मोदींचा फुगा का फुटला ?- श्रीरंजन आवटे.
युपीएची दुसरी टर्म होती. घोटाळे बाहेर येत होते. ए.राजा, लालूप्रसाद यादव, कलमाडी अशा सत्तेतल्याच नेत्यांना अटक होत होती. तो काळ वेगळा होता, माध्यमंही स्वतंत्र होती. कॉन्ग्रेसवर सडकून टीका होत होती. आण्णा हजारेंचे आंदोलन माध्यमांनी मोठे केले होते. अशा सगळ्या काळात मोदींचा राष्ट्रीय पटलावर उदय झाला. त्याला माध्यमांची साथ होती. संघाचे पाठबळ होते आणि मुख्य म्हणजे कार्पोरेट लॉबी त्यांच्यावर खुश होती. मोदी हा भ्रष्टाचार संपवतील, ते विकासपुरुष आहेत. गुजरात मॉडेल हे त्याचे उदाहरण आहे. अशी ही सारी योजना होती. त्यामुळे हिंदुत्वाच्या आधारे नव्हे तर प्रामाणिक विकासपुरुषाची प्रतिमा स्थापित करुन मोदी सत्तेत आले. हे सत्तांतर अभूतपूर्व होते. मोदी, भाजप, संघ या सगळ्यांसाठी ही अनोखी संधी होती.
मोदींनी या संधीचा लाभ घेतला. हवे तसे निर्णय घेतले. नोटबंदीचा एका रात्रीत निर्णय घेतला. लोकांचे हाल झाले. कित्येक लोक गेले; पण लोकांचा विश्वास होता काहीतरी चांगला उद्देश असेल मोदींचा. जीएसटीचा घोळ सुटला नाही पण लोकांनी सहन केले. राफेलचा मुद्दा राहुल गांधींनी कितीही हिरिरीने पटवून सांगितला तरी त्यातली गुंतागुंत लोकांना समजली नाही. त्यामुळे हिंडेनबर्ग रिपोर्ट कळणे तर आणखी कठीण. कोविडमध्येही पीएम केअर घोटाळा झाला; पण लोक स्वतःच्या समस्यांनी ग्रस्त होते. आताही इलेक्टोरल बॉन्डचा मुद्दा काही अंशीच लोकांपर्यंत पोहोचला आहे; पण तरीही मोदी भ्रष्ट आहेत, भाजप वॉशिंग मशीन आहे आणि हे लोक संविधान बदलू शकतात, हे लोकांना कळून चुकलं आहे.
मोदींचा फुगा फुटण्याचं मुख्य कारण म्हणजे आत्यंतिक अहंकार. त्यातून त्यांनी इडी, सीबीआयचा आत्यंतिक गैरवापर केला. त्यातही महाराष्ट्रात जे काही भाजपने केले त्यामुळे मोदींच्या फुग्यातली उरलीसुरली हवा गेली. पहाटेचा शपथविधी शरद पवारांनी उधळून लावला. पुढे भाजपने सेना फोडली. मग राष्ट्रवादीही. कहर म्हणजे दोन्ही गटांचे आमदार पात्र, असा निकाल दिला. न्यायालयात गेली अडीच वर्षे खटला पेंडिंग आहे. अजित पवारांचे ‘सिंचन’ ‘स्वच्छ ‘झाले आणि ‘डीलर’ अशोकराव भाजपचे ‘लीडर’ झाले. मोदींनी नेत्यांना विकत घेतले; पण नेत्यांना विकत घेऊन जनतेला खिशात घालता येत नाही, हे त्यांना कळले नाही. त्यात स्थानिक निवडणुका दोन-अडीच वर्षे लांबवल्या. इतका बट्ट्याबोळ केला की भाजपचा कट्टर समर्थकही भाजपला मतदान का करायचे, हे सांगू शकेना. संघावर मुजोरी केल्याने केडर दुरावले. मुख्य म्हणजे मोदींची प्रामाणिक ही प्रतिमा धूसर झाली. विकास न दिसल्याने विकासपुरुषही संपला; उरला केवळ अभिनिवेशी वक्ता.
या वक्त्याला लोक कंटाळले. त्याच त्या भाषणांनी वैतागले. २०१९ ला बालाकोट नाट्य उभे करत राष्ट्रवादाच्या मुद्याने निवडणूक जिंकली मात्र यावेळी राममंदिर उभा करुन धर्माचा मुद्दा रेटण्यात मोदींना अपयश आले कारण तोवर महागाईने लोकांचे कंबरडे मोडले. बेरोजगारीने लोक हैराण झाले. युवा वर्ग हताश झाला. शेतकरी हवालदिल झाला. स्त्रियांवरच्या अत्याचाराने अवघा देश हळहळला. बिल्किस बानो प्रकरण असो की ब्रिजभूषण सिंग किंवा आताचे प्रज्वल रेवण्णा लैंगिक शोषणाचे प्रकरण, भाजपचा चेहरा भेसूर दिसू लागला.
एकदा फुगा फुटला की त्यात हवा भरता येत नाही. मोदींचा अवास्तव फुगलेला फुगा ८ मे २०२४ रोजी फुटला. अंबानी-अदानी यांचा उल्लेख करुन मोदींनी हिटविकेट दिली. मोदींचा थापाड्या आणि सोंगाड्या असलेला चेहरा उघड झाला. हे पितळ उघडे पडले. हे घडण्यात राहुल गांधी यांचे सर्वांत मोठे योगदान आहे. मोदी पंक्चर होत असल्याने भाजपमधले अनेक वरिष्ठ नेते आनंदात आहेत. मोदी केवळ विरोधी पक्षाला नको आहेत, असे नव्हे. भाजपलाही मोदी आता नकोसे झाले आहेत. रमणसिंग, शिवराजसिंग चौहान, वसुंधरा राजे, देवेंद्र फडणवीस असे सारेच प्रादेशिक नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न मोदींच्या अंगलट आला आणि अखेरीस हा फुगा फुटला. मोदींच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे. त्यांच्या सभा आपटत आहेत. कार्पोरेट लॉबीही हळूहळू तोंड वळवू लागली आहे.
दिवा विझताना भडका उडतो तेव्हा अधिक सावध रहावे लागते. मोदींचा फुगा फुटला असला तरी लोकशाहीसमोरचे आव्हान मोठे आहे. मोदी प्रधानमंत्री बनणार नाहीत किंवा एनडीए सत्तेतून जाईल एवढ्याने खूश व्हायचे कारण नाही. ही संपूर्ण राजकीय प्रक्रिया अधिक सशक्त कशी होईल आणि इथली लोकशाही संस्कृती अधिक समृद्ध होईल, यासाठीचा लढा मोठा आहे, याचे भान बाळगले पाहिजे.
- श्रीरंजन आवटे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत