निर्भय बनो, कशासाठी ?

“निर्भय बनो” या बॅनरच्या अंतर्गत रा. स्व. संघ-भाजप सरकारच्या हुकुमशाही कार्यपद्धतीच्या आणि दडपशाहीच्या विरोधात आवाज उठविणार्या ज्येष्ठ पत्रकार मा. निखिल वागळे, ज्येष्ठ विधिज्ञ मा. असीम सरोदे, मा. विश्वंभर चौधरी व त्यांचे इतर सहकारी यांच्यावर हिंसक हल्ला करणार्या रा. स्व. संघ-भाजपच्या लोकांचा मी निषेध करतो. असा निषेध लोकशाहीवर विश्वास ठेवणार्या प्रत्येकानी केलाच पाहिजे. सद्यस्थितीत “निर्भय बनो” या बॅनरखाली महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेण्यात येत आहेत. थोडावेळ हे मान्य केले की या आंदोलनाच्या पुढार्यांच्या सांगण्यानुसार या सभांना जमणारे सर्व लोक निर्भय बनले तर पुढे काय करायचे ? हा प्रश्न माझ्यासारख्याच्या मनात निर्माण होतो. निर्भय बनून फॅसिस्ट शक्तीच्या विरोधात लढायचे म्हणजेच रा. स्व. संघ-भाजपला मतदान करायचे नाही एवढा एकमेव अजेंडा निर्भय बनो आंदोलनाचा दिसतो आहे. असे असेल तर रा. स्व. संघ-भाजपला मतदान करायचे नाही या मुद्द्यावर काँग्रेस, राष्टवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) वंचित बहुजन आघाडी यासह अनेक राजकिय पक्ष हे आवाहन दररोजच करीत असतात. मग या राजकीय पक्षाच्या अजेंड्यात आणि निर्भय बनो आंदोलनाच्या अजेंड्यात नेमका फरक काय ? निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, कुमार नागे, संभाजी भगत, अश्विनी सातव, उत्पल व. बा., शिल्पा बल्लाळ, रेश्मा रामचंद्र, प्रमोद मुजुमदार, नितीन वैद्य व त्यांचे इतर सहकारी आणि समर्थक यांना नेमके कोणाला आणि कशासाठी निर्भय बनवायचे आहे हे त्यांनी नेमकेपणाने संगितले पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांच्या रक्षणासाठी किंवा संविधानाच्या रक्षणासाठी असे मोघमपणे बोलून चालणार नाही.
निर्भय बनण्याची कसोटी काय ?
निर्भय बनो आंदोलनाच्या अध्वर्यूनी निर्भय बनण्याची नेमकी कसोटी काय याचे उत्तर देणे अपेक्षित आहे. माझ्या मते निर्भय बनण्याची मुख्य कसोटी ही आपल्या मनावरील धर्माचा पगडा झुगारून देऊन ब्राह्मण धर्माचा थेट विरोध करणे ही आहे. दुसरी कसोटी शोषक राज्यकर्ते बहुसंख्यकांची धार्मिक-सांस्कृतिक प्रतीके, भाकडकथा समाजातील प्रत्येक घटकांवर जबरदस्तीने लाद्त आहेत त्या धार्मिक संस्कृतिक प्रतिकांचा आणि भाकडकथांचा फोलपणा, खोटारडेपणा, अनैतिहासिकपणा उघडा पाडणे म्हणजे निर्भय बनणे होय. आंबेडकरवादी चळवळीतील 95 टक्केपेक्षा अधिक लोक हे या दोनही कसोट्यावर खरे उतरतात. हे पाहता ते आधीच निर्भय बनले आहेत. त्यांना “निर्भय बनो” म्हणून सांगण्यात काय अर्थ आहे ? “निर्भय बनो” आंदोलनाच्या नेत्यांना, सर्व जनतेला खर्या अर्थाने निर्भय बनवायचे असेल तर रा. स्व. संघ-भाजपने जो “नवीन धडावर पुरातन मेंदू रोपित करणे” (Old Brain On New Body) हा अजेंडा राबविला आहे तो हाणून पाडून “नवीन धडावर अत्यधुनिक मेंदू” रोपित करणे होय. अन्यथा “निर्भय बनो” आंदोलन म्हणजे रा. स्व. संघ-भाजपला मतदान करायचे नाही एवढा मर्यादित राजकीय अजेंडा राबविणारे काही राजकीय पक्षांचे अराजकीय आंदोलन एवढ्यापुरते मर्यादित होईल.
इतिहासात निर्भय बनो आंदोलन कोणी चालविले ?
निर्भय बनण्याची आणि बनविण्याची लढाई ही काही आजकालची लढाई नाही. ही लढाई क्रांति विरुद्ध प्रतिक्रांतीची लढाई आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या “क्रांति आणि प्रतिक्रांती” या ग्रंथात या लढाईचे उदाहरणासहित वर्णन केले आहे. ब्राह्मणी धर्मग्रंथानुसार राज्याचे कोणतेही कार्य ब्राह्मणी धर्माच्या अंमलबजावणीपेक्षा मोठे असू शकत नाही. जो कोणी शासक ब्राह्मणी धर्माचे पालन करणार नाही त्याचे नातलग, मंत्री, अमात्य, सैन्य, अधिकारी, प्रजा यांना साम (स्तुति – प्रशंसा करणे व ठगविणे ), दाम (धन, पैसा, पद देणे ), दण्ड (भय दाखविणे, शिक्षा करणे), भेद (जाती, धर्म, प्रांत इत्यादीवरून फुट पाडणे), माया (भ्रम पसरविणे, लालच देणे), उपेक्षा (फितुरी घडवुन आणणे, फितुरांमार्फत आपल्याच लोकांवर आरोप करण्यास उद्युक्त करणे), इंद्रजाल (विविध प्रकारची षड्यंत्र रचणे) या सात मार्गाचा अवलंब करून त्यास पदच्युत केले पाहिजे असा उपदेश मनुस्मृती, वशिष्ठ स्मृती, पराशर स्मृती, गौतम स्मृती, शुक्र नीति, कौटिल्य अर्थशास्त्र इत्यादी ब्राह्मणी धर्मग्रंथांमध्ये केला आहे. वर्तमानातील ब्राह्मणवादी रा. स्व. संघ- भाजप सरकार नेमके हेच करते आहे. यासंदर्भात निर्भय बनो वाले लोकांना काही सांगतात काय ? नसतील सांगत तर मग नुसतीच मोघम बडबड करण्यात काय हशील आहे ?
पुराणकथा आणि महाभारतादी काव्ये यात उल्लेख केल्यानुसार राजा नहुष, राजा बळी, राजा हिरण्यकश्यपू, राजा वेन अशा क्षत्रीय राजांनी ब्राह्मणांच्या या दहशतवादाचा विरोध केला. यामुळे ब्राह्मणांनी वरील सात मार्गाचा अवलंब करून त्यांना पदच्युत केले असे दिसून येते.
ऐतिहासिक काळात ब्राह्मणांनी नंद सम्राट धनानंद याला ब्राह्मणांचा अपमान केला म्हणून पदच्युत केले. मौर्य सम्राट बृहद्रथ ब्राह्मणी धर्म मानत नाही म्हणून त्याचा खून करून ब्राह्मण पुष्यमित्र शुंग यास गादीवर बसविले व बौद्ध धर्माच्या विरोधात प्रतिक्रांती केली. दहाव्या शतकातील काश्मीरचा राजा चक्रवर्मन याने पाशुपत पंथ स्वीकारून ब्राह्मण धर्माचा त्याग केला म्हणून त्यास ठार मारण्यात आले. देवगिरीच्या यादवांची आणि महाराष्ट्रासह कर्नाटकातील विजयनगरची हिंदू राजवट नष्ट करण्यात तत्कालीन ब्राह्मण मुलकी अधिकारी व मंत्री यांनी मोठा हातभार लावला असे अनेक इतिहासकारांनी दाखवून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य ब्राह्मणांनी गिळंकृत करून पेशव्यांचे ब्राह्मण राज्य स्थापित केले. एकंदरीत भारतीय इतिहासात राजदण्ड नव्हे तर ब्राह्मणदण्ड हाच प्रभावी राहिलेला आहे असे इतिहासातील अनेक उदाहरणातुन दिसते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक बौद्धिक मुखंड दत्तोपंत ठेंगडी यांनी त्यांच्या कार्यकर्ता या पुस्तकात RSS चे अंतिम उद्दिष्ट शासनसत्तेवर धर्मसत्तेचा प्रभाव निर्माण करून धर्माधिष्ठित समाजरचना (वर्णाश्रम व्यवस्था) व धर्मप्रवण व्यक्तीमानस (नाम स्मरणात, भक्तीत गुरफटलेला माणूस) तयार करणे आहे हे स्पष्टपणे नमूद केले आहे. वर्तमान काळात रा. स्व. संघ-भाजप ब्राह्मणवाद नाकारणाऱ्या सत्तेविरुद्ध ज्या पाशवी पद्धतीचा धुडगूस घालतो आहे त्यावरून ब्राह्मणांना संविधान व लोकशाही मानणारी राज्ये अजिबात नकोत तर ब्राह्मणी राष्ट्रवाद मानणारी राज्ये प्रस्थापित करायची आहेत असेच दिसून येते. निर्भय बनो आंदोलांनाच्या पुरस्कर्त्यांनी या बाबी लोकांच्या समोर आणणे गरजेचे आहे.
हिंदू राहून निर्भय बनणे अशक्य.
भारतातील भयग्रस्त मानसिकतेला हिंदू धर्माचा व हिंदूंच्या धर्मशास्त्राचा भक्कम पाया लाभला आहे. यामुळे संविधानाचे रक्षण करायचे असल्यास ही भयग्रस्त मानसिकता ज्या पायावर उभी आहे तो धार्मिक पाया उध्वस्त करणे आवश्यक आहे. हा पाया उद्धवस्त करण्यासाठी लागणारी कायद्याच्या तरतुदींवर आधारित भौतिक स्वरूपाची चौकट भारतीय संविधानाने उपलब्ध करून दिली. निर्भय बनो वाले ही नेमकी चौकट लोकांपुढे मांडत नाहीत ही आमची तक्रार आहे.
ज्यांना खरोखरच निर्भय बनून फॅसिस्ट शक्तीच्या विरोधात लढायचे असेल त्यांनी फॅसिझमचा पाया म्हणून काम करणाऱ्या हिंदू धर्माला नाकारणे ही प्राथमिक गरज आहे. इतिहासात ज्यांना ब्राह्मणवाद मानवी उत्कर्षाला घातक आहे असे वाटले त्यांनी ब्राह्मण वाद विरोधी नवीन धर्म किंवा पंथ स्थापन केल्याचे दिसते. भगवान बुद्धाने स्वतंत्र बौद्ध धम्म निर्माण केला, भगवान महावीराने जैन धर्म निर्माण केला, तंत्रयानाचे संस्थापक, नालंदा महाविहाराचे आचार्य शांतरक्षित, सहजयानाचे संस्थापक सिद्धसरहप्पा, नाथपंथाचे संस्थापक मच्छिंद्रनाथ, लिंगायत पंथाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर, महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी, चैतन्य संप्रदायाचे संस्थापक चैतन्य महाप्रभू, खालसा पंथाचे (शीख धर्म) संस्थापक गुरूनानक, भक्तीपंथाचे विविध संत, वारकरी संप्रदायाचे विविध जातीय संत, आधुनिक भारतातील सत्यशोधक संप्रदायाचे संस्थापक महात्मा जोतीराव फुले इत्यादी अनेकांनी हिंदू धर्माला नाकारून निर्भयपणे अन्य धर्म/संप्रदाय स्वीकारण्याचा/स्थापण्याचा पर्याय स्वीकारलेला दिसतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म नाकारून बौद्ध धर्म स्वीकारताना परिवर्तनवादी भारतीय महापुरुषांची ही ऐतिहासिक परंपरा जोपासली. क्रांति विरुद्ध प्रतिक्रांतीच्या लढाईला अशा प्रकारे असंख्य असे पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत. निर्भय बनो आंदोलन चालविणार्यांनी हे संदर्भ तपासून त्याचा अभ्यास केला पाहिजे व त्याबद्दल लोकांचे प्रबोधन केले पाहिजे. मात्र, “निर्भय बनो” च्या स्टेजवर या पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भांचा साधा उल्लेखही केला जात नाही हे खेदजनक आहे. हिंदू राहून निर्भय बनणे अशक्य आहे ही बाब “निर्भय बनो” वाल्यांनी गांभीर्याने घेतली पाहिजे.
सुनील खोबरागडे
By Sunil Khobragade
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत