डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनछत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक समस्यांवर मात करून तसेच विभिन्न जाती धर्मातील मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या राज्यभिषेकापूर्वी आणि त्यानंतरही त्यांच्या राज्यकारभारास केवळ राजेशाही नव्हे तर लोकशाही तत्वावर आधारलेली राजेशाही असल्याचे त्यांच्या कार्यपद्धती वरून सिद्ध झाले आहे. त्यामुळेच शिवाजी महाराजांना ‘लोककल्याणकारी आदर्श राजा’ म्हणून ओळखले जाते.
अशा कर्तुत्वान शिलवंत राजासंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अभ्यासणे महत्वाचे ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगारांचे उद्धारक, शोषित पीडितांचे मुक्तिदाता, इतिहासकार, पत्रकार, लेखक, कृषीतज्ञ, जलव्यवस्थापक, धर्मचिकित्सक आणि उत्तम संविधानकार आहेत. थोडक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार आणि कार्याने भारतातील प्रत्येक नागरिकांचे जीवन प्रभावित झालेले आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कार्य समस्त भारतीय नागरिकांसाठी ‘दीपस्तंभासारखे’ आहेत. तसेच त्यांनी स्वतःचे संपूर्ण विचार आणि कार्य ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चार शब्दात सामावलेले असल्याचे नमूद केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या सर्व बहुआयामी पैलू बरोबरच त्यांचे शिवाजी महाराजांसंबंधी विचार तथा दृष्टीकोन जाणून घेणे महत्वाचे आहे. त्या अनुषंगाने उपरोक्त संशोधन लेख उपलब्ध, तथ्यांच्या आधारे मांडून त्याचे विश्लेषण केलेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर २३३ वर्षांनी १९१३ ते १९४९ दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाण आणि भाषणातील छत्रपती शिवाजी महाराजां-संबंधीच्या संदर्भाचे विश्लेषण प्रस्तुत संशोधन लेखात केलेले आहे. डॉ. आंबेडकरांच्या महत्वपूर्ण सुप्त विचारांना वाव अमेरिकेतील कोलंबिया विद्यापिठातील प्रवेशापासून मिळाली. त्यामुळेच आचार्य पदवीच्या संशोधनाचा विषय त्यांनी ‘संभाजीच्या कारकिर्दीत महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती कशी होती. असा निवडलेला होता. त्यासंबंधीचे तथ्य संकलन शेकडो ग्रंथ वाचून त्यांनी केले होते. या संशोधन विषयाच्या आधारे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची संपूर्ण कार्यपद्धती आणि छत्रपती संभाजी यांची कारकीर्द सर्वांगीण दृष्टीने अभ्यासावयाची होती. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जातीच्या प्रश्नावर संशोधन करावे असे त्यांच्या मार्गदर्शकांनी सुचविले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांच्या कार्याचे विभिन्न पैलू तेही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चिकित्सक अध्ययनातून पुढे येऊ शकले नाहीत. तथापि त्यांच्या आचार्य पदवीसाठी विषय निवडीच्या निर्णयातून छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी यांच्या कार्याचे महत्व त्यांनी अधोरेखित केले होते. त्यामुळेच भविष्यात शिवाजी महाराजांच्या कार्याचा संदर्भ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विचार आणि कार्यातून प्रकट केलेला आहे.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर २२ सप्टेंबर १९२७ नंतर लिहिलेल्या अनेक पत्रांची सुरुवात ‘जय भवानी’ या शब्दांनी करीत असत. छत्रपती शिवरायांचे कुळदैवत तुळजापूरची भवानी माता असल्याचे संदर्भ शिवचरित्र आणि शिवकालीन साहित्यात नमूद आहेत. थोडक्यात डॉ. बाबासाहेबांनी १९२७ ते १९३० दरम्यानच्या त्यांनी लिहिलेल्या पत्रात ‘जय भवानी’ असा सन्मान सूचक शब्द शिवराया प्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या सार्वजनिक कार्याचे, चळवळीचे प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मानले होते. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या दैवताला त्यांनी आपल्या पत्रात सन्मानसूचक आणि वंदन म्हणून ‘जय भवानी’ असा शब्द लिहून पत्रातील अन्य मायना लिहत असत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील अनेक महत्वाच्या
घटनांपैकी महाड चवदार तळ्यावरील सत्याग्रह प्रमुख मानला जातो. २० मार्च १९२७ चा महाड चवदार तळ्यावरील पाण्यासाठीचा सत्याग्रह आणि त्याच वर्षी २५ डिसेंबर १९२७ ला महाड तळ्यावरील सत्याग्रहाबरोबरच ‘मनुस्मृती दहन’ करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वासंबंधी पराकोटीची निष्ठा होती. त्यामुळेच २५ डिसेंबरच्या सत्याग्रहानंतर आपल्या सहकाऱ्यांना रायगडावर जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. ‘महाड येथील कार्यक्रम संपल्यावर बाबासाहेब मित्रमंडळीसह रायगड किल्ला पाहण्यासठी महाडहून २९ डिसेंबर १९२७ ला सकाळी मोटारीने गेले त्यावेळी त्यांच्यावर एका प्राणघातक प्रसंगाने झडप घातली होती. त्यातून ते सहीसलामत बाहेर पडले. शिवाजी महाराजांच्या कार्याची महती पुस्तकांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देश- विदेशात सखोल अभ्यासली होती. महाडच्या सत्याग्रहामुळे त्यांना छत्रपतींच्या रायगडाचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची संधीच प्राप्त झाली होती. परंतु त्या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाड सत्याग्रहाबरोबरच अनेक कार्यात व्यस्त होते. तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्याचे निश्चित केले. ‘डॉक्टर आंबेडकर आणि त्यांचे सहकारी सहस्त्रबुद्धे, चित्रे, मुंबईचे प्रधान बंधू, रा. खोळवडीकर, गंगावणे, गायकवाड, गणपत बंधू, जाधव, सुभेदार घाटगे राजभोज हे पाचाड गावापासून ‘शिवाजी महाराज की जय, घोषणा देत रायगडावर पोहोचले. श्रीपत शेडगे यसा लोकल बोर्डाच्या शिपायाने त्यांची व्यवस्था करून रायगड दाखविला. आंबेडकरांनी छत्रपतींच्या समाधीला वंदन केले झाडीमध्ये अगदी झाकून गेलेल्या तोफांना योग्य ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था त्यांनी केली. त्यानंतर गडाच्या सर्व ठिकाणांची पाहणी केली. गडावरील मुक्कामात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यावर हमला करण्याचा कट रचला होता. त्याचा प्रतिकार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रक्षण करण्यासाठी रायगड परिसरातील दहा मैल अंतरावरील लोकांनी येऊन गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पहारा दिला. यामधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला प्राणाची बाजी लावून त्यांनी पाठिंबा दिला होता. अशाही प्रसंगी तत्कालीन ‘कुलाबा समाचार’ या दैनिकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यावर रायगडावरील वर्तणुकीबाबत चुकीचे लिखाण करुन बदनामी केली होती. तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचार आणि कार्यपद्धतीत कोणताही नकारात्मक विचारांचा शिरकाव होऊ दिला नाही. लाहोर येथील जातापात तोडक मंडळाची १९३६ ला होणारी परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी भाषणातील मुद्याबाबत झालेल्या मतभेदामुळे रद्द करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना परिषदेचे अध्यक्षीय मार्गदर्शक म्हणून निमंत्रण देण्यात आले होते. परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषणाचा मसुदा तयार केला होता. त्याच भाषणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘जाती प्रथेचे निर्मूलन’ या नावाने पुस्तक रूपाने प्रकाशित केले होते. त्या भाषणामधून त्यांनी जातीव्यवस्था निर्मुलनासंबंधी अतिशय मूलभूत चिंतन नमूद केले होते. त्यामुळेच ते प्रत्यक्ष दिलेले नसूनही प्रसिद्ध ठरलेले भाषण आहे. या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा विशेष संदर्भ दिलेला आहे. जगातील प्रत्येक देशात झालेल्या राजकीय क्रांतीचा संबंध धार्मिक आणि सामाजिक क्रांतीशी असल्याचे स्पष्ट केले होते. ‘राजकीय क्रांत्याच्या आधी नेहमीच सामाजिक व धार्मिक क्रांत्या घडून आल्या आहेत, हा इतिहासाचा सिद्धांत आहे. भारतीय इतिहासदेखील याच निष्कर्षाला पुष्टी देतो. चंद्रगुप्ताने घडवून आणलेल्या राजकीय क्रांतीच्या आधी बुद्धाची धार्मिक व सामाजिक क्रांती घडली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडविलेल्या राजकीय क्रांती आधी महाराष्ट्राच्या संतांनी धार्मिक व सामाजिक सुधारणा घडवून आणल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या विधानामधून शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असे म्हटले जाते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेस आणि त्यांच्या योगदानास ‘छत्रपती शिवाजी महाराजांची क्रांती’ असे म्हटले होते. म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते शिवाजी महाराज…
केवळ स्वराज्यच स्थापन केलेले नाही. राज्य स्थापने बरोबरच व्यवस्था परिवर्तन केलेले आहे. व्यवस्था परिवर्तन किंवा अमुलाग्र परिवर्तन म्हणजे क्रांती होय. तसे अमुलाग्र परिवर्तन शिवाजी महाराजांनी घडवून आणल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. शिवाजी महाराजांची कार्यपद्धती तत्कालीन जाती व्यवस्थेला आणि जाचक राजेशाही पद्धतीला छेद देणारी हाती. तसेच शक्तीचे, भीतीचे आणि अन्यायाचे, दडपशाहीचे, नीतिभ्रष्टतेचे धोरण शिवाजी महाराजांचे नव्हते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याला क्रांती असे म्हटलेले आहे. तसेच त्यांच्या कार्यावर वैज्ञानिक आणि समतामूलक विचारांच्या संताच्या कार्याचा प्रभाव असल्याचे सुद्धा नमूद केले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव
तत्कालीन समाजव्यवस्थेवर पडलेला आहे. तसेच तेव्हापासून आजपर्यंत छत्रपती हे प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणेचे, आदर्शाचे प्रतिक आहेत. तथापि अशाही त्यांच्या व्यक्तिमत्वाला ब्राह्मणवादाच्या विरोधाचा सामना करावाच लागला. त्यासंबंधी ३० डिसेंबर १९३९ ला कोल्हापूर संस्थानात ‘दलित प्रजा परिषद’ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आपण गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करीत असतो. शिवछत्रपतीला ब्राह्मण नष्ट करता आले नाही. आपल्या राज्याभिषेकासाठी सोने देऊन काशीहून गागाभट्टाला त्यांना आणावे लागले. त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध तसेच अडथळे निर्माण करण्यत आले. तसेच त्यांना गोब्राह्मण प्रतिपालक असे दर्शविण्यात आले. तत्कालिन परिस्थितीत राजावर सुद्धा धार्मिक रीती रीवाजांच्या वर्चस्वाचा पगडा होता असे निदर्शनास येते. या सर्व प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवार्जीचे योगदान अतिशय महत्वपूर्ण नव्हे तर अवर्णनिय असे होते. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते शिवाजी महाराजांचे कार्य कर्तृत्व म्हणजे क्रांती होय असे म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शूद्र पूर्वी कोण होते ? या १९४६ ला लिहिलेल्या ग्रंथात शुद्रांच्या पूर्वीच्या स्थितीचे, जीवन पद्धतीचे संशोधन करुन लिखाण केले आहे. शिवाजी
महाराज यांच्या राज्यभिषेक प्रसंगी निर्माण करण्यात आलेल्या मतभेदाचे संदर्भ उपरोक्त ग्रंथात नमूद आहेत. या सर्व संदर्भातून हे स्पष्ट होते की शिवाजी महाराज त्यांच्या सर्व गुणधर्मबरोबरच खंबीर नेतृत्वाचे तसेच उत्कृष्ट समन्वयक होते. त्यामुळेच स्वराज्य स्थापने नंतर ही तीव्र स्वरूपाच्या अंतर्गत विरोधातही धर्म आणि जातीच्या सलोख्याचा विश्वास टिकवून ठेवण्यात ते यशस्वी झाले होते.
भारताच्या संविधान निर्मिती मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विशेष योगदान सर्वज्ञात आहे. २५ नोव्हेंबर १९४९ ला डॉ. आंबेडकरांनी संविधान सभेत शेवटचे भाषण केले होते. त्या भाषणातून त्यांनी संविधान निर्मितीच्या प्रक्रियेचे विवेचन केले. शिवाय अनेक आरोप, प्रत्यारोपांचे निरसन केले. तसेच संविधान समितीच्या सहकार्यातून आणि त्यांच्या अथक परिश्रमातून आकारास आलेल्या संविधानाचा केवळ गुणगौरव केलेला नाही, तर स्वतंत्र भारतातील प्रत्येक नागरिकाने संविधानाप्रती पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्याप्रति जागृत राहण्याचे सूचित केले होते. कारण भारतात जे थोर राजे होऊन गेले त्यांना आपल्यातीलच प्रजेने धोका दिलेला आहे. त्यामुळे आपल्या देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वरात्र्य स्थापनेच्या कालावधीत करण्यात आलेल्या विरोधाची आठवण त्यांनी सांगितली. ते म्हणतात ‘जेव्हा शिवाजी हिंदूच्या मुक्तीसाठी युद्ध करत होते तेव्हा इतर मराठा सरदार आणि राजपूत मोगल बादशहाकडून युद्ध करीत होते. या घटनेतून त्यांनी शिवाजी महाराजांचे महान कर्तृत्व एका बाजूला दर्शविले तर दुसऱ्या बाजूला अशाही महान कर्तुत्वाला स्वराज्य स्थापनेच्या कार्याला मराठा आणि राजपूत यांच्याकडून केलेला विरोध स्पष्ट केला. अशा अनेक माध्यमातून शिवाजी महाराजांच्या एकूणच कार्यपद्धतीला व्यक्तिगत स्वार्थाला प्रलोभनाला बळी पडून स्वजनाकडून विरोध करण्यात आला. त्यामुळे शिवाजी महाराजांना अनेक संकटांचा आणि समस्यांचा मुकाबला करावा लागला. त्याचप्रमाणे भारताला स्वातंत्र्य मिळून मोठ्या परिश्रमाने आकारास आलेले संविधान लागू होणार आहे. भविष्यात
सर्वच स्तरातील, धर्मातील नागरिकांचा पाठिंबा संविधानास मिळणे गरजेचे आहे. अन्यथा भारत देशाच्या स्वातंत्र्यावर पुन्हा संकट येऊ शकते हे डॉ. आंबेडकरांना छत्रपती शिवाजी महाराजांना झालेल्या विरोधाच्या ठराविक घटनेतून स्पष्ट करावयाचे होते…
छत्रपती शिवजी महाराज यांच्या जयंती निमित्त परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वरील गौरवउदगार काढले होते…
त्या जयंतीची थोडक्यात माहिती मूकनायक मध्ये प्रकाशित झाली होती…
३ मे १९२७ रोजी संध्याकाळी ६ वाजता बदलापूर जिल्ह ठाणे
येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला होता.
सदर उत्सवाच्या व्यवस्थापक कमेटीत अध्यक्ष कोणाला करावे या साठी चर्चा झाली होती. शेवटी सर्व गावकऱ्यांच्या संमतीने असे ठरविण्यात आले की, शिवजयंती उत्सवाला अध्यक्ष म्हणून मुंबईचे बहिष्कृत वर्गाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहतील. असे ठरविले. शिवाजी उत्सवाचे अध्यक्षस्थान डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आनंदाने स्वीकारले. उत्सवाच्या दिवशी ४ वाजता मुंबईहुन सोबत रा. नाईक, रा. सीताराम शिवतरकर, रा. गणपत महादु जाधव या मंडळीसह बदलापूर येथे आले त्यांचा मुक्काम पालये शास्त्री यांच्या घरी होता. चहापाणी झाल्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सायंकाळी सहा वाजता उत्सवाच्या ठिकाणी आले.उत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी इशस्तवनपर पद्य म्हणयात आले. त्यानंतर पालेय शास्त्री यांचे प्रास्ताविक भाषण झाले. नंतर परंपरे प्रमाणेअध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारावे अशी विनंती गावकऱ्यांनी केली मेसर्स काळे, सुळे, पाटील व मोकाशी यांनी अनुमोदन दिल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थानापन्न झाले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
आपल्या भाषणात शिवाजीच्या अंगच्या निरनिराळया गुणांचा उल्लेख करून अत्यन्त परिणामकारक असे एक तासभर भाषण केले शेवटी सागितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लोकोत्तर गुणाने राज्य मिळविले .त्यांचे राज्य चिरकाल टिकले नाही कारण राज्याचा अभिमान सर्वांना सारखाच नव्हता. एक राजा गेल्यावर दुसरा राजा आला तरी लोकांच्या नित्याच्या व्यवहारात काहीच फरक होत नव्हता .नेपोलियन च्या इंग्लड वरील स्वारीच्या वेळी मजूर लोकांनी देशातील लोकांना जे उत्तर दिले ते येथेही लागू पडते.”असे महत्वपूर्ण वक्तव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले.या नंतर भा. रा. ओक यांनी आपल्या विनोदी भाषणाने सर्वांचे आभार मानल्यावर उत्सवाच्या कार्यक्रमातील पहिला भाग समाप्त झाला. नंतर श्री. पालेय शास्त्री यांच्याकडे सर्व भोजनाला गले. त्यांनी कसलाही किंतु मनात न बाळगता आपल्या घरात डॉ. बाबासाहेब आबेडकर व त्यांच्या बरोबरीच्या अस्पृश्य मंडळीसह सहभोजन केले.नंतर रात्री ९ ते ११.३० पर्यंत कीर्तन झाले. या कीर्तनात कसल्याच प्रकारचा जातीभेद न मानता लोक कीर्तनश्रवणास बसले होते. काही अस्पृश्य मंडळी तर कीर्तनी बुवांच्या समोरच बसली होती. कीर्तन आटोपल्यावर रात्री शिवाजी महाराजांची पालखी डॉ. आंबेडकर यांच्या पुढारीपणाखाली सुमारे १५ हजार लोकांसह नगर प्रदक्षिणा करून आल्यावर हा उत्सव
समाप्त झाला…
संदर्भ :-बहिष्कृत भारत, दि. २० मे १९२७
भगव्या ध्वजाकरिता शक्य ते सारे करीन…
घटना समितीने नेमलेल्या राष्ट्रध्वज समितीत एक सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानाने दिल्लीस गेले. त्यांना निरोप देण्यासाठी विमानतळावर हिंदू महासभा मराठा मंदिर आणि शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे मुख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भगवा ध्वज अर्पण करण्यात आला…
उपस्थितांमध्ये रा.ब.सी. के बोले, श्री.अ.स. भिडे, श्री. नगरकर भाई अनंतराव, सुरेंद्रनाथ टिपणीस मराठा मंदिराची श्री गावंडे, श्री वामनराव चव्हाण, श्री. मासुरकर अॕड सिंग प्रभृती कार्यकर्ते प्रामुख्याने दिसत होते. विमानतळावर भव्य हिंदुध्वज फडकविण्यात आले होता. एका कार्यकर्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हिंदूध्वजची भेट दिली. भगवा राष्ट्रध्वज हातात घेतलेल्या डॉ. बाबासाहेबांचे छायाचित्र घेण्यात आले.
रा. व. बोले यांनी डॉ. साहेबांना आशीर्वाद देऊन आपल्या हातून अ. भा. भगवा ध्वज फडकू दे! असे उद् गार काढले यावर बाबासाहेब विनोदाने म्हणाले,
मला महाराच्या पोराला पुढे करून तुम्ही मागे राहणार काय? दिल्लीला चला तेथे यासाठी जोराची निदर्शने झाली पाहिजेत, मी माझ्याकडून शक्य ते सारे करीनच”
शेवटी छत्रपती शिवाजी महाराज, भगवाध्वज वीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात विमान अंतराळात अदृश्य झाले…
10 जुलै 1947 मुंबई विमानतळावर बाबासाहेब आंबेडकरांनी रोप देते वेळेस त्यांनी व्यक्त केलेले विचार…
संदर्भ डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषणे खंड 6
(मुक्तीदाता विशेषांक )
10 जुलै 1947 स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना समितीच्या ध्वज समिती वर सदस्य म्हणून 23 जून 1947 रोजी नेमणूक झाली…
पुढे 22 जुलै 1947 रोजी घटना समितीने अशोकचक्र अंकित तिरंगा झेंडा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला…
संदेश तुपसुंदरे कार्यसंपादक
मुक्तीदाता विशेषांक
संदर्भ ग्रंथ सूची –
१) खैरमोडे चां.भ. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर खंड-१ सुगावा प्रकाशन, पुणे सहावी आवृत्ती डिसेंबर २०१० पृ. ८४
२) संपादक खरात शंकरराव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रे, इंद्रियणी प्रकाशन, पुणे १७- १०-२०१० पृ. ३०
३) खैरमोडे चां.भ. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर खंड-३, सुगावा प्रकाशन, पुणे तृतीय आवृत्ती ऑगस्ट २००३ पृ. २१३
४) संपादक, प्रा. नरके हरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे – बहिष्कृत भारत आणि मूकनायक, उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, मुंबई, द्वितीय
आवृत्ती २००८, पृ. १७२
५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अनुवादक गौतम शिंदे) जातीप्रथेचे विध्वंसन सुगावा प्रकाशन, पुणे प्रथमावृत्ती ऑक्टोबर १९९२, पृ. २५-२६
६) संपादक मुनवसंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे खंड १८, भाग २, महाराष्ट्र शासन, मुंबई प्रथमावृत्ती १५ ऑक्टोबर २००२, पृ. ३०७
७) अनुवादक प्रा. घोडेस्वार देविदास ‘संविधान सभा डिबेटस्’ गोपाल नगर, नागपूर-२०१३, पृ. ७८२
समाज माध्यमातून साभार…..
सध्दम्म प्रचार केंद्र मालेगाव जिल्हा वाशीम
सुधाकर ग्यानुजी पखाले
9075233272
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत