ज्ञानज्योतीने अंधारयुगाला प्रकाशमान केलेः डॉ. समता माने एक ज्योत ज्ञानज्योतीसाठी अभिनव सोहळा


सातारा दि. ( प्रतिनिधी ) अंधारयुगात चाचपडणाऱ्या समाजाला बाहेर काढून केवळ स्त्रियांचे नव्हेतर बहुजनांचे आयुष्य सजवले, फुलवले आणि प्रकाशमान केले त्या सावित्रीबाई फुलेंची जयंती दीपोत्सवाने साजरी झाली पाहीजे. त्यासाठी प्रत्येक घरातील स्त्रीने सावित्रीबाई फुले या ज्ञानज्योतीसाठी एक ज्योत प्रज्वलित करायला हवी, असे विचार प्रा. डॉ. समता माने – बोराटे यांनी व्यक्त केले.
साहित्यिक अरुण जावळे यांया संकल्पनेतून साकारलेल्या ‘एक ज्योत ज्ञानज्योतीसाठी’ या अभिनव उपक्रमातर्गंत सावित्रीबाई फुले जयंती सोहळ्यात प्रा. डॉ. समता माने – बोराटे प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी बी. एल. माने यांनी भूषविले. यावेळी हरिदास जाधव, अमर गायकवाड, विलासराव कांबळे, योगेश म्हस्के, किरण कांबळे, ऋषी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. समता माने – बोराटे पुढे म्हणाल्या सध्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय पर्यावरण बिघडले आहे. जात आणि धर्माच्या नावाने माणसामाणसात, समाजासमाजात दुरावा आणि कटुता निर्माण कशी होईल अशा पध्दतीने वातावरण टोकदार बनू पहातंय. अशा पार्श्वपरिस्थितीत स्त्रियांनी समाज घडविण्यासाठी पुढे आले पाहिजे. सावित्रीबाई फुले यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करून समाजक्रांतीचे चक्र गतिमान केले. जर सावित्रीबाई जन्मल्याच नसत्या तर आजची स्त्री घडली नसती. म्हणून प्रत्येक स्त्रीने सावित्रीबाईंचे स्मरण म्हणून कृतज्ञतापूर्वक एक ज्योत प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करायला हवा.
बी. एल. माने यांनी अध्यक्षीय भाषणात यांनी सावित्रीबाई फुले आजच्या तरूण पिढीने समजून घेतल्या पाहिजेतअसे सांगत सावित्रीबाईचा संघर्ष कथन केला. साहित्यिक अरुण जावळे यांनी प्रास्तविक भाषणात ‘एक ज्योत ज्ञानज्योतीसाठी’ या अभिनव संकल्पने पाठीमागची भूमिका विषद केली. धम्मशिल चॕरिटेबल ट्रस्तचे विलासराव कांबळे, परिवर्तन मित्र समूहचे विश्वस्त हरिदास जाधव, क्रांति थिएटर्सचे अमर गायकवाड, ऋषी गायकवाड, समता सैनिक दलाचे तुकाराम गायकवाड आदी मान्यवरांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त्य केल्या. सुप्रसिद्ध शाहीर श्रीरंग रणदिवे यांनी गीतगायनाने सोहळ्यास रंगत आणली. योगेश म्हस्के यांनी त्रिसरण पंचशील दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज सेंटरचे मिलिंद कांबळे यांनी धम्मपालन गाथा घेतली. बुध्दिस्ट इंटरनॅशनल स्कूलचे संचालक किरण कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. आभार त्रिरत्न समूहचे राहूल देवकांत यांनी मानले. प्रारंभी डॉ. समता माने यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यादरम्यान महापुरुषांच्या जोरदार जयघोष केला गेला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत