महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

बुद्ध… क्रांती आणि ईश्वर… प्रतिक्रांती

नामदेव बा. सोनावळे – नागांव, मुंब्रा (ठाणे) मोबाईल नंबर – ९६१९११४८५५

  भारत हा सहिष्णू विचारांचा देश आहे. या देशाने परकीयांचे नेहमीच स्वागत केलेले आहे. म्हणूनच, परकीय धर्म (ख्रिश्चन, मुस्लिम, पारसी), परकीय विचारधारा (कम्युनिष्ट), इथे स्वतंत्रपणे तग धरुन आहेत आणि या सर्वांना भारतीय संस्कृतीने आपल्या मध्ये सामावून घेतलेले आहे.
   डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ' प्राचिन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती '  या ग्रंथाचे आकलण केले असतांना, भारताचा इतिहास म्हणजे भारतीय समाजातील दोन वर्ग,

ब्राम्हण आणि बौद्ध यांच्यातील सांस्कृतिक संघर्षाचा
“क्रांती आणि प्रतिक्रांती” असा इतिहास आहे. हा सिद्धांत मांडून डॉ. बाबासाहेबांनी असे प्रतिपादन केले आहे की, बुद्धपूर्वकाळातील आर्य समाज हा सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक दृष्टीने अध:पतित झालेला समाज होता बौद्ध धर्माने त्यात क्रांती घडवून आणली. बौद्ध धर्माचा उदय ही केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक व राजकीय क्रांती होती.
वैदिक धर्म व्यवस्था काल्पनिक ईश्वराच्या नावाने यज्ञ, पशू हत्या, कर्मकांड, अंधश्रद्धा पसरवून समाजाचे शोषण करत होती. म्हणून, तथागत बुद्धाने ईश्वर ही संकल्पना नाकारून बहुजन समाजाला शोषणमुक्त करण्यासाठी, कोणतेही कर्मकांड नसलेला,
अनंत विश्व हाच…बुद्ध हा श्रद्धेसाठी सत्य पर्याय दिला होता. सम्राट अशोकाने ८४ हजार बौद्ध स्तूपांची निर्मिती करून, धार्मिक क्षेत्रात विशेष क्रांती केली होती. धम्माच्या प्रभावाने समाजाची नैतिकता वाढली होती. तसेच , विज्ञानवादी विचारांमुळे समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोनही सुधारला होता. त्यामुळे धार्मिक कर्मकांड आपोआपच कमी झाले होते. परिणामःत काही ब्राम्हण पुरोहित वर्गाचे आर्थिक हितसंबंध पूर्णपणे उध्वस्त झाले होते.
कालांतराने भारतात मुस्लिमांचे पश्चिमे कडून आक्रमण झाले. मुस्लिम मूर्तिपूजा मानत नसल्यामुळे त्यांनी अनेक बुद्ध विहारे, बुद्ध स्तूप, बुद्ध मुर्त्यांची नासधूस केली, भिख्खुंच्या कत्तली केल्या. नालंदा, तक्षशिला सारखी विद्यापिठे जाळून नष्ट केली. त्याचवेळी ब्राम्हणी व्यवस्थेला राजाश्रय मिळाला होता. त्यामुळे अनेक वर्ष दबा धरून बसलेल्या ब्राम्हणी व्यवस्थेला संधी मिळताच सेनापती पुष्यमित्र शृंगाच्या नेतृत्वाने सम्राट अशोकाचा नातू राजा बृहदत्त याची हत्या केली आणि प्रतिक्रांतीला सुरूवात झाली. वैदिक साहित्यामध्ये थोडा बदल करून, रामायण , महाभारत, श्रुती, स्मृती पुराणे, गीता यांची रचना करण्यात आली.
तथागताने, ज्या अनंत विश्वाला… ‘बुद्ध’ असं संबोधून अध्यात्मिक क्रांती केली होती, त्या बुद्ध नावाचा लोप करून, ब्राम्हणवाद्यांनी अनंत विश्वाला…’ईश्वर’ म्हणायला सुरुवात केली.
सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या ८४ हजार बौद्ध स्तूप, बुद्ध मुर्त्या, बुद्ध विहारे यांचे विदृपीकरण / दैवीकरण करून अनेक बुद्ध मंदिरांचे वेगवेगळ्या देवी-देवतांच्या मंदिरांत रूपांतर केले. पंढरपूर येथील बुद्ध मूर्तीचे, बुद्धासी साम्य असलेलं… विठ्ठल (ज्याला विटाळ होत नाही तो विठ्ठल) हे नाव ठेवलेले आहे. कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर, कार्ला येथील एकवीरा देवीचे मंदिर, तिरुपती येथील बालाजी मंदिर, अयोध्या (साकेत) येथील राम मंदिर अशाप्रकारे, ब्राम्हणी व्यवस्थेने अनैतिकतेने, कुट नितीने बौद्ध धम्मावर प्रतिक्रांती करुन विजय मिळवला.
डॉ. बाबासाहेबांच्या लेखनावरुन, ब्राम्हणवाद्यांच्या अति नीतीने, बौद्धांच्या नितीला पराभूत केले,
अर्थात, बौद्ध धम्माला टक्कर देण्याच्या इराद्याने स्वत:मध्ये जाणीवपूर्वक बदल करणारे ब्राम्हण बुद्धपूर्व काळात पक्के गोमांस भक्षण करणारे होते. पण, बौद्ध भिक्खूंपेक्षा अधिक श्रेष्ठ होण्यासाठी व बुद्ध धम्माला नामोहरण करण्यासाठी त्यांनी गोमांस वर्ज्य करुन गाईची पूजा सुरु केली व शाकाहारी बनले. त्याचा निष्कर्ष असा की, अतिरेकाने अतिरेक ठार करण्याची ही नीती आहे म्हणजेच, नीतीला अति नीतीने हरविणे. बुद्ध धम्माला हरविण्याचा एक उपाय उरला होता तो म्हणजे एक पाऊल पुढे जाऊन शाकाहारी बनणे.
यावरुन, ब्राम्हणवाद्यांची प्रतिक्रांती कशी यशस्वी ठरली हे समजून येते.
अशा प्रकारे साम, दाम, दंड, भेद निती वापरून, शंकराचार्याच्या पुढाकाराने चार पीठे निर्माण करून, बुद्धाचा धम्म नामशेष केला आणि… बुद्ध तत्वांचाचं अंगीकार करून, ईश्वरधिष्टित भागवत / ब्राम्हणी पंथ (सध्याचा हिंदू धर्म) म्हणून प्रस्थापित केला.
प्राचिन भारताच्या इतिहासातून बोध घेऊन…
सांप्रत, बौद्ध परंपरेने तथागत बुद्धाच्या नास्तिक/निरीश्वरवादी प्रतिमेचा त्याग करुन, “वास्तववादी” म्हणजेच…
“अनंत विश्व हाच… बुद्ध” ही प्रतिमा स्वीकारली तर, हिन्दू धर्म आणि बुद्ध धम्म यांची वैचारिक नाळ जोडली जाईल.
(बौद्धमय भारतीयांची अध्यात्मिक नाळ एकच होती.) त्याचीच पुनरावृत्ती म्हणून,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी, पाच लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन सांस्कृतिक नाळ जोडलेली आहे.
सांप्रत हिन्दू धर्माचा ईश्वरवाद… केवल नावापुरताच असून, फक्त… शब्दच्छल केलेला आहे. काल्पनिक ईश्वराला पर्याय म्हणून… बुद्ध
आणि प्रतिक्रांती करून बुद्धाच्या जागी Replace ईश्वर आणलेला आहे.
“अनंत विश्व हाच…ईश्वर”
ही संकल्पना त्यांनी भगवत् गीतेच्या माध्यमातून स्वीकारलेली आहे, हे गीतेच्या १५ व्या अध्यायातील अभ्यासातून स्पष्ट होते.
गीता आणि बौध्द धम्माचा तुलनात्मक अभ्यास करुन, ‘गीता आणि बौद्ध धम्म ही दोन्ही एकाच वेळी झालेल्या क्रांतीची अभिव्यक्ती आहेत’.
असा, निष्कर्ष काढून गीतेमध्ये सांख्य तत्वज्ञान सांगण्यात आलेलं आहे आणि “गीता ही बौद्ध विचारांनी भरलेली आहे”. असं – डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.
यावरुन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवदिक्षीत बौद्धांना कोणता संदेश देतात हे विवेकाने समजून घेणे आवश्यक आहे.
वरील विश्लेषणावरुन,
सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्ती नंतर ज्या अनंत विश्वाला… बुद्ध असे संबोधले आहे, त्याच अनंत विश्वाला…
प्रतिक्रांती करुन, ब्राम्हणवाद्यांनी भगवत् गीतेच्या माध्यमातून ‘ईश्वर’ म्हणायला सुरुवात केली.
म्हणजे…
बुद्ध… क्रांती आणि ईश्वर… प्रतिक्रांती
हे समीकरण…
भारतीय बौद्ध आणि हिन्दू यांची अध्यात्मिक नाळ एकच आहे, हेच दर्शविते.
या लेखाच्या माध्यमातून मला हेच सांगायचे आहे की, क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या चक्रातून निपजलेली सांप्रत काळातील बौद्ध आणि हिन्दू परंपरा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
म्हणून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा स्त्रोत ओळखून स्वदेशी… बौद्ध धम्माचा स्वीकार करुन, राष्ट्राची एकात्मता आणि अखंडता कायम राखण्याचे महान कार्य केलेले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येवला (नाशिक) या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली. बाबासाहेब २१ वर्ष जगातील सर्व धर्म, पंथ, विचारधारा यांचा अभ्यास करत होते, या काळात बाबासाहेबांना अनेक धर्मांच्या धर्मप्रमुखांकडून आमच्याच धर्माचा स्वीकार करावा म्हणून प्रस्ताव येत होते, विशेषत: ख्रिश्चन आणि मुस्लिम या पाश्च्यात्य धर्मीयांकडून धर्मांतराचे प्रस्ताव आले होते. शेवटी बाबासाहेब आपल्या मातीतून उगम पावलेल्या सर्वश्रेष्ठ…. बुद्ध धम्माला शरण गेले.
बुद्ध धम्माचा स्वीकार करत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २२ प्रतिज्ञांच्या माध्यमातून हिन्दू देव-देवता नाकारल्या आहेत. बौद्ध धम्माचा नवदिक्षितांना योग्य आकलण व्हावे म्हणून, हिन्दू देव-देवता, परंपरा या विषयी संदर्भासहित स्पष्टीकरण देऊन टिका-टिप्पणी केलेली आहे. रिडल्स हिंदूझम सारख्या ग्रंथांची निर्मीती केली. ह्याचा अर्थ, डॉ. बाबासाहेबांच्या मनात हिन्दू धर्मीयांच्या बद्दल द्वेष भावना होती किंवा हिंदूंवर सुड उगवायचा होता असंही नव्हे ! बाबासाहेबांनी जे लिहीलं, ते सत्याचं यथार्थ दर्शन घडविण्यासाठी लिहीलं, मानवतेच्या भावनेतून करुणेने, समाज हितासाठी, देशहितासाठी लिहीलेलं आहे.
बौद्ध धम्म संपविण्यासाठी ज्या प्रमाणे स्वकीयांनी (ब्राम्हणी व्यवस्थेने) प्रयत्न केले, तेवढेच प्रयत्न परकिय मुस्लिम आक्रमण कर्त्यांनी सुद्धा केलेले आहेत. हे सत्य असून सुद्धा, आज मुस्लिम समाजाबद्दल भारतीय बौद्धांच्या मनात कोणताही संदेह किंवा द्वेष भावना आढळून येत नाही.
(याचा अर्थ बौद्ध बांधवांनी मुस्लिम समाजाबद्दल द्वेष भावना ठेवावी, असं म्हणण्याचा माझा हेतू नाही.)
परंतू , बौद्ध धम्माचा स्वीकार, २२ प्रतिज्ञा आणि बाबासाहेबांचे संशोधित लेखन वाचून… हिन्दू धर्म, हिन्दू परंपरा म्हणजे, बौद्ध धम्मावरील फार मोठी आपत्ती आहे असा संभ्रम बौद्ध समाजाने करुन घेऊ नये असं मला वाटतं.
दूरगामी परिणाम म्हणून, बौद्धांवरील अन्याय, अत्याचार व राजकीय पिछेहाटीचे कारण यामध्ये दडलेले आहे. बौद्ध धम्मीयांच्या मनातील हा संभ्रम म्हणजे, धम्माचे यथायोग्य आकलण न होण्याचा परिणाम आहे, हे दिसून येते. बुद्धाची दृष्टी लाभलेल्या दृष्टे बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना प्रेम, मैत्री, करुणा, शांतीचा विश्वव्यापक बुद्धाचा सर्वश्रेष्ठ धम्म दिला. त्याच बुद्ध तत्वांवर अधिष्ठित सर्व भारतीयांना एकसंघ ठेवणारे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय देणारे संविधान दिले आहे. त्या बाबांच्या बौद्ध अनुयायांनी बहूसंख्य हिन्दू समाजाप्रती असलेली संघर्षाची भ्रांती कायमची मिटवावी आणि बौद्ध – हिन्दू समन्वयाची शांती स्थापन करावी, असं मला वाटतं. याचं प्रमुख कारण म्हणजे, हिंदू समाज हा पक्का ईश्वरवादी समाज असून, नास्तिक/ निरिश्र्वरवाद्यांच्या बद्दल त्यांच्या मनात भयंकर चीड आहे. तसे त्यांच्यावर धार्मिक संस्कार केले जातात.
आज आपण हिंदू धर्म म्हणजे, वैदिक धर्म, मनुस्मृती, चातुर्वर्ण्य व्यवस्था, वेद, पुराण अशी चर्चा करतो. परंतू , वास्तविक दृष्टीने अनेक पंथ, संप्रदाय यांचा अभ्यास केला तर, (काही अपवाद वगळता) त्यांनी हे सर्व त्यागलेले असून, भगवत गीता आणि संत साहित्य यांच्यावरच त्यांच्या अध्यात्माचा पाया उभा आहे. संत साहित्याचा विचार केला तर, वारकरी संप्रदाया मध्ये संत ज्ञानेश्वरांची ‘ज्ञानेश्वरी’ आणि संत तुकाराम महाराज यांची ‘तुकाराम गाथा’ यांचीच पारायणे केली जातात, बहुतांश, हेच तत्वज्ञान अनेक पंथ, संप्रदाया मध्ये शिकविले जाते. ज्ञानेश्वरी ग्रंथ तर संत ज्ञानेश्वरांनी भगवत गीतेचं मराठी मध्ये केलेलं भावार्थ आहे. आणि तुकारामाची गाथा व भगवत गीता यांच्यावर बुद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव आहे. यावरून, बौद्ध बांधवांनी काय तो बोध घ्यावा.
हिन्दू धर्म आणि बौद्ध धम्म यांच्या परंपरा व उपासना पध्दती जरी वेगवेगळ्या असल्या तरी, त्यांच्यातील अध्यात्मिक आणि सांस्कृतिक नाळ एकच आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. ते समजून घेणे हीच… बौद्धमय भारताची नांदी घडवू शकते.

                 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!