संविधान निर्माते बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त संविधान प्रस्तावनेचे वाचनभारतीय बौध्द महासभा अकोला व निलेश देव मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम
अकोला :
इंग्रजांची जुलमी राजवट संपवुन स्वतंत्र भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार प्राप्त झाला. त्या संविधानाच्या आजन्म संरक्षणासाठी आपण सर्व कटिबध्द आहोत. त्यासाठी एक छोटे पाऊल अकोलेकर जनतेने उचलण्याचा संकल्प केला आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय बौध्द महासभा अकोला,निलेश देव मित्र मंडळाच्यावतीने 3,000 मातृशक्तीच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचनाचा कार्यक्रम अकोला शहरात आयोजित करण्यात आला आहे. 21 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन जठारपेठ भागातील भारत विद्यालयाचे छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणात हा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अॅड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या माध्यमातुन हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या भव्य दिव्य सोहळ्याचे आपण ही साक्षीदार व्हा, असे आवाहन भारतीय बौध्द महासभा अकोला नीलेश देव मित्र मंडळाने केले आहे. महिलांना बसण्यासाठी सुयोग्य व्यवस्था करण्यात येणार आहे. अकोलेकर नेहमी अभिनव उपक्रमातुन राज्याला आणि देशाला संदेश देत असतात. अशा विविध उपक्रमांचे आयोजन भारतीय बौध्द महासभा अकोला, निलेश देव मित्र मंडळ नेहमी करत आले आहे. या उपक्रमात समाजाचे हित जोपासले जात असून लोकहितासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीयांसाठी अभिमानाचा, जिव्हाळ्याचा आणि प्रत्येक भारतीयांची मान उंचावेल असे भारतीय संविधान आहे. त्या संविधानाच्या प्रस्तावना अर्थात उद्देशिकेचे वाचन हे काळाची गरज असून संविधानावर होणारे हल्ले रोखण्यासाठी सामुहिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. अन्यथा, स्वतंत्र प्राप्तीनंतर आपल्याला मिळालेले विविध अधिकार आणि हक्क हिरावल्याशिवाय राहणार नाही. संविधान बचावाची आणि संविधान प्रत्येकाच्या मनामनात रुजविण्याची ही चळवळ व्यापक करण्यासाठी भारतीय बौध्द महासभा व निलेश देव मित्र मंडळाने पुढाकार घेतला आहे.
विविध विषयांची संविधानात एकत्रितपणे थोडक्यात व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे प्रस्तावना होय. या प्रस्तावनेला उद्देशिका असे म्हणतात. उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची ‘प्रास्ताविका’ किंवा ‘सरनामा’ असेही म्हटले जाते. उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते. त्यानुसार देशाचा, राज्याचा,गावाचा, शहराचा प्रत्येकाचे हक्क अबाधित राखत कारभार चालावा ही अपेक्षा आहे. येत्या 26 जानेवारी 2025 रोजी भारतात भारतीय प्रजासत्ताकाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने भारताच्या संविधानाला सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी 3000 मातृशक्तीच्या उपस्थितीत 75,000 वेळा संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येत काॅलेज तरुणी, महिला, युवती, गृहिणी यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मातृशक्तीच्या सशक्तीकरणाच्या माध्यमातुन समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य या संविधान उद्देशिका, प्रस्तावना वाचनातुन होणार आहे. मातृशक्तीच्या सशक्त पाठिंब्यातुन हा सोहळा यशस्वी होईल असे भारतीय बौध्द महासभा अकोला व निलेश देव मित्र मंडळाने सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत