चवदार तळे सत्याग्रह: समता आंदोलनातील सुवर्णपर्व!!!…… डी. एस. सावंत -9969083273

जगाने अनेक ठिकाणी,अनेक मानवमुक्तीचे लढे, सत्याग्रह पाहिले असतील, परंतु महाड येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो पाण्यासाठी सत्याग्रह केला, तो “पाण्यासाठी” केला गेलेला जगातील पहिला आणि एकमेव सत्याग्रह होता म्हणून तो अभूतपूर्व होता, आणि म्हणूनच त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. तो सत्याग्रह केवळ योगायोगाने झाला होता आस कोणी समजू नये कारण त्या पाठीमागची पार्श्वभूमी जातीअंताची, गुलामांना गुलामगिरीची जाणीव करून देणारी होती आणि अंततः समतामूलक समाज निर्मितीची होती.
देश-विदेशातून स्वतंत्रता, समता, बंधुता आणि न्यायाचे ज्ञानामृत प्राशन केलेल्या डॉ बाबासाहेबांना एक वैचारिक, नैतिक अधिष्ठान प्राप्त झाले होते. त्यांच्या समतावादी जीवननिष्ठेमुळे, भारतातील जातीवादी मानसिकतेबद्दल त्यांना प्रचंड चीड आणि विषण्णता आली होती. जगात कुठेही नाही अशा भारतातील जातिव्यवस्थेमुळे, येथील एका विशाल मानवी समूहाला अस्पृश्य म्हणून संबोधण्यात येत होते, आणि उच्चजातीय हिंदू पासून त्यांना वेगळे ठेवण्यात आले होते. पाण्यासारख्या मूलभूत आणि जीवनावश्यक असणाऱ्या, सार्वजनिक स्तोत्रा पासून त्यांना वंचित ठेवले होते. त्यांना अनेक बाबी मध्ये मज्जाव करण्यात आला होता, रस्त्यावरून चालण्यास मनाई, थुंकन्यास मनाई करणारी धर्माधिष्ठित व्यवस्था राजरोसपणे राबवली जात होती आणि येथील हाडामासाच्या माणसाचे जीवन पशु पेक्षा हिन केले गेले होते. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारव्यवहारातून उत्सर्जित झालेली, ही समग्र परिवर्तनाची चळवळ, येथील हजारो वर्षाच्या गुलामीत खितपत पडलेल्या शोषित समाजात प्राणवायू भरणारी, चेतना देणारी आणि स्फुल्लिंग चेतवणारे ठरली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जीवननिष्ठा आणि मूल्याधिष्ठित वर्तनव्यवहाराने ह्या सत्याग्रहाचा कृतिशील आराखडा तयार करून दीन, दलित, शोषित, वंचित, पीडित आणि मागासलेल्या समाजाच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी जेव्हा दंड थोपटले तेव्हा,येथील जीर्ण विचाराचे जळमटे स्वैरभैर झाली, काही वाऱ्यासोबत उडून गेली, तर काही काळाच्या उदरात दफन झाली. असे असले तरी हा संघर्ष तसा साधा, सोपा मुळीच नव्हता, तरीही डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रखर आणि कृतिशील बुद्धिवादी नेतृत्वामुळे, प्रसंगी न्यायालयीन लढाई लढून तो यशस्वी केला गेला.
अरे, जिथे कुत्र्या मांजरांना आणि गुराढोरांना पाणी पिण्यासाठी मनाई नाही तिथे माणसं सारख्या माणसांना मनाई का असावी? आम्हीही माणसे आहोत! येथील नैसर्गिक साधनसंपत्तीवर आमचा ही तुमच्या एवढाच अधिकार आहे!असे ठणकावत बाबासाहेबांनी परिवर्तनाचा नवा सिद्धांतच मांडला. आणि लढ्याची क्रांतदर्शी दिशा ठरवली गेली. म्हणून तो मानवमुक्तीचा जाहीरनामाच ठरला! आणि म्हणूनच महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रहाचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला.
डॉ बाबासाहेब म्हणतात चवदार तळ्याचे पाणी पिऊन कोणीही अजरामर होणार नाही. चवदार तळ्याचे पाणी पिल्याने आमचे दुःख दूर होईल किंवा आमची परिस्थिती सुधारेल किंवा आमच्यावरील अन्याय कमी होईल असा अर्थ नसून, हा केवळ एका मानवाने दुसऱ्या मानवाशी समतेने कसे वागावे तसेच सर्व मानवाला समतेचा अधिकार आहे. हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच आम्हाला किमान माणुसकीचे आणि समतेचे अधिकार मिळाले पाहिजेत ही त्या पाठीमागची भूमिका होती. गुलामगिरीची बेडी तोडण्यासाठी, जुलूमशाही च्या विरोधात विद्रोह करण्यासाठी आणि विषमतेच्या विरोधात एल्गार पुकारण्यासाठी ही लढाई होती.
4 ऑगस्ट 1923 रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे सी. के. बोले यांनी मुंबई प्रांतिक कायदेमंडळांना मध्ये एक ठराव आणला आणि मुंबई कायदेमंडळांनी तो ठराव पारित केला, त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या व सुरक्षित ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजे अस्पृश्य मानले गेलेल्या समूहाला ही वहिवाटीचा हक्क असेल असे नमूद करण्यात आले होते. त्यामध्ये सार्वजनिक पाणवठे, विहिरी,तलाव इत्यादीचा समावेश होता. याप्रसंगी सी के बोले म्हणतात अस्पृश्यता हा आपल्या मातृभूमीच्या नावाने लागलेला कलंक आहे. आफ्रिकेत राहणारे हिंदी लोकांना अस्पृष्याप्रमाणे वागणूक देतात त्याचा आपण निषेध करतो, परंतु आपल्याच घरात हे घडते त्या वेळेला आपण मूग गिळून का गप्प बसतो? हे मला कळत नाही! अस्पृश्यतेमुळे समग्र देशाचे अतोनात नुकसान होत आहे. या ठरावानुसार 5 जानेवारी 1924 साली महाडच्या नगरपालिकेने ही या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पारित केला. हे जरी असे असले तरी त्या तळ्यावर जाऊन पाणी घेण्याची हिंमत अस्पृश्यांमध्ये आली नाही. एवढा वचक इथल्या धर्ममार्तंडांचा होता. त्यांची कायद्याला न जुमानणारी वृत्ती होती आणि त्यामुळेच अस्पृश्य आपले जीवन अत्यंत हलाखीचे मध्ये आणि मूलभूत गरजांच्या पूर्तीविनाच व्यतीत करावे लागत होते.
19 व 20 मार्च 1927 ला महाड येथे “कुलाबा जिल्हा बहिष्कृत वर्गाची परिषद” भरवली गेली, या सभेचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर होते तर मुख्य संयोजक संभाजी तुकाराम गायकवाड तसेच रामजी कद्रेकर इत्यादी.होते. त्यांनी महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापर्यंत स्त्री-पुरुषांना या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून जवळ जवळ पाच हजार पेक्षा जास्त स्त्रिया आणि पुरूष जमा झाले होते. परंतु त्यांनाही कोणाला पाण्याला हात लावण्याची हिंमत झाली नाही. म्हणून त्यांच्यासाठी चाळीस रुपये किमतीचे पाणी उच्चवर्णीय हिंदूंकडून खरेदी केले गेले.
बाबासाहेबांच्या अध्यक्षतेमुळे या सत्याग्रहाला एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले होते. सत्याग्रहींचा उत्साह शिगेला पोहोचला होता. हा सत्याग्रह रायगड जवळ महाड येथे असल्यामुळे आणि म. गांधींनी या सत्याग्रहाला पाठिंबा दिल्यामुळे सत्याग्रही “छत्रपती शिवाजी महाराज की जय” “महात्मा गांधी की जय” “डॉक्टर आंबेडकर की जय” अशी घोषणा देत होते या सत्याग्रहासाठी स्थानिक सुरबानाना टिपणीस, गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, आनंत विनायक चित्रे यांच्यासह अनेक पुरोगामी कार्यकर्ते बाबासाहेबांना सहकार्य, सहयोग आणि मदत करत होते.
20 मार्च रोजी प्रत्यक्ष तळ्यावर जाऊन सर्व सत्याग्रहीनी पाणी प्राषण करायचे असे ठरवले गेले. आणि अत्यंत शिस्तबद्धपणे, अत्यंत अहिंसक मार्गाने हे सत्याग्रही हे चवदार तळ्याच्या दिशेने चालू लागले. आणि अत्यंत धीरगंभीर अशा वातावरणामध्ये बाबासाहेबांनी त्या पाण्याला स्पर्श केला, ओंजळ भरली आणि पाणी प्राशन केले. बाबासाहेबांच्या पवित्र स्पर्शाने ते तळे सुद्धा पवित्र झाले असावे, नाही काय! सर्वांनी आपल्या ओंजळी भरून घेतल्या, मुठीही भरून घेतल्या आणि जातीवादी मानसिकतेला, व्यवस्थेला जणू मूठमातीच दिली गेली! महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रहाने खऱ्या अर्थाने इथल्या प्रस्थापित मनुवादी व्यवस्थेला सुरुंग लावले गेले आणि दस्तुरखुद्द पाण्याने ही एक नवा वनवा… पाहिला असे म्हटले तर वावगे ठरू नये. बा. स. हाटे यांनी “जिथे पाणी पेटले” या पुस्तकात त्याचे यथार्थ वर्णन केले आहे.
मानवमुक्तीच्या लढ्याचा नवारंभ झाला. त्यामुळेच हा लढा मानवी मूलभूत हक्काच्या चळवळीची सुरुवात करणारा ठरला. हा दिवस केवळ पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजासाठी अभूतपूर्व होता असे नाही,तर तो जगाच्या इतिहासात मानवी हक्क संवर्धन आणि मानवी मूल्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जावा असाच होता. या सत्याग्रहाने मानवाधिकाराची मुहूर्तमेढ रोवली गेली!
या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह,चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम,महाडची सामाजिक क्रांती अशा विविध नावांनी संबोधले जाते त्यामुळेच सरकारला सुद्धा 20 मार्च हा दिवस “सामाजिक सबलीकरण दिवस” म्हणून साजरा करावा लागतो हे या लढ्याचे वैशिष्टय आहे.
चवदार तळे प्रकरणांमध्ये इथला सनातनी, पुरोहित वर्ग प्रचंड अस्वस्थ होता. ते गप्प बसतील तरी कसे? त्यांनी एक शक्कल लढवली आणि संपूर्ण महाडमध्ये एक अफवा पसरवून दिली की, चवदार तळ्याचे पाणी बाटवल्यानंतर आता हा जमलेला जमाव वीरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिर बाटवनार
आहेत. आपला धर्म धोक्यात आहे! अशी अफवा पसरवली गेली. आणि त्यातूनच उच्चवर्णीय हिंदू लोक हातात लाठ्याकाठ्या,हत्यारे घेऊन जमावावर चाल करून आले व जेवण तयार करीत असणाऱ्या निरपराध लोकांवर हल्ला केला गेला. या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले. कुणाचे हात मोडले, दुखण्याची पाय मोडले तर कोणाचे डोके फुटले. संयोजक संभाजी गायकवाडचा मुलगा भिकाजी गायकवाड हा अत्यंत गंभीरपणे जखमी झाला आणि 5 जानेवारी 1929 ला त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. ज्या पद्धतीने सनातन्यांनी या जमावावर हल्ला केला तो अत्यंत भयानक स्वरूपाचा होता, हृदयद्रावक होता. त्यामध्ये स्त्रिया, मुले यांना अमानुषपणे मारहाण केली गेली. परंतु मूल्याधिष्ठित जीवनव्यवहारावर निरंतर प्रेम करणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हा लढा अत्यंत संयमाने, विवेकाने आणि अहिंसेच्या मार्गाने लढवला गेला, त्यामुळेच हातामध्ये लाठ्याकाठ्या असतानाही आणि पाच हजाराचा जमाव असतानाही पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यानी बाबासाहेबांच्या आज्ञेचे उल्लंघन केले नाही. धन्य तो नेता आणि धन्य ते अनुयायी!
पुढे येथील सनातन्यांनी चवदार तळ्या मधून 108 घागरी पाणी काढून त्यामध्ये गोमूत्र आणि शेण अशा पंचगव्यामध्ये सनातनी शास्त्रोक्त मंत्रोच्चारात शुद्धीकरण केले? किती हा दांभिकपणा? काय म्हणावे या मानसिकतेला?, आणि अवैज्ञानिक दृष्टीला? हिंदू समाजाला दुर्दैवाने आजपर्यंत हे कळाले नाही की, हा लढा हिंदूंच्या एकत्रीकरणासाठी आणि सक्षमीकरणासाठी सुद्धा होता.(पुढे बॅरिस्टर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वततेमुळे 17 मार्च 1937 ला न्यायालय लढ्याद्वारे अस्पृश्यांना चवदार तळ्या मधील पाणी पिण्याचा कायदेशीर हक्क प्राप्त करून घेतला.)
बाबासाहेबांनी आपली भूमिका विस्तृतपणे मांडण्यासाठी बहिष्कृत भारतात चवदार तळ्याच्या संदर्भात तीन अग्रलेख लिहिले. बाबासाहेब बहिष्कृत भारताच्या अग्रलेखात म्हणतात “पाचीविरथ विजानामा” या म्हणण्याची सत्यता पटवून द्यावी , मात्र बहिष्कृत वर्गाच्या संदर्भात लिहिताना जपून लिहावे. पुढे ते म्हणतात विदूषक किंवा ढोंगी देशभक्तांच्या सहानुभूतीची आम्हाला गरज नाही! तुमच्यावर आमचा तीळमात्र विश्वास नाही! तुमच्या उपदेशाला गवताच्या काडी एवढी आम्ही किंमत देत नाही! तुम्हाला आमच्या हक्काचा पुरस्कार करायचा नसेल तर बाजूला व्हा! आमच्या मार्गात अडसर आणाल तसेच इतरांना भडकवाल तर याद राखा. तात्कालीन “भालाकार” भोपटकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रहवर सनातनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्तर दिले कि, आमचा पक्ष न्यायाचा आहे. “बहिष्कृत वर्ग शेणा मेणाचा नाही. त्यांनी आत्तापर्यंत रणांगणात मर्दुमकी गाजवली आहे.त्यामुळे कुठल्याही लोकांच्या समोर त्यांची गाळण उडणार नाही, हे आम्हास ठाऊक आहे”. आमच्या पाठी आम्हास धमकी देणार्यांची आम्ही खैर करणार नाही. चवदार तळ्याचा सत्याग्रह हा जगातील सर्व मानवाचा निसर्गातील सर्व संपत्तीवर नैसर्गिक साधनावर समान अधिकार आहे हे बजावणारा व निक्षून सांगणारा सत्याग्रह आहे. हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मूलभूत मानवी हक्कासाठी आहे. आता अस्पृश्यांनी बंधनात जगणे सोडले पाहिजे. त्यासाठी संघर्ष केला पाहिजे.आपली सामाजिक आर्थिक आणि राजकीय प्रगती केली पाहिजे. शिक्षणावर भर देऊन चांगला उद्योग,व्यवसाय आणि नोकरी मिळवली पाहिजे.तरच आपला उद्धार होणार आहे.आमची ही सभा अभूतपूर्व आहे फ्रेंच राज्यक्रांती समता बंधुता आणि न्यायाचा उद्घोष करणारी होती तसेच आमचीही आजची सभा समतेचा उदघोष करणारी आहे, त्यामुळे तिला वैश्विक महत्त्व आहे.
आज या लढ्याला 97 वर्षे पूर्ण होत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत जाणिवेने सत्याग्रहासाठी 1927 हे वर्ष निवडले कारण 1927 साल महात्मा फुले यांची जन्मशताब्दी वर्ष होते बाबासाहेबांनी केवळ गुरु शिष्याचे नाते परंपरा अबाधित ठेवली नाही तर सार्थ करून दाखवले होते. गुरूचे कार्य पूर्णत्वास नेणारा हा शिष्य जगावेगळा नव्हे काय !
या लढ्याची फलश्रुती म्हणजे अस्पृश्य समाजामध्ये प्रचंड जागृती आली, त्यांचा स्वाभिमान जागा झाला. गुलामांची ना गुलामगिरीची जाणीव झाली आणि ते बंड करून उठले! आपले मानवी हक्क प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रस्थापितांविरुद्ध दंड थोपटले. तसेच अस्पृश्यता निवारण हे हिंदू धर्माचे सबलीकरण करण्याचे, हिंदू समाजाचे संघटन करण्याचे आहे त्यामुळे आमचे हे कार्य, विचार आणि कृती राष्ट्राला प्रबळ करणारी आहे असा मेसेज इथल्या प्रस्तावित समाजाला सुद्धा दिला गेला.
चौदारतळ्याच्या कृतीशील चळवळीमुळे अस्पृश्यांची चळवळ त्यावेळेला पन्नास वर्षे पुढे गेली परंतु दुर्दैवाने बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांच्या या पोलादी संघटनेला,चळवळीला “अपवाद वगळता” प्रगल्भ,अभ्यासू, दूरदृष्टीचे आणि ध्येय उद्दिष्टा प्रति प्रामाणिक असणारे नेतृत्वाचा अभाव असल्यामुळे चळवळीची वाताहत होताना दिसत आहे. त्यामुळे अन्याय, अत्याचार, बलात्कार तसेच सामाजिक संरचनेचा ढाचा, समतेचा जाहीरनामा असलेलं आपलं संविधान उध्वस्त केले जात आहे हे फक्त आंबेडकरी समाज रोखू शकतो. बाबासाहेबांच्या नावाने मलिदा खाणाऱ्या इतर समाजानेही या समाजाला साथ दिली पाहिजे, त्यांचे डोळे उघडले पाहिजेत,अन्यथा काळ कुणालाही माफ करणार नाही याचे भान असावे! म्हणून आपण संघटित राहून तसेच सर्वांना बरोबर घेऊन या देश विघातक शक्तीचा मुकाबला केल्यास डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या समतावादी चळवळीचा विजय होईल अशी आशा वाटते. चवदार तळ्याच्या सत्याग्रहा निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आणि सत्याग्रहींना विनम्र अभिवादन!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत