भारतीय स्वातंत्र्य आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका
अनिल वैद्य
माजी न्यायाधीश
९६५७७५८५५५
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची १३३ वी जयंती साजरी करीत असताना
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्य्या भारतीय स्वातंत्र्या विषयी काय भूमिका होत्या या वर प्रकाश टाकणे जयंती निमित्ताने आदरांजली ठरेल.
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
“आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यन्त आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केला पाहिजे”
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे या बद्दल शंका नाही पण या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत .
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की,”या देशात जाती आहेत व जाती जाती मध्ये मत्सर व तिरस्कार आहे ,या जाती राष्ट्रविरोधी आहेत.देशाला वास्तवात राष्ट्र व्हायचे असेल तर या अडथळ्यांवर मात केली पाहिजे.”पुढे ते म्हणतात की ,”राष्ट्रनिर्मिती नंतरच बंधुत्व वास्तवात पाहायला मिळेल ,”
आपण जर आजचे चित्र बघितले तर अद्यापही जातीय मत्सर गेला नाही ना राष्ट्र निर्मिती झाली आणि मग बंधूभाव तर दूरची बाब आहे. बाबासाहेब म्हणतात ,”बंधुत्वाशीवाय असलेले स्वातंत्र्य हे बाह्य देखावा आहे.
एखाद्या नेत्यांला भक्त मानले किंवा व्यक्ती पूजा करणे ही देशाला अधःपतन व अंतिमतः हुकूमशाही कडे नेणारा मार्ग ठरतो”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे.”
देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब म्हणतात ,”पूर्वी भारताचे स्वातंत्र्य आपल्याच लोकांच्या विश्वासघाताने गेले आहे. आपल्याच लोकांनी देशद्रोह केला आणि भारत देश दुसऱ्याच्या हाती दिला. महंमद बीन कासीमने जेव्हा सिंधवर स्वारी केली तेव्हा राजा दाहीरच्या सेनापतीने लाच घेतली आणि तो आपल्या राजाच्या मदतीला धावला नाही. यामुळे राजा दाहीरचा पराभव झाला. महंमद घोरीला भारतावर स्वारी करण्याचे आमंत्रण राजा जयचंदने दिले. शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढत होते, तेव्हा इतर मराठे सरदार शिवाजी महाराजांविरुध्द लढत राहिले. आता पुन्हा तसेच होणार नाही ना? अशी मला चिंता वाटते. जर नेत्यांनी आपल्या पक्षाचे मत हे राष्ट्र हितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल. असे झाले तर पुन्हा स्वातंत्र्य मिळविणे अशक्यच होऊन बसेल. यासाठी *रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे”
. (संदर्भ खंड 18 भाग 3 पृष्ठ156 ते 176)
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्र निष्ठेवर काही लोक नाहक बरळत असतात त्यांच्या माहिती साठी सांगतो 4 एप्रिल 1938 ला मुबंई विधी मंडळात कर्नाटक राज्य निर्मिती विधेयकावर चर्चा झाली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र कर्नाटक राज्य विभागणीच्या ठरावास विरोध केला. त्यात ते आपल्या भारत देशावरील प्रेमाविषयी, देशाभिमानाविषयी बोलतात व फुटिरतावादाला विरोध करतात. त्यावरुन त्यांचे राष्ट्रप्रेम किती प्रखर होते
याची कल्पना येते. ते म्हणाले “मी स्वतः असे स्पष्टपणे बोलतो की, माझा या गोष्टीवर विश्वास नाही की , या देशात एखाद्या विशिष्ट संस्कृतीला कोणतीही जागा नाही. मग ती हिंदू संस्कृती असो किंवा मुसलमान संस्कृती असो किंवा कन्नड संस्कृती
गुजराती संस्कृती असो.अश्या काही गोष्टी आहेत की ज्यांना आपण नाकारू शकत नाही. परंतु लाभ म्हणून त्यांना खतपाणी घालायला नको.त्यांना नुकसानकारक समजले पाहिजे, त्यांना आपले इमान दुभंगणारी गोष्ट समजले पाहिजे. आणि त्यांना आपल्यापासून आपले समान ध्येय हिराऊन घेणारी गोष्ट समजले पाहिजे. ते समान ध्येय म्हणजे आपण सर्व भारतीय आहोत या भावनेची वृद्धी करणे. काही लोक असे म्हणतात की, आपण प्रथम भारतीय आणि हिंदू नंतर आहोत किंवा मुस्लीम नंतर आहोत. परंतु मला हे आवडल नाही मी तेव्हड्याने समाधानी नाही. मी प्रांजळपणे म्हणतो की, मी त्याने समाधानी नाही .मला हे नको आहे की भारतीय म्हणून आपली निष्ठा इतर कोणत्याही शुब्छ निष्टेने थोडी सुद्धा बाधित होईल. मग ती निष्ठा आपल्या धर्मातून उदभवलेली असो, आपल्या संस्कृतीतून उगम पावलेली असो वा आपल्या भाषेतून उगम पावलेली असो. मला सर्व लोक प्रथम भारतीय हवे आहेत. शेवटी इतर काहीही नसून केवळ भारतीय हवे आहेत”
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानात लोकशाही प्रणाली देशाला दिली ,त्यातील संघराज्य, न्यायव्यवस्था, संसद अर्थात कार्यकारी मंडळ यांना दिलेले स्वतन्त्र अधिकार देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यात साठी दिले की जेणे करून देशात हुकूमशाही निर्माण होऊ नये.
मूलभूत अधिकार नागरिकांना दिले ज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य व सभा व संघटन स्वातंत्र्य आहे यात देशाचे स्वातंत्र्य रक्षणाचा सुद्धा दूरगामी विचार केला आहे .यावरून देशाच्या भविष्याची डॉ बाबासाहेब आंबेडकरांना चिंता वाटत होती हे स्पस्टपणे दिसून येते.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची स्वातंत्र्याची कल्पना कशी होती ते पुढील वक्तव्यवरून लक्षात येते,
21जुलै 1946 ला अहिल्याश्रम ,पुणे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
“आमचे भांडण हे नेहमी तत्त्वासाठी असते. ६ कोटी अस्पृश्य समाजाच्या वतीने आमचे भांडण आहे. आम्हाला राजकीय संरक्षण पाहिजे. हे राजकीय सरक्षण अशा तऱ्हेने पाहिजे की मूर्खाच्या हातून किंवा लबाडाच्या हातून आमचे काहीही नुकसान होता कामा नये. आमच्या चळवळीमध्ये मूर्खाला किंवा लबाडाला थोडा देखील वाव नाही. लुच्च्या लफंग्याला जागा मिळणार नाही अशा तर्हेची आम्हाला चळवळ करावयाची आहे. इतर लोकांप्रमाणेच आम्हालाही स्वातंत्र्य पाहिजे आम्हाला कोणाचीही, परकियांची किंवा स्वकियांची गुलामगिरी पत्करावयाची नाही. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आहे. परंतु त्याचबरोबर आम्हाला लोकशाही देखील पाहिजे आहे. राजकीय सत्ता काही ठराविक लोकाच्या हाती गेली तर आम्हाला चांगले दिवस येतीलच असे नाही, अशी आम्हाला भीती वाटते आणि ही भीती साधार आहे म्हणूनच राजकीय सत्ता सर्वसाधारण लोकांच्या हाती. खऱ्या अर्थाने शेतकरी कामकऱ्यांच्या हाती. असावयास पाहिजे. असा आमचा पक्का समज आहे.
दुसरे लोक काहीही म्हणोत आपणाला खरे स्वातंत्र्य पाहिजे आहे. या देशातील कोणत्याही जातीने जमातीने किंवा वर्गाने आपणावर वर्चस्व गाजवता कामा नये. आपणा सर्वांना त्या देशामध्ये उजळ माथ्याने वावरता आले पाहिजे. असे आपणास राजकीय हक्क पाहिजेत. गुलामगिरीला आपण ठोकरीने उडविले पाहिजे. या देशातील ६ कोटी अस्पृश्यांचा लढा हा खरा स्वातंत्र्याचा लढाआहे. “
सामाजिक स्वातंत्र्य आधी मिळाले पाहिजे अशी भूमिका डॉ बाबासाहेब आंबेडकरांची होती
31 जानेवारी 1954 ला मुंबई येथे आचार्य अत्रे निर्मित महात्मा जोतीराव फुले या चित्रपटाच्या उद्घघाटन प्रसंगी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले, “जोतीराव फुले हे आद्य समाज सुधारक होत ! पूर्वी, सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा आधी हा वाद चाले. आधी समाज सुधारणा झाली पाहिजे असे रानडे, गोखले, आगरकर प्रतिपादन करीत; पण टिळकांचा भर राजकीय सुधारणांवरच होता. टिळक आपल्या विरोधकांवर याबाबतीत विजय मिळवू शकले नाही. पण पुढे महात्मा गांधींनी मात्र समाज सुधारणावाद्यावर विजय मिळविला. परंतु समाज सुधारणा होण्यापूर्वी देशाला राजकीय स्वतन्त्र मिळाले. त्याचे परिणाम फारसे चांगले झालेले नाहीत. आज देशाला चारित्र्यच उरलेले नाही आणि ज्या देशाला नीतिमत्ता नाही त्या देशाचे भवितव्य अतिशय खडतर आहे”
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 15 फेब्रुवारी 1946 ला सातारा जिल्ह्यातील दहिवाडी येथे स्पष्ट म्हणाले होते की,”माझा स्वराज्याला बिलकुल विरोध नाही पण त्या स्वराज्यात आम्हाला पुरेसा हिस्सा पाहिजे”
गोलमेज परिषदेत 20 नोव्हेंबर1930 ला डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ,’ब्रिटिश सरकार जो पर्यंत या देशात आहे तो पर्यंत आम्हाला (अस्पृश्याना ) सत्ता मिळणार नाही ती सत्ता वस्वराज्यातिल घटनेतच मिळेल.’
हे खडे बोल त्यांनी ब्रिटिशांना त्यांच्याच देशात सुनावले होते.या वरून हे स्पष्ट होते की,
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तरच आपली प्रगती होईल असाही विश्वास त्यांना होता.आणि उपरोक्त विधांनावरून मिळालेल्या स्वातंत्र्याला टिकवण्याची त्यांची चिंता दिसून येते.
अनिल वैद्य
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत