देशनिवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

नकाराधिकार !! – ज्येष्ठ विचारवंत आयु. प्रा. रणजित मेश्राम सर



स्थिती हाताबाहेर चाललीय. लोकशाहीने स्वीकारलेले हेतू बदलले की काय? जनसामान्यांचे कल्याण हे हेतू होते. ते कुठे दिसत नाही. कागदावर वेगळे, प्रत्यक्षात दुसरेच ! विषमता संपावी. हे हेतू होते. तेही उडाले. ती पराकोटीने वाढलीय. मग हेतू कोणते ?

निवडणूक जिंकणे, हेतू झालाय ? त्यासाठी काहीही ! सोबत सरकारी बळ आहेच. हेतू घट्ट होतोय. फोडा-झोडा वाढलेय. जगणे-जिणे निवडणुकमय झाले. संविधानिक संकेतांचे इच्छामरण चाललेय. विरोधी पक्षांचे अस्तित्व धोक्यातच ! धोका वाढतोय. नाशपध्दती (spoils system) आली की काय ? याला म्हणतात तोंड दाबून बुक्क्यांचा मार !

हे चालू द्यायचे ? की स्वीकारायचे ? की बदलायचे ? गरीबी, रोजगार, आरोग्य, तरुणाई हे तर पटलावरच नाहीत. दूरदूरपर्यंत यांची चर्चा नसते. मग सरकार कशासाठी ? बरेचदा टिनांचे कुंपण घालून आतमध्ये काहीतरी सुरू असते, असे तर नव्हे !

लोकांना सांगून, लोकांना विश्वासात घेऊन, लोकांच्या संमतीने चालणारी ती लोकशाही. लोकांना धक्के देऊन नव्हे ! धसक्यात ठेवून नव्हे ! ३६ टक्के मतांवर सत्ता प्राप्त होते. ती कायदानिष्ठ असते. स्वनिष्ठ वा पक्षनिष्ठ नाही ! ६४ टक्केही मतदारच असतात. त्यांच्या विभागणीवर सत्ता बांधणे, तसे गैरच ! ते विभागुनच नेहमी राहतील, कशावरून ?

एकदा तसा चमत्कार घडलाय. दुसऱ्या महायुद्धात ( १९३९-४५). इंग्लंड, अमेरिका, फ्रांस, रशिया एकमेकांचे वैरी होते. पण परिस्थितीजन्य ते एक झाले. नाव घेतले, ‘दोस्त राष्ट्र !’. जंगल जळत असताना, घरटे काय वाचवायचे ? पेटणे विझवू ! तेव्हाच लोकशाही वाचली. हिटलर-मुसोलिनीचा साफ पराभव झाला.

भारतातही असे घडले. १९७७ ला. कांग्रेस पराभूत होत नव्हती. सारे विरोधक एक आले. संघटन कांग्रेस, लोकदल, जनसंघ, समाजवादी, स्वतंत्र, अकाली, कम्युनिस्ट आदी. party position ऐवजी political position घेण्यात आली. ४२५ जागांवर एकासएक लढत झाली. इंदिरा काँग्रेस चा मोठा पराभव झाला.

हे घडू शकते. शक्य आहे. समुच्चयाला निश्चयाकडे न्यावे. त्याआधी मतदार जागा व्हावा. तसा तो करावा. त्यालाच त्याचे अधिकार ठाऊक आहेत की नाहीत ? तो केवळ मतदार आहे ? बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हढेच मंजूर नव्हते.

मतदारांकडे मतदानशक्ती (voting power) हे खरे आहे. बाबासाहेब हे भारतीय मतदाराला त्याहून अधिक शक्तिशाली मानतात. भारतीय मतदाराकडे मतदानशक्तीसोबत नकारशक्ती (veto power) असल्याचे ते मानतात. नकारशक्ती वा नकाराधिकार बाबासाहेबांसाठी अधिक महत्वाचा आहे.

तो कसा ? बाबासाहेब म्हणतात, लोकशाही म्हणजे नकारशक्ती वा नकाराधिकार होय. आनुवंशिक अधिकार किंवा स्वयंसत्ताक अधिकार यांची प्रतिशोधक म्हणजे लोकशाही होय. ज्यांची देशावर सत्ता आहे, त्यांच्या अधिकारावर कोठेतरी, केव्हातरी नकाराधिकार veto power वापरणे म्हणजे लोकशाही. राजेशाही राज्यव्यवस्थेत नकाराधिकार नसतो. राजाच्या सत्तेला आव्हान करणारा नकाराधिकार कोणाही जवळ नसतो. लोकशाहीमध्ये हा नकाराधिकार भारतीय मतदारांना मिळाला आहे.

जगपातळीवर नकाराधिकाराचे अतुलनीय महत्व आहे. भारताकडे अजून नकाराधिकार veto power नाही. युनोतील, सुरक्षा समितीच्या या पाच स्थायी सदस्यांकडे, अमेरिका, चीन, इंग्लंड, फ्रांस व रशिया कडे नकाराधिकार आहे.

भारतात तर प्रत्येक मतदार नकाराधिकारी आहे. त्या अधिकाराचे मोल कळावे !

० आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत आयु. प्रा. रणजित मेश्राम सर

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!