देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

अंजनाक्का — अशोक सवाई

(राजकारण)

            दुपारचे जेवण झाल्यावर सुदामण्णा ओसरीत बाजीवर झोपले होते. नदीच्या माशांचं झणझणीत कालवण आन् ज्वारीच्या भाकरी हाणल्यावर सुदामण्णाला चांगलाच डोळा लागला होता. घरातील आवराआवर करून अंजनाक्का ओसरीत नवऱ्याजवळ येवून सुदामण्णाला आवाज दिला. 

“धनी… आवं धनी”… पण सुदामण्णा कडून प्रतिसाद नाही. अंजनाक्काने पुन्हा एकदोन वेळा आवाज दिला. सुदामण्णांनी फक्त थोडीशी कुस बदल्या सारखे केले.
“काय बाई ह्यो माणूस… खाल्लं की झोपलं… खाल्लं की झोपलं… निस्तं खानंन् झोपनं… घरात असल्यावर बायकोशी दोन सबद बोलावं की नाय म्या म्हणती” असं बोलून अंजनाक्का पुन्हा घरात गेली. चाळीसीतील अंजनाक्काला तिचे शेजारी पाजारी लहाण्यापासून मोठ्यांपर्यंत सारेच अंजनाक्काच म्हणत असत. ती अडाणी असली तरी व्यवहारी होती भल्याबुऱ्याची तिला चांगली समज होती. अंजनाक्काच्या मोठ्या बोलण्याने सुदामण्णाची झोप उडाली. एक मोठी जांभई देवून ते उठून बसले. “कारभारीन बाई पानी आणा पानी”… त्यांनी बसल्या बसल्याच आवाज दिला. अंजनाक्का तांब्याभर पाणी घेऊन आली. “गेली व्हय झोप?” नवऱ्याच्या हातात तांब्या देत ती बोलली. “आवं तुवां तगड्या आवाजानं थांबती व्हय झोप, सवतीवानी खसकून गेली बग” सुदामण्णा बोलले “पर म्या म्हणती सवत बिवत सबद वापराची काय बी गरज न्होती बगा” बायकांना साध्या बोलण्यातून देखील सवत शब्द सहन होत नाही. सुदामण्णाचं रग्गड जेवण झालं होतं. मार्च महिना संपत आला. उन्हाची तल्खी वाढत होती. घशाला कोरड पडलेल्या सुदामण्णांनी गटाघटा तांब्याभर पाणी संपवलं. आपल्या धोतराच्या सोग्यानं तोंड पुसलं अन् बायकोकडे नजर टाकत बोलले “हां बोल आता काय म्हणत व्हती मघास्नी?” अंजनाक्का तांब्या बाजूला ठेवून खाटंशेजारीच ऐसपैस खाली बसली.

            "आवं धनी म्या म्हणत व्हती आपल्या गावात  औरंग्याची कबर... औरंग्याची कबर, उकरून काढा, आपुल्या राज्यात काहला पाहिजे त्येची कबर असीच सारी चर्चा चालतीया समदीकडं. कोन हाय वं ह्यो औरंग्या?" अंजनाक्काने भोळ्यापणाने थेट सुरवात केली. "हाय नाय व्हता! अन् त्यो औरंग्या नाय त्येचं नाव औरंगजेब हाय" सुदामण्णांनी खुलासा केला. "पर त्येला औरंग्या औरंग्या काम्हूण म्हणत्यात?" तिचा सवाल "आवं बाय तुह्या पोराचं काय नावं हाय? सांग बरं?" माह्या एकटीचं थोडंच हाय तुमचं बी हाय नव्हं पोरगं?... "हां हां माझं बी हाय पर घडीभर नाव तं सांग त्येचं धनीनं म्हणजे सुदामण्णांनी सवाल केला. "बजरंग" ती बोलली "मंग माह्यास्नी सांग तू त्येला लाडानं काय म्हणतीया?"... "बजरंग्या"... हास्नी! आता कसी बोल्ली... तसच औरंगजेबाला बी समदी लोकं लाडानं औरंग्या म्हणत्यात"...  "आस्सं व्हय? पर काय वं धनी ह्यो औरंगाजेब कवा व्हता?"... "आपलं राजं माहित हाय नव्ह?"... "व्हय व्हय रयतेचं  राजं"... "बराब्बर! हुश्शार बाय हाय. त्येंच्या टायमला ह्यो औरंगजेब व्हता त्येच्यामंधी अन् आपलं राजं ह्येंच्यात वैर व्हतं दोघांमंधी लढाया झाल्यात. त्येला आता साडेतीनसं वरीस झालीत बग. राजंच्या मांसाहेब म्हंजी आपल्या बी जिजाऊ मां  म्हणत हुत्या, वैरी मेला आन् वैर संपलं. त्ये औरंगजेबाच्या कबरीत आजपावतर त्येच्या हाडामासाची माती बी झाली आसल तरी बी आजचं राजकारणी मतलबी पुढारी हुक्की आल्यागत मेलेले मुडदे उकरून काढत्यात बग.  हुक्की काहले म्हणत्यात ह्ये तुवास्नी माहीत हाय नव्ह?"... व्हय व्हय तुम्हास्नी जसी कवा कवा ढोसाची हुक्की येते तसीच नव्ह?" अन् अंजनाक्काने एकदम तोंडाला पदर लावला. नाही म्हटलं तरी तिनं शालीतून नवऱ्याला लगावलं होतच. सुदामण्णा चुप्प... त्यांनी बायकोकडं डोळ्याच्या कोपऱ्यातून फक्त एक तिरकी नजर टाकली. "पर म्या म्हणतीया हे समदं पुढारी आसं काम्हूण करत्यात बरं?"... "समदं नाय करत पर काही पुढारी जाती जातीत, धर्माधर्मात बिब्बा घालण्याचं कामं करत्यात बग"... आवं म्या त्येच म्हणतीया पर काम्हूण?"... "आवं माजे बाय गेल्या नव धा वरीसात सत्तेच्या खुर्चीवर बसून जनतेच्या हिताचं काय बी काम केलं नाय, निस्ता जिकडं तिकडं भरस्टाचार माजून ठिवला ह्या लोकांनी. मीठापास्न पीठापावतर  कर लावून ठेवल्यात म्हूण महागाई वाढली, पेट्रोल, डिझल, गॅस वाढलं की भाजीचा देठ आन् साधा चहाचा कप बी महाग होतो बग, तरण्याताठ्या पोरांच्या हाताला कामधंदा नाय, साळा बंद पडत चालल्या, मास्तर लोकं घरी बसल्येत, शिक्षणाची बोंब, दवाखाने महाग झालेत, इजेचं बीलं वाढलीयात, आपण शेतकरी आहोत, आपल्या शेतमालाला भाव नाय, शेतकरी कर्जबाजारी झाला, कर्जवसुलीसाठी बॅंकाचा/सावकाराचा तगादा सुरू झाला की मंग शेतकरी आत्महत्या करत्यात. परवाच आपल्या गावच्या बाजूच्या गावात एकानं आत्महत्या केली ह्ये माहीत हाय नव्ह?"... "व्हय जी" अंजनाक्काने गंभीर चेहरा करत दुजोरा दिला. "आपलीच असी गत हाय तवा शेतमजूर आन् हातावर पोट भरणाऱ्यांची काय गत आसल इच्चार कर जरासा. ह्या समद्या मुद्द्यावर जनता बोंबलू नये म्हूण हे सारं झाकून लोकाचं ध्यान भलतीकडं भटकवण्यासाठी हे पुढारी लोक मेलेले मुडदे उकरून काढत्यात. म्हंजी त्येंच्या नाकर्तेपणावर पडदा पडावा म्हूण हे लोक असल्या हिकमती करून हिंदू मुसलमान करत असत्यात समजलं?"... "बाई... म्हंजी दंगली घडवून एकमेकांचे  मुडदे पाडण्याचं घोर पाप झालं की वं हे"... "व्हय समजा दंगली घडल्यात  तवा मरत्याल फकस्त बहुजनांची पोरं पुढाऱ्यांच्या पोरांना धक्का बी लागत नाय त्येंची पोरं परदेशात आरामात शिक्षण घेत्यात, आन् इकडं त्येंची बाप लोक मंडळी आपल्या बहुजनांच्या पोरास्नी धर्माच्या नादी लावून एकमेकांची डोस्की फोडायला सांगत्यात बग" सुदामण्णांच्या अंगात सात्विक गाव पुढारी घुसल्यागत ते संतापाने बोलू लागले. त्यांची बायको ध्यान धरून ऐकत होती. आपल्या नवऱ्याला बुद्धी हाय बाई... अस नवऱ्याचं मनात कौतुकही करत होती. 

            "आपलं मुख्यमंत्री बी औरंगजेबाला औरंग्याच म्हणत्यात. काय नाव त्येंचं बरं?"... "फ.. फ.. फ"... राहू दे डोळं फडफडील तुवं मंग म्हणशीला कायतरी अपशकुन हाय, माह्या डावा डोळं फडफडतुया म्हूण... म्या काय म्हणत व्हुतो इसरलोच बग... हां..  चला रं औरंग्याची कबर उकरून काढू आस्सं कुणी किती बी बोंबलत सुटलं ना तरी बी कबर कुणी उकरून काढणार नाय बग ह्या फकस्त धमक्या आसत्यात जाती धर्मात तेढ पेरण्यास्नी" यावर अंजनाक्काची प्रश्नार्थक मुद्रा. चेव येवून सुदामण्णा पुन्हा बोलू लागले. "आवं बाय... जमीन आन् जमीनीतील कोणत्या बी धर्माचा जो पुरातन वारसा असतो त्यो केंद्र सरकारच्या... "केंद्र सरकार म्हंजी?" अंजनाक्काने नवऱ्याचं वाक्य अर्ध्यात तोडत विचारलं. "आवं माजे बाय केंद्र सरकार म्हंजी दिल्ली दरबार"... "आस्सं व्हय"... "हां.. त्याच्या अधीन पुरातत्त्व खातं हाय...  "कोण खातं?"... "जा बाय कोण काय बी खात नाय फकस्त तू माह्य डोस्क नोको खाऊ"... "आवं धनी म्या आपली अडाणी बाय हाय... नाय समजत तवा बुद्धीवाल्या नवऱ्यानं समजून सांगावं आपल्या बायकोस्नी"... बायकोनं बुद्धीवाला म्हटल्यावर सुदामण्णाला बरं वाटलं. "बरं बरं सांगतो आइक"... व्हय व्हय आइकती सांगा"... "दिल्ली दरबाराच्या अधीन पुरातत्त्व खातं हाय त्ये खातं सरकारी खात्याशिवाय कुण्या बी ऐऱ्यागैऱ्याला पुरातन वारसाच्या जमीनीला कुदळ/फावडं लावण्याची परवानगी देत नाय. चिल्लर फालतू पुढारी आपली चमकोगिरी करण्यासाठी कबरी खोदण्यासारख्या फालतू वावड्या उडवत असत्यात. आन् समाजातील माहोल खराब करत्यात"... बरं त्या औरंगजेबाची कबर हाय म्हूण आपल्या राजंच्या शौर्याचा इतिहास बी जीता हाय नायतर आपल्या पुढच्या पिढ्यास्नी त्येंचा इतिहास बी समजनार नाय बग"... "धनी आत्ता समजलं बगा, बाई... लय बुद्धी हाय वं तुम्हास्नी". बायकोच्या तारीफीनं सुदामण्णांला आपल्या अंगावर मूठभर मांस चढल्यासारखं वाटलं. नंतर त्यांनी आपल्या छातीकडे बघितले तर छातीही दिड दोन इंचांपर्यंत फुलल्यासारखी वाटली. सुदामण्णांनी आपल्या बंडीच्या तिरप्या खिशातून बटवा काढला. बटव्यातू तंबाखू काढून तिला अंगठ्याच्या नखाने चुना लावला अन् बायकोकडं पिरमानं बघत तंबाखू मळू लागले. राहून राहून त्येन्ला बायकोचा 'बुद्धीवाला' सबद आठवत होता. 

            "आवं पोराची माय अजून तुवां एक गोष्ट सांगतुया" आसं म्हणत त्यांनी तंबाखूचा बार आपल्या खालच्या ओठात भरला. आन् आपले हात झटकले. "काय वं काय सांगत व्हुते?" बायकोनं इचारलं "आवं म्या ह्ये म्हणत व्हुतो... आपल्या गावचा खाटिक उस्मान भाई त्येच्या बकरी ईदला त्यो आपल्याला खीरकुर्मा, मटन आणून देतो... देतो की नाय?"... "देतो की"... अंजनाक्का सुपारीचे खांड तोंडात टाकत बोल्ली. दर एकदोन वरीसानी त्यो सुलेमान आन् त्येचा त्यो मेव्हणा आपलं कौलारू घर शाकारून देतुया, त्यो बाबू मियां आपलं  अडलं नडलं शेतीचं अवजारं दुरूस्त करून देतुया. गावच्या चौकातला त्यो सायकल दुरूस्तीवाला मामू उस्ताद, आपल्या पोराची सायकल त्चेच्याकडच असते नव्ह दुरूस्तीसाठी, शेतीसाठी पाट्या डालं त्यो रूस्तमच देतो नव्ह आपल्याला. या साऱ्यांची पोरं बी आपल्या जगताप मास्तरांच्या साळेमंधी शिकत्यात. गावच्या शेवटल्या गल्लीतील त्या सलमाच्या पोराचा मागल्या वरीस ॲक्सिडंट झाला व्हुता तवा  आपल्याच मराठी पोरांनी धावपळ केली व्हती. म्हंजी त्ये आपल्या सुखादुखात आपण त्येंच्या  सुखादुखात आसं समदं सुखासमाधानानं चालत असल्यावर बी बिनकामाचे उचले पुढारी गावात येत्यात आन् ईनाकारण ईख पेरून जात्यात. आन् गावचा माहोल खराब करत्यात. पर आपल्या गावचे लोकं लय समजदार हायती म्हणूनशान झगडं भांडण व्हत नाय, आन् समदा गाव बी शांततेत नांदतय" आन् सुदामण्णांनी बसल्या बसल्या तंबाखूची पिचकारी थेट अंगणात मारली. "खरं हाय वं धनी... ह्या ढेरपोट्या पुढाऱ्यांची पोटं भरल्याली असत्यात म्हूण त्येंन्ला  नसती धंदे कराया सुचत्यात"...

“हूं… बरं लय टाईम झाला आता चहा कर. पोरगं बी यायचा टाईम झाला. मी जरा गावातून चक्कर मारून येतूया” अंजनाक्का बी आवरते घेत उठली आन् चहा करायला घरात गेली. इकडे सुदामण्णां न्हानीघरात गेले हातपाय धुवून ताजेतवाने झाले. धोतर ठाकठीक केलं हाफ ओपन कुर्ता डोक्यातून चढवला. डोक्यावर टोपी चढवली तेवढ्यात अंजनाक्का चहा घेवून आली. सुदामण्णांनी चहाचा घोट घेताच “व्वा लय झकास झाला बग चहा आज चहात लय पिरेम ओतलय वाटतीया पोराच्या मायनं” आन् अंजनाक्का त्या वयातही मस्त लाजली. तिच्या गोऱ्या गालावरची खळी त्याची साक्ष देत होती. सुदामण्णांनी त्यांचा खास दुप्पटा खांद्यावर टाकला. “आवं अय काय आणू खायला?”…”मवां नग पोरास्नी आणा काय आणायचं ते”… आवं पोरगं बी खाईल आपण बी खाऊ”… आणा काय बी तुमच्या मतास्नी”… “बरं बरं” असं म्हणून सुदामण्णांनी खुंटीवरची थैली घेतली पायात कुरकुर वाजणाऱ्या कोल्हापूरी चपला चढवल्या आन् निघाले तवा अंजनाक्का सुदामण्णांच्या पाठमोऱ्या आकृती कडं खूप दूरपर्यंत पहात उभी व्हती.

अशोक सवाई
91 5617 0699

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!