माझी अस्वस्थता तुम्हाला कळते आहे का ?
मी अस्वस्थ आहे कारण शरद कळस्कर आज 30 वर्षाचा आहे. त्याच्या गावात हिंदुत्ववादी संघटनेचा पहिला कार्यक्रम 2010 साली झाला. म्हणजे त्यावेळी तो 16 वर्षाचा होता. डॉक्टरांचा खून करण्यासाठी त्याची निवड 2012 साली झाली. तेव्हा तो 18 वर्षांचा होता. आणि वयाच्या 19 व्या वर्षी दाभोलकरांचा खून केला.
वैद्यकीय डॉक्टर संख्येने खूपच कमी असण्याच्या काळात पैसे आणि तथाकथित प्रतिष्ठा मिळवण्याची संधी नाकारून ज्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आपल्या आयुष्याची 40 – 45 वर्षे समाज विवेकवादी घडवण्यासाठी घालवली ( प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दाभोलकरांचा उल्लेख ‘पृथ्वी मोलाचा माणूस’ असा केला आहे.) त्याच दाभोलकरांचा निर्घृण खून केला.
एवढ्यावरच न थांबता तो शरद कळस्कर आपल्या साथीदारांसह पुढील खूनाच्या नियोजनात व्यस्त झाला.
प्रथमदर्शनी सामान्य कुटुंबातील दिसणारा हा मुलगा समाज म्हणजे काय हे अगदी नुकतंच कळू लागायच्या वयात समतावादी समाज घडवू पाहणाऱ्या कृतीशील विचारवंतांचा खूनी कसा बनवला गेला?
त्याची ही वाटचाल पाहिली की तिकडे जिहादी बनून दहशतवादी कारवाया करणारे तरुण या धर्मांधांच्या हाती कसे लागत असतील,आणि त्यांना धर्मांध कसे बनवले जाते याची कल्पना येते.
धार्मिक असणं, आपल्या धर्माच्या उपासना पध्दतीने आचरण करणं वेगळं आणि धर्माच्या नावाने आधी कट्टर आणि नंतर धर्मांध होऊन धर्मात सुधारणा करू इच्छिणार्यांचा,धर्माच्या नावावर समाजाला कर्मकांड,अंधश्रद्धा यात अडकऊन त्यांचं शोषण करणाऱ्यां चां विरोध करणाऱ्याचा,किंवा इतर धर्मियांचा द्वेष करणं, त्यांना मारून टाकावंसं वाटणं आणि पुढे जाऊन तशी कृती करणं वेगळं. धार्मिक असणं ही स्वाभाविक प्रकृती असू शकते तर धर्मांध असणं ही जाणीवपूर्वक घडवून आणलेली विकृती आहे.
तेव्हा आपली मुलं धार्मिक शिक्षण देणाऱ्या विविध धर्माच्या संस्था, संघटना, पक्ष यांच्याकडे जाऊन साने गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे ‘जयाला देव तो प्यारा, जयाला धर्म तो प्यारा, तयाने प्रेमरूप व्हावे! ही प्रेमाची शिकवण शिकतात की व्यक्तीद्वेष, धर्मद्वेष, विचारद्वेष शिकून धर्मांध होण्याच्या वाटेवर आहेत हे वेळीच पहा.
त्या शरद कळस्करचे पालक, सचिन अंदुरेचे पालक आज काय स्थितीत असतील? याचा विचार करा.
2010 साली शरद कळस्करच्या गावात झालेल्या ‘त्या धार्मिक (?) कार्यक्रमाला शरद गेला असेल तेव्हा 2019 साली तो मानवतावादी कार्यकर्त्यांच्या खूनाचा प्रमुख आरोपी बनेल याची अंधुकशी कल्पना तरी त्या पालकांनी केली असेल का? याचा विचार करा.
त्याचवेळी हेही लक्षात घ्या की शरद कळस्कर, सचिन अंदुरे, विनय पवार, सारंग अकोळकर, विक्रम भावे, अमोल काळे असोत वा आता सुत्रधार दिसणारे विरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर असोत, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या विचारवंतांचे असे निर्घृण खून घडवून आणणारे मूळ सुत्रधार अजूनही पुढे आलेले नाहीत. ते शेवटपर्यंत पुढे येतील की नाही माहिती नाही. (म्हणून आपल्या घरातील, नात्यातील किंवा शेजारच्यांपैकी कुणी अशा ठिकाणी जात असेल तर वेळीच सावध व्हा. इतरांना सावध करा.)
कदाचित आजही ते असे अनेक शरद कळस्कर शोधून काही विचारवंतांच्या खूनाचे बेत आखत असतील.
शेवटी डॉ. नरेंद्र दाभोलकर काय म्हणायचे,
“विचार तर कराल?”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत