पक्ष म्हणून राष्ट्रवादी वाढवणार नाही – अजित पवार गटातून उमेदवार असलेल्या अर्चना राणाजगजितसिंग पाटील यांचे अजब वक्तव्य.

धाराशिव : एखाद्या लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणजे नेमक काय? त्याच्या जबाबदाऱ्या काय कर्तव्ये काय हे सगळं त्या उमेदवाराला सर्वसामान्य जनते पेक्षा खूप जास्त चांगल्या पद्धतीने माहिती असत किंबहुना असायला पाहिजे. पण सध्याचं राजकारण “सेटिंग” वर चालते, सामाजिक आर्थिक वजन तपासून उमेदवारी दिली जाते, उमेदवार निवडून “आणले” जातात, राखीव जागा पडल्यास संधी साधून पक्षांतर केलं जातं इत्यादी लोकशाहीला लाजवणारे प्रकार आजकाल सर्रास पाहायला मिळतात.
पक्ष प्रवेशा दिवशीच भाजपा मधून पक्षांतर करून अजित पवार गटात आलेल्या व तात्काळ उमेदवारी भेटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार, केवळ खासदार म्हणून निवडून येता येईल या विश्वासावर पक्ष बदलून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तुळजापूर चे भाजपा चे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील नव्या वादात सापडल्या आहेत. ज्या राष्ट्रवादी पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली, त्याच पक्षाबाबत त्यांनी वादग्रस्त विधान करत खळबळ उडवून दिली आहे.
बार्शीत राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढवणार का असा प्रश्न अर्चना पाटील यांना पत्रकारांनी विचारला होता. तेव्हा मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, माझा नवरा स्वत: भाजपचा आमदार आहे असं विधान अर्चना पाटील यांनी केलंय.
अर्चना पाटील यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे.. अर्चना पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी घेतलीय. तर त्यांचे पती आमदार राणाजगजितसिंग पाटील हे तुळजापूरचे आमदार आहेत. धाराशिव लोकसभा उमेदवारीवरुन महायुतीत तणाव वाढला आहे. इथे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावरुन शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक आक्रमक झालेत. तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत यांना तिकीट द्यावं अशी मागणी तानाजी सावंतांच्या समर्थकांनी केली आहे. त्याचाच भाग म्हणून भूम, परंडा, वाशी तालुक्यातील शिवसैनिकांनी राजीनामे दिलेत. तसंच राजीनाम्यांची होळीही केली. महायुतीचा धाराशिवचा उमेदवार बदला अशी त्यांची मागणी आहे.
आणखीन विशेष म्हणजे भाजपा आमदाराच्या पत्नी ज्या राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे निवडणूक लढत आहेत त्या अर्चना पाटील यांचे दिर धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार आहेत त्यामुळे आता दीर विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. म्हणजे निवडणुकीचा निकाल कांहीही आला तरी सत्ता आपल्याच घरात.
अशा पद्धतीचे विचारधारा व पक्षनिष्ठेची थट्टा करणारे राजकारण लोकशाही संवर्धनासाठी पोषक नक्कीच नाही. आता जनतेनेच जागृत राहून संविधान निर्मात्या च्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी योग्य निर्णय घेऊन मतदान करण्याची आवश्यकता आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत