बौद्धांच्या तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी अशी ही पोस्ट आहे विचार आहे. अवश्य वाचा…
आमच्या आजोबांनी, पणजोबांनी, १९५६ च्या दरम्यान धम्म दिक्षा घेतली. तो काळ मनुवादी विचारांचा पगडा बसलेला. लोकांमध्ये खूप अज्ञान, देवावर आंधळी श्रद्धा असलेला, काही चुकीचे घडले तर देव कोपेल, संसाराची राख रांगोळी होईल ही भीती प्रत्येकाच्या मनात खोल जाऊन रुतलेली. शेतीसाठी, बियाण्यांसाठी दुसऱ्यावर अवलंबून, मंजुरीसाठी भटांवर अवलंबून. निसर्गाच्या प्रकोपात कधी कधी खंडाने करत असलेली शेती उध्वस्त व्हायची.
जवळजवळ प्रत्येकाचे जगणेच दुसऱ्यावर अवलंबून. पण एवढे असूनही त्या भोळ्या जनतेने बाबासाहेबांना आदर्श मानून बौद्ध धम्माची दिक्षा घेतली तीही बावीस प्रतिज्ञा बोलुन. म्हणजेच जुन्या चालीरीती, परंपरा, देव यज्ञ या खुळचट कल्पनेला आपल्या वाडीतून हद्दपार करण्याचे धाडस केले.
त्यानंतर गावामध्ये खूप हलचल झाली. हिंदू धर्मातील एक हिस्सा बाहेर निघाला, पाचाचा मानकरी, वतनदार, दुसऱ्या धर्मात गेला म्हणुन आक्रोश चालु झाला. ज्यांना आमचे परिवर्तन मान्य नव्हते त्यांनी आपल्या लोकांवर आरोप चालु केले. गावमेळे झाले, सामाजिक बंधने लादली गेली, चाकऱ्या गेल्या, गडीपन गेले आणि कसायला दिलेल्या जमिनिपण काढून घेण्यात आल्या. कल्पना करा आधीच सगळ्यांकडे आठराविश्व दारिद्र्य. निसर्गाची साथ नसायचीच त्यात कामेही बंद. मग त्या लोकांनी म्हणजेच आपल्या वाडवडिलांनी काय विचार करायला पाहिजे होता?
पण.. आपले लोक अज्ञानी असले तरी त्यांच्या मागे एक महामानव उभा होता त्याला अनुसरून लोकांनी देवाला शिक्षणात शोधायला सुरवात केली. देवाला नोकरीत शोधायला सुरवात केले. सम्यक आचरण करून लोकांनी स्वतःचे भविष्य वैचारिक क्रांतीत शोधायला सुरवात केले आणि दगडांच्या, कल्पनेच्या देवाला, चमत्कारिक देवाला आपल्या जीवनातून तडीपार केले. काय धीराची माणसे असतील ती? त्या धैर्याबरोबर त्यांना बाबासाहेबांच्या विचारांची जी समज आली होती, ती आकलनशक्तीच अद्भुत आणि आपल्यापेक्षा प्रगल्भ होती. देव नदीत बुडवले, गणपती आणायचे बंद केले, दिवाळी बंद, होळी बंद म्हणजे आपल्या पूर्वजांच्या वाटोळेच झाले पाहिजे होते ना? पण या लोकांवर देव कोपण्यापेक्षा त्यांचा विकास झाला. शिक्षण घेतले, नोकऱ्या मिळाल्या, मुले झाली, समाजात वेगळे स्थान मिळाले, प्रतिष्ठा मिळाली, विचारमंच मिळाला.
तेच जर महार म्हणून रहातात तर फक्त गावकी आणि महारकी करत बसले असते, येणाऱ्या महारकीत हिस्से करत बसले असते. मोलमजुरीसाठी गावावर अवलंबून राहिले असते. पण त्या अशिक्षित लोकांनी एक कठोर पाऊल उचलले, आणि सिस्टीम बदलून टाकली.
पण सध्याचे सुशिक्षित तरुण पुन्हा त्या मार्गाला चालले आहेत जिथे आपल्या पूर्वजांनी लाथ मारली होती. का करतात हे तरुण असे? देव कोपेल म्हणून घाबरतात का? की एक फॅशन म्हणून करतात? की ज्या समाजात आपली कवडीचीही किंमत नव्हती त्यांना खुश करण्यासाठी बाबासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा करतात? की धम्माची तत्वे नीट समजली नाही म्हणून असे करतात ? हा एक चिंतनशील विषय आहे.
एक मात्र नक्की आहे आताची पिढी जर देवांना घाबरत असेल तर ती मूर्ख असेल. ज्याचे अस्तित्वच नाही त्या कल्पित देवाच्या सणानिमित्त उदोउदो करून पुन्हा त्या पूर्वजांच्या पुरोगामी विचारांचा आव्हान देत असेल तर त्यांचे शिक्षण निव्वळ नोकरी शोधण्यासाठीच आणि चैन विलास यात रममाण होण्यासाठीच असणार. आजची पिढी तर्क, चिकित्सा करण्यात कमी पडत आहेत. इतिहास विसरत आहे. स्वतः का? कशाला हे प्रश्न उपस्थित करू शकत नाही आहे. आणि जो तर्काच्या कसोटीत विचार करू शकत नाही तो कदापि बौद्ध असू शकत नाही.
[ जो तरुण वर्ग चिकित्सक पध्दतीने विचार करीत आहे. बौद्ध धम्मानुसार आचरण करीत आहे…त्यांना वगळून ही पोस्ट … ]
!जयभीम! !!जयभारत!! !!!नमोबुद्धाय!!!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत