मूलनिवासी बहुजन चळवळीला दीनाभाना यांचे योगदान..

मूलनिवासी बहुजन चळवळीला नवीन दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य दीनाभाना यांनी केले आहे. आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांना समजून घेण्यासाठी थोडासा प्रयत्न करुया. राजस्थानमधील जयपूर पासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या वागास या गावी 28 फेब्रुवारी 1928 ला दीनाभाना यांचा जन्म झाला. सुरूवातीला त्यांच्या परिवाराकडून त्यांचे दीनानाथ असे नाव विचारपूर्वक ठेवण्यात आले होते. पुढे त्यांनी दीनानाथ मधून नाथ कमी करून वडिलांचे नाव भाना जोडून दीनाभाना असे केले. पुढे ते दीनाभाना या नावाने ओळखले जाऊ लागले. ते आपल्या आईवडिलांचे पाचवे अपत्य होते. त्यांना पाच भाऊ आणि एक बहीण होती. ते 14 ते 15 वर्षाचे असताना त्यांच्या जीवनात एक घटना घडली. ती अशी की, दीनाभाना यांच्या वडिलांनी गांवातील एका जाट व्यक्तीला त्यांच्या पाळीव प्राण्यांना चारा पाण्यासाठी हौद बनवून दिला होता. ज्याच्या मजुरीच्या बदल्यात त्यांनी म्हैस भेट दिली होती. त्यामुळे दीनाभाना यांना फार आनंद झाला कारण त्या काळात त्यांच्या समाजातील व्यक्तींना धार्मिक बंधनाप्रमाणे म्हैस पाळण्यावर बंदी घातली होती. गावातील पहाडीवर त्या गांवचे राजा ठाकूर यांचा राजवाडा होता. तिथून भाना यांच्या घरी बांधलेली म्हैस स्पष्ट दिसत होती. याची चौकशी केल्याने राजाला लक्षात आल्यावर भाना यांना बोलावून घेतले. तेव्हा राजाने भाना यांना म्हैस या विषयावर विचारणा केली तेव्हा त्यांनी जाटाकडून विकत घेतल्याचे स्पष्ट केले. तेव्हा राजाने ती म्हैस परत करायला सांगितलं. डुक्कर पाळणारे म्हैस कशी पाळू शकतात? याची त्यांना जाणीव करून दिली. परिणामी भीतीपोटी भाना यांनी ती म्हैस जाट या व्यक्तीला परत केली. यावरून जातीची भयानकता दीनाभाना यांच्या लक्षात आली आणि ते वागास गाव सोडून 1937 ला दिल्ली येथे आपल्या भावाकडे आले. पुढे 1946 ला ते पुणे येथे आले जिथे त्यांना थोड्याच दिवसात सरकारी कर्मचारी म्हणून नोकरी मिळाली. ज्यात त्यांनी आपल्या भंगी जातीचा उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांची नियुक्ती कामगार म्हणून करण्यात आली होती तरी त्यांच्या कडून साफसफाई चे काम करवून घेतले जात असे. यात ते समाधानी नव्हते. पण त्यांच्यासमोर पर्याय उपलब्ध नव्हता म्हणून ते सहन करीत होते. त्यांनी 1944 मध्ये दिल्लीस्थित पंचकुइयाँ परिसरात झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेला उपस्थित असताना ऐकले होते, त्यात बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, आपण जास्तीत जास्त शिक्षण घेतले पाहिजे. त्यामुळे त्यांनी थोडेफार इंग्रजी शिक्षण घेतल्याने त्यांना 1967 ला डिफेन्स मध्ये निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली.
मूलनिवासी बहुजन समाजातील चळवळीला एक नवे वळण मिळाले ते असे की, पुणे स्थित आर्डीनंन्स फॅक्टरी मध्ये 1957 पासून बुद्ध जयंती व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्टी दिली जात होती. परंतु 1970-72 च्या काळात प्रशासनातर्फे या दोन्ही सुट्ट्या रद्द करून एक टिळक जयंती व दुसरी दिवाळी च्या सुट्टीत बदल करण्यात आली. त्या काळात आर्डीनन्स फॅक्टरी मध्ये 22000 हजार कर्मचारी होते. त्यात 42 महार व 6 भंगी असे 48 जण चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते. या सर्व कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या समस्या निर्मूलनासाठी 100 सदस्यांची एक समिती तैयार करण्यात आली होती. त्याच काळात मान्यवर कांशीराम जी त्या कार्यालयात अधिकारी पदावर कार्यरत होते. तेव्हा कांशीराम जी यांनी दीनाभाना जी यांच्यात हिंदी, इंग्रजी सुधारणा घडवून आणली आणि त्यांच्या कडे प्रयोगशाळेची देखभाल करण्याचे काम सोपविण्यात आले. त्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांचे नेतृत्व करण्याची संधी त्यांच्या कडे चालून आली होती. परिणामी त्यांना त्या 100 सदस्यीय समितीत चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. त्या संधीचे सोने करण्याची संधी चालून आली होती म्हणून त्यांनी बुद्ध व आंबेडकर जयंती च्या सुट्ट्या रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात समितीसमोर प्रश्न उपस्थित केला त्यामुळे प्रशासन अडचणीत आले होते. तेव्हा प्रशासनाने चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना प्रश्न विचारला की, काय आपण दीनाभाना यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या मागणीशी सहमत आहात? तेव्हा कर्मचा-यांनी सहमत नसल्याचे सांगितले आणि त्यांना नोकरीची आवश्यकता असल्याचे लेखी पत्र लिहून दिले होते. त्यामुळे प्रशासनाने दीनाभाना यांना कमिटीतून काढून टाकले जात असल्याची नोटीस दिली. तसेच एक आठवड्यात नोकरीतून सुद्धा काढून टाकण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले होते. परिणामी कार्यकारी कमिटीच्या सदस्य पदाची निवडणूक रद्द करण्याची नोटीस पण देण्यात आली. हे प्रकरण मान्यवर कांशीराम जी यांनी त्यांच्या वकील मित्राला सांगितली तेव्हा त्यांनी कुठल्याही मतदारांना निवडून दिलेल्या प्रतिनिधींना माघारी बोलविण्याची तरतूद कायद्यात नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे वकिलांमार्फत दीनाभाना यांनी कमिटीचे चेअरमन, प्रशासन व इतर अधिका-यांना नोटीसा पाठविल्या परिणामी पुनश्च होणारी निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यामुळे ज्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांनी दीनाभाना यांच्या सोबत नसल्याचे पत्र प्रशासनाला दिले होते ते मात्र कांशीराम यांना येऊन भेटले परंतु त्यांनी दीनाभाना यांच्या समर्थनार्थ उभे राहिले नाहीत. त्या काळात दीनाभाना यांना बडतर्फ केल्याने उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाल्याने कुटुंब अडचणीत आले. तेव्हा कांशीराम यांनी दीनाभाना यांना त्यांच्या पगाराएवढी रक्कम देण्याचे अभिवचन दिले होते. म्हणून ब्राह्मणवादी प्रशासनाने दीनाभाना यांच्या पत्नीला माफी मागण्यासाठी तैयार करावे असा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता, त्याला त्या बळी पडल्या नाहीत.
या अनुषंगाने बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सुट्ट्या रद्द करून दीनाभाना यांना बडतर्फ करण्याच्या उद्देशाने कोर्टात फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्या काळात या केसच्या संदर्भात डी. के. खापर्डे साहेब यांची कांशीराम सोबत भेट झाली. तेव्हा बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. त्याप्रसंगी डी. के. खापर्डे यांनी मान्यवर कांशीराम यांना जातीचे निर्मूलन ( Annihilation of Caste) ही पुस्तक भेट दिली. जी त्यांनी सात वेळा वाचली. त्यामुळे मूलनिवासी बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे कारण कळले. म्हणून या व्यवस्थेच्या विरुद्ध लढ्यात सहभागी व्हायचे त्यांनी ठरविले. त्यांच्या हे पण लक्षात आले की, ‘इच्छा प्रबळ असेल तर मार्ग काढले जाऊ शकतात आणि इच्छा प्रबळ नसेल तर बहानेबाजी पुढे येईल.’
याच काळात दीनाभाना यांना कांशीराम मदत करीत असल्याची प्रशासनाला पूर्ण जाणीव झाल्याने संचालकांनी कांशीराम यांना दालनात बोलावून घेतले आणि बाबासाहेब बदमाश असल्याची माहिती कांशीराम यांना दिली. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचे फार नुकसान केल्याचे संचालकांनी स्पष्ट केले होते. तेव्हा कांशीराम यांनी प्रशासनाला पूर्ण विरोध केला होता. एवढेच नव्हे तर 14 एप्रिल च्या सुट्टी जाहीर करण्यास भाग पाडले होते. मात्र प्रशासनाने चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना कामाच्या मोबदल्यात ओव्हरटाईम देण्याचे जाहीर केले. ज्यात चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांनी काम केले. पुढे मात्र या दोन्ही केसचा निकाल दीनाभाना यांच्या बाजूने लागला. त्यामुळे संचालकांची बदली करण्यात आली तर उपसंचालकांना नोकरीतून काढून टाकण्यात आले होते. तर दीनाभाना यांना नोकरीचे सर्व लाभ प्रदान करण्यात आले. रद्द केलेल्या दोन्ही सुट्ट्या पूर्ववत सुरू करण्यात आल्या. यांचा आनंदोत्सव साजरा करताना पुण्यात खुशीची लहर निर्माण झाली. ज्याला त्या काळात दादासाहेब गायकवाड यांनी सुद्धा सहकार्य केले होते. त्यामुळे मूलनिवासी बहुजन समाजावर होणा-या अन्याय अत्याचाराला थांबविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका पार पाडली पाहिजे अशी संकल्पना पुढे आली. त्यामुळे 1973 ते 1978 या पाच वर्षांच्या काळात मूलनिवासी बहुजन समाजात आपल्या आदर्श महापुरुषांच्या विचारधारेचा प्रचार प्रसार करण्यात आला. परिणामी 6 डिसेंबर 1978 ला दिल्ली च्या बोट क्लब वर बामसेफ च्या पहिल्या अधिवेशनात बामसेफ ची निर्मितीच्या अनुषंगाने सामाजिक भूमिका स्पष्ट करण्यात आली. अशाप्रकारे दीनाभाना यांनी आर्डीनन्स फॅक्टरी च्या समन्वय समितीच्या बैठकीत सदरील मुद्यावर एल्गार पुकारल्यामुळे पुढे जाऊन बामसेफची स्थापना करण्यात आली. एवढे महत्त्वपूर्ण योगदान मान्यवर दीनाभाना यांचे मूलनिवासी बहुजन चळवळीत आहे. याची आपण दखल घेऊन मार्गक्रमण करावे. हीच त्यांना जयंती निमित्त आदरांजली ठरेल असे मला वाटते. या शाब्दिक मार्गदर्शनाने मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. तसेच जयंती निमित्त आपणांस कोटी कोटी सदिच्छा.
लेखक : मेश्राम बी. बी., अभ्यासक, संचालक : फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कल, छत्रपती संभाजी नगर, (औरंगाबाद) महाराष्ट्र. 431002.
संपर्क : 9421678628.
stdbbm@gmail.com.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत