कंबोडियातील अंगकोर वट Angkor Wat – Largest religious monuments in Cambodia.
कंबोडिया हे व्हिएतनाम आणि थायलंड या देशांच्यामध्ये वसलेले एक बौद्धराष्ट्र आहे. १३ व्या शतकापासून थेरवादी बौद्धधम्म तेथे प्रचलित आहे. ५ व्या शतकापासून बुद्धीझमचे अस्तित्व तेथे होते हे अलीकडील उत्खननावरून स्पष्ट झाले आहे. ७ व्या शतकानंतर धम्माचा प्रभाव भारताप्रमाणेच कमी होत गेला. तेथील राजांना हिंदू करण्यात पुरोहित वर्ग यशस्वी झाला. पण राजाचे मंत्री बौद्धच राहिले. इ.स. १००१ ते १०५० मध्ये पुन्हा महायानी पंथाचा सुर्यवर्मन हा कंबोडियाचा पहिला बौद्ध राजा झाला. १३ व्या शतकात थेरवादी बौद्धधम्म हा राजा ति-चय (इंद्रवदन) याच्यामुळे चांगला रुजला. त्याकाळात बांधले गेलेले ‘अंगकोर वट’ हे आता कंबोडियातील महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळ झाले आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेले हे एक भव्य धार्मिक बौद्धस्थळ असून त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.
१) अंगकोर वट हे शिल्प कलाकृती असलेले प्रचंड मोठे विहार इ.स. ८०२ ते १३०० मध्ये बांधलेले असून येथे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना पहावयास मिळतो. वालुकामय पाषाणातील घडविलेल्या सुंदर कलाकृती येथे दृष्टीस पडतात.
२) अंगकोर वटचे बांधकाम प्रत्येक राजवटीत होत गेले. त्याबाबतचा इतिहास अस्पष्ट आहे. असे म्हणतात की त्यावेळी एक हजार हत्ती आणि लाखो मजूर तेथे काम करीत होते. पाच मिलियन टन वालुकामय पाषाणाचा यासाठी वापर करण्यात आला. या संपूर्ण स्थळाचे क्षेत्रफळ २०८ हेक्टर आहे.
३) वर्षाला जवळजवळ वीस लाख पर्यटक या आकर्षक आणि अदभूत स्थळाला भेट देतात.
४) कंबोडिया देशाला अंगकोर वटचा अतिशय अभिमान असून त्यांच्या राष्ट्रीय ध्वजावर त्या स्थळाची प्रतिमा आहे. जगामध्ये कंबोडिया आणि अफगाणिस्तान असे दोनच देश आहेत, ज्यांनी त्यांच्या देशातील पुरातन स्थळांच्या प्रतिमा ध्वजावर घेतल्या आहेत.
५) ‘अंगकोर वट’ याचा अर्थ म्हणजे ‘विहारांचे शहर’ असा आहे. कंबोडियाच्या ख्मेर भाषेत अंगकोर म्हणजे शहर आणि वट म्हणजे बुद्धमंदिर किंवा विहाराची जागा असा आहे. येथे बुद्धमूर्ती ठिकठिकाणी असल्याचे दिसले. भिक्खुंचा वावर तेथे आहे.
६) सन २००१ मध्ये लारा क्रॉफ्टचा सिनेमा ‘टॉम्ब रेडर’चे (Tomb Raider) चित्रीकरण येथील ता-फ्रॉम ( Ta-Prohm ) या विहार स्थळावर झाले. पॅरामाऊंट पिक्चरने त्यासाठी प्रतिदिन $10,000 भरले. येथे चित्रण केल्यानंतर अँजेलिना जोली ही हिरोईन कंबोडियाच्या प्रेमातच पडली. व तीने मेडॉक्स नावाचा बौद्ध कंबोडियन मुलगा दत्तक घेतला.
७) अंगकोर वट येथे बुद्धांची शिल्पे आढळून येतात. मात्र एकेठिकाणी भिंतीवर रामायणातील प्रसंगसुद्धा कोरलेले आढळतात. इ.स.१३व्या शतकापर्यंत प्रथम बौद्ध त्यानंतर हिंदू आणि मग पुन्हा बौद्ध राजवट अशी स्थित्यंतरे तेथे झाली. व आता मात्र कंबोडियातील थेरवादी बौद्धस्थळ म्हणून ते जगजाहीर आहे.
८) इ.स.१४३२ नंतर अंगकोर वट हे भव्य विहार संकुल काही अज्ञात कारणाने निर्मनुष्य झाले. आजूबाजूस वाढलेल्या घनदाट जंगलामुळे दृष्टीआड झाले. अनेक वर्षे विस्मरणात राहिले. अजिंठ्याचा शोध जसा २८ एप्रिल १८१९ रोजी मद्रास पलटणीतील एका शिपायाने लावला तसाच अंगकोर वटचा शोध सन १८६० मध्ये फ्रेंच संशोधक हेनरी मौहोट यांनी लावला. लाओस येथे तापाने मरण पावल्यावर त्यांच्या डायरीतील लेखनातून त्यांनी केलेल्या संशोधनाचा सुगावा लागला. आणि हे भव्य शिल्प विहार संकुल जगाला माहीत झाले.
९) येथील असंख्य बुद्धमूर्ती शिल्पांची लुटालूट फ्रेंचांनी व ब्रिटिशांनी केली. त्यावेळी युरोपमध्ये अनेक खाजगी संग्रहालये उदयास आली. त्यांनी जुन्या शिल्पांची तस्करी करून रग्गड पैसा मिळविला. १९९२ साली युनेस्कोने जागतिक वारसा यादीत या स्थळाचा समावेश केला. त्यामुळे हे स्थळ सुरक्षित झाले असून कंबोडिया आता तेथे सुधारणा करीत आहे.
१०) अंगकोर वट बघताना तेथील काही शिल्प विहारांची दुरुस्ती भारतीय पुरातत्त्व विभाग करीत असल्याचे निदर्शनास आले. तेथे त्यांच्या नावाचा बोर्ड दृष्टीस पडला. म्यानमारमध्ये सुद्धा काही पॅगोड्यांची दुरुस्ती भारतीय पुरातत्व खाते करीत आहे. अंगकोर वट मधील भग्नावस्थेतील अनेक शिल्पे पाहून वाईट वाटले. व पाचशे वर्षापूर्वी हा ठेवा किती दिमाखदार दिसत असेल याची कल्पना त्यांच्या शिल्प आणि स्थापत्य शैलीतून दिसून आली.
— संजय सावंत ( नवी मुंबई )
????????????????????????
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत