
दि. 9/ऑक्टोम्बर
कलम 370 हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत, कारगिलमधील लडाख स्वायत्त हिल कौन्सिलच्या निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने भाजपचा पराभव केला आहे. 26 जागांच्या लडाख परिषदेच्या निवडणुकीत मतमोजणी सुरू आहे. मात्र, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने मोठी आघाडी घेतली आहे.
आतापर्यंत जाहीर झालेल्या 22 जागांच्या निवडणुकीत काँग्रेसने 8, तर नॅशनल कॉन्फरन्सने 11 जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी भाजपला केवळ 2 जागा मिळाल्या आहेत. एका जागेवर अपक्ष उमेदवारानेही विजय मिळवला आहे. यानंतर उपराज्यपाल मतदानाचा अधिकार असलेल्या चार सदस्यांची नियुक्ती करतील. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, कारगिलमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेससारख्या धर्मनिरपेक्ष पक्षांना विजय मिळणे ही आनंदाची बाब आहे.
नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या युतीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 30 सदस्यीय एलएएचडीसीच्या 26 जागांसाठी 4 ऑक्टोबर रोजी निवडणूक झाली. काँग्रेसने, नॅशनल कॉन्फरन्सशी युती करून 22 उमेदवार उभे केले होते. भाजपने 17 उमेदवार उभे केले होते. गेल्या निवडणुकीत भाजपने एक जागा जिंकली होती आणि नंतर दोन पीडीपी नगरसेवकांच्या समावेशाने त्यांच्या जागांची संख्या तीन झाली होती. मात्र, या वेळी भाजपने एकूण 17 उमेदवार उभे केले होते. आम आदमी पक्षानेही या निवडणुकीत उडी घेतली होती. त्यांनी चार जागांवर नशीब आजमावले, तर २५ अपक्षही रिंगणात होते. मात्र, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत