जालन्यातील मराठा आंदोलनात झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज ठाणे बंद चे मराठा समाजाच्यावतीने आव्हान

मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजातर्फे सोमवारी ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. या संदर्भात शनिवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सकल मराठा समाजाचे ठाणे जिल्हाध्यक्ष व भाजपचे शहर पदाधिकारी रमेश आंब्रे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दत्ता चव्हाण यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. हा बंद शांततेच्या मार्गाने करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या बंदला काँग्रेस पक्षासह भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार गट), मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांतील मराठा नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात सुमारे दोन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहरात तैनात करण्यात येणार आहेत.
बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुमारे दोन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहरात तैनात करण्यात आले आहेत. शहरात 45 निरीक्षक, 160 सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, सुमारे 1 हजार 300 कर्मचारी, दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या, राज्य राखीव दलाच्या सहा तुकड्या असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच रास्ता रोको टाळण्यासाठी महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त तैनात केला जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी निवासस्थान ठाण्यातील नितीन कंपनी जंक्शनजवळ असल्याने बंदच्या पार्श्वभूमीवर येथे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
सरकारी आणि खासगी कार्यालये सुरू असल्याने नोकरदारांना सेवा देण्यासाठी ठाणे परिवहन सेवा सुरु ठेवली जाणार आहे. सकाळी बंदची तीव्रता पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती परिवहन अधिकाऱ्यांनी दिली. तर रिक्षा संघटनांनी बंदमध्ये थेट सहभागी होणे टाळले असून बंदच्या परिस्थितीप्रमाणे रिक्षा चालक निर्णय घेतील, असे रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत