
हे २०२५ साल आहे. याचं महत्व काय आहे ?
बरोब्बर शंभर वर्षांपूर्वी दोन संघटनांचा जन्म झाला होता.
कम्युनिस्ट आणि संघ.
दोन्हीही ब्राह्मणवाद्यांनीच जन्माला घातल्या होत्या.
१९२५ साली सत्यशोधक समाज जोरात होता तेव्हां कॉंग्रेस हा ब्राह्मणवादाचा चेहरा होता. सत्यशोधक समाजात मराठा कुणबी मोठ्या प्रमाणात होता. याच चळवळीने अनेक मराठा कुणबी नेत्यांना कॉंग्रेसच्या विरोधात उभे केले. छत्रपती शाहूंचा सत्यशोधकांना पाठिंबा होता. डॉ. बाबासाहेब स्वत:ला सत्यशोधक म्हणवायचे. सत्यशोधक जवळकर जेधे यांच्या विरोधातला ब्राह्मणवाद्यांनी दाखल केलेला बदनामीचा खटला बाबासाहेबांनी एक पैसाही न घेता जिंकून दिला होता. हे त्यांचं नातं होतं.
कॉंग्रेसने सत्यशोधक चळवळीची ताकद लक्षात घेऊन अन्य राज्यांप्रमाणे इथे ब्राह्मणांच्या हाती कॉंग्रेस न देता यशवंतराव चव्हाण यांना मोठं केलं. यशवंतरावांनी सत्यशोधक नेत्यांना कॉंग्रेसमधे आणलं. याला ते बेरजेचं राजकारण म्हणत. ज्या ब्राह्मणवादाच्या विरोधात सत्यशोधक चळवळ उभी ठाकली होती, त्याच ब्राह्मणवादाच्या आश्रयाला जेधे जवळकर जाऊन बसले. त्यांच्यावर याच कॉंग्रेसी नेत्यांनी अनेक खटले दाखल केलेले होते. कॉंग्रेसमधे गेल्यावर ते काढून घेतले गेले.
तेव्हां बाबासाहेब उद्वेगाने म्हणाले होते “आज मी एकटाच सत्यशोधक उरलो”.
यशवंतरावांनी नंतर बहुजन नेत्यांना कॉंग्रेसमधे आणत कॉंग्रेसचा चेहरा महाराष्ट्रात बहुजनवादी केला. अर्थात राज्यात यशवंतराव हा चेहरा असले तरी केंद्रात कॉंग्रेस कायमच ब्राह्मणी राहिली. जर महाराष्ट्रात बहुजनवादी चेहरा दिला नसता तर सत्यशोधक चळवळ किंवा शेकापची सत्ता आली असती. क्रांतिसिंह नाना पाटलांना शह देण्याचे काम यशवंतराव यांनी केले.
अगदी शरद पवारांचे उदाहरण घेतले तरी त्यांच्या घरात शेकापची परंपरा होती. मात्र यशवंतरांनी मुद्दामून शरद पवारांना कॉंग्रेसमधे आणून मोठं केलं. यामुळं पश्चिम महाराष्ट्रात रूजलेली शेकापची मुळं कमकुवत करता आली. पवारांना मोठं करून त्यांच्याच घराण्यातली शेकापची सत्ता कॉंग्रेसने संपवली.
याच काळात उत्तर प्रदेश आणि बिहार या मागासवर्गीय बहुल राज्यात मात्र कॉंग्रेस सातत्याने ब्राह्मण मुख्यमंत्री देत होती, याचे कारण त्या राज्यात सत्यशोधक चळवळीप्रमाणे नसलेली सामाजिक दबावगटांची परंपरा. ओबीसी संघटीत नसल्याने कॉंग्रेसमधला ब्राह्मणवाद तिथे डॉमिनंट होता. जोपर्यंत लालूप्रसादांचं नेतृत्व समोर आलं नाही तोपर्यंत उत्तर प्रदेश, बिहारात हीच परिस्थिती होती.
अन्य काही समाजवादी नेत्यांनी कॉंग्रेसच्या उच्चवर्णिय नेतृत्वाला शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र कांशीराम ,लालू यांच्याप्रमाणे त्यांची चळवळ टोकदार नव्हती. ब्राह्मणी नेतृत्वाकडून ठाकूर, बनिया नेतृत्वाकडे समाजवादी अंगाने नेतृत्व जाईल अशी ती चळवळ होती.
हरियाणात देवीलाल, उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव, कांशीराम, बिहारात लालू यांनी उत्तर भारतातल्या ब्राह्मणी वर्चस्वाला सुरूंग लावल्यावर संघाच्या ऑर्गनायजर या अनऑफिशियल मुखपत्रात ” द शूद्र रेव्होल्युशन ” या नावाने विशेषांक काढला होता. दक्षिण भारतात ब्राह्मणवाद उखडला गेला होता. महाराष्ट्रात कॉंग्रेस बहुजन नेत्यांच्या आश्रयाने होती आणि उत्तर भारतात ब्राह्मणी नेतृत्वाला हादरे बसत असल्यानेच कॉंग्रेस खिळखिळी झाली होती.
म्हणूनच कॉंग्रेसने भाजपकडे सत्ता देण्याचा निर्णय घेतला. भाजपने उघड हिंदुत्ववादी चेहरा धारण करून बहुजनवादाचे पेकाट मोडायचे आणि कॉंग्रेसने सेक्युलर चेहरा धारण करून बहुजनवाद सेक्युलॅरिजमकडे न्यायचा हा खेळ त्यांनी आरंभला. त्यासाठीच रामजन्मभूमी हा बाटलीतला राक्षस राजीव गांधींनी बाहेर काढून भाजपला सुसाट सोडले. दोन वरून ८८ वर भाजप गेली ती राहुल गांधींच्या या खेळीनेच.
जिथे या ८६ जागा ओबीसींच्या पक्षांना मिळायला हव्या होत्या त्या भाजपला गेल्या. कॉंग्रेस हे बुडतं जहाज होतं. पण आपण बुडत असताना ब्राह्मणवाद बुडू नये म्हणून कॉंग्रेसने ब्राह्मणवादाची बी टीम सशक्त केली. त्या काळात अनेक उच्चवर्णिय नेते कॉंग्रेसमधून भाजपमधे गेले.
आज २०२५ साली शंभर वर्षांपूर्वी जे झालं तेच रूप बदलून चालू आहे.
कॉंग्रेसमधले मराठा नेते आज भाजपमधे जात आहेत.
ब्राह्मणतेर चळवळीचे जनक सत्यशोधक नेते ब्राह्मणी कॉंग्रेसमधे गेले. जे कधी होईल असं वाटलं नव्हतं.
आज सत्यशोधक रूप धारण केलेल्या कॉंग्रेसमधले मराठा नेते भाजपमधे जात आहेत. थोडेच शिल्लक आहेत ते पुढच्या दहा वर्षात जातील.
ब्राह्मणवादाने रूप बदललं.
कॉंग्रेस आणि भाजप हेच ब्राह्मणवादाचे अ आणि ब संघ आहेत यापेक्षा मोठा पुरावा आणखी काय पाहीजे ?
२१२५ साली भाजप बहुजन चेहरा असेल आणि त्या वेळी उघड ब्राह्मणवादी म्हणून आणखी काही तरी असेल.
स्टीफन हॉफकिंग यांच्या मते अजून ५६० वर्षे पृथ्वी मानवाला राहण्यासाठी योग्य असेल. त्यानंतर माणूस शिल्लक राहणार नाही.
पण तो नष्ट होईपर्यंत बहुजन असेच मूर्खात निघत राहतील.
—मंदार माने
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत