संत परंपरेतील ध्रुव तारा- संत शिरोमणी गुरु रविदासजी.

“भारताचे आकाश संत महात्म्यांच्या तारकांनी भरलेले आहे. त्यात संत रविदास हे ” धृव” तारा आहेत – ओशो.”
ओशो सारख्या तत्त्वज्ञानी महागुरुने प्रशंसा केलेल्या या महान क्रांतिकारी संताची महाराष्ट्राला तशी फार कमी माहिती आहे.
संत रविदासाचा जन्म १४३३ साली काशी जवळील मांडूर (मंडुवाडोह प्रचलित नाव) गावी, रविवारी माघी पौर्णिमेला झाला.
चोदह सौ तैतीस की माघ सुदी पंद्रास!
दुखियों के कल्याण हित, प्रकटे श्री रविदास!!
मांडूर नगर लीन औतारा, रविदास शुभ नाम हमारा!!
रविदास, रोहिदास, रयदास, रैदास, भगत, तसेच गुरू, महाराज, भक्त, संत, संत शिरोमणी, संतनके संत ह्या उपाध्या लावलेल्या अनेक नावे भक्त रत्नावली, संत रविदास वाणी, संत रविदास की भक्तिसाधना, रविदास दर्शन, रविदास रामायण सारख्या हिंदी साहित्यात आढळतात. त्यामुळे त्यांच्या नावाबद्दल तसेच जन्मस्थाना बद्दल ही काही विद्वाना मध्ये मतैक्य नाही.
चौदाव्या शतकात सामान्य जनता बादशहाच्या झिझिया कर, अपहरण, धार्मिक बंधने व धर्मांतर, तसेच भट पुरोहितांच्या पुराणांतील कर्मकांड अंधश्रद्धे मुळे अज्ञान, भिती व गुलाम गिरीच्या जाळ्यातील बेबंदशाहीतील कष्टमय जीवन जगत होते. सर्वत्र अराजकता, दुःख, अशांतता, विषमता अंदाधुंदी पसरली असता, भक्तिमार्गाने, गीत, संगीतातून व पदभ्रमण करीत निर्भीडपणे समानतेचा, एकीचा आपलेपणाचा संदेश देणारी क्रांतीकारी चळवळ अतिशय आत्मविश्वासाने संत रविदास महाराजानी चालविली…! ते मनूवादा विरूद्धचे परिवर्तनाचे प्रखर आंदोलन होते. ह्या आंदोलनातून लोकांना ज्ञानी करून, अन्याया विरुद्ध संघटीत करून प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा देत होते..!
हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य,अस्पृश्यता, विटाळ, अंधश्रद्धा ईत्यादी कारणाने शुद्रांना, स्त्रियांना, मंदीर बंदी, शिक्षण बंदी जात पात, भेदाभेद उच्चनीचतेच्या विषमता वादी रिती रिवाज व्यवस्थेने समाज पोखरला गेला होता. अश्या काळी
हरिको भजे सो हरि का होय,
जात पात पुछे नहि कोय!
रविदास उपजइ सभ इक नूर ते, ब्राम्हण मुल्ला सेख!
सभ को करता एक है,
सभ कूं एक ही पेख!!
सारे शूद्र, ब्राम्हण, मुल्ला, सर्व मानव एकाच ज्योतीपासून उत्पन्न झालेली माणसं आहेत. सर्वांचा निर्माता एक आहे. सर्व माणसं समान आहेत. भेदाभेद ही पापीआचरण आहे. हा समतेचा, बंधूभावाचा संदेश आणि धारिष्ट्य उच्चवर्णिय विशेषतः भट पुजाऱ्यानां आवडले नव्हते.
एक शुद्र चर्मकार देवा धर्माच्या विरोधात प्रचार करतो. तो सर्व प्रकारे अपमान, छळ करून ही थांबत नाही. हे सहन न झाल्याने कट कारस्थान रचून भट पुरोहितांनी सिकंदर लोधी बादशहाकडे रविदास इस्लाम विरुद्ध बोलतो. राम व रहीम एकच आहेत म्हणतो.. मस्जिद मध्ये अल्ला नाही म्हणतो.. असे म्हणत जनतेला चिथावणी देतो अशी तक्रार केली. बादशहाने बिथरून रविदासाला तुरुंगात टाकले. शिक्षा म्हणून हत्तीच्या पायदळी देऊन जीवंतपणे मारण्याचे फर्मान काढले पण त्या मदमस्त हत्तींने रविदासाला तुडवण्यासाठी आपला पाय वर न उचलता सोंड आकाशात उचलुन जागेवर स्तब्ध राहिला. जणू तो रविदासाना नमनच करतो आहे. हे पाहून तिथे जमलेल्या जनसमुदायाने आचंभित होऊन त्या शिक्षे विरोधात घोषणा दिल्या. रविदासाचा जय जयकार केला..त्या जन प्रक्षोभाने बादशहाने आपला मनसुबा बदलला व रविदासाला सन्मान पूर्वक सोडून दिले.
चवताळलेल्या, घाबरलेल्या, ब्राम्हण, भट, पुरोहितांनी शुद्र रविदास धर्म, वेदप्रामाण्य, अठरा पुराणांना विरोध करतो, तिर्थ यात्रा, व्रत वैकल्याना सोंग ढोंगं म्हणत आमचा धर्म भ्रष्ट करतो; वेद पुरानां विरूद्ध लिहतो, बोलतो, जादू भानामती करतो म्हणत काशी नरेशा कडे त्यांची तक्रार केली व ईशनिंदे बद्धल राजशिक्षा करावी असा आग्रह धरला. काशी नरेशाने रविदासाला दरबारात बोलावून जाब विचारला असता, त्या दरबारातील राजसभेत तमाम धर्म मार्तंडांचा त्यांनी आपल्या ज्ञानाने, कोमल अमृवाणीने, तर्कशुद्ध वाणीने पराभव केला. त्यामुळे राजाने त्यांना आश्रय व अभय दिले. त्यांची काशीतून पालखीतून गौरव मिरवणूक काढली. राजाश्रयामुळे व जनाश्रयामुळे रविदासाची किर्ती सर्वत्र पसरली. तत्कालीन धर्म, समाज, कर्मकांड, अंधविश्वास व्यवस्थेविरुद्ध, निर्भयपणे बंडखोरी करून राजाश्रय व बहूजनाश्रय मिळवणे हे चमत्कारा पेक्षा कमी नव्हते..!
जगाच्या पाठीवरील उदय झालेली सर्व राज्ये ही जनतेसाठी निर्माण झालेली होती व आहेत. अमुक एका देवासाठी कुठले ही एक राज्य निर्माण केलेले नाही. राज्यकर्ते जरी आपल्या राज्यांना देवाधिष्टित वा धर्माधिष्ठित मानत असले तरी ही ती सर्व राज्ये ही जन कल्याणासाठीच होती व आहेत. देवांच्या कल्याणासाठी मानवांना हरवून कोणी राज्य स्थापण केलेले दाखले इतिहासात कुठेच सापडत नाहीत. राज्ये ही जन कल्याणार्थ असतात. त्यात देव राज्य (राम राज्य) अल्लाहके नामपर, (इस्लामी राजवट) राजे शाही सरकारे धर्मा धर्मात देशा देशात विभागल्या गेलेली आहेत. संत रविदास महाराज जनतेला आणि राज्यकर्त्यांना सांगतात की सरकार वा राजवट कोणतीही का असेना, पण
ऐसा चाहौ राज मै, जहां मिले सबन को अन्न!
छोट बडो सभ सम बसै रविदास रहे प्रसन्न!!
अशी असावी अशा राज्याला ते बेगमपुर (बे गम) संबोधतात.
बेगमपुर सहर का नाम!
फिकर ॲदेस नहि तेहि ग्राम!
बेगमपुर म्हणजे दुःख रहित नगर (राज्ये) की जिथे भय, दुख, चिंता नाही; कर नाही, पण अन्न पाणी मुबलक असावे. नेहमी आनंदच आनंद असावा अशी राज्ये म्हणजे बेगमपुर.
वसुधैव कुटूंबकं ते हेच.! पृथ्वी ही कुटूंब आहे…! अशी पृथ्वी म्हणजेच बेगमपुर …!
मानव कल्याण हेच ध्येय राज्यकर्त्यां, सरकारने पाहिले पाहिजे. हा वैश्विक विचार त्यांनी आपल्याला दिलेला आहे. मानव हित त्यांच्या कल्याणात सुखात आहे. ते कल्याण कसे होईल.? जगातील दूखं नष्ट झाल्यावर. जगांतील दुखं नष्ट कशी होतील? यावर त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे.
काम भ्रम क्रोध भ्रम मद भ्रम लोभ भ्रम मोह भ्रम!
पंच संग्या मिली पिडिओ प्राणियां!
काम, क्रोध, मद लोभ, मोह हे भ्रम विकार आहेत. ह्या पंचविकारानी मानवाला पिडलेले आहे. हे पंचविकार नष्ट केल्याने दुःखमुक्ती होते.
सत्त संतोष अरू सदाचार जीवन को आधार!
रविदास भये नर देवते जिन तिआगे पंच विकार!!
दुःखापासून मुक्त होण्यासाठी संतोष व सदाचार हे जगण्याचे मूलाधार आहेत. ह्या पंच विकारापासून मनुष्याने परावृत्त राहिले पाहिजे.
विकार हे मनात असतात. ज्यांच्या मनाने या विकारांवर विजय मिळवलेला आहे त्यास मनचंगा म्हणतात. विकृत, कृत्यांना अपराध म्हंटले आहे. हे अपराध आधुनिक भा.द.वी कलमानुसार दंडपात्र आहेत…!
रविदास निर्गुण निराकार एकेश्वरवादी होते. मनचंगा मनांत देव वास्त्व्याला असतो. मंदिरातल्या मुर्ती तीर्थस्थानी वा जत्रेत नाही. हे आवर्जून सांगितलेले आहे. देव अनुभवण्यास पंच विकारापासून मुक्त होण्यासाठी मनुष्याने सत्यज्ञान मिळवणे जरूरी आहे. सर्व दुःखाचे कारण अज्ञान आहे. हे ज्ञान प्राप्तीसाठी घर सोडण्याची वैराग्य घेण्याची जरूरी नाही. आपला घर प्रपंच नेटाने करीत, कष्टाची, घामाची भाकर खात व इतरांना खायाला घालत, स्वयंभु राहावे..हे स्वाभिमानी स्वयंभूपण म्हणजेच स्वातंत्र्य.
नेक कमाई जऊ करइ,कबहु निहफल
जाय!
नेक कमाई करणारा सदाचारी व ज्ञानी मनुष्य कधी दुःखी नसतो. वाईट चालीच्या नादाच्या व्यसनांची गुलामगिरी माणसांचे पाप ठरते. हे, राजांना व नागरिकांनाही लागू पडते.
स्वातंत्र्य हे निसर्गदत्त आहे. ते हरवू नये. स्वातंत्र्य जपणे हे आत्माविष्काराचे लक्षण आहे.
पराधिनता पाप है, जान लेहु रे मीत!
रविदास दास प्राधीन सो, कौन करै है पीत!!
संत रविदासाचे कालत्रयी, विद्रोही विचार, साहित्य व कार्य हे एक ऐतिहासिक परिवर्तनाचे प्रेरणादायी आंदोलन होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रविदासाच्या या साहित्याच्या सखोल अभ्यास केलेला होता. हू वेअर शुद्रा हा आपला ग्रंथ अर्पण केलेला आहे.
संत रविदासांचे वरील मानवतावादी विचार भारतीय राज्यघटनेत अनेक कलमातून आढळून येतात.
त्यांचे ४० दोहे/साख्या/ सबद या नावाने पवित्र गुरू ग्रंथ साहेबात समाविष्ट आहेत. संत कबीर, संत सेना, गूरू नानकजी, गुरू गोरखनाथ, संत मिराबाई, संत नामदेव हे त्यांचे समकालीन गुरुबंधू होते. त्या वेळेचे सुमारे ५२ राजे गुरू रविदासाचे शिष्य झाले होते. त्यात संत मिराबाईचा ही समावेश आहे.
जन्म झाला चर्मकार वंशी!
ज्ञान पहाता लाजवी वसिष्ठाशी!!
….श्री दासगणू महाराज
ऐका श्रोते हो सावकाश! परम वैष्णव रोहिदास!!…………..महिपती.
निवृत्ती ज्ञानदेव सोपान चांगाजी मेरे जी के जी है नामदेव!
नागाजन मित्र नरहरी सुनार रविदास कबीर सगे मेरे…….संत तुकाराम.
रोहिदास चमार सब कुछ जाने!
कठोर गंगा देख !!……संत एकनाथ..
गुरू मिलिया रैदासजी दिन्ही जान की गुटकी……… संत मिराबाई.
संतनमे है रविदास संत है..संत कबीर
संदेह ग्रंथि खन्डन निपुन, बानी विमल रैदासकी……..नाभादास.
रैदास रंगिला रंग है ……गरीबदासजी.
रविदास ध्याये प्रभु अनुप गुरूदेव नानक गोविंद रूप.. गूरू नानक.
अश्या भाव सुमनांनी थोर साधु संत महात्म्यांनी संत रविदासांना गौरविले आहे. यासाठीच रविदास महाराजाना “संत शिरोमणी” म्हंटलेले आहे. आजच्या काळातही त्यांचे विचार अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. अश्या गूरूना मनःपुर्वक नमन. जय रविदास…!
लेखक.ॲड.आनंद गवळी.
बी ए. (अर्थ) एल.एल.बी. , एम.एल.एल. अॅण्ड एल.डब्लू. एल.एल.एम.
राष्ट्रीय उपाध्यक्ष
राष्ट्रीय चर्मकार महासंघ.
भारतीय दलित साहित्य अकादमी.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष.
मनचंगा संत रोहिदास. लेखक
महाराष्ट्र शासन संत रविदास पुरस्कार २०१८
भाषा संवर्धन समिती पुणे महा.न.पा २०१७.पुरस्कारार्थी
भारतीय दलित साहित्य अकादमी राष्ट्रीय पुरस्कार २००४ आणि २०१६.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत