भगवान बुद्धांची शिकवणभाग ६६

अधम्म म्हणजे काय?
धर्मपुस्तके प्रमादातीत (अचुक) आहेत असे मानणे म्हणजे अधर्म आहे
वेद हे केवळ पवित्र आहेत, एवढेच नव्हे तर, ते स्वतः प्रमाण आहेत, एवढेच नव्हे तर ते प्रमादातीत आहेत असे ब्राम्हण म्हणत.
बुद्धांनी वेद पवित्र आहेत, स्वतः प्रमाण आहेत आणि वेद प्रमादातीत आहेत या तीनही गोष्टी नाकारल्या आहेत.
‘तेवीज्यसूत्ता’मध्ये भगवान बुद्धांनी, ‘वेद म्हणजे एक निर्जल वाळवंट, निष्पथ अरण्य आणि खरोखर एक नरकच आहे असे म्हटले आहे.’ बौद्धिक आणि नैतिक तृष्णेने आर्त झालेल्या कोणाही मनुष्याने वेदापासून आपल्या तृष्णेचे शमन होईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
वेद प्रमादातीत आहेत यासंबंधी त्यांचे म्हणणे असे की, वेदच काय, कोणतेही वाङमय प्रमादातीत नाही. प्रत्येक गोष्टीची परीक्षा आणि पुन्हा परीक्षा ही झालीच पाहिजे.
कालाम लोकांच्यापुढे झालेल्या आपल्या प्रवचनात भगवान बुद्धांनी हे मत स्पष्ट केले आहे. बुद्ध म्हणाले, “हे कालामांनो, तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ धर्मपुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ तर्कशास्त्रानुसार* आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ न्यायशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ सकृद्दर्शनी पटण्यासारखे आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. ज्या समजुती आणि मते अनुकूल वाटतात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ बाह्यात्कारी खऱ्यासारखे दिसते ते केवळ बाह्यात्कारी सत्य म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. एखादे वचन कोणा एका यतीने अथवा आचार्याने सांगितले एवढ्यानेच त्यावर विश्वास ठेवू नका.”
कालामांनी विचारले, “मग आम्ही करावयाचे तरी काय? आम्ही कोणती कसोटी लावायची?”
बुद्धांनी उत्तर दिले, “कसोट्या ह्या स्वतःलाच विचारा. ह्या गोष्टी हितकर आहेत काय? शहाण्या माणसाने त्या टाकाऊ मानल्या आहेत काय? त्या केल्या असता कष्ट आणि दुःख ओढवते काय?”
कालामाने विचारले, “मग आम्ही करावयाचे तरी काय? आम्ही कोणती कसोटी लावायची?”
कालामांनो, यापुढेही जाऊन तुम्ही असे विचारले पाहिजे की, “हे सिद्धांत तृष्णा, द्वेष, मूढता आणि हिंसा यांना सहाय्यक नाहीत ना?”*
“एवढेच पुरे नाही तर कालामांनो आणखीही पुढे जाऊन तुम्ही पाहिले पाहिजे की, ते सिद्धांत माणसाला इंद्रियाधीन करणारे नाहीत ना? हिंसेला प्रवृत्त करणारे तर नाहीत ना? चोरी करण्याला प्रेरणा देणारे तर नाहीत ना? कामेच्छापूर्तीसाठी मिथ्याचार शिकविणारे तर नाहीत ना? ते असंबद्ध भाषण करायला लावणारे तर नाहीत ना? आणि शेवटी तुम्ही या सिद्धांताबाबत असा प्रश्न विचारला पाहिजे की, या सिद्धांताचा परिणाम अहित आणि दुःखात तर होणार नाही ना?”
“आता कालामांनो, सांगा: —
“त्या श्रमण ब्राम्हणांचे सिद्धांत हित साधणारे आहेत की अहित साधणारे आहेत?”
कालामांनी उत्तर दिले, “भगवान, ते अहिताकडे नेणारे आहेत.”
“ते लाभकारक आहेत की हानिकारक आहेत?”
“भगवान, ते हानिकारक आहेत.”
“ते निंद्य आहेत काय, कालामांनो?”
कालामाने उत्तर दिले, “भगवान, ते निंद्य आहेत.”
“शहाण्या माणसांना ते मान्य आहेत की त्यांच्या मते ते निषिद्ध आहेत?”
“शहाणी माणसे त्यांना टाकाऊ समजतात.”
“त्यांचा आचार केला असता त्याचे पर्यवसान कष्टात आणि दुःखात होते काय?’
“होय भगवान, त्यांचे पर्यवसान कष्टात आणि दुःखात होते.”
“जे धर्मग्रंथ असले सिद्धांत शिकवितात ते तुमच्या मते स्वतः प्रमाण आणि प्रमादातीत ठरतात काय?”
“नाही,” कालामाने उत्तर दिले, “भगवान, ते स्वतः प्रमाण आणि प्रमादातीत ठरत नाहीत.”
“आणि कालामांनो, मीही नेमके हेच म्हणतो आहे, मीही हेच म्हणालो आहे. जे केवळ ऐकीव आहे, परंपरागत आहे, ज्यात केवळ वादविवादाची कुशलता आहे किंवा तर्काची सूक्ष्मता आहे, तेवढ्यावरूनच त्यावर विश्वास ठेवू नका. केवळ वरवर पाहता जे विश्वसनीय वाटते म्हणून ते मानू नका. समजुती आणि दृष्टिकोण केवळ अनुकूल वाटतात म्हणून स्वीकारू नका. ते केवळ श्रमण ब्राम्हणाचे शब्द आहेत म्हणून त्यावर भाळून जाऊ नका.”
“जेव्हा तुम्हाला आत्मानुभवाने वाटेल की, ह्या गोष्टी अहितकर, दोषार्ह, सूज्ञांनी निषिद्ध ठरविलेल्या किंवा परिणामी कष्टात आणि दुःखात नेणाऱ्या आहेत, तेव्हा त्या गोष्टींचा तुम्ही त्याग केला पाहिजे.”
भगवान बुद्धाच्या ह्या विचारसरणीचा सारांश अगदी स्पष्ट आहे. ‘कोणाचीही शिकवण ती स्वीकारार्ह समजून मान्य करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की, ती धर्मग्रंथनिविष्ट आहे, त्यात तर्काची सूक्ष्मता आहे, किंवा तिचे बाह्यरूप ग्राह्य आहे, म्हणून ती मानू नका. उपदेशिलेले विचार किंवा दृष्टीकोन अनुकूल वाटतात, ते बाहेरून सत्यस्वरुप दिसतात किंवा ते कोणा महान आचार्याचे आहेत म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका.’
‘उपदेशिलेले विचार किंवा दृष्टिकोन हितकर आहेत की निंदनीय आहेत, सदोष आहेत की निर्दोष आहेत, कल्याणकारक आहेत की अकल्याणकारक आहेत यांचा विचार करा.’
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१७.२.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ तृतीय खंड भाग चवथा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत