भगवान बुद्धांची शिकवण – भाग ९३

रूग्णपिडीत भिक्खूंची सेवा
एकदा एक भिक्खू अतिसाराने आजारी होता आणि आपल्या मलमूत्रातच पडून राहिला होता.
स्थविर आनंदाबरोबर फिरत फिरत तथागत त्या भिक्खूच्या निवासस्थानी आले.
आपल्या मलमूत्रात लोळत पडलेल्या भिक्खूला तथागतांनी पाहिले. ते त्याच्यापाशी गेले व म्हणाले, “भिक्खू, तुला काय होत आहे?”
“भगवान, मी अतिसाराने आजारी आहे.”
“तुझी सेवा करण्यास कोणी आहे काय?”
“भगवान, कोणी नाही.”
“भिक्खू, तुझी कोणी दुसरे भिक्खू सेवा करीत नाहीत, असे का?”
“भगवान, मी कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून कुणी माझी पर्वा करीत नाहीत.”
मग तथागत आनंदाला म्हणाले, “आनंद, जा आणि पाणी घेऊन ये. ह्या भिक्खूला मी स्वच्छ करतो.”
“होय, महाशय,” आनंद त्यांना म्हणाला. त्याने पाणी आणल्यावर तथागतांनी पाणी ओतले व आनंदाने त्या भिक्खूचा देह स्वच्छ केला. नंतर तथागतांनी त्याचे डोके व आनंदाने पाय धरून त्याला उचलून बिछान्यावर ठेवला.
नंतर तथागतांनी त्या क्षणी सर्व भिक्खूगणांना पाचारण केले व ते म्हणाले,
“अमुक एका निवासात कोणी भिक्खू आजारी आहे काय?”
“होय, भगवान.”
“तो कशामुळे आजारी आहे?”
“भगवान त्या भिक्खूला अतिसार झाला आहे.”
“भिक्खूवर्गहो, त्याची कुणी सेवा करीत आहे काय?”
“नाही. भगवान!”
“का नाही? त्याची सेवा का करीत नाहीत?”
“तो भिक्खू कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून भिक्खू त्याची सेवा करत नाही.”
“भिक्खुहो, तुमची काळजी वाहन्यास तुमचे मातापिता नाहीत. तुम्ही जर परस्परांची सेवा केली नाही तर दुसरे कोण करणार? भिक्खुहो, जो माझी सेवा करु इच्छितो त्याने रुग्णांची सेवा करावी.”
“त्याला जर गुरु असेल तर तो जिवंत असेपर्यंत गुरुने त्याची काळजी वाहावी आणि रुग्ण बरा होईपर्यन्त प्रतीक्षा करावी. जर आचार्य अथवा सहनिवासी भिक्खू असेल अथवा शिष्य, सहवासी किंवा गुरुबंधू असेल तर त्याने त्याची काळजी घ्यावी आणि बरा होईपर्यन्त प्रतीक्षा करावी. जर कुणी रुग्णाची सेवा करणार नसेल तर तो त्याचा गुन्हा समजावा.”
एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या महावनात कलंदक निवासामध्ये राहात होते.
त्या वेळी स्थविर वक्कली रुग्ण, पीड़ीत व व्याधिग्रस्त अशा स्थितीत एका कुंभाराच्या झोपडीत राहत होता.
स्थविर वक्कलीने आपल्या सेवकांना बोलाविले व तो म्हणाला,
“मित्रहो, तथागतांकडे जा आणि माझ्या वतीने त्यांच्या चरनी वंदन करून त्यांना सांगा, ‘भिक्खू वक्कली रुग्ण, पीडीत व व्याधिग्रस्त आहे व तो तथागतांच्या चरणी वंदन करीत आहे.’ आणि असेही सांगा, ‘वक्कलीवर दया करा आणि त्याला पाहण्यास या.'”
भगवानांनी मौनानेच सम्मती दर्शवली. नंतर वस्त्रे लेवून भिक्षापात्र चिवरासह स्थविर वक्कलीला पाहण्यासाठी तथागत गेले.
स्थविर वक्कलिने तथागतांना येताना पाहून आपल्या बिछान्यावर तो सावरून बसला.
तेव्हा तथागत स्थविर वक्कलीला म्हणाले, “वक्कली, उठू नकोस. ह्या इथल्या आसनावर मी बसतो.” त्याप्रमाणे तिथे असलेल्या आसनावर तथागत बसले व ते स्थविर वक्कलीला म्हणाले:
“वक्कली, मला दिसते आहे की, तू सर्व सहन करीत आहेस. तू धीराने दिवस कंठीत आहेस. तुझी पीडा न वाढता कमी होत आहे ना? ती कमी होण्याची लक्षणे आहेत की वाढण्याची?”
“नाही, भगवान. मला आता सहन होत नाही. मला धीरही उरला नाही. तीव्र कळांनी मी हैराण झालो आहे. त्या कमी होत नाहीत. त्या कमी होण्याची लक्षणे दिसत नाहीत. उलट वाढण्याचीच दिसतात.”
“तुझ्या मनात काही संदेह आहे, वक्कली? काही दुःख?”
“भगवान, माझ्या मनात काही संदेह किंवा दुःख नाही.”
“वक्कली, तुझ्या शीलाबाबत काही दोशार्ह आहे काय?”
“भगवान, नाही. माझ्या शीलाबाबत लज्जा वाटण्यासारखे काही घडलेले नाही.”
“वक्कली, असे आहे तर तुला काही तरी दुःख होत असले पाहिजे. कसला तरी तुला पश्चाताप होत असला पाहिजे.”
“भगवान, आपले दर्शन व्हावे अशी फार दिवसांची इच्छा होती पण त्यासाठी आपल्याकडे येण्याचे त्राण देहात नव्हते.”
“वक्कली, ह्या माझ्या क्षुद्र देहात पाहण्यासारखे काय आहे? जो धम्माला पाहतो, तो मला पाहतो, वक्कली! जो मला पाहतो, तो धम्माला पाहतो. धम्माचे दर्शन करणाऱ्याला मी दिसू शकतो आणि वक्कली, माझे दर्शन करण्यात धम्माचेही दर्शन घडते.”
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१५.३.२०२४
(संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड-सहा)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत