बौद्ध धम्मात राजकारणातील बहुजनवादाचीभेसळ करू नका – सद्धम्मकार प्रा.आनंद देवडेकर

नालासोपारा (प्रतिनिधी): बौद्ध धम्म स्वीकारलेल्या समाजानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ ऑक्टोबर १९५६ रोजीच्या दीक्षाभूमीवरील भाषणाचं परिशिलन करून, त्या भाषणातील मतितार्थ लक्षात घेऊन बौद्ध धम्मात राजकारणातील बहुजनवादाची भेसळ होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे सुस्पष्ट व रोखठोक प्रतिपादन अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर यांनी नालासोपारा,पश्चिम येथे बोलताना केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या विद्यमाने लॉर्ड बुद्धा कल्चरल सेंटर, बुद्धरूप प्रांगण, सुप्पारक मैदान, नालासोपारा पश्चिम येथे आयोजित ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. देवडेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक नरेशजी जाधव हे होते.
प्रा. आनंद देवडेकर आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात पुढे म्हणाले की, मुक्ती कोण पथे ? हा प्रश्न पडलेल्या मुक्ती लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक बौद्ध धम्म स्वीकारात मुक्तीची वाट सापडली आहे. त्यामुळं आता बौद्ध धम्म स्वीकरलेल्या समाजानं त्यागलेल्या ब्राह्मणी धर्माच्या सुधारणेची चळवळ करणं अपेक्षित नसून बौद्ध धम्म प्रचार प्रसाराचं मिशन गतिमान करण्याची जबाबदारी पार पाडायची आहे याचं आपण भान ठेवायला हवं.
धर्मांतरीत बौद्धांनी धम्मक्रांती निष्प्रभ करण्यास कारणीभूत ठरणार्या दलित, बहुजन आदी संकल्पनांच्या नादी न लागता बौद्ध साहित्य, संस्कृती आणि इतिहासाची ओळख करुन घेतल्यास या विषयांतील समृद्ध वारशाच्या आधारे बौद्ध म्हणून इतरांपेक्षा असलेलं आपलं निराळेपण आपल्या लक्षात येईलच परंतु धम्म स्वीकारानं झालेली आपली प्रगतीही इतरांसाठी प्रेरक ठरेल. त्यासाठीच स्वतःची ओळख (Identity) बौद्ध म्हणून सांगा आणि येणार्या जनगणनेत स्वतःची नोंद जातिविरहित बौद्ध म्हणूनच करा असेही प्रा. देवडेकर आपल्या भाषणात शेवटी म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेश जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रमुख वक्त्यांनी उपस्थित केलेल्या अभ्यासपूर्ण मुद्द्यांचं महत्त्व विशद करून बौद्ध म्हणून आपण जबाबदारीनं वागायला हवं असं सांगितलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन संस्थेचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी केले. श्रोत्यांच्या भरगच्च उपस्थितीत संपन्न झालेल्या या प्रबोधन सत्रात प्रा. संध्या वैद्य, कर्नल सिद्धार्थ बर्वे, बौद्धजन पंचायत समितीचे श्रीधर साळवी, संस्थेचे माजी चिटणीस संजयकुमार खैरे, आयुष्मती वैशाली चिरणकर, साहित्यिक संदीप महाडिक, एम के कांबळे, जयराम मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत