सुभाषचंद्र बोस जयंती निमित्याने…दत्ताजी हिवाळे म्हणतात…हे स्वातंत्र्य मिळवलंय तरी कश्यासाठी ?
दत्ताजी हिवाळे.
मलकापूर बुलढाणा
९५१८९२५५४७
हे स्वातंत्र्य मिळवलंय तरी कश्यासाठी ? असा प्रश्न आज स्वातंत्र्य प्रा्ती नंतरच्या ७५ ते ८० दरम्यान च्या वर्षा नंतर हि पडावा हा आपला विजय म्हणायचा कि पराभव हेच कळेनासे झाले आहे. आपण सर्वजण आज आपल्याच स्वातंत्र्यात असूनही आपल्या भोवतीच्या समाज घटकातील कोणीच कसा सुखी आणि समाधानी दिसत नाही अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. ज्यांच्या जवळ आज सत्ता संपत्ती आहे तेही चिंतातुर आहेत आणि ज्यांच्या जवळ नाही तेही चिंतातुर आहेत ज्यांच्या जवळ आहे ते यासाठी चिंतातुर व अस्वस्थ आहेत की, माझे आहे ते कुणी घेऊन जाईल का ? मी ज्या मार्गाने ते मिळविले आहे त्या मार्गाला आणि मला कुणी चोर तर म्हणणार नाही ना ? माझ्या वर कुणी काही कारवाई किंवा हल्ला तर करणार नाही ना ? आणि ज्यांच्या जवळ नाही ते मला कसे मिळवता येईल ? सरळ मार्गाने तर ते मला मिळणार नाही आणि वाम मार्गाने मी ते मिळविण्याचा प्रयत्न केला तर मी चोर गुन्हेगार तर ठरवल्या जाणार नाही ना ? म्हणून तो हि चिंतातुर आहे जे सरकारी भरपूर पगारदार आहेत त्यांचही पगारात भागत नाही म्हणतात .
मजूर कामगार म्हणतो माझं माझ्या कुटुंबाचं उद्याच काय ? शेतकरी साऱ्यांचा पोशिंदा म्हणतो मी साऱ्यांच्या मुखी अन्न घालतो आणि माझ्या वरच उपासमारीची आणि आत्महत्येची पाळी का ? तरुण म्हणतो माझं वय होतंय मला काम नाही मी या बेरोजगारीत कसे कुटुंब उभारू ! असे सारेच अस्वस्थ आहेत .निर्भय आणि चिंतामुक्त कोणी कस दिसत नाही .सारेच भयभीत दिसतात .त्यात मधेच कुठे जातभय नाहीतर धर्मभय फणा बाहेर काढतय,
लोकशाही, स्वातंत्र,समता,बंधुता, न्याय,राष्ट्रभक्ती हे शब्द फक्त चघळण्याचे आणि फार झालं तर फक्त टी.व्ही. किंवा चॅनल वरील परिसंवादा पुरते उरलेत. खुशाल चर्चा करा आणि आहे त्यातच मरा , एवढंच मतदारांच्या हाती उरलय . राजकीय पक्ष तर पक्षांचे थवे उडावेत तसे आज या फांदीवर तर उद्या त्या.असे इकडून तिकडे उडत आहेत. स्त्रिया म्हणतात आम्ही सुरक्षित नाही पुरुष म्हणतात ह्या अति स्त्रीमुक्तीमुळे आम्ही पुरुष असुरक्षित झालोत. कोण सुरक्षित आहे याचा शोध सुद्धा घेता येत नाही . अन्नसुरक्षे मुळे कोट्यावधींची श्रमशक्तीच गोठवून टाकली . अन्न उत्पादन हव पण उत्पादन प्रक्रियेत सहभाग नको त्यामुळे ‘ काहींनी राबायचं आणि काहींनीच दाबायच ‘ असं सूत्र अंगवळणी पडलय !
या साऱ्या गदारोळामुळे याच स्वातंत्र्यासाठी लटकली होती का ती माणसं फासावर यासाठी वाहिलेत का ते रक्ताचे पाट याच स्वातंत्र्याच्या साठी संपल्यात का त्या पिढ्या, त्या घटना आणि इतिहास डोळ्यासमोर आणला की मन आणि हृदय पिळवटून जातंय. आणि आंतरध्वनी सांगू लागलाय.
काहीतरी चुकतंय आपलं आणि काहीतरी चुकीचं तरी घडतय आपल्या आजूबाजूला आणि आपल्या मतदानाने आपण पाठिंबा देतच आलोय त्याला .
स्वातंत्र्य मिळून ७०-७५ होत आहेत , देश तुमचा , लोक तुमचे , पक्ष , पुढारी नेते कार्यकर्ते मतदारही तुम्हीच तुमचे . मग आपण सारेच का साक्षीदार होत आहोत या अस्वस्थतेचे , भय आणि भीतीचे या कारस्थानाचे , जातीय व्यवस्थेचे , धर्मांधतेचे , रक्तपिपासूंचे दोषी कोण ते की आपण मतदार ?
या साऱ्या अराजकतेच उत्तर आपण शोधणार आहोत की नाही की या स्वातंत्र्यासाठी जे मेलेत गेलेत त्यांच्या फक्त जयंत्या पुण्यतिथ्या एक एक दिवस साजरा करून त्यांचे फक्त ‘ इव्हेंट्स ‘ करत राहणार आहोत आपण . आपण नाही तर कोण बदलणार आहेत हे परिस्थिती , कोणी अवतार येणार आहे का हे बदलायला या संदर्भात रामदासांनी मूर्खांचे नऊ लक्षण जी सांगितलेली आहेत त्यातील एक लक्षण या परिस्थितीवर प्रामुख्याने जाणवतय रामदास स्वामी म्हणतात ….
‘ सांगे फक्त वडिलांचीच कीर्ती तोही एक मूर्ख ‘ आपण फक्त महापुरुषांचीच नाती सांगत त्यांच्या फक्त जयंत्या पुण्यतिथ्या ठराविक तारखांना साजऱ्या करत राहणार आहोत का . आणि वडिलांचीच कीर्ती सांगणाऱ्यांच्या वंशावळीतीलच एक होणार की या माणूसपण , लाज लज्जा , नीतिमत्ता हरवलेल्या आणि भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आजूबाजूच्या बिघडलेल्या परिस्थितीवर काही उपाय शोधणार आहोत की नाही . हे स्वातंत्र्य कशासाठी याचा गंभीरतेने विचार करून या स्वातंत्र्याची फेर मांडणी करणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे .
आपल्या अशा या भविष्याचा विचार करूनच स्वातंत्र्य देताना जाता जाता चर्चिल म्हणाला होता हे भारताचे लोक स्वातंत्र्याच्या लायकीचे नाहीत अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचे तर तो म्हणाला होता ‘इंडिया वॉज नेव्हर ए नेशन , इट इस ओन्ली ए पॉपुलेशन ‘ त्याचे ते शब्द आजही जिव्हारी लागतात. आणि प्रश्न पडतो असा की अनेक जाती जातीत आणि धर्माधर्मात जखडलेले आपण खरच राष्ट्र आहोत का आणि हे स्वातंत्र्य नक्की मिळवलं तरी कशासाठी ?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत