दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

आद्यशिवशाहीर, क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा व कोटी कोटी अभिवादन.

डॉ.श्रीमंत कोकाटे.

महात्मा फुले आधुनिक भारताचे शिल्पकार

महात्मा फुले हे केवळ बोलके सुधारक नव्हते, तर ते प्रत्यक्ष कृती करणारे महामानव होते. त्यांनी आपल्या देशात सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया घातला. शिक्षणाचे महत्त्व सांगणारे तृतीय रत्न नावाचे नाटक त्यांनी लिहिले. मुलींच्या शिक्षणाची सुरुवात आपल्या पत्नीला शिक्षित करून केली. फुले साहित्याचे आणि विचाराचे मोठे अभ्यासक डॉ. बाबा आढाव म्हणतात “ज्योतिरावांनी 1848 झाली स्त्री शिक्षणाचा ओनामा सुरू केला”.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे एक अस्सल चित्र उपलब्ध आहे. हा फोटो आहे. हा फोटो जाणीवपूर्वक काढलेला नसून तो सहज काढलेला आहे. या फोटोत सावित्रीबाई या महात्मा फुले यांच्या उजव्या बाजूस आहेत. हा फोटो ठरवून काढलेला नाही. नकळत काढलेला आहे, पण यातून हे लक्षात येते की महात्मा फुले यांच्या केवळ जाणिवेतच नव्हे तर नेणिवेत देखील स्त्री ही पुरुषांपेक्षा उजवी म्हणजेच कर्तृत्ववान आहे, ती डावी म्हणजेच दुय्यय दर्जाची नाही, यावर त्यांचा दृढ विश्वास होता.
महात्मा फुले यांनी प्रथमतः स्वतः च्या पत्नीला शिकवले. प्रथमतः मुलींची शाळा सुरू केली. मुलगी शिकली तरच सामाजिक परिवर्तन होईल ही फुलेंची भूमिका होती. त्यांनी विधवांच्या केशवपणाला कडाडून विरोध केला. बालविवाह या प्रथेला विरोध केला. विधवा विवाहाला चालना दिली. भ्रूणहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून महिलांना, भ्रूणांना जीवदान दिले.
महात्मा फुले यांनी जनमानसाची मराठी भाषा प्रथमत: साहित्यात आणली, असे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त डॉ. भालचंद्र नेमाडे म्हणतात. केवळ पुणेरी मराठी म्हणजेच प्रमाण भाषा आहे, असे नव्हे तर कष्टकरी, श्रमकरी, शेतकऱ्यांची मराठी भाषा साहित्यात आणून तिचा गौरव केला. महात्मा फुले चिपळूणकरांना म्हणाले होते “माझ्या सहित्यात व्याकरण नसेल, पण त्यात जनमानसाचे अंतःकरण आहे”. केवळ सनातन्यांची भाषा हीच प्रमाण भाषा आहे,असा आग्रह धरून श्रमकरी वर्गात न्यूनगंडाची भावना निर्माण करणाऱ्याना म. फुले यांनी ग्रंथनिर्मिती करून सणसणीत उत्तर दिले व श्रमकऱयांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला.
महात्मा फुले यांनी १८६९ साली रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचा शोध घेतला. पुण्यात येऊन शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली. त्यांनी ९०८ ओळीचा शिवरायांच्या जीवनावरील आधुनिक काळातील पहिला महत्त्वपूर्ण पोवाडा लिहिला. शिवचरित्राचा वापर विधायक कार्यासाठी महात्मा फुले यांनी केला. थोर समाजसुधारक भाई माधवराव बागल म्हणतात “शिवस्मारकाची कल्पना प्रथम महात्मा फुले यांचीच होती”. आधुनिक काळात वास्तव शिवचरित्र घरोघरी पोचविणारे म फुले हे खरे शिवशाहीर आहेत. शिवचरित्राची अस्सल साधनं हाताशी नसताना वास्तव इतिहासाकडे कसे पोचावे ही फुलेंची अन्वेषण पध्दती सांगते. म. फुले हे संशोधकांचे दीपस्तंभ आहेत.
धर्माच्या नावाखाली बहुजनांचे शोषण होत होते, त्याला पायबंद घालण्यासाठी महात्मा फुले यांनी “गुलामगिरी” या ग्रंथातून धर्मचिकित्सा केली. जागतिक कीर्तीचे प्राच्यविद्यापंडित शरद पाटील म्हणतात “भारतीय मुक्ती समस्येचे उत्तर अचूक शोधणे शक्य व्हावे अशा रीतीने महात्मा फुलेंनी ती उभी केली हीच फुलेवादाची महत्ता आहे”. महात्मा फुले यांच्या कार्यकर्तृत्वाचा व एकूण विचारधारेला तत्वज्ञानाच्या चौकटीत बसवण्याचे महान कार्य शरद पाटील यांनी केले आहे. सामान्य जनमानसाला शिक्षण, आत्मविश्वास, वैज्ञानिक दृष्टीकोन, समानता याचे महत्त्व सांगणारे फुले हेच खरे देशभक्त आहेत, असे महर्षी वि. रा. शिंदे सांगतात. महर्षी शिंदे यांनी म. फुले यांचा “सत्याचा पालनवाला । जोतिबा माझा ।” या नावाचा पोवाडा लिहिला.
महात्मा फुले यांनी १८७३ साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. असत्य नाकारून सत्याचा पुरस्कार करणे. अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, अनिष्ट प्रथा प्रथा यांचा त्याग करणे. धार्मिक क्षेत्रातील दलाल नाकारून आपले धार्मिक कार्य आपणच करणे,यावर त्यांनी भर दिला. सत्यशोधक पद्धतीने विवाह करायला सुरुवात केली. त्यांनी सार्वजनिक सत्यधर्माचा पाया घातला.
महात्मा फुले श्रीमंत होते. ते जमीनदार होते. ते बांधकाम व्यावसायिक होते. खडकवासला धरण, अनेक पूल, कात्रजचा जुना बोगदा याचे बांधकाम महात्मा फुले यांच्या कंपनीने केलेले आहे. त्यातून मिळालेला पैसा महात्मा फुले यांनी शिक्षणासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी वापरला, म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. बी. सावंत म्हणतात “शिक्षण आणि समाजपरिवर्तनासाठी या भूमीत कायावाचामने चंदनासारखा झिजलेला पहिला (आधुनिक काळातील) महापुरुष म्हणजे ज्योतिराव फुले आहेत”
महात्मा फुले यांचे विचार सडेतोड आहेत. ते क्रांती करणारे आहेत. महात्मा फुले यांनी लेखणीच्या व प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्या वैचारिक विरोधकांना प्रत्युत्तर दिले. फुले हे तडजोडवादी नव्हते. त्यानी कधी आपल्या विरोधकांशी हातमिळवणी केली नाही, पण माणुसकी मात्र कायम जपली, त्यामुळेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात “ज्योतिबा की नीति और उनका तत्वज्ञान यही लोकतंत्र का एक मात्र सच्चा मार्ग हे।”.
महात्मा फुले यांनी शैक्षणिक,धार्मिक आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव करताना महाराजा सयाजीराव गायकवाड म्हणतात “फुले हे भारताचे वॉशिंग्टन आहेत”, तर शाहू महाराज म्हणतात “फुले हे भारताचे मार्टिन ल्युथर आहेत”
महात्मा फुले यांना ब्राह्मणद्वेष्टे ठरवणारांनी लक्षात घ्यावे की त्यांनी पीडित काशीबाई नातू या ब्राह्मण महिलेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले व त्याला डॉक्टर बनविले आणि त्याचे आपल्या नात्यातील मुलीशी लग्न लावून दिले.इतके ते मानवतावादी म्हणजेच जातिव्यवस्थेच्या विरोधात होते.
महात्मा फुले हे जात, धर्म, प्रांत, राष्ट्र या सीमा ओलांडून वैश्विक बंधुत्व निर्माण करणारे महापुरुष आहेत.संकुचित राष्ट्रवाद त्यांना मान्य नव्हता.एकमय समाज म्हणजे राष्ट्र हा त्यांचा राष्ट्रवाद आहे. ते म्हणतात ” ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणासी धरावे पोटाशी बंधुपरी” हा त्यांचा प्रगल्भ मानवतावादी वैश्विक विचार होता.स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुली करून अस्पृश्यता निर्मूलनाची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली.
महात्मा फुले निर्भीड होते. ते कणखर होते. त्यांनी संकटावर मात करून यश मिळविले. ते पलायनवादी नव्हते, तर ते लढवय्ये होते. कठीण प्रसंगी ते निराश-हताश होऊन बसले नाहीत. ते स्वाभिमानी होते, तसेच ते संवेदनशील मनाचे होते. ते जितके कर्तव्यकठोर होते,तितकेच ते विनयशील होते, परंतु विचाराबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. ते निस्वार्थी होते. ते प्रचंड कनवाळू होते. ते नीतिमान होते.

-डॉ.श्रीमंत कोकाटे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!