महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

प्रतित्यसमुत्पादाच्या बारा कड्यांचे विवरण भाग १८

(4)नाम-रुप
प्रतित्यसमुत्पादाची चौथी कडी म्हणजे नामरुप. विज्ञानामुळे नामरुप उत्पन्न होतात. नाम म्हणजे मन व रुप म्हणजे शरीर. नाम (मन) हे चार खंडाचे बनलेले आहे. ते म्हणजे १) विज्ञान (Consciousness जाणीव), २) संज्ञा (Perception आकलन), ३) वेदना (Sensation संवेदना, अनुभूती) व ४) संस्कार (Reaction प्रतिक्रिया).
मनाच्या माध्यमातून एखाद्यी प्रक्रिया कशी घडत असते याचे उदाहरण म्हणजे- समजा रस्त्यात एखादी वस्तू दिसली तर ते पाहण्याची क्रिया डोळ्यांनी करताच काहितरी आहे याची जाणिव (विज्ञान) होते. त्यापाठोपाठ लगेच दुसरी क्रिया घडते ती म्हणजे नक्कीच भयावह साप आहे याचे आकलन (संज्ञा) होते. ते पाहून भीतिदायक संवेदना (वेदना) निर्माण होते. लगेच प्रतिक्रिया (संस्कार) उत्पन्न होते की आपण तेथून दूर जायला पाहिजे अन्यथा तो साप जर चावला तर आपला मृत्यू ओढवेल.
रुप (शरीर) हे पाच ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने क्रियाशील राहत असून त्यांच्यामुळेच बाह्य जगाशी संबंध प्रस्थापित होत असते. ते पाच इंद्रिय म्हणजे १) डोळा, २) नाक, ३) कान, ४) जीभ, व ५) त्वचा ही होत. या पाच इंद्रियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पाच बाबीचे ज्ञान मानवास होते. डोळ्याद्वारे बाह्य वस्तूमात्र जाणणे, नाकाद्वारे गंध जाणणे, कानाद्वारे आवाज जाणणे, जिभेद्वारे चव जाणणे, व त्वचेद्वारे स्पर्श जाणणे.
तसेच रुप (शरीर) हे १) पृथ्वी, २) पाणी, ३) अग्नी आणि ४) वायू या चार घटकांचे बनलेले आहेत आणि हे चार घटक सृष्टीमध्ये निसर्गत:च विद्यमान असतात.
भगवान बुध्दांनी रुप आणि नाम या घटकांवर लक्ष केंद्रित करुन चिंतन केले आणि सत्याचा शोध घेतला. त्यांनी या नामरुपाच्या जडण-घडणीची सूक्ष्म पातळीवर अंतर्मुख होऊन चिकित्सा केली. वरकरणी जड घटकांचे बनलेले हे शरीर (रुप) भरीव भासत असले आणि त्या आधारावर क्रिया करणारे हे मन (नाम) वरवर स्थूल भासत असले तरी ते शरीर अगदी सूक्ष्म परमाणूचे बनलेले आहे. याचा शोध सर्वप्रथम भगवान बुध्दांनी लावला. एवढेच नव्हे तर हे सारे मन आणि शरीर क्षणाक्षणाला अतिसूक्ष्म प्रमाणात अत्यंत शिघ्रगतीने सतत बदलत आहे; उत्पन्न होत आहे; नष्ट होत आहे. हे भगवान बुध्दांना दिसले. यालाच त्यांनी अनित्य म्हटले आहे.
आधुनिक शास्त्रज्ञांनी हे अंतिम सत्य मान्य केले आहे. एवढेच नव्हे तर इसवी सन सहाव्या शतकापूर्वी भगवान बुध्दांनी मांडलेले बरेच सिध्दांत आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे असे मत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात मांडले आहे.
या नामरुप प्रवृती मानवामध्ये दु:ख निर्मितीसाठी सहाय्यभूत ठरत असतात. आपल्या मनावर बालपणापासून निसर्गात आणि आजुबाजूला घडणार्‍या अनंत घटनाच्या संग्रहाचा स्तर चढलेला असतो. बाह्य जगात घडणारी घटना आपले मन त्यामध्ये संग्रहीत जुन्या संस्काराशी ताडून पाहत असते व त्यानुसार प्रतिक्रिया व्यक्‍त करीत असते. या मनात अनेक प्रकारचे विकार संग्रहीत झालेले असतात. अर्थात प्रत्येकाचे मन अशुध्द व मळलेले असतात. जोपर्यंत कोणत्याही व्यक्‍तीला स्वत:च्या मनातील मळ व अशुध्दता दिसणार नाही, तो पर्यंत ते मळ व अशुध्दता शुध्द करण्याच्या फंदात पडणार नाही. जेव्हा मन नितांत निर्मळ होईल, परिशुध्द होईल तेव्हाच त्या मनावर नवीन संस्कार रुजल्या जातील.
विज्ञान हे परिवर्तनशील आहे. त्या परिवर्तनशीलतेच्या तत्वामुळेच नामरुप हे नेहमी बदलणारे तत्व ठरते.
विज्ञानाचा निरोध केला असता नामरुपाचा निरोध होतो.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.३१.१२.२०२३
टीप- ‘भगवान बुद्धांची शिकवण’ हे माझं पुस्तक Amazon Kindle वर असून त्यावर आधारित ही लेखमाला सादर करीत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!