संतांचे संत आणि सुधारकांचे सुधारक: गाडगे महाराज
प्रा.(डॉ.)छाया स.मित्तर,
माजी प्राचार्या.
मोबाईल:9773415469
लोकनायक मालिका:
संतांचे संत आणि सुधारकांचे सुधारक:गाडगे महाराज
संदर्भ: संत गाडगे महाराज काल आणि कर्तृत्व प्रा. सत्यवान मेश्राम महाराष्ट्र,राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई. ‘तुफानातील दिवे’ भीमसेन देठे.कादंबरी.
या लेखनाचा हेतू कोणताही धर्म किंवा व्यक्तिगत भावना दुखावण्याचा नाही.वरील संदर्भ आणि संत गाडगे बाबा यांचे विचार यावर आधारित लेख लिहिला आहे.
जी सामाजिक कामे सुशिक्षित,उच्चशिक्षित अतिश्रीमंत संस्था,मंडळे,किंवा कुटुंब सहज करू शकतात.अशी सर्व सामाजिक कार्ये अडाणी,अशिक्षित गरीब,मागासलेल्या जातीत जन्मलेल्या एकट्या गाडगेबाबांनी केली.यावर बहुतेक वाचकांचा विश्वास बसणार नाही.त्यांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती घेताना मन विनम्र होते.
शाळा-महाविद्यालय निर्मिती,हिंसा बंदी,दारुबंदी, पशुबळी प्रथा निवारण,अस्पृश्यता निवारण,अंधश्रद्धा निर्मूलन,ग्राम स्वच्छता,आश्रम शाळा, जलाशय संरक्षण अशी अनेक दिशादर्शक कामे त्यांनी केली.
गाडगे महाराज कीर्तनकार होते. पण ते “देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका” असे अडाणी गरीब अंधश्रद्धेत अडकवलेल्या समाजाला कीर्तनातून संदेश देत होते.
आज 23 फेब्रुवारी.महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कीर्तन आणि स्वच्छता या माध्यमातून समाज सुधारणा करणारे थोर संत गाडगे महाराज यांची आज जयंती.
त्यांना कोटी कोटी प्रणाम.
23 फेब्रुवारी1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगांव येथे एका गरीब,परीट(धोबी) कुटुंबात गाडगे महाराजांचा जन्म झाला.त्यांचे नाव डेबूजी होते.
त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी परंपरेनुसार मटण, दारु असे जेवण गावकऱ्यांना देण्याऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले.हा बदल त्या काळातील प्रथापित व्यवस्थेला दिलेला पहिला ठळक छेद होता. संसार,कुटुंब, मुले बाळे यात ते फारसे रमले नाहीत.
डेबूजी जवळ सतत एक खराटा ( झाडू) असे.अंगावर कायम गोधडी वजा फाटके-तुटके पण अतिशय स्वच्छ कपडे असत. जवळ सतत एक फुटके गाडगे( मडके) असे. अशा वेशामुळे लोक त्यांना ‘गाडगेबाबा किंवा ‘मडकेबुवा’ म्हणू लागले.पुढे त्यांच्या महान कार्यामुळे ‘संत गाडगे महाराज’ म्हणून प्रसिद्धीस आले.
कधी ही शाळेत न गेलेले गाडगे महाराज यांचे कीर्तन ऐकण्यासाठी ग्रामीण जनता गर्दी करीत असे.आपल्या रसाळ वाणीने आणि रोकठोक उपदेशाने भल्या भल्या धर्म प्रमुखांनी आणि किर्तनकार आश्चर्यचकित होत.ते कीर्तनातून, लोकांच्या सद्सद्विवेक बुद्धीला आवाहन करत.
आचार्य अत्रे गाडगेबाबांच्या कीर्तनाचे कौतुक करताना म्हणतात ‘सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात’!
स्वतःच्या मुलाच्या मृत्यूने गाडगेबाबा वर कुठलाही परिणाम झाला नाही. परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूचा आघात ते सहन करू शकले नाहीत.बाबासाहेबांच्या मृत्युनंतर अवघ्या १४ दिवसात गाडगे बाबांनी देखील देहत्याग केला.ते बाबासाहेबांना आपले गुरू मानत.(या विषयी सविस्तर लिखाण परत कधीतरी)
अशा या महान संताचा,मे 1983 रोजी ‘संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ’ शासनाने सुरू करून त्यांच्या कार्याचा गौरव केला,ही बाब उल्लेखनीय आहे.
त्यांची ‘देव’ नावाची प्रसिद्ध कविता प्रस्थापित सामाजिक व्यवस्था आणि कर्मकांड यांचे वाभाडे काढताना दिसते.
गाडगे महाराज यांची सुंदर कविता “
” देव “
कीती पुजला देव तरी,देव अजुन पावला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,अजुनपर्यंत घावला नाही..||धृ||
मंदिरासमोर लुटली इज्जत,हा बघत बसला पोरीला,
रक्षण करतो म्हणाला,अन् स्वत:च गेला चोरीला,
हातात असुन धारदार शस्र,कधी चोरामागे धावला नाही..
कुठं राहतो कुणांस ठाऊकअजुनपर्यंत घावला नाही…||१||
सगळं काही तोच देतो,तोच पुरवतो सगळ्यांची हौस.
शेतक़री बघतो आभाळांकडं,मग गेला कुठं पाऊस…
खुप केलं हरी हरी तरी,मुखांत कधी मावला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,अजुनपर्यंत घावला नाही.||२||
कधी स्वत: राहून उपाशी,भुक त्याची भागवली…
हा म्हणे नैवद्यावर थोडी,साखर का नाही मागवली…
आहार त्याचा वाढतं गेला,कधी एका बक-यावर भागला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,अजुनपर्यंत घावला नाही…||३||
आंघोळ करतो दुधाने,जणू सगळ्याच गाई त्याच्या बापाच्या…
तोच घागरी भरतो म्हणे,पुण्य अन् पापाच्या…
पाप-पुण्याचा हिशोब कधी,त्यानं दावला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,अजुनपर्यंत मला घावला नाही…||४||
आजही आजूबाजूला शिक्षित,उच्चशिक्षित विशेषतः महिला कर्मकांडात अडकले दिसतात.तेंव्हा या कवितेतील प्रत्येक शब्द माझे मन पिळवटून टाकते.
सामाजिक स्वच्छता म्हटले की सर्वांना गांधीजी आठवतात.एक थोर समाजसेवक व क्रांतिकारक राष्ट्रसंत,ज्यांनी प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन ‘स्वच्छतेचा महामंत्र संपूर्ण देशाला दिला.महाराष्ट्रातील मातीत जन्मलेले संत गाडगेबाबा यांचा मात्र समाजाला विसर पडलेला दिसतो!
अशा हिऱ्यांना भारतरत्न दूर, साधे पद्मभूषण मिळू नये!!!
हे केवळ महाराष्ट्र नाही तर भारत भूमीची शोकांतिका आहे.
असा हा थोर संत 20 डिसेंबर 1956 रोजी वलगाव (अमरावती) येथे काळाच्या पडद्याआड विलीन झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत