तुम्ही पहा भारतात बौद्ध ,मुस्लिम ,शीख आणि जैन या धर्मात ब्रह्मामण नाही त्यामुळे ब्रह्मामण त्यांचा आणि त्यात विशेष करून बौद्ध अनुयायांचा द्वेष करतो. कारण पूर्वी हा समाज हिंदू धर्माचा भाग होता.आणि आता नाही म्हणजे महात्मा फुले यांचा भाषेत बोलायचे तर मंदिर हे ब्रह्मामणांचा धंदा आहे. आणि त्यांचे आर्थिक नुकसान ते कसे सहन करतील ? आता यांचा इतिहास आहे यांनी आर्थिक प्रगती करण्यासाठी किती नको त्या गोष्टी स्विकारल्या आहेत. आणि चार्वाक नंतर तथागत बुद्ध हेच या वैदिक संस्कृतीला धक्का देणारे महापुरुष आहेत. यामुळे कधी या भटांनी आपल्या महापुरूषांना चांगले म्हटले तर हे हुरूळुन जाऊ नका हे त्यांचे नाटक असते. एक लक्षात ठेवा आपल्या राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी सत्यशोधक कोणाला म्हटले आहे तर ते म्हणतात “ सत्यशोधक शूद्र आणि अतिशुद्रच असू शकतो.” याचा अर्थ आज आपल्या समाजात अनेक लोक आपण सत्यशोधक आहोत असा जाहीर प्रचार करतात त्यापासून आपण सावध असले पाहिजे. त्यामुळे आपले बहुजन सोडून इतर कोणीही सत्यशोधक होऊ शकत नाही. परंतु आपल्याच अर्ध्या विद्वानांना असे वाटत आहे की, काही ब्रह्मामण सत्यशोधक असतात आणि मग आपले काही विद्वान यात फसतात आणि पूर्वी सुद्धा फसले आहेत. तर आपण यापासून सावध असले पाहिजे. सत्यशोधक होण्यासाठी वैज्ञानिक दृष्टी असावी लागते आणि त्यासाठी बुद्धाचे विचार आपणास समजून घ्यावे लागतात. आता या जगात परमेश्वर नाही .आत्मा नाही , स्वर्ग नाही या सर्व काल्पनिक बाबी भट असणार्या पुरोहितांना चांगले माहीत आहे. पण आता लोकांना सत्य सांगावे तर यांचे आर्थिक नुकसान एवढे मोठे होईल की, यांना जीवन जगणे मुश्किल होईल. कारण बहुजन समाजाला फसविणे हा एकमेव धंदा यांचा अनेक पिढयापासून चालू आहे. ते फसवतात आणि आम्ही फसतो. पण आता जागे झाले पाहिजे. आपल्या सर्व महापुरुषांनी आपणास हेच सांगितले आहे की, आपण या फालतू कर्मकांडात अडकले नाही पाहिजे. पण आता आपलेच लोक उच्च शिक्षित असूनसुद्धा आपल्या लोकांना सत्य सांगत नाहीत. कारण यांनीच शिक्षण हे पोटासाठी घेतले आहे. यांनी शिक्षण घेतले पण शिक्षणाचा उद्देश विसरले. शिक्षित व्यक्ती हा चिकित्सक असला पाहिजे. त्याने देव धर्म अशा बाबी चिकित्सा करूनच स्वीकारल्या पाहिजे. आणि असे झाले तर या जगात भारत महासत्ता होईल. कारण चिकित्सा करण्याची परंपरा आपल्या तथागत बुद्धाने जगाला दिली आहे. आज आणि पूर्वी सुद्धा तथागत बुद्ध हे प्रत्येक वैज्ञानिक असणार्या व्यक्तीचे आदर्श होते आणि आजही आहेत. सुरूवातीला प्रत्येक वैज्ञानिक बौद्ध तत्वज्ञान अभ्यासतो आणि मग त्याच्या आधारावर पुढे शोध लावतो आणि शेवटी त्याला समजते की, आपल्या देशात बर्याच गोष्टी या विनाकारण लोकांना सांगितल्या जातात आणि समाजाला दिशाहीन केले जाते. आणि म्हणून कांही वर्षापूर्वी आपल्याकडे एक विदेशी वैज्ञानिक आला होता त्याने आपल्या भारताबद्दल एक विचित्र निष्कर्ष काढला की, हा देश या देशातील सरकार नाही तर जे 36 कोटी देव आहेत ते चालवतात. म्हणजे चांगल्या भाषेत आपल्याला शिव्या देऊन गेला असेच म्हणावे लागेल. आपल्या देशात वर्षभर काही ना काही धार्मिक उपक्रम चालू असतात. हे सर्व उपक्रम खरे तर भारतीय समाजाला निष्क्रिय करतात आणि दैववादी बनवतात. पण आता आपल्याच देशातील एवढा महान तत्ववेत्ता (बुद्ध) आपणास सांगून गेला आहे पण ऐकणार कोण ? हा प्रश्न आहे. आपल्या भारतीय समाजाचे एक विशेष आहे की, जे सत्य असेल ते आपण कितीही मोठया व्यक्तीने सांगितले तरी त्याचे ऐकणार नाही. पण असत्य असेल आणि आपल्या समाजाचे नुकसान करणारे असेल तर आपण लगेच स्वीकारतो. आताचे उदाहरण घ्या असाराम आणि असे अनेक कथाकार आणि बाबा आपल्या भारतीय समाजाला अनेक वर्ष मागे नेत आहेत अनेक करोडो रुपयाचे नुकसान करीत आहेत पण आपला समाज त्यांनाच मानणार आणि विशेष म्हणजे उच्च शिक्षित यात जास्त आहे. त्यांना आज सुद्धा असाराम बापू निर्दोष वाटतो. आता याला काय म्हणावे ? आणि ही मानसिकता तयार केली जाते हेच यांना समजत नाही. कारण आपल्या देशात संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहले असल्यामुळे आणि ते एका भारतीय समजूतीप्रमणे एका अस्पृश्य व्यक्तीने लिहले आहे त्यामुळे इथल्या शंकराचार्याला ते मान्य होत नाही. आणि त्यामुळे आपला बहुजन समाजसुद्धा ते मान्य करीत नाही. असे का होते तर आपण कोणी काहीही बोलले तरी चिकित्सा न करता ते स्वीकारतो त्याचा हा परिणाम आहे. आणि त्यामुळे भारतीय संविधनाला विरोध करायचा आहे, त्यामुळे मग असाराम यांना निर्दोष वाटतो. आता एवढे षडयंत्र समजायला थोडी चिकित्सा करावी लागते. आणि त्यासाठी बुद्ध विचाराचा अभ्यास आणि स्वीकार करावा लागतो. जसे मानवाला सकस अन्न पचण्यास कठीण असते अगदी त्याचप्रमाणे चांगले विचार सुद्धा समाजाला सहज पचत नाहीत. आणि त्यामुळे मनाला पटत सुद्धा नाहीत हे वास्तव आहे . त्यामुळे समाजाला दरवर्षी आपल्या अनेक महापुरुषांच्या जयंती दिनी ते द्यावे लागतात. मग अनेक वर्ष गेल्यानंतर ते पटतात. आताचे उदाहरण घ्या दरवर्षी आपल्याकडे पाडवा येतो. आणि पाडव्याच्या दिवशी काय घटना झाली आहे हे आपणास माहीत आहे की, आपले बहुजनांचे राजे छ्त्रपती संभाजी महाराज यांची हत्या झालेली आहे. पण अनेक वर्षापासून आपला बहुजन समाज आपल्या घरावर गुढी उभारतो आणि गोडधोड खायला करतो. वास्तविक हे चूक आहे आपल्या घरातील कोणी मृत्यू पावले किंवा मारले गेले तर आपण करतो का ? तर नाही. पण आपल्या महाराष्ट्रात हे होते. पण कांही वर्षापासून आपल्या राज्यातील आ.ह. साळुंखे आणि इतर काही विचारवंतांनी हे लोकांना बोलून ,लिहून आणि प्रसार करून पटवून दिले आणि आज आपण पाहतो यात परिवर्तन होण्यास सुरुवात झाली आहे. आज महाराष्ट्रात कांही भागात घरावर गुढी नाही तर भगवी पताका दिसत आहे. आता हे परिवर्तन होण्यास इतकी वर्ष लागली आणि असेच असते सामाजिक परिवर्तन संथ गतीने होत असते. आणि त्यात आंबेडकरी समाज तर आणखी साधने कमी आहेत. त्यामुळे वेळ जरा जास्त लागणार आहे. पण आपल्याला थोडा संयम ठेवावा लागणार आहे. आपल्या भारतीय समाज मनावर एक सनातनी विचारांचा ताबा आहे. त्याला दूर करण्यास वेळ लागणार आहे. यात उच्च शिक्षित लोकांची भूमिका जास्त महत्वाची आहे. एखादे वळण मनाला पडले तर ते लवकर मोडत नाही. तसेच आहे आपल्याला जर रोज सकाळी चहा पिण्याची सवय असते तसे आहे. जर कोणी सांगितले सकाळी चहा पिणे बंद करा ते आरोग्याला अपायकारक आहे पण ती सवय लवकर बंद होणार नाही. कारण आपल्या मनाला आणि इंद्रियाला ती सवय झाली आहे. तसेच आपल्या वर्तणुकीचे असते. आपले पूर्वज मंदिरात जात होते ,अनेक धार्मिक विधी करीत होते . आता अचानक यात बदल करायचा म्हटले तर लवकर शक्य होत नाही.
तथागत बुद्ध यांचा धम्म आणखी एका बाबतीत इतर धर्मापेक्षा वेगळा आहे. तथागताच्या महापरिनिर्वाण वेळेच्या काहीकाळ अगोदर त्याचा शिष्य आनंद याने एक प्रश्न तथागाताला विचारला होता की, “ तुम्ही गेल्यानंतर या धम्माचा वारस कोण असेल ? त्यावर तथागत म्हणाले, “ धम्म स्वत: त्याचा वारसदार आहे, त्याला इतर वारसाची गरज नाही.” म्हणजे धम्मातच एवढे सामर्थ्य आहे की, इतर कोणी वारस असण्याची गरज नाही. आणि जसे इतर धर्मात परमेश्वर आणि अनुयायी यांच्या मध्ये एक मध्यस्थ असतो त्याच्याशिवाय अनुयायाला त्याचे अंतिम ध्येय साध्य करता येणार नाही. तसे तथागताच्या धम्मात ईश्वर ,आत्मा ,स्वर्ग ,नर्क आणि पुनर्जन्म अशा काल्पनिक बाबी नसल्यामुळे अशा कोणत्याही मध्यस्थ व्यक्तीची गरज नाही. मुळात धम्मात मानवी वर्तनाला जास्त महत्व आहे. इतर धार्मिक विधी यास महत्व नाही. म्हणजे एखादा धम्म अनुयायी कोणत्या प्रसंगी विहरात आला किंवा नाही याला महत्व नाही, पण त्याचे रोजच्या व्यवरातील वर्तन मात्र योग्य पाहिजे. नाही इतर अनेक धर्मात अनेक विधी आणि प्रथा बंधनकारक असतात. आणि इतर अनुयायांना सारखी भीती असते पण आपल्या धम्मात अनुयायी हा भीतीमुक्त आहे, स्वतंत्र विचाराचा आहे ही सर्वात मोठी देणगी आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की, “ मानसिक स्वातंत्र्य हे सर्वात मोठे स्वातंत्र्य आहे .” याचे कारण त्यांनी स्पष्ट केले आहे की, जेंव्हा व्यक्ती कोणाच्या दबावाखाली जीवन न जगता स्वत:च्या विचाराने जगतो आणि जो दुसर्याचा गुलाम नाही तो स्वतंत्र आहे.
तथागत हा शब्द मुळात पाली भाषेतील आहे. तथागताने जे विचार समाजाला सांगितले ते सर्व तत्व आणि विचार त्यांनी त्यांच्या जीवनात अंमलात आणले त्यामुळे त्यांना तथागत म्हणतात. बुद्ध एक उपाधी आहे त्याचा अर्थ मोठा म्हणजे अकाशाएवढा ज्ञानी होय. आणि बुद्ध हि उपाधी तथागतांनी स्वत: प्रयत्न करून मिळवली आहे. आणि मागे एक इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड या विद्यापीठीने एक जगातील १० हजार वर्षामध्ये असे महामानव ज्यांनी आपल्या बुद्धीचा वापर करून मानव जातीच्या उत्थानासाठी कार्य केले अशा १०० महामानवाची यादी तयार केली. या यादीत सर्वप्रथम स्थानी तथागत बुद्ध आहेत. आचार्य रजनीश तथागाताबद्दल म्हणतात की, “बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही.” तसे पाहिले तर भारत ही बुद्धाची मुळ भूमी आहे. पण बौद्ध धम्म हा जगात जास्त प्रमाणात प्रसार झाला आहे. बौद्ध धम्माचे सर्वात महत्वाचे विशेष म्हणजे हा धम्म विज्ञानवादी आहे. आणि आपल्या भारतीय संविधानाने सुद्धा आपल्याला विज्ञानवादी होण्यासाठी मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत. पण आपण पाहतो कि, १९५६ ला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास बौद्ध धम्माची दिक्षा दिली आणि आज ६८ वर्ष झाली आहेत पण आपल्या समाजात कांही प्रमाणात जुन्या रूढी आणि प्रथा याचे पालन केले जाते. आज सुद्धा अनेक बौद्ध बांधव आपल्या मुला-मुलींचे लग्न असेल तर एक दिवस अगोदर हळदीचा कार्यक्रम आहे असा उल्लेख पत्रिकेत करतात. आणि वर बौद्ध कृपे करून असे लिहतात. आता याला काय म्हणावे ? आणि यात उच्च शिक्षित लोकांचे प्रमाण जास्त आहे. मागे मला एक नाशिक जिल्यातील लग्नाची पत्रिका आली होती त्यामध्ये असा उल्लेख होता तर मी घरातील एका जबाबदार व्यक्तीला फोन करून चौकशी केली तर असे समजले की, या लग्नाच्या दोन पत्रिका काढल्या आहेत. हे ऐकूण तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे उच्च शिक्षित लोकांबद्दल म्हटले होते ते १०० टक्के खरे झाले आहे. त्यांनी म्हटले होते की,” शिकलेल्या लोकांनी मला धोका दिला.” आणि आज सुद्धा ते सत्य होतांना दिसत आहे. आज कोणत्याही समाजात जे सर्वात जास्त उच्च शिक्षित आहेत ते आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांना कसे फसविता येईल यासाठी बुद्धीचा वापर करतात. उलट महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, शिक्षित व्यक्तीने आपल्या ज्ञानाचा वापर आपल्या समाजातील पिडीत व्यक्तीच्या समस्या कमी करण्यासाठी करावा. बुद्धाने आपणास मैत्री करण्यास सांगितली आहे पण आपले बुद्धिष्ट लोक आपल्या लोकांशी मैत्री करीत नाहीत तर त्यांच्या सोबत आर्थिक संपन्न असणार्या लोकांशी करतात. आणि आपल्या लोकांना नीट बोलत सुद्धा नाहीत. पण ते हे विसरतात की, कांही वर्षापूर्वी याची सुद्धा अवस्था अशीच होती. पण आपल्या महापुरुषांनी समाज उत्थानासाठी केलेल्या कार्यामुळे हे सुधारले आहेत. आणि त्यामुळे बुद्धाने सांगितलेली मैत्री आपण समजून घेतली पाहिजे. आणि अशी मैत्री आपण समाजात करीत असतांना कोणी कोणत्या जाती आणि धर्माचा आहे याला महत्व नाही तर जो अडचणीत आहे ,दु:खी आहे त्याला आपण मदत केली पाहिजे. आणि मग बुद्धाची हीच समता ,स्वातंत्र्य ,बंधुता आणि न्याय भारतीय संविधानात अंतर्भूत केली आहेत. पण लोकांनी असा प्रचार केला की, तत्वे फ्रेंच राज्यक्रांती पासून घेतली आहेत. याचा अर्थ यांना बुद्ध समाजापर्यंत जाऊ द्यायचा नाही. किंवा बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार आहे. मग यांना एक साधा प्रश्न आहे की, जसे इतर अवताराचे फोटो यांच्या घरात आहेत तर तथागत बुद्धाचा फोटो का नाही ? म्हणजे यावरून आपल्याला यांची नौटंकी लक्षात येईल. यांनी कितीही प्रयत्न केले तरीही आता आपले सर्व महापुरुष समाजापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाहीत. आता समाजातील लोक शिक्षित होत आहेत.आणि सोशल मिडीया सक्रीय झाला आहे. त्यामुळे आज कोणत्याही ग्रुपवर अनेक आपले बहुजन बांधव सर्वच महापुरुषांच्या जयंती आणि महापरिनिर्वाण प्रसंगी मेसेज पाठवतात. आता यांना कळू लागले आहे कि, आपल्या बहुजन समाजाला यांनी विभागणी करून आजपर्यंत फसविले आहे. पण यापुढे असे होऊ द्यायचे नाही. आणि आपल्या कोणत्याही महापुरुषाच्या जयंती प्रसंगी आपण यात सुधारणा केली पाहिजे. फेब्रुवारी ते जुन याकाळात आपल्या बहुतेक सर्व महापुरुषांच्या जयंत्या आणि निर्वाणदिन आहेत मग आपण हे पाच –सहा महीने वैचारिक उत्सव साजरे केले पाहिजे. आपला मनोरंजन करण्याचा काळ आता संपला आहे. आज प्रबोधनकाळ आहे. आता वैचारिक मंथन झाले पाहिजे.ज्याला जसे जमेल तर समाजात प्रबोधन करावे.आपण एका व्यक्तीने एका व्यक्तीला जरी आपल्या महापुरुषांचे कार्य सांगितले तरी या कार्याचा वेग प्रचंड वाढेल.
तथागत बुद्ध यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत वास्तव होता. म्हणजे आपण कोणीही असाल आपला जन्म ,आपले जीवन आणि आपला मृत्यू यात जे वास्तव आहे ते आपण स्वीकारले पाहिजे. म्हणजे मानवाने आपले जीवन कसे जगायचे आहे कोणते कर्म आपणास करायचे आहे हे स्वत: निश्चित करावे. आणि त्याप्रमाणे आपले वर्तन ठेवावे. आणि जसे वर्तन असेल तसेच त्याचे पुढील जीवन असेल या (कर्मविपाक) सिद्धांतावर तथागताचा संपूर्ण विश्वास होता. आणि धम्माचे जे अनुयायी त्याकाळात होते त्यांना अशीच शिकवण बुद्ध देतात. म्हणजे धम्मात कर्मवीपाक आहे म्हणजे आपण जसे कर्म करणार तसा त्याचा परिणाम होईल. त्याचा मागील जन्माशी काहीच संबध नाही. तर या जन्मात जे कर्म आपण करतो त्याचा परिणाम याच जन्मात आहे. आणि पुढील आणि मागील जन्म कोणते होते ? आणि होते का नाही याचा बुद्ध विचार करीत नाहीत आणि मुळात पुनर्जन्मावर त्यांचा विश्वासच नाही. बुद्धाने पुनर्जन्मच नाकारला आहे. आणि इतर अनेक काल्पनिक बाबी सुद्धा नाकारल्या आहेत. जगात दु:ख आहे आणि यावर उपाय आहे ते कोणता उपाय आहे हे शोधण्यासाठीच बुद्धाने आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले आणि जेंव्हा बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली. तेंव्हाच दु:खाचे कारण आणि उपाय मिळाला होता. ही जगातील सर्वात मोठी अभूतपूर्व घटना आहे. मानवी जीवनातील अनेक जटिल प्रश्नांची उत्तरे यामुळे मिळाली. जगातील एकमेव धर्मसंस्थापक आहे की, ज्याने आपल्या धम्मातील तत्वे अनुयायांना जर पटली नाही तर त्यांनी त्याचा स्विकार करू नका याचे स्वातंत्र्य दिले आहे आणि हेच मानसिक स्वातंत्र्य आहे . इतर धर्मात त्यांना तत्वे पाळण्याचे बंधन आहे. प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य नाही. एखाद्या विचार किंवा तत्वाची चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य नाही. ते बुद्ध धम्मात आहे ही बुद्ध धम्माची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. परंतु आपल्या अनुयायांना याचे महत्व कळत नाही. हे जगातील अनुयायांना समजले आणि त्यांनी धम्म पुढे नेला आहे. आज जगात धम्माचीच चर्चा आहे. 2009 यावर्षी जिनेव्हा येथे एक सर्व धर्माची परिषद भरली आणि यात हिंदू धर्मासहित 200 धर्माच्या प्रतींनिधींनी एकमताने मान्य केले की, आधुनिक युगात एकच असा धर्म आहे जो सर्वात श्रेष्ठ आहे आणि तो म्हणजे बौद्ध धम्म आहे. आणि 2500 वर्षानंतर असे सर्वोच्च स्थान निर्माण होण्याचे श्रेय तथागत बुद्धाला जाते. आणि दुसरे श्रेय त्यांनी निर्माण केलेल्या भिकखू संघाला जाते. आज आपण पाहतो की, एक उच्च शिक्षित व्यक्ती , अधिकारी आणि श्रीमंत व्यक्ती आपल्या भिकखू म्हणजे धम्मगुरु यांना सन्मान देत नाहीत. आणि कांही इतर विचाराचे (आर.एस.एस.) भिकखू सुद्धा आपल्यात घुसले आहेत. त्यामुळे समाजात बेबनाव झाला आहे. आणि यामुळे चांगले भिकखू आणि उपासक समाजात बदनाम होत आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
आजकाल लोकांना पैसे मिळवले की, आपण जग जिंकले असे वाटते. पण तसे नाही. आपण सम्राट अशोक यांचे जीवन पाहिले असेल की, एवढा जगजेता असताना त्यांना सर्व वैभव सोडून बुद्धाचा धम्म स्विकारावा लागला आणि स्वत: तथागत एका मोठया राज्याचा राजकुमार आणि किती मोठे वैभव सोडून गेला हा इतिहास आपणास माहीत आहे . कारण माणसाला मनाला शांतता पाहिजे असेल तर पैसा नाही तर त्याला विचार आणि तत्वे पाहिजे असतात. आणि असे विचार आणि तत्वे असणारा जगात एकच धम्म आहे आणि तो म्हणजे बुद्ध धम्म होय. याचा निकष साधा आहे. आपल्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तिसरी धम्मक्रांती केली ती १९५६ ला आणि त्यानंतर जर आपण भारतात धर्मांतराचा विचार केला तर एकमेव धम्म आहे की, ज्याकडे लोक आकर्षित होत आहेत. आणि बुद्धाकडे लोक येत आहेत. याचे एकच कारण आणि ते म्हणजे तथागतच्या धम्मात गूढ असे काहीच नाही. जे आहे ते स्पष्ट आणि निर्मळ आहे. म्हणजे काहीतरी गूढ सांगून अनुयायांना भीती निर्माण करणे आणि भीतीमुळे लोक आपल्या धर्मात येतील असा प्रयत्न यात नाही. आज अनेक बाबा आणि बुवा लोकांना फसवत आहेत आणि कांही जेल मध्ये आहेत. पुढे आणखी कांही जाणार आहेत. फक्त कायद्याची अंमलबजावणी करणारे थोडे प्रामाणिक आहेत आणि इतर पूर्वग्रहदूषित भावनेने अंमलबाजवणी करतात यामुळे जरा कांही वाचले आहेत जर कठोर नियमाने पालन केले तर या देशात असे बाबा आणि बुवा यापुढे वाढणार नाहीत. आणि समाज फसवला जाणार नाही. भारताला आणि जगाला शेवटी बुद्धाच्या मार्गानेच जावे लागेल. आपल्या देशात मागील 20-30 वर्षात आपण जर पाहिले तर बुद्धाच्या धम्माकडे लोक आकर्षित होत आहेत आणि अनेक लोकांना बुद्ध धम्माकडे जाऊ नये असे प्रयत्न आर.एस.एस.चे लोक करतात. परंतु हे पुढे थांबणार नाही. कारण यात कोणाचा दबाव किंवा आमिष नाही तर नैसर्गिक भावनेने लोक येत आहेत. त्यांना विचार पटत आहेत, लोक आता शिक्षण आणि सोशल मीडियामुळे जागृत होत आहेत. त्यांना भारतीय संविधानाचे महत्व समजत आहे. आज महाराष्ट्रात अनेक कीर्तनकार हे भारतीय संविधान वाचले पाहिजे यावर किर्तन करीत आहेत जे आजपर्यंत कधीच झाले नव्हते आणि ही अस्तित्वाची भीती आर.एस.एस. ला आहे त्यामुळे त्यांनी अनेक कथा आणि कीर्तनकार समाजात सोडले आहेत. पण मला खात्री आहे की, जसे आज कांही राजकीय पक्षांना पैसे देऊन लोक सभेला आणावे लागतात तशी यांच्यावर पुढे वेळ येईल आणि आज पैसे कमावणारे उद्या यांना कोणी फुकट विचारणार नाही. आणि समाजाचा कल एकदम बदलायला जास्त वेळ लागत नाही. आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तेंव्हाच म्हणाले होते की, “ जगाला बुद्धाशिवाय पर्याय नाही आणि आज तेच होतांना दिसत आहे. भारतात अनेक जाती संप्रदाय हे धम्माकडे येण्याच्या मन:स्थितीत आहेत कारण त्यांना विचारांची उपयुक्तता लक्षात येत आहे. आणि तथागतांनी आनंदाला उपदेश करतांना सांगितलेले आहे की, कोणताही धर्म हा त्याच्या विचाराने पुढे जातो. त्याला विशेष अशा वारसाची गरज नसते. आणि आज तथागताची वाणी सत्य होतांना दिसत आहे.
प्रा. डॉ. आर.जे. इंगोले
नाशिक ( 9423180876 )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत