संविधानाच्या पंचाहत्तरीला अनुल्लेखाने मारण्याचे हे षडयंत्र होय…

विशाल हिवाळे (संविधान अभ्यासक आणि प्रचारक) ९०२२४८८११३
धार्मिक आणि सांस्कृतिक आक्रमणाद्वारे, जनतेच्या मनावर अधिराज्य केलं जातंय. दैवतीकरणाच्या माध्यमातून भारतीयांचा मेंदू हायजघ्क केलाय. रामराज्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी सामूहिक मानसिकता बनविण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या माध्यमातून जोमाने व नियोजन बद्ध पद्धतीने सुरू झालीय. भारताच्या संविधानाने आधुनिक, वैज्ञानिक समाजवादी, दृष्टिकोन देण्याचं मूल्य प्रस्थापित केलं होतं. संविधानाच्या अंमलबजावणी नंतर भारताचा जो काही विकास झाला तो केवळ संविधानिक मूल्यांमुळेच. वास्तविक ७५ वर्षात फार मोठी मजल मारता आली असती. भारताने अमेरिका – रशिया-इस्रायल-चीन, जपान सारख्या राष्ट्रांच्या पंक्तीत आपलं नाव समाविष्ट केलं असलं. किमान आपण या महाविकसित राष्ट्रांच्या स्पर्धेत असतो. मात्र या देशात ज्या पद्धतीने बुरसटलेल्या विचारधारेच्या लोकांनी धार्मिक आणि सांस्कृतिक भडिमार चालू ठेवला. त्यामुळे बहुसंख्य जनता भक्तीतत अडकून पडली. दैवतीकरणाच्या चिखलात लोक इतके रूतले की स्वतः सह त्यांच्या भावी पिढयांनाही त्यांनी मानसिक गुलाम करून टाकलंय.
जगाची प्रगती आणि क्षणाक्षणाला पृथ्वी व अवकाश मंडळात होणारे बदल हे केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन जगण्यात उतरविल्यामुळे होत आहेत. आपल्याकडे शनि मागे लागतो, राहू-केतू मागे लागतात या फालतू आणि बाष्कळ गोष्टी मेंदूत घुसविल्या जातात. खरं तर शनि, मंगळ, बुध अथवा ज्ञात-अज्ञात असणाऱ्या कोणत्याही ग्रहाला इतरांच्या अस्तित्वाची जाणीवही नाही, पृथ्वीवर ते सुद्धा भारताच्या भूमिवर किडे रेंगाळतात की पशू अथवा माणसं त्याला त्याचं शनि व इतर तत्सम ग्रहांना काहीही सोयरसूतक नाही. शनि-राहू-केतू-कसे दिसतात हे पोटापाण्याचा धंदा करणाऱ्यांना माहित नसतं. प्रत्यक्षात त्यांनी बघितलेले नसतात, पण ते मूर्खाच्या मनावर भितीचं साम्राज्य प्रस्थापित…….
करत अनादी काळापासुन आपला पोटापाण्याचा धंदा तेजीत चालवत आहेत. धर्ममार्तंडांच्या कचाट्यात सापडलेल्या महामूर्खानो, जगातील विकसित राष्ट्रे शनि, राहू, केतू सोडा अवकाश मंडळातील मोठमोठया सर्व ग्रहांच्या मागे हात धूवून लागलेत. एवढंच कशाला, सूर्यावरही झेप घेण्याच्या प्रयत्नात आहेत, कारण सौर्य मालिकेतील दुसरा महासूर्य त्यांना खुणावतोय. आपण जो सूर्य बघतोय, रोज अनुभवतोय त्याच्या पेक्षा दोन हजार पट मोठा सूर्य वैज्ञानिकांना दिसलाय. आपल्याकडे हि माहिती प्रसारीत होत नाही कारण अंधभक्तांना अंधारातच रममाण ठेवायचंय. थाळ्या वाजवून करोनाला पळवणं व दिवे लावून करोनाचे विषाणू शोधणं असे अवैज्ञानिक प्रकार अंधभक्तांकडून करविले जातात. कारण अंधभक्तांना विज्ञान उमगायला लागलं तर आपला धंदा बंद होईल. धार्मिक, सांस्कृतिक आणि दैवतीकरणाला फाटयावर फाट्यावर मारून हे भक्त सत्याच्या शोधात निघालात,…….
मात्र जनतेच्या मनावर २२ तारखेचा कार्यक्रम बिंबविला जातोय. संविधानाच्या पंचाहत्तरीला अनुल्लेखाने मारण्याचं हे षडयंत्र होय. खरंतर कुणाच्याही धार्मिक, सांस्कृतिक उत्सवात आडकाटी आणण्याचा कुणालाच अधिकार नाही. आपापल्या धर्माच्या, उपासनेच्या नियमानुसार कार्यक्रम घ्यायला कुणाचाच विरोध असण्याचं कारण नाही कारण हा अधिकार संविधानाने बहाल केलाय. मात्र धार्मिक उन्मादाच्या आधारे संविधानिक मूल्यांना बगल देत असंविधनिक गोष्टींना वाव देणं हा राष्ट्रद्रोहच असतो. मग तो देशात अस्तित्वात असणारा कोणताही धर्म करोत. संविधानिक मूल्यांची जपणूक आणि सन्मान करणे हे प्रथमतः प्रत्येक नागरिकाचं परम कर्तव्य आहे. परवा ९ जानेवारी व काल १० जानेवारीला लोकसत्ता मध्ये अनुक्रमे भाजपचे केशव उपाध्यय आणि विनय सहस्त्रबुद्धे यांचे लेख प्रसिद्ध झालेत. दोघांच्या लेखात राम मंदिराच्या
अनुषंगाने राष्ट्रीय अस्मितेच्या श्रद्धेवर लिहीलं गेलंय. अर्थात हे सबंध भारतभराच्या मिडीयात व चॅनलवर लिहिलं जातंय, बोललं जातंय. विनय सहस्त्रबुद्धेच्या लेखाचं टायटल, सांस्कृतिक पुर्नजागरणाचे ‘नव’ वर्ष ! असं आहे. हे टायटल म्हणजे भारतीयांच्या डोळयात धूळफेक करण्याचं षडयंत्र आहे. कारण हे वर्ष भारताच्या संविधानाचे पंचाहत्तरावे जागरण वर्ष आहे. विविधतेने नटलेल्या, एकेकाळी राज्य/ संस्थानिकांच्या रूपाने विखंडीत असणाऱ्या व जाती-उपजातींच्या खुराडयात बंदिस्त भारताला एकत्र आणून पंचाहात्तर वर्ष एकत्र ठेवणं हे भारतीय संविधानाचं यश असून जगाने सुद्धा हे गौरविलेलं आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचा कार्यक्रम जनतेत घेऊन जाणं हा राष्ट्रीय कार्यक्रम असायला हवा होता. केंद्रात सत्तेत बसलेल्यांना तरी संविधानिक मूल्यांचं व संकेतांचं भान ठेवायला हवं होतं मात्र ज्यांना भारताचं संविधान मान्य नाही त्यांच्या कडून हि अपेक्षा करणं व्यर्थ.
ज्यांना भारताच्या संविधानावर विश्वास आहे त्यांनी तरी यांच्या जाळयात न, गुरफटता, भारतीयांना जागृत करण्याची चळवळ शक्तीशाली करावी. निदान दोन- तीन महिने तरी आपल्या हातात आहेत. त्याचा योग्य वापर करवा. २६ जानेवारी २०२४ ला प्रजासत्ताकाचा पंचाहत्तरावा महाउत्सव एकत्र येऊन साजरा करावा. भविष्यात संविधानिक जागरणाची चळवळ निरंतर व्यापक आणि शक्तीशाली करण्याची मनोमन प्रतिज्ञा करून, संविधानमय भारताची जबाबदारी प्रत्येकाने आपापल्या खांदयावर घ्यावी. संविधानाच्या पंचाहत्तरी निमित्ताने संविधानमय भारताच्या उद्देशाची जोमाने सुरूवात व्हावी तरच संविधानाला टिकविण्याची आशा शिल्लक राहिल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत