दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

राजे, आम्हाला माफ करा…आम्ही षंढ झालो आहोत!

महेंद्र कुंभारे,
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.
शनिवार दि. 1 मार्च 2025
मो.नं. 8888182324

राजे, खरचं आम्ही तुमची माफी मागतो. कारण आम्हा षंढांना याशिवाय दुसरे काही येत नाही. तुम्ही त्याकाळी कठीण परिस्थिती असताना आमची सुंता होण्यापासून आम्हाला वाचविले. त्यावेळी तुमच्या अवतीभोवती फितूर, गद्दार होते पण स्वराज्यासाठी जीव देणारे जाँबाज मावळेही होते. मात्र, आता आमच्या राज्यात तुमच्या नावाचा फक्त वापर केला जातो आहे. तुम्ही दाखविलेल्या रस्त्यावर चालायला कोणीच तयार नाही. महाराज, तुमच्या स्वराज्यात परस्त्रीकडे वाईट नजरेने बघायची कोणाची हिंमत नसायची. याबाबतीत तुम्ही तुमच्या मेहुण्याने डोळे फोडले होते हा इतिहास आहे. पण आमच्या राज्यात एकही स्त्री सुरक्षित नाही. कित्येक तरुणी बेपत्ता आहेत. दिवसा ढवळ्या बस स्टँड सारख्या सार्वजनिक ठिकाणी महीलेवर बलात्कार होऊन राहीले आहेत. आणि आमचे औरंगजेबी राज्यकर्ते त्याची निर्लज्ज कबूली देत आहेत. राजे, आज तुम्ही असते तर प्रथम या हलकट राज्यकर्त्यांचेच डोळे फोडले असते.

महाराज, नवीन पिढीने तुमचा आदर्श घ्यावा म्हणून ठिकठिकाणी तुमचे पुतळे उभे केले आहेत. मात्र, आज आमच्या षंढांच्या राज्यात तुमच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करुन ते कोसळत आहेत. आणि आम्ही षंढ फक्त उघड्या डोळ्यांनी हे बघत आहोत. तुम्ही त्या परप्रांतीय औरंगजेबाला सळो की पळो करुन सोडले होते. पण आमच्या राज्यात आपलेच राज्यकर्ते रयतेलाच सळो की पळो करुन सोडत आहेत. राजे, स्वराज्यात आपल्या सैन्यात अठरापगड जाती, बारा बलुतेदार, मुसलमान सर्वच जाती धर्माच्या लोकांना “मावळे” म्हणून आपण एकत्र आणले होते. ते सर्व जीवाला जीव देऊन स्वराज्यासाठी लढत होते. मात्र, आमच्या राज्यात आम्हीच निवडून दिलेले (मशिनमध्ये घोळ करुन आलेले) राज्यकर्ते जातीधर्मात द्वेश पसरवून आम्हालाच आपापसात लढवत आहेत. महाराज, आम्हा षंढांकडे आपणांस सांगण्यासारखे खुप आहे. पण, हल्ली आपल्या बदनामीची नवीनच पध्दत सुरु करण्यात आली आहे.

एका विशिष्ट वर्गाची लोकं उठसूठ आपली बदनामी करत सुटले आहेत. संवैधानिक पद धारण करणारी जबाबदार व्यक्तीही सार्वजनिक ठिकाणी आपली टिंगल करत असताना आम्ही षंढांसारखे गप्प बसलो. राजकीय मंडळी तर कॅमेरा समोर आपला एकेरी उल्लेख करत आहेत. कुरुलकर, सोलापूरकर, कोरटकर यांनी तर आपल्या बदनामीची सुपारीच घेतली आहे. मिठाईच्या पेटाऱ्यातून आपण खूबीने औरंग्याच्या तावडीतून निसटण्याच्या शौर्याला हि लोकं पळपुटे म्हणतात. तुमचा शिवाजी लाच देऊन पळाला असा एकेरी उल्लेख करत असतांना आम्ही षंढ काय बरे करणार? सध्या आमच्याकडे खोटी लोकशाही अस्तित्वात असून आमच्या ब्राम्हणांच्या राज्यात असा खुलेआम उल्लेख हि लोकं करतात. महाराज, आमचा छावा शंभूराजांना सुध्दा असेच बदनाम करुन खोटा इतिहास सांगितला गेला. शंभूराजांचा काही प्रमाणात खरा इतिहास डॉ.अमोल कोल्हे यांनी सिरीयलच्या माध्यमातून आणि इंद्रजित सावंत यांनी “छावा” चित्रपटातून समोर आणला तर त्यांना कोरटकरांनी फोनवरुन अर्वाच्च भाषेत शिविगाळ करुन मारण्याची धमकी देण्यात आली. विशेष म्हणजे आमच्या सरकारने सावंतां एवजी कोरटकरला पोलिस संरक्षण दिले हे आम्हा षंढांचेच दुर्दैव. महाराज, तुमची खुलेआम बदनामी होत असताना आम्ही राजकारण्यांच्या ताटाखालचे मांजरी झालेलो हतबल षंढ साधा निषेधही करु शकत नाहीत. म्हणून महाराज आम्हाला माफ करा, आम्हा षंढाकडून जास्त अपेक्षा ठेऊ नका. राजकारणी मतांसाठी तुमचा वापर करत आहेत. हे आम्हाला माहीत असतांनाही आम्ही गप्प आहोत. आमचे रक्तच थंड झाले आहे. तुमचा शौर्याचा इतिहास वाचूनही आमच्यात ताकद येत नाही. त्यामुळे भविष्यात आपली अजून जास्त बदनामी होणार हे निश्चित. आणि आम्ही षंढ त्यांचा प्रतिकार करु शकणार नाही म्हणून आम्हाला माफच करा…..🙏

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!