दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

चवदार तळ्याचा सत्याग्रह ‘समता दिन‘; परंतु पाण्याची आग मागासवर्गीयांना आजही सोसावी लागत आहे !

महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 या दिवशी झाला होता. तो संघर्ष जवळपास सहा महिने चालतच होता. आज हा दिवस ‘समता दिन’ तसंच ‘सामाजिक सबलीकरण दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.

आतापर्यंत समतेसाठी अनेक आंदोलनं झाली, भारतीय संविधानाने या देशातल्या सर्व जाती-धर्मांना समान हक्क प्रदान केले. पण पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना आणि आत्ताच्या एस.सी /एस.टींना मिळालेले संवैधानिक अधिकार स्वीकारतो कोण ? त्यामुळं पाण्याच्या प्रश्नावरुन आज ही जातीय आणि धार्मिक अस्मिता कशा उफाळून येतात याची अनेक उदाहरणं आपण आजही समाजात पाहतो आहोत. खरं तर ही बाब इथल्या व्यवस्था आणि सरकारला लाज वाटावी अशी आहे. सवर्ण, उच्चधर्मीय लोकांकडून केला जाणारा दुजाभाव, द्वेष, अत्याचार अजूनही समाजात दिसतो आहे.

चवदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना उद्देशून म्हटलं होतं, “चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपल्याला जावयाचे आहे.” याचा अर्थ असा होतो की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह हा मानवी समानतेसाठीच लढला होता. जी समानता इथल्या व्यवस्थेने हजारो वर्षांपासून नाकारली होती.

भारतीय जातीव्यवस्थेने शोषण केलेल्या तसेच सवर्णांकडून ‘अस्पृश्य’ मानल्या जाणाऱ्या दलित जातींना सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेवर समान हक्क देणारा कायदा 1923 साली मुंबई कायदे मंडळाने संमत केला. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाड नगरपालिकेच्या पुढाकाराने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची सभा आयोजित करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणं, पाणवठे आणि चवदार तळं अस्पृश्यांसाठी खुलं करण्यात यावं यासाठी झालेल्या सत्याग्रहात सवर्ण समाजातील नेते मंडळी सुद्धा सहभागी झाली होती. या ऐतिहासिक सत्याग्रहात तीन हजारांहून अधिक लोक सहभागी झाल्याची सरकार दफ्तरी नोंद आहे. ‘आम्हीही माणसे आहोत’ हे जगाला ठणकावून सांगण्यासाठीचा 20 मार्च 1927 ला सुरू झालेला लढा मात्र अजूनही संपलेला नाही ! त्यामुळे महाडचा सत्याग्रह, लढा किती जीवनावश्यक होता हे आपल्याला लक्षात येते.

वास्तविक पाहता पाण्याचा संघर्ष अद्यापही संपलेला नाही. आज ही देशातल्या विविध राज्यांमध्ये एस.सी/एस.टीच्या जाती बांधवांना पाण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. याची काही ठळक आणि जिवंत उदाहरणे आपण मीडियाच्या माध्यमातून सतत पाहत असतो. त्यापैकी काही ठळक अशा पाण्यासाठी झालेल्या संघर्षाच्या सत्यकथा आपण थोडक्यात या ठिकाणी त्याचा परामर्श घेऊ.

आज ही पाणी घेतले म्हणून ‘सवर्णां’ कडून होतं असते मारहाण !

अगदी काही दिवसांपूर्वीची घटना आहे. उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमधील डासनामध्ये एका मुस्लीम मुलाला मंदिराच्या आवारातील पाणी पिण्यावरुन मारहाण करण्यात आली. ही मारहाण करतानाचा व्हीडिओ शूट करण्यात आला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी यादवच्या दोन तरुणांना अटक केली. या मारहाणीत आरिफच्या डोक्याला आणि हाता-पायांना दुखापत झाली. त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारण्यात आलं असं त्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं. ज्या मंदिराच्या परिसरात पाणी पिण्यावरुन आसिफला मारहाण झाली त्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर मुस्लीमांना प्रवेश नाकारणारी एक पाटी आहे – ‘य़ह मंदिर हिंदुओं का पवित्र स्थल है, यहाँ मुसलमानों का प्रवेश वर्जित है.’

मंदिराचे महंत यति नरसिहानंद यांनी ‘पाण्यावरुन हा ड्रामा केला जातोय’ असं होतं. आसिफचं कुटुंब गरीब आहे आणि मजुरीवर आपली गुजराण करतात

तर दुसरी घटना ही राजस्थानच्या भरतपूरमध्ये कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असताना 27 मे या दिवशी काही दलितांना प्रस्थापित लोकांनी गावातल्या आरोचं पाणी घेण्यास मज्जाव केला व मारहाण केली.

तर 9 जून 2019 रोजी उत्तर प्रदेशच्या कोशंबीमधील एका घटनेत सार्वजनिक हँण्डपंपवर पाणी भरलं म्हणून दलित महिलेला मारहाण करुन विवस्त्र केलं गेलं.

‘अस्पृश्यतेच्या आणि भेदभावाच्या खाणखुणा’ जाती-धर्मावरुन अशा प्रकारे भेदभाव करणं हे मुळातच राज्यघटनेतील मुलभूत हक्कांच्या विरोधात आहे.तरी ही ‘तथाकथित पाणी नावाची पवित्र गोष्ट बाटली वा अपवित्र झाली’,अशी तथाकथित सवर्ण समाजाची धारणा या भेदभावाच्या मानसिकतेच्या मुळाशी असते. याशिवाय पाण्यासारख्या नैसर्गिक संसाधनावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भेदभाव, अत्याचार झाल्याची उदाहरणं संवैधानिक लोकशाही स्वतंत्र भारतात घडतच आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजातील अस्पृश्यतेची प्रथा, रुढी, परंपरा मोडून काढण्यासाठी भारतीय संविधानात 17 व्या कलमाचा समावेश करण्यात आला आहे. या कलमानुसार समतेच्या हक्क प्रस्थापित करण्यासाठी तरतुदी आहेत. परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणि शासन आणि प्रशासनात असलेल्या सरकारी जातीवादामुळे आज हे गावकुसात मागासवर्गीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

एक हाती विहीर खणणारे बापूराव ताजने

2016 ला वाशीम मध्ये एक हाती विहीर खणणारे बापूराव ताजने यांच्या बद्दल कदाचित ऐकलं असेल. कडक उन्हाळ्यातली ही गोष्ट माध्यमांनी तेव्हा खूप रंगवून सांगितली होती.वाशीमच्या कोळंबेश्वरमध्ये बापूराव ताजणे या दलित तरुणाची ही गोष्ट.तथाकथित सवर्ण व्यक्तीने त्यांच्या पत्नीला विहिरीवरुन पाणी भरु न देता अपमान करुन पाठवलं.त्याची सल मनात ठेवून बापूराव यांनी आपल्या घराजवळ एक हाती विहिर खणायला सुरुवात केली,आणि चक्क चाळीस दिवसात कठोर परिश्रमानं विहिरीला पाणी लागलं.त्या नंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला खरा पण इथे दलित म्हणून त्यास पाणी नाकारलं गेल्याचा उल्लेख या कौतुकाच्या गर्दीत माध्यमांना आणि लोकांना ऐकायला आला नाही.

आजही पुरोगामी महाराष्ट्राच्या विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पाण्यावरून रणकंदन पेटत असतं. मागासवर्गीयांना मारहाण करणं विहिरीवर मज्जाव करणं अशा अमानवीय घटना सतत सुरू असतातच. पुरोगामी महाराष्ट्रातील अनेक गावात बहुतांश मागासवर्गीय कुटुंबं सार्वजनिक विहिरीतल्या पाण्यासाठी उच्चवर्णीयांच्या मर्जीवर अवलंबून असतात. अनेक ठिकाणी बोअरवेलवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या मागासवर्गीय महिलांना वेगळी रांग लावावी लागते, इतरांचं अर्थात सवर्णांचं पाणी भरुन झाल्यावरच त्यांना पाणी मिळतं. गावामध्ये सवर्ण भागात नळ वा विहिर असेल तर तिथे दलितांना मज्जाव केला जातो.गावात मागासवर्गीय वस्त्यांना अनेक दिवस पाण्यापासून वंचित ठेवलं जातं. सद्यस्थितीत भेदभावाच्या या प्रथा समाजात पाळल्या जात आहेत.” ही बाब अतिशय गंभीर आहे.

भारतात स्वातंत्र्यानंतर ऐंशीच्या दशकातही पाण्यावरच्या समान हक्कासाठी चळवळ छेडली गेली. महात्मा फुले यांच्या वैचारिक वारसदारांनी एकेकाळी ‘एक गाव एक पाणवठा’ सारख्या चळवळी राबविल्या. आज शहर ते पंचायत राज व्यवस्थेतील गावगाड्यात सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील तरच या संवैधानिक भारतात पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. हे हे तितकेच खरे आहे !

संदर्भ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण खंड 18 भाग 1 आणि गुगल.

विजय अशोक बनसोडे
लेखक/संपादक 8600210090
जि.संघटक भारतीय बौद्ध महासभा

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!