“डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन – ३० व्या वर्धापन दिनानिमित्ताने डॉ. एम. ए. वाहुळ सर, सेवानिवृत्त प्राचार्य यांच्या कार्याला सविनय जयभीम

काही आठवणी....
आज १४ जानेवारी या मंगल दिनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार -३० व्या (तिसाव्या) वर्धापन दिना” निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!!????????????
यासाठी डॉ.वाहूळ सरांच्या कार्यास क्रांतिकारी जयभीम…सॅल्युटकरतो. ???????? असेच सामाजिक कार्यासाठी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभण्यासाठी सरांना उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य मिळो…हीच मंगलमय सदिच्छा!!.????????. – नामदेव जाधव, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक पैलूपासून आपणास उर्जा किंवा प्रेरणा मिळत असते. त्यांच्या सहवासातील त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली एखादी वास्तू किंवा भूमी सुध्दा आपणास एक परमोच्च आनंद देवून जाते. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे श्रध्दास्थान आहेत.म्हणून आपण त्यांना जीव की प्राण समजतो. जर एखाद्या माणसास त्यांच्या महाविद्यालयात शिक्षण घेवून तिथेच नोकरी करण्याची संधी मिळाली असेल तर त्यास काय म्हणावे? नक्कीच तो माणूस खूप भाग्यशाली असला पाहिजे. त्याचे जीवन सार्थकी लागले, एवढेच नाही तर त्याच्या जीवनाचे सोने झाले असेच म्हणावे लागेल. हेच भाग्य लाभले आहे, औरंगाबाद जवळील गावांना. एका छोट्याशा खेड्यातील भाग्यशाली व्यक्तीमत्वास. त्यांचे नाव आहे मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एम.ए.वाहूळ सर.
एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाचा माझा परिचय झाला आहे याच सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि त्यांच्या जवळ जाण्याची सुवर्ण संधी मला मिळाली हे मी माझे अहो भाग्य समजतो. आणि विशेष म्हणजे सरांचा परिचय मला प्रथम व्हाटसॲपच्या माध्यमांतून झाला. एके दिवशी मी प्रा.हरी नरके सरांशी संबंधित आर्टिकल व्हाटसॲपवर प्रसारीत केले होते. सरांनी ते वाचून प्रा. हरी नरके सरांबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी आदरणीय आयु. वाहुळ सरांनी औरंगाबादहून मला फोन केला आणि प्रा. हरी नरके सरांचे कार्याबद्दलची सखोल माहिती मला कथन केली. (प्रा. हरी नरके सरांचे वाहुळ सरांशी कौटुंबिक संबंध होते.) या निमित्ताने सरांचा अगदी जवळचा परिचय झाला. त्यांनी मला त्यांचा ‘कर्तव्याचा महामेरूःएम.ए.वाहूळ’ हा त्यांच्या जीवनावरील एकूण ६९ लेखांचा गौरवग्रंथ मला पोस्टाने पाठवला. मी जेव्हा “गौरव ग्रंथ” वाचला; तेव्हा त्यातील प्रत्येक लेख हा मास्टर पीसच होता. सर्व लेख मोठमोठे आय. ए. एस. दर्जाचे अधिकारी यांचेकडून लिहीलेले आहेत. त्याला प्रसिद्ध लेखक श्रीपाल सबनीस यांनी सुंदर प्रस्तावना लिहीली. यातून एक भारदस्तपणाची अधिकची भर पडली.
ग्रंथ जसा वाचत गेलो, तसा आंबेडकरी चळवळीतील योध्दा समोर येत होता. आणि ते खरेच ठरले. त्यातील दै.लोकमतचे वरिष्ठ पत्रकार विजय सरवदे यांच्या लेखातील वाहूळ सर म्हणजे काॅलेज वयातील लढवय्ये. सन १९६२ मध्ये मिलिंद विज्ञान महाविद्यालयात ‘पीयूसी’ ला होते. तेव्हा ते ‘प्रिफेक्ट’ होते. विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी मंडळाच्या अध्यक्षस्थानी ‘प्रिफेक्ट’ संबंधित असत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जागेलगतच ‘अजिंठा’ वसतिगृहाच्या उत्तरेला लागून स्वतंत्र ५ एकर २८ गुंठे जमिन (सर्वे नं.२, जयशिंगपूरा ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खरेदी केली होती. कारण त्यांच्या तब्येतीस औरंगाबादचे वातावरण सुयोग्य होते. त्यामुळे तेथे बंगला असावा असा त्यांचा अंदाज होता. पण बाबासाहेबांच्या निधनानंतर माईसाहेब आंबेडकर यांनी लिलाबाई बाभूळे यांना ती जागा विकली. ज्या वेळेस त्या बाभुळे बाईंनी जागेचा ताबा घेतला आणि कंपाऊंड केले. तेव्हा सदरची जागा विकल्याचा उलगडा झाला. आणि एकच गोंधळ उडाला. तेव्हा वाहूळ सरांच्या नेतृत्वाखाली २०० ते २५० विद्यार्थ्यांची बैठक घेऊन ही बाबासाहेबांची जागा आहे. ही जागा कोणालाही आम्ही विकू देणार नाही. हा आमच्या अस्मितेचा आणि आस्थेचा प्रश्न आहे. हे सांगितले. आणि रातोरात हे कंपाऊंड उखडून टाकून काम फत्ते केले. पुन्हा बाभूळे बाईंनी १४ नोव्हेंबर, १९६३ मध्ये ती जमीन पीईएसला 30 हजार रुपयेला विकली. रजिस्ट्रार व्यवहार कार्यालयात नोंद क्र.१४७९. तिथेच या आंबेडकरी योद्ध्याचा जन्म झाला.
दुसरा महत्त्वाचा लढा त्यांनी लढला. जेष्ठ पत्रकार प्रा.बाबा गाडे आपल्या लेखात लिहतात- “सन १९६९-७० ला वाहूळ एम.एस्सी झाले. विद्यार्थीदशेत एक विद्यार्थी नेता म्हणून मराठवाडा रिपब्लिकन विद्यार्थी संघ या संघटनेच्या अध्यक्षपदी ते होते. त्यावेळी विद्यार्थी चळवळ फार सक्रीय केली होती.”
“सन १९५८ ला मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. ते स्थापन झालेले देशातील ४० वे विद्यापीठ होते.” “सन १९५१ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशी मागणी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या समोर केली होती. म्हणून ‘पळणीटकर’ समितीच्या शिफारशीने हे विद्यापीठ कार्यान्वित करण्यात आले. म्हणून विद्यापीठाच्या स्थापनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्व पूर्ण योगदान होते. हे निश्चित. त्याचे पहिले कुलसचिव म.भि.चिटणीस यांनी समिती समोर डॉ बाबासाहेबांच्या नावाचा आग्रह धरला. पण सोबत इतर काही नावे समोर आल्याने मराठवाडाच हे नाव निश्चित झाले.”
नामांतरांची मागणी का सुचली? यावर वाहूळ सर म्हणतात, दरम्यानच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात ही खंत कायम होती. की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला दिले नाही. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक आंदोलनात या मुद्यावर लक्ष्य केंद्रित केल्या जात होते. हा मुद्दा नेहमीच ओठावर असायचा.हे लक्षात घेवून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या समोर ही बाब ठेवून मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देवून नामांतर करावे ही मागणी त्यांनी मुंबई भेटीत केली. त्यावर मुख्यमंत्री नाईक म्हणाले काही हरकत नाही, पण ही मागणी लोकांतून यायला हवी,असे त्यांनी सुचविले.
औरंगाबादला येताच वाहूळ सरांनी आपल्या सहकऱ्यांना विश्वासात घेवून २६ जून, १९७४ रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून ५ व्या क्रमांकावर मराठवाड्यातील दोन विद्यापीठांपैकी एका विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली. या निवेदनाची तात्काळ. दखल घेत १६ जुलै, १९७४ ला मुख्यमंत्र्यांच्या अवर सचिवांचे पत्र आले,जे वाहूळ सरांच्या संग्रही आहे. या ऐतिहासिक दस्तावेज वरुनच सर विद्यापीठ नामांतर मागणीचे प्रथम पुरुष ठरतात. या निमित्ताने आणखी एक महत्त्वपूर्ण तथ्य समोर येते की, विद्यापीठ नामांतर मागणीची सुरुवात वसंतदादा पाटील यांच्या पासून नव्हे तर त्यांच्याही अगोदर वसंतराव नाईक यांच्या पासून असल्याचे उपलब्ध दस्तऐवजावरुन स्पष्ट होते. वाहूळ सरांच्या मते या मागणीला नाईक अनुकूलही होते. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रति त्यांच्या मनात असलेली आस्था होय. म्हणूनच मिलिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थी आंदोलक नेत्यांशी एक वेगळीच जवळीक तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची होती.
पण १९७४-७५ मध्ये मुख्यमंत्री ना. वसंतराव नाईक यांना पदावरून पाय उतार व्हावे लागले आणि त्यांच्या जागी ना. वसंतदादा पाटील हे विराजमान झाले. त्याचवेळी डॉ. वाहूळ सर शासकीय सेवेत रुजू झाले. पण विद्यापीठ नामांतर मागणीचा हा वणवा पुढे विद्यार्थ्यांनी पेटतच ठेवला. पुढे पुढे याने तीव्र स्वरूप धारण केले. महाड चवदार तळ्याच्या सुवर्ण महोत्सवात वसंतदादा पाटील यांना १ मे, १९७७ ला याविषयावर जाहीरपणे बोलावे लागले. पण त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्याला दलित पँथरने तीव्रपणे विरोध केला. यासाठी मराठवाड्यात पँथरनेते गंगाधर गाडे,ॲड. प्रितमकुमार शेगावकर, अरुण कांबळे, रामदास आठवले यांनी रान पेटवले.
हा नामांतराचा संघर्ष पुढे १९७७ ते १९९४ असा एकूण १७ वर्षे चालला.१९७७ मध्ये म. भि. चिटणीस यांच्या पुढाकाराने नामांतरवादी कृती समिती सक्रीय झाली. याचाच प्रभाव म्हणून विद्यापीठात किशनराव देशमुख यांनी नामांतराचा ठराव मांडला. तो पासही झाला तर दुसरीकडे राज्यभर चाललेल्या आंदोलनाची दखल घेत विधानसभेत हा ठराव २७ जुलै, १९७८ ला पास झाला. या ठरावात रा. सू. गवई यांनी पुढाकार घेतला. त्याला बहुसंख्य आमदारांनी पाठिंबा दिला पण विरोधकानी तो रोकला. याचे पडसाद मराठवाड्यात उमटले. भीषण दंगली झाल्या. तरीही नामांतरवाद्यांनी नामांतराची मागणी सोडली नाही. पुढे १९७९ मध्ये नामांतरासाठी भव्य असा लाँग मार्च काढण्यात आला. यात प्रा.जोगेंद्र कवाडे, बाबा आढाव, ग. प्र. प्रधान, भाई वैद्य, मृणाल गोरे आदींचा पुढाकार होता. १९८०मध्ये दलित पँथरने हा लढा चालूच ठेवला. हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर घेत तत्कालीन मुख्यमंत्री ना. शरद पवार यांनी मराठवाड्यात पुरेशी वातावरण निर्मिती करुन १४ जानेवारी, १९९४ ला सायंकाळी ४:३० वा. मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करुन “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ” या नावाने ओळखले जाईल असे जाहीर केले. आणि हा वाद कायमचा मिटवला.
ह्या एवढ्यामोठ्या लढ्याच्या मागणीचे प्रथम अग्रणी म्हणून डॉ. वाहूळ सर असले तरी त्यांनी याचे वैयक्तीक श्रेय कधीच घेतले नाही. ते म्हणतात, हे श्रेय कोणा एकाचे नाही, तर यात मराठवाडा, राज्य, देश आणि जगभरातील आंबेडकरी जनतेचा तसेच समतावाद्यांचा सहभाग आहे. हे सर्व व्यापी लढ्याचे यश आहे.
या लढ्याच्या पहिल्या मागणी बद्दल १९७८ मध्ये जेष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी ‘प्रबोधनाच्या दिशा’या आपल्या पुस्तकात ‘नामांतराची चळवळ आणिआम्ही’ या प्रकरणात याची नोंद घेऊन डॉ. वाहूळ यांनी नामांतराची प्रथम मागणी केल्याचे नमूद केले आहे. तर १५ जानेवारी, १९९४ला प्रसिद्ध झालेली वृत्तपत्रे यांची कात्रणे, जेष्ठ पत्रकार व संपादक बाबा दळवी यांनी लिहलेला अग्रलेख, ‘युएनआय’ या वृत्त संस्थेसाठी नामांतर दिनी लिहीलेली नागेश गजभिये यांची बातमी डॉ. वाहूळ सर यांच्यावरील प्रसिद्ध लेख, त्यांच्या मुलाखती असा दस्तावेज आहे.
या निमित्ताने डॉ. वाहूळ सरांसारख्या व्यक्तिमत्त्वाच्या निःस्वार्थ सेवेची आणि कार्याची ओळख येणाऱ्या पिढीस करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
या नामांतर लढ्यातील सर्व शहिदांच्या प्रति कृतज्ञता आणि आंदोलनात सहभागी असलेल्या तळागाळातील नामांतरवादी नेत्यांचा कार्यकर्त्यांच्या कार्याचा अभिमान वाटतो.
डॉ. वाहूळ सर प्राचार्य पदावर कार्यरत राहून सेवानिवृत्त झालेले आहेत. पण आजही ते सामाजिक कार्यात जोडलेले आहेत. आजही ८१ वर्षे वयातसुध्दा ते व्याख्याने देतात. सध्या असोसिएशन ऑफ कॉलेज ॲंड युनिव्हर्सिटी सुपर एन्युएटेड टीचर्स, महाराष्ट्रचे संस्थापक, तर ऑल इंडिया फेडरेशन ऑफ रिटायर्ड युनिव्हर्सिटी ॲंड कॉलेज टिचर्स असोसिएशन, हैद्राबादचे अध्यक्ष आहेत. आणि निवृत्त लोकांच्या समस्येसाठी धडाडीने काम करतात. नवीन पीढीसाठी त्यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांना कधीही फोन एखादी समस्या विचारली तर ते तितक्याच तत्परतेने मार्गदर्शन करतात.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत