फुले दांम्पत्य ( सन्मान दिवस -1 जाने 1848 )

हंसराज कांबळे
8626021520
नागपूर
एकच ध्यास, करावा अभ्यास
शिकवावा इतिहास
सावित्रीचा !
भारतीय स्त्री ही शेकडो वर्ष शिक्षण व सामाजिक हक्कापासून वंचित होती. अनेक सामाजिक कथोकल्पित रूढी परंपरेच्या जंजाळात पूर्णतः जखडलेली होती. त्यांची फक्त ” चूल आणि मूल ” इथपर्यंत त्यांचं आयुष्य समाजानं सिमित केलं होतं. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांची अवहेलना पदोपदी पहावयास मिळत असे. त्यामुळे त्यांचं सारं आयुष्य पूर्णपणे अंधारमय झालं होतं. या साऱ्या प्रश्नांची मूळ कारणे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबांना अस्वस्थ करत होती. स्त्रीच्या मनातील वेदनेचा हुंकार अचूक ओळखून परिवर्तनासाठी अनेक संकटांना नजुमंता शिक्षणाच्या नंदादीपातून समाज मन प्रज्वलित करण्यासाठी त्यांनी सावित्रीमाईला सुशिक्षित केलं.
अन एका दैदिप्यमान उज्वलशाली पर्वाची पहाट उदयास आली. अतिशय खडतर, कटुमय मार्गातून कणखर व संयमी मनाने स्त्री बलशाली झाली पाहिजे या ध्यासातून त्यांनी केलेल्या अविरत प्रयत्ना पुढे समाज कंटकाचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले व शिक्षणाची दालने स्त्रियांसाठी खुली करून आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला. यात महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास साऱ्या विश्वाला सदोदित प्रेरणादायी आहे. माता सावित्रीबाई फुले या युगंधर स्त्री उद्धारक होत्या. आज जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. त्या उच्च पदे भूषवित आहेत. आता त्या अबला नाहीत, त्या सबला आहेत. त्यांच्या कर्तुत्वाला खरे तर आकाशाची मर्यादा आहे. पण हे कुणामुळे व कशामुळे घडले ? ते घडले शिक्षणामुळे आणि शिक्षण मिळावे म्हणून ज्यांनी संघर्ष केला त्यांच्यामुळे. फुले दांपत्यांनी शिक्षणाची सुरुवात केली. यात महात्मा ज्योतिराव फुले हे आद्य शिक्षक, तर सावित्रीबाई फुले या आद्य शिक्षिका ! शिक्षणासहित समग्र समाज सुधारणेच्या गंगोत्रीचा उगम त्यांच्या कार्यातून झालेला आहे. शिक्षणाचे पात्र विशाल बनलेले आहे. माता सावित्रीबाईंनी काटकी हातात धरून भुईवर मुळाक्षरे गिरविली. जमिनीवर कोरलेल्या त्या अक्षरांना अंकुर फुटले. त्यातून पुढे शिक्षणाची वृक्षराजी निर्माण झाली. भुईवर अक्षरे गिरवलेल्या या स्त्रीने आकाशात गरुड झेप घेतली. माता सावित्रीने पतीच्या क्रांतिकारी समाज सुधारण्याच्या कामात बरोबरीचा वाटा उचलला. हे दाम्पत्य खरोखर आकाशाएवढे मोठे होते.महात्मा ज्योतिबा फुले हे समतेचे प्रतीक होते तर माता सावित्रीबाई फुले या ममतेच्या प्रतीक होत्या. समता व ममतेचा सुरेख संगम दोघांच्याही जीवनात झाला होता. एकमेकांशी ध्येयवादाने एकरूप झालेले असे जोडपे जगाच्या इतिहासात क्वचितच सापडेल. शिक्षण हे वाघिणीचे दूध असते हेच खरे. माता सावित्रीबाई नेते प्राशन केले होते. त्यांनी ते आपल्या विद्यार्थीनींना पाजले. मुक्ता साळवे गुरगुरली ती त्याचमुळे. फुले दांपत्यांनी दिनदलितांच्या उद्धारकांनी अविश्रांत श्रम केले. दिनदलित, कष्टकरी समाजाला समाजात मानाचे स्थान मिळावे म्हणून लोकनिदेंची, छळाची, त्रासाची पर्वा न करता प्रसंगी समाजाकडून बहिष्कारचे दडपण आले असतानाही समाजात बहुजन समाजातील लोकांना मानाचे स्थान मिळावे म्हणून अहर्निश प्रयास केले. अलीकडील काळात त्या सर्वांमध्ये सामाजिक सुधारणाचे अग्रदूत महात्मा ज्योतिराव फुले आणि माता सावित्रीबाई फुले हे अग्रणी ठरतात.
महात्मा फुले यांच्या ध्येयवादात सूर्याची दाहकता होती. तर माता सावित्रीच्या कार्यात चंद्राची शितलता होती असे म्हटल्यास वावगे ठरू नये. क्रांतिकारी फुले दांपत्यांना विनम्र अभिवादन ! ????????
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत