प्रिय,आदरणीय, आपणास,२०२४ या उगवत्या नवीन वर्षासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा.

आपला शुभचिंतक
अनंत दा. राऊत
आपण या अनंत विश्वातल्या पृथ्वीतलावरील भारत भूमीतले अत्यंत मूल्यवान असे चैतन्यमय मानवी अस्तित्व आहात. आपलं हे मूल्यवान अस्तित्व वरचेवर अधिकाधिक मूल्यवान होत जाओ ही मंगल कामना.
आपण फिरणं व्यायाम, योगासनं, प्राणायाम वगैरे करतच असाल. वेळ मिळतो ना हे सरं करायला? वेळ मिळत नसला तरी वेळ काढला पाहिजे बरं या सर्व गोष्टींना. रोज पोटासाठी शारीरिक काबाडकष्ट करणाऱ्या बांधवांना मात्र अशा गोष्टींना फारसा वेळ मिळत नाही. आपलं शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी सर्वांनाच पुरेसा, फुरसतीचा वेळ मिळायला हवा. सर्वांनीच तो काढायला हवा. माणसासाठी आरोग्य हीच तर खरी धनसंपदा असते. आपलं आरोग्य कायम उत्तम राहो या माझ्या आपणाला शुभकामना आहेतच.
एक सांगू का? माणसाचं शारीरिक स्वास्थ्य जसं उत्तम राहणं आवश्यक असतं, तसंच मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहणं आवश्यक असतं. आपल्या मानसिक स्वास्थ्यावर, त्याच्या नितळपणावर आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्यासाठी आपलं मन अधिकाधिक निर्दोष, नितळ, निर्मळ राहील यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करायचा असतो. शारीरिक स्वास्थ्यासाठी जसा व्यायाम आवश्यक असतो, तसे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान आवश्यक असते. अनेकांना हे महत्त्वाचं वाटत नाही पण मला मात्र याचं महत्त्व पटलेलं आहे. स्वानुभवातून पटलेलं आहे. मी रोज सकाळी फिरणं, प्राणायाम वगैरे करतो, त्याचप्रमाणे विपश्यनाही करतो. विपश्यना ही फारच अनमोल अशी साधना आहे. ही साधना प्रत्येक व्यक्तीने शिकून घेतली पाहिजे असं मला वाटतं. आजच्या स्वार्थाने बरबटलेल्या जगात कुठे नितळ, निर्मळ शुद्ध असं काही शिल्लक आहे की नाही असा प्रश्न निर्माण व्हावा, अशी स्थिती आहे. अशा स्थितीत मला भारतातली आणि जगातल्या विविध देशांमधली विपश्यना शिकवणारी केंद्रं ही अंतर्बाह्य निर्मळ असल्याचं आणि निस्वार्थपणे जनकल्याणासाठी कार्यरत असल्याचं अनुभवास आलेलं आहे. आपण शिकलात का विपश्यना? दहा दिवसाचं शिबीर करून ही विपश्यना शिकला असाल आणि ही साधना रोज करत असाल तर उत्तमच. शिकला नसाल, करत नसाल तर आपल्याबद्दलच्या आत्मीयतेतून मला हे आपणास सांगावसं वाटतं की आपण ही साधना दहा दिवशीय विपश्यना शिबीर करून आवर्जून शिका. आपल्या जीवनाला ही साधना फार आनंदमय बनवेल. आपणाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल. आपण त्या दिशेने जावं ही माझी आपणास मंगल कामाना आहे.
मी समाज माध्यमावरून आपल्यासमोर नेहमीच काही ना काही विचार ठेवतो. आपण त्याला जमेल तसे प्रतिसादही देता. आपल्या प्रतिसादाबद्दल मी आपला फार आभारी आहे.
मी मांडतो ते सारेच विचार आपणाला पटतीलच असं नाही. माझा प्रत्येक विचार आपणाला पटलाच पाहिजे असं थोडंच आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती, आवडीच्या भिन्न भिन्न तऱ्हा या असतातच. त्या असल्याच पाहिजेत. समृद्ध अशी असंख्य रंग ढंगी वैविध्यता हेच तर सृष्टीचं मूलभूत लक्षण आहे. सृष्टीचं हे मूलभूत लक्षण आपणाला जपावच लागतं. आपले काही मुद्द्यांच्या संदर्भात मतभेद झाले तरी आपल्याबद्दलचं प्रेम आणि अस्था मी कधीही कमी होऊ देणार नाही. अहो मतभेद कुणात नसतात? ते अगदी बापलेकात देखील असतात. बऱ्याचदा असे मतभेद बरेच तीव्र असतात. म्हणून काय बापलेकांमधलं प्रेम आणि आत्मीयता कमी होते? मुळीच नाही. मतसंमती आणि मतभेदांच्या सह आपले प्रेम संबंध कायम जपत राहणं हे महत्त्वाचं असतं.
आपण आपल्या व्यक्तिमत्त्वानुसार काही सामाजिक जाणीवा बाळगून समाजकार्य, राष्ट्र कार्य करताच.ते करणं, करत राहणं फार महत्त्वाचं असतं. ज्याच्या जगण्याला कुठलंच सामाजिक जाणिवेचं अंग नसतं, जो व्यक्ती केवळ आणि केवळ आत्मकेंद्रीत राहून स्वतःसाठी जगतो, त्याचं जगणं निरर्थक असतं. तो जगला काय आणि मेला काय त्याला काहीच अर्थ नसतो. आपलं जगणं तसं नाही. आपण नक्कीच काही एक सामाजिक जाणीव बाळगून काम करता. आपलं सामाजिक आणि मानवाच्या हितासाठीचं जे जे काम चालू असेल ते ते काम २०२४ या नव्या वर्षात आणखी मोठ्या प्रमाणात वाढत जाओ ही देखील मी आपल्यासाठी मंगल कामना प्रकट करतो.
परत एकदा नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.समाज माध्यमावर आपण नेहमी भेटतोच पण प्रत्यक्षातदेखील अधून मधून आपली भेट व्हायला हवी असं वाटतं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत