आर्यअष्टांगिक मार्ग भाग ३३

शीलअष्टांगिक मार्गातील सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका हे मार्ग शीलामध्ये येतात.१) सम्यक वाचा अष्टांगिक मार्गातील तिसरा मार्ग सम्यक वाचा हा आहे. सम्यक वाचा पुढील शिकवण देते. १) माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे. २) असत्य बोलू नये. ३) माणसाने दुसर्याविषयी वाईट बोलू नये. ४) माणसाने दुसर्याची निंदानालस्ती करण्यापासून परावृत व्हावे. ५) माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरु नये ६) माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे. ७) माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करु नये. त्यांचे बोलणे समंजसपणाचे व मुद्देसूद असावे असे भगवान बुध्दांनी ‘सुत्त निपात व दीघ निकाय’ यात सांगितले आहे. सम्यक वाचा म्हणजेच सम्यक वाणी. वाणी ही चांगल्या आणि वाईट गोष्टी निर्माण होण्यासाठी कारणीभूत असते. भांडण, तंटा वादावादी हे वाईट वाणीमूळे तर प्रेम, ममता चांगल्या वाणीमूळे ऊत्पन्न होत असते. प्रबोधन, जागृती हे वाणीमूळेच शक्य आहे. म्हणून जीवन जगत असताना वाणी हे महत्त्वाचे घटक आहे. ‘धम्मपदात’ वाणीचे महत्त्व सांगितले आहे. मन हे सर्व धर्माचे पूर्वगामी अग्रणी आहे. मन हे श्रेष्ठमय आहे, मनोमय आहे. जो कोणी दुष्ट मनाने बोलतो किंवा कर्म करतो त्याच्या मागे गाडी ओढणार्या बैलाच्या पायाच्या मागे ज्याप्रमाणे गाडीचे चाके जातात, त्याचप्रमाणे दु:ख जाते. त्याचप्रमाणे जो कोणी प्रसन्न मनाने बोलतो किंवा कर्म करतो, त्याच्यामागे सुख हे कधीही साथ न सोडणार्या छायेप्रमाणे मागे मागे जाते. कोणालाही कठोर बोलू नये, रागावू नये. असे बोलण्याने दुसरेही तुम्हाला तसेच बोलतील. नेहमी सत्य बोलावे. कोणावरही क्रोधीत होऊ नये. वाणी संयत ठेवावी. वाणीचे वाईट आचरण त्यागून वाचेने चांगले आचरण करावे. कोणासोबत उध्दट्पणे बोलू नये. स्वत:ची आत्मस्तुती करु नये. दुसर्यांचा तिरस्कार करु नये. कुणालाही शिव्याश्याप देऊ नये. इतरांना त्रास होणार नाही अशी वाणीने कृती करावी. मनाला आवडणारी, हृदयाला भिडणारे व कानाला मधुर वाटणारी वाणी बोलावे. अशी शिकवण भगवान बुध्दांनी दिली आहे. कठोर वाणीचे, मिथ्या वाणीचे जे वाईट परिणाम आहेत, ते भगवान बुध्दांनी ‘अंगुत्तरनिकायात’ सांगितले, “काही काही व्यक्ती क्रोधी स्वभावाचे, अशांत चित्ताचे, थोडेही बोलले तर रागावणारे, चिडचिडे, कठोर हृदय होऊन विरोधी होतात. क्रोध, द्वेष आणि असंतोष प्रगट करतात. ज्याप्रमाणे जुन्या व्रणावर जर लाकूड किंवा काही लागले तर रक्त वाहू लागते, त्याचप्रमाणे काही व्यक्ती क्रोधी, अशांत चित्ताचे रागावणारे, चिडचिडे व क्रोध, द्वेष आणि असंतोष प्रगट करणारे असतात. अशाप्रकारच्या व्यक्ती उपेक्षा करण्यायोग्य असतात. त्यांचे अनुकरण करु नये. सेवा करु नये. आदर करु नये. कारण अशी व्यक्ती माझा अपमान करु शकते. अपशब्द म्हणू शकते. मला अनर्थ व हानी पोहचवू शकते. म्हणून अशा प्रकारच्या व्यक्तीच्या प्रती उपेक्षा करावी. त्याचे अनुसरुन व आदर करु नये.” भगवान बुध्द भिक्षूंना म्हणाले, “भिक्षूंनो, जर कोणी माझी (बुध्दाची), धम्माची व संघाची निंदा करतील तेव्हा तुम्ही त्यांचेशी वैर, असंतोष आणि आपल्या मनात राग धरु नये. कुपित किंवा खिन्न होऊ नये. त्यामुळे तुमचीच हानी होईल. राग अथवा खिन्न झाल्यामुळे ती गोष्ट सत्य आहे किंवा असत्य आहे ते कळणार नाही. म्हणून सत्य किंवा असत्याला शोधले पाहिजे. तसेच कोणी प्रशंसा करीत असेल तर तेव्हा देखील आनंदीत, प्रसन्न अथवा हर्षोत्साहित होऊ नका. त्यामध्ये सुध्दा तुमचीच हानी आहे.” व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व हे त्याच्या वाणीवरुन, बोलण्यावरुन कळून येते. बोलणारी व्यक्ती आपल्या चांगल्या अथवा वाईट बोलण्याने दुसर्याशी चांगले अथवा वाईट संबंध प्रस्थापित होतात. बुध्दांच्या वचनात व्यर्थ बडबड राहत नव्हती. ते असंयत गोष्टी मानत नव्हते. वचनाने त्यांनी अहित गोष्टी दूर सारल्यात आणि बहुजनांच्याच हिताच्या गोष्टी सांगितल्या. म्हणून ‘सम्यक वाचा’ हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. तो जीवनात उतरविण्याचा प्रत्येकांनी प्रयत्न करायला पाहिजे. क्रमशःआर.के.जुमळेदि.१५.१.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत