इंग्रजी कमिशन आणि आंबेडकरबोध !

रणजित मेश्राम
इंग्रज इथून गेले की सुखाचे दार उघडलेच ! अशी मानसिकता झालीकेली होती. तशावेळी, जेरबंद दास्यांत सामाजिक स्वातंत्र्याचा लढा रोवणे अपार जिकिरीचे काम होते. दास्यतेला धर्मतरतूद व ईश्वरीय मान्यतेची डूब .. असा हा भयंकर तिढा होता.
राजकीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात समाज व्यवस्थेची ही तीव्रता झाकोळून गेल्याने इंग्रजांच्याही लक्षात येत नव्हते. शिवाय, कोणाच्याही अजेंड्यावर हा विषय नव्हता.
यातून मार्ग काढणे. अडिग उभे ठाकणे. समुच्चयाला सामोरे जाणे. सारे अवघडेय होते. ‘गेल्या जन्मीचे पातक’ यासारखा दुसरा कठोर फास नव्हता. ही फासकैद ‘इमाने भोगली की पुढच्या जन्मी आनंदीआनंद’ या अघोरी कटात कोट्यवधींचे नरसंहार सदृश्य शोषण सुरू होते. हे छद्म यातच सारी मेख होती.
हे ओळखणे. तिथे निदान देणे. पाऊलांना दृढ करणे. ती चालती करणे. ती मोट बांधणे. बाबासाहेब ते करत गेले. अथक केले. पहिल्यांदाच असे घडले. जगात तरी.
जगातील मुक्तिदात्यांपूढे असे आव्हान आले नव्हते. ते जागरण व संघर्ष होते.
इथेतर खडकावर रोप लावणे होते. ते बाबासाहेबांनी केले !
या महत्प्रयासी कार्यात, इंग्रजांच्या प्रत्येक हालचालींकडे बाबासाहेबांचे पूर्ण लक्ष असायचे. त्यांना गोरे व काळे या दोहोंच्या जाचांतून कोट्यवधींच्या मुक्तीचा समतोल साधायचा होता. हे सर्व प्रचंड जिकिरीचे व नवेच होते. याला डावपेच, दूरदर्शित्व, प्रसंगावधान व धैर्यता ही त्यांची गुणवत्ता उपयोगाची ठरली. ते असेच विकसितही होत गेले. इथेच अलौकिक नेतृत्वाचा उदय झाला.
इंग्रज लंडनहून राज्यकारभार सांभाळतांना कमिशनचा पूरेपूर उपयोग करीत. वेळोवेळी ते कमिशन पाठवत असत. त्याद्वारे भारताचा कानोसा घेत असत. आलेले सर्व कमिशन (शिष्टमंडळ) इंग्रजांसाठी कान आणि डोळे असायचे.
सत्ताकाळात इंग्रजांनी साऊथबेरो कमिशन, सायमन कमिशन, क्रिप्स कमिशन, कॅबिनेट मिशन कमिशन ही शिष्टमंडळे इथे पाठविली हे विशेष !
दरम्यान, २० आगस्ट १९१७ ला भारत मंत्री माॅंटेग्यू यांनी, ‘निरनिराळ्या समाजाच्या लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थेत व कायदे मंडळात प्रतिनिधित्व मिळेल’ असे ब्रिटिश लोकसभेत घोषित केले. त्याचे पडसाद, सामाजिक व राजकीय स्तरावर भारतात जोरदार उमटले. याच काळात, लो टिळकांचे ‘कायदे मंडळात जाऊन कुणब्यांनी नांगर हाकावयाचे नाहीत व वाण्यांनी तागड्या धरावयाच्या नाहीत’ हे केलेले वक्तव्य लक्षवेधी ठरले.
विशेष म्हणजे, १९१७ ला पहिल्यांदाच, कलकत्ता कांग्रेस अधिवेशनात ‘अस्पृश्यता निवारणा’चा ठराव पारित करण्यात आला. याशिवाय अस्पृश्यता निवारण परिषदा व्हायला लागल्या. परिषदांचे केंद्र मुंबई हे होते. या सर्व घडामोडींवर बाबासाहेबांचे लक्ष होते.
या नव्या परिस्थितीचे अवलोकन करायला साऊथबेरो कमिशनचे (१९१८) भारतात आगमन झाले. कमिशनमध्ये पाच गोरे व चार भारतीय सदस्य होते. काही महिने कमिशन भारतात फिरत होते. विविध स्तरावर गाठीभेटी सुरू होत्या. तेव्हा बाबासाहेब मुंबईला सिडनहॅम काॅलेजला प्राध्यापक होते. तेव्हाच त्यांनी अस्पृश्यांच्या प्रश्नाला असे अनाथ सोडणे योग्य नसल्याचे ठरविले. आणि ते दृढतेने सामोरे ठाकले.
बाबासाहेबांनी साऊथबेरो कमिशनला लिखित निवेदन दिले. ते संक्षिप्त प्रबंध होते. अस्पृश्यांना स्वतंत्र ओळख का .. याची मुद्देसूद मांडणी होती. शिवाय कमिशनला विस्तृत कैफियत सांगणारी साक्ष दिली.
हे निवेदन व साक्ष, इथेच बाबासाहेबांच्या नेतृत्वाचा प्रारंभ झाला. यानंतर ते पुढेच गेले. ३१ जानेवारी १९२० ला ‘मूकनायक’ पाक्षिक सुरु केले.
दहा वर्षांनंतर म्हणजे १९२८ ला सायमन कमिशन भारतात आले.भारतात उठलेल्या राजकीय असंतोषाला समजून घेणे हा या कमिशनचा उद्देश होता. यात ब्रिटिश लोकसभेचे चार व राज्यसभेचे दोन असे सहा सदस्य होते. सायमन संसदपटू होते. कमिशन ३ फेब्रुवारी १९२८ ला भारतात पोहचले. यात एक सदस्य मेजर ॳॅटली हे होते. ते नंतर ब्रिटनचे पंतप्रधान झाले. त्यांचेच कार्यकाळात भारताला स्वातंत्र्य मिळाले.
तेव्हा ‘सायमन, गो बॅक’ असे वातावरण होते. तेव्हा सायमनला भेटणे जोखीमेचे होते. ती जोखीम बाबासाहेबांनी पत्करली. त्यांनी अभ्यासपूर्ण अशी दोन निवेदने सायमन कमिशनला दिली. शिवाय, स्वतःची साक्ष दिली. मेजर ॳॅटली सोबतची प्रश्नोत्तरी वेधक राहीली.
त्यावेळी बाबासाहेबांची भूमिका या देशातील अस्पृश्य हे, सरकारने अवहेलना Depressed केलेले, हिंदूंनी दडपलेले Oppressed व मुसलमानांनी उपेक्षा Disregarded केलेले आहेत अशी होती.
याचे परिणाम नंतर उमटले. सायमनच्या अहवालावर इंग्रज सत्तेने १९३०-३१ ला लंडनला गोलमेज परिषद (Round table conference) घेतली. तिथे इतरांच्या सोबत अस्पृश्यांचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून बाबासाहेबांना पाचारण केले.
गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी भारतीय समाजव्यवस्थेची काळी बाजू जगापूढे ताकदीने मांडली. जग स्तिमित झाले. पहिल्यांदाच जग ते ऐकत होते.
१९३६ नंतर बाबासाहेब हे अस्पृश्यांचे एकमेव नेते असतांना त्या प्रतिमेतून बाहेर पडले. आता ते शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य यांचे नेते झाले. त्यांनी स्थापन केलेल्या ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ (Independent labour party) याने ही प्रतिमा प्रदान केली. ‘ब्राम्हणशाही व भांडवलशाही’ हे आपले प्रमुख शत्रू आहेत असे या पक्षाचे ब्रीद होते. पक्ष १५ आगस्ट १९३६ ला स्थापन झाला.
१७ फेब्रुवारी १९३७ ला मुंबई प्रांतिक विधी मंडळाची निवडणूक झाली. यात स्वतंत्र मजूर पक्षाचे बी आर आंबेडकर (मुंबई) , दादासाहेब गायकवाड(नाशिक), आर आर भोळे (पुणे), खंडेराव सावंत (सातारा), विनायकराव गडकरी (पुणे), रामकृष्ण भातनकर (ठाणे), अनंतराव चित्रे (रत्नागिरी), गंगाराम घाटगे (रत्नागिरी), श्यामराव परुळेकर (रत्नागिरी), दादासाहेब रोहम (अहमदनगर), जीवाप्पा ऐदाळे (सोलापूर), दौलतराव जाधव (खानदेश), बळवंत हनुमंत वराळे (बेळगाव) हे तेरा जण निवडून आले.
यानंतर १९४२ ला सर स्टॅफोर्ड क्रिप्स कमिशन भारतात आले. तेव्हा दुसरे महायुध्द ऐरणीवर होते. महायुध्द भारताच्या उंबरठ्यापर्यंत आले अशी स्थिती होती.
एकूण स्थिती व सत्तांतर दोन्हींचे अवलोकन क्रिप्स कमिशनला करायचे होते. क्रिप्सनी भारताकरीता जी योजना आणली होती तीत अस्पृश्यांची दखल नव्हती. इथे बाबासाहेब चिंताग्रस्त झाले. त्यांनी क्रिप्सचे याकडे लक्ष वेधले. तेव्हा त्यांनी आडमुठे धोरण घेतले. मूळ लक्षवेधीला बगल देऊन ‘आपण अस्पृश्यांचे नेते की मजुरांचे’ असे विचारते झाले. अस्पृश्यांची कैफियत स्वतंत्र मजूर पक्षाचे नेते म्हणून कसे ऐकावे ?
इथेच विलक्षण घडामोडी घडल्या. अखेर बाबासाहेबांवर स्वतंत्र मजूर पक्ष गुंडाळून ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ची स्थापना (१९४२) करण्याची बाध्यता आली.
एक देशनेता असा अस्पृश्यांचा नेता केला गेला.
यानंतर कॅबिनेट मिशन नावाचे कमिशन आले. त्याला त्रिमंडळ पण म्हणत असत. या कमिशनमध्ये स्वतः क्रिप्स, पॅथिक लाॅरेंस व अलेक्झांडर असे तिघेजण होते.
तेव्हा १९४६ चे सार्वत्रिक निकाल लागले होते. शे का फेडरेशनचा पूर्ण पराभव झाला होता. तोच प्रचाराचा मुद्दा झाला.
या त्रिमंडळाने सुध्दा क्रिप्सचीच री ओढली.
आता अस्पृश्यांचा नेता ही मानायला तयार नव्हते. सारे डावपेच बाबासाहेबांच्या लक्षात येत होते. ते दृढ होते. दमाने घेत होते.
पूढे संविधान निर्मिती .. बुध्द धम्म स्वीकार घडत गेले .. !
काय करायचे तेही सांगून गेले .. !
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत