महार सेनापती सिद्नाक महार आणि भीमा कोरेगावची लढाई… एक मानव मुक्तीचा लढा…

महेंद्र शांताराम चाफे (मुंबई)
(व्याख्याते विचारवंत अभ्यासक)
फोन:९०२९२७५२५४
विशेष आभार: सरकार मिलिंद इनामदार (सिद्नाक महाराजांचे थेट १२ वे वंशज)
सरकार मिलिंद इनामदार:९८६०७२३७७७
इतिहासाच्या पाऊल खुणा
वाचा आणि पुढे पाठवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागवंशी पूर्वजांच्या इतिहासाची आठवण करून देताना “बहिष्कृत भारत” वृत्तपत्रात लिहितात… आमच्या बाप जाद्याने शिपाईगिरीच केली. तलवार भाला दानपट्टा तिरकमान या खेरीज कशाला हात लावला नाही. हे कोणास सांगावयास नको. आता जरी लेखणी हातात धरली आहे. तरी आपल्या आयुष्यात तलवार व बंदूक केव्हा हाती धरल्या नाहीत असे नाही.
महार हे पट्टीचे लढवय्ये शूर पराक्रमी व सत्तशी इमान राखणारे होते.
भीमा कोरेगावची लढाई जगाच्या पाठीवर न भूतो न भविष्य अशी इतिहासाच्या पानावर नोंद झाली आहे. आधुनिक काळात भीमा कोरेगावची लढाई ही महारांच्या मर्दुकीची सनद ठरली, नागवंशी शूर महारांचा शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास डॉ. बाबासाहेबानी उजेडात आणला. इतिहासाच्या पानात महारांचा इतिहास हरवला होता बाबासाहेबांनी शोध घेऊन आम्ही कोण आहोत याची जाणीव करून देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “बहिष्कृत भारत” मधील एका अग्रलेखात लिहतात… आजचे अस्पृश्य लोक कोंबड्या बकऱ्याप्रमाणे बळी देण्यासारखे मेष राशीचे आहेत असे मला बिलकुल वाटत नाही त्यांच्या पूर्वजांची तर सिंह राशी होती याची साक्ष इतिहास देत आहे ते पुढे लिहितात पेशवाईला अखेरची मूठमाती देताना ज्यांचे पूर्वज धीरतार्थी पडले व ज्यांची नावे भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ वर कोरून ठेवण्यात आली आहेत त्या वीरांची रास सिंह या राशी शिवाय दुसरी कोणती असू शकणार नाही.
इ. स.पूर्व १३ व्या शतकात राजा बहमनीच्या राज्यात सिद्नाक महार सेनापती होते. हे इतिहासाला आणि इतिहास कारांना विसरता येणार नाही. इतिहासाची पाने चालत असताना सिद्नाक महार सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील मौजे वेलंग येथील वतनदार होते. त्यांचे घराणे मूळ नाईक महारांचे घराणे होते. बहमनी राज्याच्या विघटनानंतर पाच शाह्या अस्तिवात आल्या अहमदनगरची निजामशाही, विजापूरचे आदिलशाही, वऱ्हाडीची इमादशाही, गोवळकोंद्याची कुतूबशाही, बिदरची बिरीदशाही इ.स.१५ व्या शतकाच्या अखेरीस अस्तिवात आल्या.इ.स.१६ व्या शतकात दुसऱ्या सिद्नाक महारानी अहमदनगरच्या निजामशाहीकडून मौजे वेळंग येथील महार वतनाच्या इनामी जमिनीच्या सनदा आणल्या. सरदार सिद्नाक महारचे सहकारी लखुजी जाधव, अंताजी खंडागळे, सुखाची गायकवाड मालोजीराजे भोसले, जजनपाल निंबाळकर हे सर्व मराठी सरदार लढाऊ पराक्रमी लढावू यौद्धे सरदार,सिदनाक महराचे सहकारी होते. मालोजीराजांचे पुत्र राजे शहाजीराजे आणि राणी जिजाऊचे लग्न लावून देण्याकरीता मध्यस्थी सरदार सिद्नाक महारानी केली यावरून निजामशाहीमध्ये सरदार सिद्नाक महार यांचा दरारा आणि इतर सरदारवर असलेल्या प्रभाव दिसून येतो.
सिद्नाक महाराचा नातू तिसरा सिद्नाक महार उर्फ सिद्नाक बाजी याने छत्रपती शिवाजी महाराजांना वाई प्रांतात जावळीच्या चंद्रराव मोरे स्वतःला राजा म्हणून घेत होता छत्रपती शिवाजी महाराजांना राजा मानायला तयार नव्हता, चंद्रराव मोरेचा पढाव करण्यासाठी इ.स. सन १६५६ मध्ये महाराजांनी चंद्रराव मोरे यांच्या जावलीवर स्वारी केली तेव्हा सेनापती सिदनाक बाजीने लष्करी मदती बरोबर घनदाट जंगलातून मार्ग दाखवण्याचे काम तसेच चंद्रराव मोरे बरोबर झालेल्या युद्धात शिदनाक बाजीने लढाईत शौर्य पराक्रमाने चंद्रारावाचा पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराजांची शाबासकी मिळविली विश्वास संपादन केला. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर विजापूरचा आदिलशहाचा सरदार अफजल खान स्वराज्यावर चालून आला तेव्हा महाराजांनी सरदार सिदनाक बाजीवर महत्त्वाची जबाबदारी सोपविली राजांनी बाजींना सांगितले सरदार अफजल खान कपट कारस्थानी फार दृष्ट आणि भेदी आहे. अफजलखान भेटी दरम्यान दगा फटका झाला तरी प्रतापगडाच्या पायथ्याशी तुम्ही तुमच्या सैन्यांला घेऊन थांबावे आणि गडावरून इशारा मिळताच मोघलांच्या सैन्यावर तुटून पडायचे. अफजलखानाने बरोबर आणलेल्या व्यापाऱ्यांची लूट करून स्वराज्याचा खजिना भरायचा ही जबाबदारी खऱ्या अर्थाने सरदार सिद्नाक बाजीने आपल्या शूर सैन्यांबरोबर पार पाडली.आणि महाराजांनी अफजलखानाचा वध करून स्वराज्यावरचे संकट परतावून लावले. बाजीचे स्वराज्याकरिता फार मोठे योगदान आहे. प्रतापगडाच्या भेटीदरम्यान पुन्हा एकदा महाराच्या प्रामाणिकपणाची साक्ष पटते. जीवा महार अफजलखानाच्या भेटीदरम्यान महाराजांबरोबर होता. सेयद बंडा अफजलखानाचा अंगरक्षक होता. महाराजांचा अंगरक्षक जिवा महार होता. महाराजांवरती सय्यद बंडाने वार केला त्यांचा हात हवेत कापणारा जिवा महार होता.( म्हणून महाराष्ट्रामध्ये म्हण प्रसिद्ध आहे. “होता जिवा म्हणून वाचला शिवा”)अफजलखान आपला कोतळा सावरत धावत असताना त्याचे मुंडके छाटणारा देखील जिवा महारच होता. परंतु त्या ठिकाणी स्वराज्याचा दुश्मन अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या स्वराज्य भक्षकाने महाराजांवरती तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराजांनी चपलतेने त्यांनी या स्वराज्य बुडव्याला ठार केले.यावरून जिवा महार सिद्नाक महार यांचे स्वराज्य प्रति प्रामाणिकपणाची साक्ष पटते. आणि कृष्णाजी कुलकर्णीचा स्वराज्य प्रति महाराजांप्रती असलेला तिरस्कार लक्षात येतो. पुढे तिसरा सिद्नाकाला कृष्णनाक हा पराक्रमी मुलगा होता. वाई प्रांतात कळक येथे मराठा मोगल लढाईत स्वराज्याच्या कामी आला. याचे वशज कांबळे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात मौज वेलंग येथे वास्तव्याला आहेत.
पानिपत ते भीमा कोरेगाव सिद्नाक महाराजांचा इतिहास
सांगली येथील कळंबी गाव सिद्नाक महाराच्या शौर्याच्या आणि पराक्रमाची येशोगाथेची साक्ष देते आपल्याला कळंबी ठिकाणी आज देखील त्यांच्या स्मारकाच्या स्वरुपात पहावयास मिळते.पानिपतचे युद्ध म्हटलं तर आपल्याला पेशव्यांची बैल बुद्धीची आठवण होते. पहिले बाजीराव पेशवे दुसरे बाजीराव पेशवे शूर होते तेसेचं मनुस्मृतीचे पुजारी होते यात शंका नाही.परंतु पानिपतच्या युद्धामध्ये विश्वासराव आणि सदाशिवराव यांच्या नेतृत्वात अफघानी आक्रमक अहमदशाह अब्दाली १७६१ साली मध्ये युद्ध झाले. आणि या युद्धामध्ये महारांचे सेनापती सरदार पहिले सिदनाक पानिपतच्या युद्धामध्ये मारले गेले. पेशव्यांच्या ढसाल युद्ध नीतीचा परिणाम महार योद्धांना सोसावा लागला. पहिले सिद्नाक महान महार या योद्धाला पानिपतच्या युद्धामध्ये प्राण गमवावे लागले. पहिल्या सिद्नाक महाराजांचे महारांचे नातू महापराक्रमी दुसरे सेनापती सिद्नाक महार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती दुसरे शाहू महाराज यांना औरंगजेब मृत्यूनंतर कैदेतून मुक्त केले. छत्रपती दुसरे शाहू महाराज महाराष्ट्रात दाखल झाले. स्वराज्य रक्षक ताराराणी आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यामध्ये राजगादीवरून १७०७ वाद निर्माण झाला परिणाम युद्धात झाला मराठी सरदार, ,ताराराणी आणि शाहू महाराजांच्या बाजूने एकवटले परंतु निर्णायक भूमिका ही महापराक्रमी सेनापती सिद्नाक महार यांची होती सिदनाक छत्रपती शाहू महाराजांच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला आणि शाहू महाराजांची ताकद वाढली. लढाईमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा विजय झाला. दोन्ही बाजूने समजोता झाला. साताऱ्याची गादी शाहू महाराजांना मिळाली. कोल्हापूरची गादी ताराराणी यांनी आपल्याकडे कायम ठेवली.
युद्धात सेनापती सिद्नाक महार यांची प्रमुख भूमिका होती छत्रपती दुसरे शाहू महाराजांनी सेनापती सिद्नाक महाराना खुश होऊन सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कळंबी गाव १७३९ साली इनाम दिले त्याचबरोबर कळंबी गावातील ९०० एकर जमीन इनाम दीली. शाहू महाराजांनी सरदारकीची वस्त्र अलंकार दीले. सिद्नाक महाराच्या मस्तकी शिरपेच चढविला. बहुमानाचे प्रतीक म्हणून मानचिन्ह आणि पालखीचा मान दिला. सिद्नाकाचा एवढा मोठा बहुमान छत्रपती शाहू महाराजांनी केला. तेव्हापासून दुसरे सिद्नाक महार (वाघमारे) हे सरकार इनामदार म्हणून सांगलीत तसेच महाराष्ट्रात ओळखले जाऊ लागले.
महापराक्रमी सेनापती सिद्नाक महार शूर पराक्रमी होते त्याचप्रमाणे त्यांचे नातू तिसरे सिद्नाक महार हे देखील महापराक्रमी योद्धा होते. तिसरे सिद्नाक महार हे महारसैन्याचे सेनापती होते आक्रमक स्वभाव तलवारबाजी मध्ये पटाईत सिद्नाक महाराच्या नावाने मोगलांच्या सैन्याला धडकी भरायची. याचा प्रत्येय आपल्याला १७९५ मध्ये निजाम आणि पेशवे यांच्यात झालेल्या खर्डाच्या लढाईत येतो. खर्ड्याच्या लढाईत श्रीमंत सवाई दुसरे माधवराव पेशव्यांचे सेनापती भाऊसाहेब पटवर्धन यांच्या नेतृत्वात युद्धाची तयारी झाली. पेशवाई काळात प्रत्येक जातीच्या सैन्यांची तळ वेगवेगले असायचे पानिपतच्या युद्धामध्ये अहमद अब्दालीने जाती जातीमध्ये असणारा जातिभेद हेरून पानिपतचे युद्ध जिंकले होते. सिद्नाक महाराचा तंबू हा मध्यभागी होता. काही ब्राह्मण उच्चवर्णीय यांनी सेनापती पटवर्धन यांच्याकडे यांच्याजवळ तक्रार केली तक्रार केली. पेशव्याने ब्राह्मण आणि मराठे सरदारांना सांगितले ही काही जेवणाची पगत नाही ही आहे शुराची संगत पंगत “ज्याची तलवार खंबीर तो हंबीर” समजले जाईल. युद्ध समोर होते. परंतु ही बातमी सिदनाक महाराना समजली सेनापती सिद्नाक म्हणाले महाराची तलवार चालते महार लढाईमध्ये सर्वात पुढे असतो. परंतु आमचा तळ आमचा गोट यांना चालत नाही. सरदार पाटणकर, सेनापती भाऊसाहेब पटवर्धन यांनी समजूत काढली. निजाम विरुद्ध पेशवा घनघोर युद्ध झाले या युद्धामध्ये निजामाचे सैन्य अफाट होते. घनघोर लढाई झाली सेनापती सिद्नाक महाराचे महार सैन्य निजामाच्या सैन्यावर तुटून पडले. परंतु एक निरोप सिद्नाका पर्यंत पोहोचला. सेनापती भाऊसाहेब पटवर्धनांना निजामाच्या सैन्यातील पठाणांनी वेडा दिला घेरले आहे. कोणत्याही क्षणी त्यांचा शीरछेद करण्यात येईल हे ऐकताच सिद्नाक महारानी आपला घोडा आपल्या सैन्यासह हर हर महादेव अशा आरोळ्या ठोकत पटवर्धनांच्या दिशेने पठानाचा वेडा तोडत पठानाना कापत पुढे निघाले पठानानी पटवर्धनांना घोड्यावरून खेचण्याच्या तयारीत असताना सिद्नाक महारानी पठाण सैनिकांना सपासप कापून काढून सेनापती भाऊसाहेब पटवर्धन यांना सही सलामत सुरक्षित ठिकाणी आणले आणि पुन्हा एकदा निजामाच्या सैन्यावर तुटून पडले निजामाच्या सैन्याला सळो की पळो करून सोडले. सिद्नाकाच्या जबरदस्त उठावामुळे चढाई मुळे नीजामांचा पराभव झाला. अशा पद्धतीने सेनापती पटवर्धनांना जीवदान दिले पेशव्यांची इज्जत वाचवली. खर्डाची लढाई जिंकली याच सर्व श्रेय सेनापती सिद्नाक महाराना जाते.
सवाई श्रीमंत दुसरे माधवराव पेशव्यांनी दरबार भरविला दरबारात सिद्नाक महाराना आपाल्या हातातील सोन्याचे कडे देऊन बहुमान करण्यात आला.
तसेच सेनापती भाऊसाहेब पटवर्धन यांनी कलंबी या ठिकाणी दरबार भरविला सिद्नाक महारांनी केलेले शौर्य कथन केले. सेनापती सिद्नाकाचा सन्मान केला.
श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी पुन्हा ब्रिटिशांच्या विरोधात लढाई करण्याचा ठराव आपल्या सर्व सरदार आणि मंत्रिमंडळ यांच्यासमोर ठेवला सेनापती बापू गोखले यांनी युद्धाचा प्रस्ताव सर्व सरदारां समोर ठेवला. महारांच्या सेनापती सिद्नाक महार दरबारात उभे राहिले सवाई माधवराव पेशवे यांना मुजरा करून अर्ज केले. श्रीमंत आम्ही आपल्या बाजूने सदैव लढत राहिलो आणि तुम्ही दिलेली प्रत्येक जबाबदारी आम्ही पार पाडली. पुढे देखील आम्ही आपल्या आज्ञेचे पालन करू परंतु एक विनंती अर्ज आहे आपण महार जातीच्या गळ्यातील मडके आणि पाठीमागची झाडू ही प्रथा बंद करावी ही विनंती अर्ज करत आहे. आपण आमच्या विनंतीला मान द्यावा. सवाई माधवराव पेशवे गरजले मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे आम्ही महार जातीच्या गळ्यामध्ये मडके आणि पाठीमागे झाडू बांधलेली आहे. तुम्हा महारांना सुईच्या टोकावर मावेल एवढी देखील सवळत मिळणार नाही. श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांनी भर दरबारामध्ये महार सेनापती यांचा अपमान केला. त्यांच्या स्वाभिमालाला ठेस पोचवली सिद्नाक महार दरबारातून तडक उठले आणि आपल्या महार सैनिकांना म्हणाले आता सहन होत नाही जिथे मान सन्मान नाही शौर्याची किंमत नाही महार सैनिकांनी लढाईत पेशव्यांकरिता रक्त सांडायचे परंतु त्या रक्ताची किंमत पेशव्यांना नाही. आता सहन होत नाही जोपर्यंत मी माझ्या महार जातीच्या गळ्यातील मडके आणि पाठीची झाडू काढून त्यांना त्यांचा स्वाभिमान परत मिळवून देणार नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही पेशव्यांपेक्षा इंग्रज बरे आतापर्यंत आपण स्वकियांसाठी लढलो माझ्या शूर सैनिकानी मरण पत्करले युद्ध जिंकली परंतु पेशव्याने आम्हाला गुलामी दिली दारिद्र्य दिले आता लढाई स्वाभिमानाची अन्यायाविरुद्ध न्यायाची चला उठा माझ्या तलवारबाज शूर सैनिकांनो आणि आता पेशवाईला मातीत गाढायचे तरच महाराना स्वाभिमानाचे जगणे प्राप्त होईल. असे बोलून आपल्या सैन्यासह सिद्नाक महार कळंबीला निघून गेले. सिद्नाक महार संधीची वाट पाहू लागले.
सेनापती बापू गोखले यांच्या नेतृत्वात ५ नोव्हेंबर१८१७ रोजी खडकीची लढाई झाली. सिद्नाक महारानी लढाईत भाग घेतला नाही. परिणाम पेशव्यांचा पराभव झाला ब्रिटिशांनी लढाई जिंकली. सेनापती बापू गोखले यांच्या नेतृत्वात १७ नोव्हेंबर १८१७ रोजी येरवड्याची लढाई ब्रिटिश आणि पेशवे यांच्यात झाली. सेनापती बापू गोखले यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या लढाईनंतर श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांना आपला जीव वाचवण्यासाठी आपल्या सैन्यासह पळून जावे लागले. यावरून महाराचे शौर्य आणि लढाऊपणा सिद्ध होतो जिकडे महार तिकडे विजय हे निश्चित होते.
सिद्नाकाच्या मनामध्ये पेशव्यांच्या अन्यायाच्या विरोधात सुडाची भावना जागृत झाली.महार सेनापती सिद्नाक लढाऊ सैनिकांबरोबर चावडीवर विचार करत असताना सिद्नाकाचा गुप्तहेर तेथे पोहोचला. मुजरा करून गुप्त बातमी सांगण्यास सुरुवात केली . कॅप्टन फ्रान्सिस स्टेटान आपल्या बॉम्बे नेटीव्ह इन्फंट्री सेकंद बटालियन रेजिमेंट (महार रेजिमेंट) बटालियन मध्ये बहुसंख्य महार होते. ही बातमी मिळताच आपल्या महार सैनिकांना सिद्नाक महार म्हणाले चला उठा माझ्या शूरवीर सैनिकांनो सर्व महार सैनिक एकवटले सिद्नाक महार आपल्या आवडत्या घोड्यावर बसून पुढे निघाले पाठून घोडदळ पायदल हर हर महादेव घोषणा देत निघाले ते थेट भीमा कोरेगावत पोहचले. सिद्नाक महार आले आहेत ही बातमी महार बटालियनमध्ये पसरली आणि नवचैतन्य महार सैनिकांमध्ये निर्माण झाले. रणझुंझार सेनापती सिद्नाक महाराच्या नावाने घोषणा महार रेजिमेंटचे सैनिक देत होते. सिद्नाक महार कॅप्टन स्टेटोन यांना भेटले. दोघांमध्ये सल्लामसलत झाली. महार सेनापती म्हणाले आम्ही पेशव्यांच्या विरोधात लढायला तयार आहोत पण आमच्या अटी आहेत. आता पर्यंत इमानाने पेशव्यांकरिता लढलो आमचे रक्त सांडवले परतू माझ्या महार जातीला जगण्याचे हक्क अधिकार नाहीत.आम्ही तुमच्या बाजूने लढण्याचा प्रस्ताव आपल्यासमोर मांडत आहोत परंतु तुम्ही महार जातीच्या गळ्यातील मडके आणि पाठी बाधलेली झाडू तुम्हाला कायमची दूर करावी लागेल. आमचे अधिकार आम्हाला मिळवून द्यावे लागतील. क्षणाचाही विलंब न करता कॅप्टन फ्रान्सिस स्टेटोन यांनी प्रताव मान्य करून सिद्नाक महाराजांचे स्वागत केले. कॅप्टन आणि सिद्नाक यांनी युद्धाची रणनीती ठरविण्यास सुरुवात केली. सेनापतीने कॅप्टनला सांगितले आपल्याला गनिमी काव्याने लढायचे आहे. माझे निवडक महार हुल देणारे घोडदळ सैनिक पेशव्यांच्या सैन्यावर चालून जाणार पेशव्यांचे सैन्य पाठलाग करत गावाची कुस ओलांडून आतमध्ये जवळ आले की ते पळून जाणार गावात घराच्या आडोशाला लपून असलेले माझे घोडदळ सैनिक त्यांच्यावरती हमला करणार अशा अनेक प्रकारच्या युद्धनीती ठरल्या सेनापतींनी आपल्या पाचशे शूर महार सैनिकांना तसेच महार रेजिमेंट मधील सैनिकांना उद्देशून म्हणाले “भीमा कोरेगावची लढाई ही जगाच्या पाठीवर न भूतो आणि भविष्य अशी लढाई ठरणार आहे”.आपल्याला लढाई जिंकायची आहे आणि आपण ही लढाई जिंकण्यासाठीच लढत आहोत. “भीमा कोरेगावची लढाई ही महाराच्या मृदूमकीची सनद ठरणार आहे” “अन्याय विरुद्ध न्यायाची मोहर ठेवणारी ही लढाई आहे “मनुस्मृतीच्या कायद्याच्या विरोधातील सशस्त्र उठाव आहे.” “पेशव्यांच्या अन्यायाच्या विरुद्ध महारांचा हा वेदनांचा उद्रेक आहे”. पेशवे आणि ब्रिटिशांसाठी ही जरी हार आणि जीत यांची लढाई असली तरी तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आपण जर युद्धात जिंकलो तर भविष्यात महार जात आपल्याला कदापि विसरणार नाही. अत्याचारी दूराचारी पेशव्यांचा बिमोड करण्याचा हा आजचा दिवस आहे. महारांचा पिशव्यांनी केलेल्या आपमानाचा बदला घेण्याची वेळ आहे. माझ्या महार सैनिकांनो आज आपली तहान आणि भूक आजच्या युद्धामध्ये विजयश्री खेचून आणून भागवायचीआहे. मनुस्मृतींच्या पुजाऱ्यांचा देव्हारा उद्ध्वस्त करायचा आहे. आपल्याला लढायचं आहे आपले अधिकार प्राप्त करून घेण्याकरिता, पेशव्यांचे सैन्य आपल्यापेक्षा ४० पटीने जास्त असले तरी आपली लढाई ही स्वाभिमानाची आहे अधिकाराची आहे. मान सन्मानाची आहे. आज जर आपण युद्धभूमीवर हरलो तरी पेशवे आपल्याला जिवंत सोडणार नाही. आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे. आपल्यासमोर दोनच पर्याय आहेत मारणे किंवा मरणे आपल्याला जिंकायचे आहे. हे महार सैनिकांनी ऐकले महार सैनिकांच्या अंगामध्ये नवचैतन्य निर्माण झाले. ५०० महार सैनिक पेशवांच्या २८००० सैन्यासमोर उभे ठाकले. ५०० पायदळ २५० घोडेस्वार जवान, दोन तोफा २४ युरोपियन गनर्स आणि मदतीला रणझुंजार महार सेनापती सिद्नाक महार आणि त्यांचे ५०० लढाऊ महार सैनिक होते.आजचे युद्ध पेशव्यांचे सेनापती गोखले विरुद्ध रणझुंजार सेनापती सिद्नाक असे होते. दिवस होतो १ जानेवारी १८१८ सकाळचे ९.०० वाजले होते.कॅप्टन स्टेटोन आपल्या सैन्याला युद्धाची सूचना केली. भीमा कोरेगावच्या गावात युद्धाची धुमचक्री चालू झाली. हर हर महादेव घोषणा देत महार सैनिक पेशव्यांच्या सैन्यावर तुटून पडले. युद्ध जुंपले तलवारीला तलवारी भिडल्या रणवाद्य वाजू लागली.महार सैनिक बेभान होऊन लढत होते. महार सैनिकाच्या मनातील राग त्यांच्या संतप्त भावना ते तलवारीतून व्यक्त होत होत्या. महार सैनिक आपल्या बंदुकीतून गोळ्यांच्या फेऱ्या झाडत होत्या. लेफ्टनंट चीस्लोमा तोफा डागत होता. पेशव्यांचे सैन्य भाजून निघत होते देहाच्या चिंधड्या होत होत्या. महार सेनापती त्यांचे सैन्य पेशव्यांच्या सैन्याला कापत कापत पुढे जात होते. बाजूलाच असलेली भीमा नदीचे पाणी रक्ताने लाल झाले होते. घनघोर युद्ध चालू होते. एक महार योद्धा पेशव्यांच्या ५६ सैन्यांला भारी पडत होते. तोफेच्या माऱ्यानी सैन्यांमध्ये भगदड माजली होती. दहशतीचे आणि भीतीचे वातावरण पेशव्यांच्या सैन्यामध्ये होते. सेनापती सिद्नाक आपल्या अठरा किलो वजनाच्या तलवारीने पेशव्यांच्या सैन्यांवर प्रहार करीत होते सिद्नाक महाराचे अक्राळ विक्राळ रूप पाहून पेशव्यांचे सैन्य सैरा वैरा पळत सुटत होते एवढी मोठी दहशत सिद्नाक महाराची पेशव्यांच्या सैन्यांत होती. तलवारीच्या आघाताने मुंडकी छाटली जात होती शरीर कापली जात होती. काही सैनिक जबर जखमी झाले पेशव्यांचे घोडे घाबरून स्वरांना खाली पाडून सैरा वैरा धावत होते खाली पडलेल्या सैनिकांना घोडे आपल्या टाचाखाली तुडवत सुटले. रणवाद्य जोराने वाजू लागली. सिद्नाकाचे महार सैनिक आवेषाने पेशव्यांच्या सैन्यावर चढाई करत होते. पेशव्यांचे सैनिक भीमा नदी उतरून पळत सुटले महार सैनिकानी चारही बाजूंनी पेशव्यांच्या सैन्याला गराडा घातला महाराच्या तलवारीतून पेशव्यांचे सैन्य सुटत नव्हते सेनापती सिद्नाक आपल्या सैनिकांना बरोबर घेऊन पेशव्यांच्या सैनिकावर तुटून पडले समोरील सैन्याला तलवारीच्या एका फटक्याने गाराद करीत होते. तेवढ्यात महार सैनिकाने बातमी आणली ३००० अरब सैन्याची तुकडी ब्रिटिश फोजावर हल्ला चढविला दोन्ही सैन्यात घमासान युद्ध सुरू झाले सिद्नाकानी आपला घोडा अरब सैन्याच्या दिशेने वळविला हर हर महादेवचा जयघोष करीत आपल्या सैन्याला म्हणाले मारा कापा कापून काढा गाव कब्जा करणाऱ्या तुकडीवर हल्ला चढविला तलवारीवर तलवारी आढळत होत्या.बंदुकीतील गोळ्यांची फेरीवर फेरी झडत होत्या तोफा आग ओकत होत्या. लेफ्टनंट चेस्लोमा यांना पेशव्यांच्या सैनिकांनी घेरून तोफ निकामी केली लेफ्टनंटचे मुंडके छाटले तलवारीच्या टोकावर मुंडके घेऊन नाचत होते.त्यांच्या शरिराचे हजारो तुकडे केले इंग्रजांच्या सैन्य बिथरले गोंधळ निर्माण झाला सिद्नाकांनी आपला घोडा तोफेच्या दिशेने शिफाशतीने वळवीला आणि पेशव्याच्या सैनिकावर तुटून पडले पेशव्यांच्या सैनिकांना माघार घ्यावी लागली. आपला मोर्चा सेनापती बापू गोखळे याचा मुलगाकडे वळविला महार सैनिकाने गोविंदबाबाला घेरले घनघोर लढाई झाली गोविंदबाबा जखमी होऊन खाली पडणार इतक्यात एक गोळी गोविंदबाबाला लागली आणि तो खाली पडला पेशव्यांच्या सैन्यात गोंधळ माजला पळापळ सुरू झाली. पेशव्यांच्या शववाहक पथकाने गोविंदबाबाचा देह उचलून पळविला ही वार्ता सेनापती बापू गोखले यांना समजली सेनापती खचला इतक्याच शेव वाहकाने देह आणला गोविंदबाबाचा रक्तबंबाल शरीर पाहताच सेनापती बापू गोखले रडू लागला मोठ्याने आक्रोश करू लागला सैन्याचे मनोबल खचले इतक्यात गुप्तहेराने बातमी सेनापती बापू गोखले यांना दिली की महाराचा सेनापती सिद्नाक महार चालून येत आहे ही बातमी ऐकून बापू गोखले आपल्या सैनिकासह पळून गेले.अगोदर श्रीमंत सवाई श्रीमंत माधवराव पेशवे युद्ध भूमीतून आपला जीव वाचविण्याकरिता पळून गेले. रणझुंजार महापराक्रमी महार सेनापती दुसरे सिद्नाक महाराने यांनी आपल्या ५०० शूरवीर सैनिकांनी आपल्या पराक्रमाने भिमाकोरेगाव युद्ध जिंकले आणि महार जातीच्या गळ्यातील मडके आणि पाठची झाडू दूर केली. महाराचे सेनापती सिद्नाक महार त्यांचे शूर सैनिकांनी खऱ्या अर्थाने पेशव्यांचा पराभव करून आपल्या महार जातीला न्याय मिळवून दिला. पेशव्यांच्या जुलमी राजवटीला आणि अहंकाराला मातीत गाडले.कॅप्टन स्टेटोन यांनी सिद्नाक महार आणि त्यांच्या सैन्यांचा बहुमान केला. ब्रिटिश सरकारने महार सैन्य मृत्यूमुखी पडले त्यांच्या आठवणीत भीमा कोरेगावचा विजयस्तंभ बांधला आणि आज देखील भीमा कोरेगावचा विजयस्तंभ महाराच्या शौर्याची गाथा सांगत उंच उभा आहे . लष्कराच्या इतिहासात भिमा कोरेगावच्या विजय म्हणजे शौर्य आणि पराक्रमाची गाथा आहे. हा विजय म्हणजे अन्यायाच्या विरोधात मिळवलेला विजय आहे. भीमा कोरेगाव लढाईची विजयी साक्ष देणारा विजयस्तंभ महारांच्या पराक्रमाची कीर्ती अजरामर राहावी म्हणून भीमा कोरेगाव येथे भिमा नदीच्या काठी प्रशस्त मैदानावर युद्धाची पहिली ठिणगी पडली त्या ठिकाणी इंग्रजांनी भव्य असा स्तंभ उभारला आहे २६ मार्च १८२१ रोजी या भव्य विजय स्तंभाची पायभरणी कार्यक्रम अत्यंत शानदार अशा सोहळ्याने बंदुकीच्या फेरी आणि तोफांच्या सलामीने करण्यात आला.१८२२ विजय स्तंभाचे काम पूर्ण झाले पूर्वी या विजय स्तंभाला ‘महार स्तंभ’ असे होते हा विजय स्तंभ ६५ फूट उंच आहे. विजयस्तंभ म्हणजे महार योद्धांच्या शौर्याचे प्रतीक आहे.
भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १ जानेवारी १९२७ रोजी पुणे येथील शिरूर जवळ भिमा कोरेगाव येथील शौर्य पराक्रमाची गाथा असलेल्या विजय स्तंभाला भेट देऊन आपल्या सहकाऱ्यांसोबत मानवंदना दिली व स्मृतिदिन साजरा केला.
कोल्हापूर माणगाव या ठिकाणी महार परिषद २० मार्च १९२० साली आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यानी परिषदेचे अध्यक्ष होते. तसेच रणझुंजार सेनापती सिद्नाक महार यांचे नातू दादासाहेब इनामदार (राजे साहेब) हे स्वागत अध्यक्ष होते. अस्पृश्यांचे नेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिषदेत उपस्थित होते. (बाबासाहेबांचे वय फक्त २९ वर्षाचे होते.) छत्रपती शाहू महाराज म्हणतात. अस्पृश्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने नेते मिळाले आहेत ते नक्कीच अस्पृश्याचा उद्धार करतील यात शंका नाही. खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच अस्पृश्यांचे नेते आहेत असे राजश्री शाहू महाराज यांनी जाहीर केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राजश्री शाहू महाराज, सिद्नाक महाराचे वंशज दादासाहेब इनामदार सुभेदार रामजीबाबा सूपुत्र अस्पृश्य बहुजनांचा कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही युगप्रवर्तक मंडळी एकाच विचार मंचावर एकच विचार धारेवर मार्ग क्रमन करून समाज उद्धारक काम करीत होती. तथागत गौतम बुद्ध,रूढी परंपरा विरोधात उभे राहणारे संत, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, काला पुढे चालणारे महानायक सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांची विचारधारा पुढे घेऊन जाणारे तिला मूर्त स्वरूप देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान देऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता, आणि न्याय सविधानामध्ये अंतर्भूत करून आमचे हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिले. परंतु याची खरी सुरुवात रणझुंजार महार सेनापती सिद्नाक महार यांनी १ जानेवारी १८१८ केली याची आपल्याला प्रकर्षाने आठवण होते. महापराक्रमी महार सेनापती सिद्नाक महाराना आणि त्यांच्या महार योद्धा सैनिकांना विनम्र अभिवादन.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत