
डॉ. मनोहर नाईक , नागपूर ९४२३६१६८२०
भाषा ही परस्पर संवादाचे आणि समाजव्यवहाराचे प्रभावी माध्यम आहे.व्यक्तीच्या मनातील भावना, वेदना,संवेदना आणि विचार भाषेतील शब्दांद्वारेच व्यक्त होतात.त्यामुळेच शब्दांना भाषेत तसेच जीवनव्यवहारात अतिशय महत्त्वपूर्ण स्थान असते. शब्द अर्थवाहक असतात.म्हणूनच शब्द फार शक्तिशाली असतात.शब्द शस्त्रांपेक्षाही धारदार असतात.शब्दांनी माणसं तोडताही येतात.जोडताही येतात.शब्दांनी माणसाला घायाळही करता येतं.मवाळही करता येतं.शब्द परस्परांत जवळीकता वाढवू शकतात.तसेच दुरावाही निर्माण करू शकतात.शब्दांनाही एक स्वभाव असतो ! शब्दांचाही काही उद्देश असतो.शब्द उद्देशांसहच व्यवहारात उतरतात.काही शब्द स्वभावदर्शक असतात.काही वृत्ती-प्रवृत्ती निदर्शक असतात. काही शब्द काही व्यक्तींकरिता इतके अचूक आणि तंतोतंत लागू पडतात की,जणू हा शब्द या व्यक्तीकरिताच तयार झाला की काय ?,असे काही क्षणांसाठी वाटते ! मराठीत असे अनेक शब्द आहेत, जे एखाद्या व्यक्तीचे, त्या व्यक्तीच्या स्वभावाचे तसेच त्याच्या वृत्ती-प्रवृत्तीचे नेमकेपणाने वर्णन करतात.असे आशयसंपन्न शब्द हे त्या भाषेची आणि शब्दांची फार मोठी शक्ती असते. # मराठीतील दयाळू ,मायाळू ,प्रेमळ,मेहनती,नम्र सज्जन इत्यादी शब्द व्यक्तीचे अथवा व्यक्तीस्वभावाचे यथार्थपणे वर्णन करणारे आहेत. तद्वतच भ्रष्ट,नीच,कारस्थानी,शोषक,स्वार्थी इत्यादी शब्द व्यक्तीच्या वृत्ती प्रवृत्तीचे निदर्शक आहेत. मराठीत काही शब्द वरवर पाहता समानार्थी वाटणारे आहेत.असे समानार्थी दिसणारे शब्द अर्थदृष्ट्याही समान वाटत असले तरी,त्यात सूक्ष्म अशी अर्थभिन्नता असते.जसे – श्रद्धा,अंधश्रद्धा,समता, समरसता हे शब्द समान स्वरूपाचे वाटत असले तरी, अर्थाच्या दृष्टीने या शब्दांमध्ये पुसटशी भेदरेषा आहे. हे असे शब्द जुळ्या बहिणींसारखे असतात. दिसायला सारखे दिसतात;परंतु स्वतंत्र व्यक्तिमत्व घेऊन वावरतात.परस्पर भेद स्पष्ट करणारे काही विरुद्धार्थी शब्द असतात. ते अर्थदृष्ट्या भिन्नभिन्न कुटुंबातील असतात. काही शब्द उद्देशाचे आणि आशयाचे वेगवेगळे चेहरे घेऊन एकाच कुळात स्वतंत्रपणे नांदतात.जसे- लाचारी आणि फितुरी हे दोन्ही शब्द अर्थदृष्ट्या पूर्णतः भिन्न आहेत;परंतु एकाच परिवारातील आहेत.या शब्दांमध्ये चुलतबहिणीचे नाते आहे ! # कोणताही शब्द आकाशातून पडत नाही. तो समाजमनाच्या अनुभूतीतून उगवतो. अनेक घटना, प्रसंगातून तोच तो अनुभव समाज पुन्हा पुन्हा घेतो आणि त्यातून शब्द जन्माला येतो.शब्द हा अनुभवांचा अर्क असतो.अनुभवच शब्दांचा उच्चार होतो;आणि अनुभवच भाषेतील शब्दांना अस्तित्व आणि आशय देतो.आजच्या स्थितीत लाचारी आणि फितुरी हे दोन शब्द अनेकार्थाने महत्त्वाचे आहेत. या शब्दांनी देशाच्या वर्तमानाला ओलीस धरले आहे. आणि देशाचे भवितव्य डावावर लावले आहे ! # लाचारी आणि फितुरी या शब्दांचे समाजशास्त्र व मानसशास्त्र लक्षात घेणेही आवश्यक आहे.लाचारी आणि फितुरी या दोन्ही अपप्रवृत्तीच आहेत ! शारीरिक,मानसिक, बौध्दिक व आर्थिक दुर्बलता आणि लालसा ही लाचारीची जन्मस्थानं आहेत. स्वाभीमान आणि तत्त्वनिष्ठेचा अभाव असलेली संधीसाधू मनोभूमी हे लाचारीचे पीक जोमाने वाढण्याचे खात्रीशीर ठिकाण असते.काबाडकष्ट करून कुडा-मातीच्या झोपडीत राहणारा स्वाभीमान कधीच लाचारीच्या मार्गाने महालात जाण्याचे स्वप्न पाहात नाही.तत्त्वनिष्ठा हेच स्वाभीमानी जगण्याचे खरे वैभव असते. तात्त्विक भूमिका सोडून भौतिक ऐश्वर्यात लोळणाऱ्या लाचारीपेक्षा स्वाभीमानी जगणे लाख पटीने श्रेष्ठ असते.स्वाभीमानी व्यक्तीला आयुष्यात फार मोठी किंमत चुकवावी लागते. उपेक्षा स्वीकारावी लागते;परंतु उपेक्षेतही स्वाभीमानी जगणे अनेकांना बोचत असते. खुपत असते.हेच या स्वाभीमानी जगण्याचे श्रेष्ठत्व असते ! # व्यक्तिगत लाचारी ही तशी फार हानीकारक नसते. परंतु ती जेव्हा सामाजिक अथवा सार्वत्रिक पातळीवर वावरते तेव्हा ती अपायकारक ठरते. लाचारी आणि फितुरी यांच्यात चुलतबहिणीचे नाते असले तरी,फितुरी फार धोकादायक असते.लाचार व्यक्ती स्वतःचा,समाजाचा मान-सन्मान गुंडाळून ठेवून स्वतःच्या पदरात काही तरी पाडून घेण्यासाठी नको तिथे वाकतो. झुकतो. त्यामुळे समाजाच्या सन्मानाला ठेच लागते. लाचारीतून व्यक्ती काही ना काही कमावतो.परंतु समाज अदृश्य रूपात बऱ्याच गोष्टी गमावतो. फितुरी ही तर अतिशय विघातक आणि धोकादायक प्रवृत्ती आहे. या अपप्रवृत्तीची विघातकता पौराणिक,ऐतिहासिक आणि समकालीन ग्रंथांत नोंदल्या गेली आहे. नोंदली जात आहे . बिभीषण, जयचंद, पेशवाईतील बाळाजीपंत नातू आणि आधुनिक भारतात काही स्वातंत्र्यवीरांनी सुद्धा फितुरी केल्याचे अलीकडे पुराव्यासह स्पष्ट होऊ लागले आहे.तसेच समकालीन भारतात प्रदीप कुरुलकरांसारख्या स्वयंघोषित देशभक्तांनी देखील फितुरी केल्याची प्रकरणे उजेडात येऊ लागली आहेत. या साऱ्यांच्या फितुरीने त्या त्या कालखंडांत आणि राजवटीत काय काय अनर्थ घडवून आणले हे सर्वविदित आहे ! ही होत्याचं नव्हतं करणारी अतिशय विनाशक व विध्वंसक प्रवृत्ती आहे. हे लाचारीचचं खूप पुढलं पाऊल आहे. मनातील लालसा अमर्याद वाढली की, सुमार व्यक्तीच्या मनात फितुरी फेर धरू लागते.वाट्टेल ती किंमत मोजून अप्राप्य गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी सुमार दर्जाची व्यक्ती मग कुठल्याही स्तराला जायला तयार होते! स्वार्थ साध्य करण्यासाठी स्वार्थांध व्यक्ती मग स्वतःला, समाजाला आणि समाजाच्या भवितव्याला डावावर लावते. लाचार व्यक्तीच्या तुलनेत फितूर व्यक्तीचं उपद्रव मूल्य मोठं असते. लाचारापेक्षा फितूर व्यक्तीची भूक मोठी असते. फितुरीच्या बदल्यात मिळणारा मोबदलाही मोठ्ठाच असतो;आणि या फितुरीमुळे होणारे नुकसानही प्रचंडच असते. फितुरी जेवढी मोठी तेवढी नुकसानीची व्याप्ती वाढत जाते. इतिहासातील काही फितुरांनी साम्राज्ये उलथवून लावली आहेत. काही फितुरांनी अनेक पिढ्या बरबाद केल्या आहेत. तर, काही फितुऱ्या मूल्यव्यवस्था उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. ठरत आहेत.फितुरी जेवढी उच्च स्तरावर घडते तेवढाच तीचा दाब तळापर्यंत पोहोचतो … # लाचारी आणि फितुरी या दोन्ही कमीअधिक तीव्रतेच्या अपप्रवृत्तीच आहेत. समाजस्वास्थ्याच्या व राष्ट्रहिताच्या दृष्टीने या अतिशय घातक आहेत. लोकशाही बाधीत करण्याच्या दुष्ट हेतूने या अपप्रवृत्तींचा राष्ट्रीय स्तरावर गैरवापर होत असेल तर,एकूणच राष्ट्राच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब आहे.हजारो वर्षं विषमतावादी धर्मव्यवस्थेने भारतीय समाजजीवनावर अमानुष पद्धतीने निरंकुश अशी सत्ता गाजवली. या धर्माने देशात समता रुजू दिली नाही.माणुसकी उगवू दिली नाही. माणूस म्हणून माणसाला माणसाशी जुळू दिले नाही. स्वतःला उच्च समजणाऱ्या मुठभर अभिजनांनी बहुजनांना तुच्छ ठरविले. देवा-धर्माच्या नावाने त्यांचे सर्वांगीण स्वरूपाचे शोषण केले. या राष्ट्रविघातक धर्मसत्तेने भारतीय समाजाला जाती-धर्माच्या आधारे हजारो तुकड्यांमध्ये विभाजित केले. भारतीय समाजमनात जातिद्वेषाचे वीष पेरले. शूद्रातिशूद्रांचे,महिलांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले. राष्ट्राच्या एकूणच विकासाला थोपवून धरले. # स्वातंत्र्योत्तर भारताची लोकशाही मूल्यांच्या आधारे पुनर्रचना करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी संविधान सभेवर सोपविण्यात आली. संविधान निर्मितीच्या कार्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला पूर्णतः झोकून दिले.त्यांच्या अथक परिश्रमातून व प्रखर राष्ट्रनिष्ठेतूनच भारतीय संविधान निर्माण झाले. भारतीय संविधान म्हणजे अखिल मानवी जीवन अधिक सुसभ्य,सुस्थापित व समुन्नत करणारा विश्वातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे.भारतीय संविधानातून आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अजोड बुद्धिमत्ता,चौफेर व्यासंग,सखोल ज्ञान,सामाजिक जाण, विविधतेचे भान, दूरदर्शी भूमिका, मानवी प्रतिष्ठा,व्यापक दृष्टिकोन, आणि सर्वोच्च दर्जाची राष्ट्रनिष्ठा या डॉ. बाबासाहेबांच्या अंगी असलेल्या गुणांचा प्रत्यय येतो.त्यांच्या मूलगामी ज्ञानातून, लोकशाही मूल्यनिष्ठेतून आणि समतोल विचारविश्वातून भारतीय संविधान आकारास आले. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार ठरले. त्यांनी असंख्य जातींमध्ये विभागलेल्या भारतीय समाजाला एस्स.सी., एस.टी., एन.टी., ओ.बी.सी. अशा मोजक्या प्रवर्गात संमीलित करून राष्ट्रीय एकात्मतेच्या एकसूत्री माळेत गुंफण्याचे अभूतपूर्व कार्य केले आहे. या सूत्रातून त्यांनी एकाचवेळी बहुजनांची एकता आणि राष्ट्रीय एकात्मता साध्य केली आहे! प्रत्येक भारतीय नागरिकाला भारतीय संविधानाने संरक्षणाच्या हमीसह मूलभूत अधिकार प्रदान केले आहेत. वैदिक धर्मव्यवस्थेने शूद्रातिशूद्रांना आणि स्त्रीयांना जे जे नाकारले होते ते ते सर्व भारतीय संविधानाने त्यांना सन्मानपूर्वक बहाल केले आहे. सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या सर्वांगीण विकासाकरिता विशेष तरतूदी केल्या आहेत. शिक्षण, रोजगार आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधित्वाकरिता आरक्षणाचे तत्त्व अवलंबिण्यात आले आहे.आरक्षण तत्त्वाचा आधार घेऊन असंख्य पात्र स्त्री पुरुषांनी सर्वच क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पदं आपल्या पदरात पाडून घेतली आहेत.अनेकांनी लाचारी पत्करून पदोन्नती पटकावली आहे. तर काहींनी परिवर्तनवादी चळवळींशी,समाजबांधवांशी आणि आपल्या उत्तरदायीत्वाशी फितुरी करून शासनात-प्रशासनात शिरकाव केला आहे. जातिसंख्येचं भांडवल करून अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील तसेच इतर मागास प्रवर्गातील (ओ.बी.सी.) अनेक प्रतिनिधी विद्यमान भारतीय संसदेत निवडून गेले आहेत.परंतु यातील सर्वांनीच आपल्या कर्तव्याशी प्रतारणा केली आहे. समाजबांधवांशी फितुरी केली आहे.देशाची केंद्रीय सत्ता हस्तगत केलेल्या संविधानद्रोही मनुवाद्यांना मागासवर्गातील सर्वच खासदार शरण गेले आहेत. विषमतावादी केंद्र सरकार रोज नवीन कायदे करून आणि नवनवीन आदेश व अध्यादेश काढून मागासवर्गीयांचे हक्क हिरावून घेत आहे. परंतु एकही मागासवर्गीय खासदार त्याविरुद्ध ब्र काढण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही.केवळ पद, प्रतिष्ठा व पैशासाठी यांनी लाचारी पत्करून समाजबांधवांशी फितुरी सुरू केली आहे.असेच एकंदरीत या लोकप्रतिनिधींच्या वर्तनावरून सिद्ध होत आहे. # भारतीय राजकारणात सद्या उच्च पातळीवर लाचारी पत्करण्याची आणि फितूर होण्याची स्पर्धा लागली की काय ? अशी उद्वेगजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या लाचारी आणि फितुरीच्या अस्त्राचा मनुवादी व्यवस्था पद्धतशीरपणे वापर करून भारतीय लोकशाहीची हत्त्या घडवून आणेल की,काय ?अशा शंकास्पद स्थितीचे गडद धुके राजकीय क्षितिजावर पसरू लागले आहे. विषमतावादी मनुव्यवस्थेला समतावादी लोकशाही नको आहे. उपेक्षितांच्या अपेक्षा जागविणारे संविधान नको आहे. लोकशाही मार्गानेच हुकूमशाही प्रवृत्ती देशाच्या लोकशाही प्रक्रियेत सहभागी झाली आहे. लोकशाहीचे शस्त्र वापरूनच लोकशाहीची हत्त्या करायची, अशी कुटनीती वापरणे पुष्यमित्र शुंगवृत्तीने सुरू केली आहे.अनेक उच्चपदस्थ लोक या कुटनीतीच्या जाळ्यात अडकत आहेत.हे उदाहरणादाखल स्पष्ट करण्यासाठी आपण दोन दिल्लीतील आणि एक गल्लीतील नमुना घेऊ ! # भारतीय संसदीय लोकशाहीत राष्ट्रपती हे सांविधानिकदृष्ट्या सर्वोच्च पद आहे. या पदाला अधिकार मर्यादा असली तरी,सर्वाधिक मान आहे. या पदावरील व्यक्तीला संविधानाने भारतातील प्रथम नागरिकाचा सन्मान दिला आहे. हे पद विभूषीत करण्याची अनेक जाती-धर्मातील व्यक्तींना संधी मिळाली आहे. बहुतेकांनी आपल्या व्यक्तित्वातील गुणविशेषांनी या पदाचा दर्जा सांभाळला आहे. सन्मान राखला आहे.शासनाकडून लोकशाही संकेत पाळले जावेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण व्हावे याची सुद्धा दक्षता या सर्वोच्च पदावरील व्यक्तींनी घेतली आहे. वेळप्रसंगी आपल्या मर्यादित अधिकारांचा योग्य पद्धतीने वापर करून सरकारला समज देण्याचे कामही या पदाने केले आहे.भारतीय संविधानाला या पदाकडून हीच अपेक्षा आहे.संविधानाने या सर्वोच्च पदाची निर्मिती यासाठीच केली आहे ! विद्यमान सरकारला भारतीय संविधान आणि सरकारवर नियंत्रण ठेवणारे सांविधानिक पदच नको आहे. म्हणूनच त्यांनी राष्ट्रपतीपदी लाचारांना बसविणे सुरू केले आहे. याचा उत्तम नमुना म्हणून आपल्याला मा. रामनाथ कोविंद (माजी राष्ट्रपती) यांचे उदाहरण देता येईल. यांच्या काळात मनुवादी सरकारकडून अनेकदा लोकशाही संकेत पायदळी तुडवले गेले. सांविधानिक तरतुदींना छेद दिल्या गेले. संविधानाला अपमानीत करण्यात आले. एवढेच नाही तर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही अनेकदा अपमानीत करण्यात आले. मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आले. तरीही त्यांच्यातील लाचारीने त्यांना त्यांच्या सर्वोच्च पदाचा वापर करू दिला नाही. कुणाचीही लाचारी आजपर्यंत एवढा उच्चांक गाठू शकली नाही ! विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या व्यक्तित्वातील लाचारीला एकाकी पडू दिले नाही. लाचारीला एकाकीपण असह्य होऊ नये म्हणून त्यांनी लाचारीला फितुरीची जोड दिली !सर्वोच्चपदी राहिलेल्या व्यक्तीने सामान्यपद स्वीकारून स्वतःचा आणि सर्वोच्च पदाचा सन्मान घालवू नये असा सामान्यतः संकेत आहे.परंतु सर्वोच्च पदाची उंचीच न कळणाऱ्या व्यक्तीला कसला मान नि कसला सन्मान ? या अशा सर्वोत्तम लाचार व्यक्ती मग फितुरीची सुपारी घेतात ; आणि आपल्या मानसिक गुलामीचा परिचय देतात. केंद्रातील सत्तेसोबतच भारतातील सर्व राज्यांची सत्तासूत्रे आपल्या ताब्यात यावी आणि देशावर आपली एकछत्री सत्ता स्थापन व्हावी या ईर्षेने मनुवादी सत्ताधीश पछाडले आहेत. यासाठीच त्यांनी ‘वन नेशन वन इलेक्शन’ ची रणनीती आखली आहे. आणि या ‘वन नेशन वन इलेक्शन’ पद्धतीला अनुकुलता दर्शविण्यासाठी एक शिफारस समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदाची धुरा रामनाथ कोविंद यांच्या स्वयंसेवकी खांद्यावर देण्यात आली आहे. श्रेष्ठ दर्जाचा लाचार व्यक्ती फितुरी सुद्धा निष्ठापूर्वक पार पाडेल या खात्रीनेच त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे … # दिल्लीतील दुसरा लाचारी व फितुरीचा उत्तम नमुना म्हणाजे विद्यमान राष्ट्रपती मा.द्रौपदी मुर्मू ! यांच्या लाचारीने तर, लाचारीही लज्जीत झाली आहे .यांना राष्ट्रपतीपदाची शपथ देण्यापूर्वी मनुवादी सत्ताधाऱ्यांनी यांचे शुद्धीकरण करून घेतले. आणि यांच्यातील लाचारीने ते मान्य केले. या शुद्धीकरणाने आपले आद्यनिवासीपण(आदिवासीपण), आपल्यातील भारतीयत्व आणि आपले स्त्रीत्व अपमानीत केले जात आहे याचा सुद्धा त्यांना विसर पडला ! राष्ट्रपती पदावरील व्यक्तीला मंदीर प्रवेश नाकारण्यात आला. सांविधानिक अशा सर्वोच्चपदी असलेल्या भारताच्या प्रथम नागरिकाला नव्या संसद भवनाच्या (सेंट्रल विस्टा) उद्घाटनप्रसंगी डावलले जाऊन अपमानित केले गेले;आणि तरीही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कुठेही आपल्या अधिकार पदाचा वापर केला नाही.अथवा साधी नाराजीही व्यक्त केली नाही.ही एकविसाव्या शतकातील सर्वोच्च लाचारी म्हटली पाहिजे! या लाचारवृत्तीने खरं तर,राष्ट्रपती या सर्वोच्च पदाचाच अवमान केला आहे. राष्ट्रपती पदावरील व्यक्तीने आपल्या वागण्या,बोलण्याने आणि कार्यपद्धतीने या पदाचा मान-सन्मान आणि सर्वोच्चता जपली पाहिजे. तसेच भारतीय समाजातील छोट्या-छोट्या दुर्बल व दुर्लक्षित समाजघटकांच्या रक्षणाकरिता सांविधानिक पदाची सर्वोच्चता उपयोगात आणली पाहिजे. परंतु भांडवलवादी सरकार अंबानी,अदानींसारख्यांच्या फायद्यासाठी आदिवासी बांधवांचा जल, जंगल व जमिनींवरील अधिकार हिरावून घेत आहे ; आणि आदिवासी समुदायातूनच राष्ट्रपतीपदी पोहोचलेल्या द्रौपदी मुर्मू यासंदर्भात आपली साधी भूमिकाही जाहीर करू शकत नाहीत. एवढी ही लाचारी रसातळाला गेली आहे ! सहा महिन्यांपासून मणिपूर धगधगते आहे. येथील कुकी जमातीचा आदिवासी बांधव रोज मरणाचा वर्षाव झेलत मरण जगतो आहे .संवेदनशील माणूस ऐकू शकत नाही अशा पद्धतीचे अत्याचार तेथील आदिवासी महिलांवर होत आहेत. महिलांची नग्न धिंड काढली जात आहे.तरीही मा. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती म्हणून तिथे भेट देण्याची गरज वाटत नाही. देशात कमी अधिक प्रमाणात सर्वत्रच गदर सुरू आहे. या गदरकडे डोळेझाक करून त्या ‘ गदर – २’ चित्रपट बघण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. ही आदिवासी बांधवांशी, देशबांधवांशी आणि राष्ट्रपती पदाशी केलेली किती उच्च कोटीची फितुरी म्हटली पाहिजे… ! # लाचारी आणि फितुरीचे दिल्लीतील दोन सर्वोच्च नमुने आपण पाहिलेत ! गल्लीतील लाचारी आणि फितुरीचा मा. रामदास आठवले उत्तम नमुना आहेत. राजकीय नेतृत्वाचा एकही गुण अंगी नसताना राजकीय क्षेत्रात एवढे मोठ्ठे स्थान, मान, सन्मान मिळविणे ही सामान्य बाब नाही…ही कलाकारी केवळ रामदास आठवलेच करू शकतात ! त्यांनी आजपर्यंत जे काही मिळवले ते केवळ आणि केवळ लाचारीच्या भांडवलावर मिळवले आहे. या लाचारीची शिसारी यावी इतकी ती नकोशी वाटणारी आहे. या लाचारीला विदुषकी (जोकर) वृत्तीची जोड आहे. त्यामुळे ती अधिकच हास्यास्पद झाली आहे ! सभापतींनी यांचे केवळ नाव उच्चारले तरी सभागृहात हास्याचे फवारे उडतात. एवढा मा.रामदास आठवले यांच्या नावाचा दरारा आहे ! त्यांचे वागणे,बोलणे, कविता करणे या सर्व बाबी समाजाचा अवमान करणाऱ्या आहेत .या त्यांच्या एकूणच वर्तनातून समाजाचा, समाजाच्या अस्मितेचा आणि आंबेडकरी साहित्य चळवळीचा एकप्रकारे अपमानच आहे. आंबेडकरवादी प्रतिभांनी भारतीय साहित्याला वैश्विक पातळीवर मानाचे स्थान मिळवून दिले आहे. आणि या रामदासी वृत्तीने आपल्या पांचटपणाने या साहित्यप्रवाहाची अशी चेष्टा चालवली आहे… या लाचारीतच फार मोठी फितुरी दडलेली आहे ! # लाचारी आणि फितुरीचे वरील तिनही नमुने हे अनुसूचित जाती, जमातीतील आहेत हे खेदाने नमूद करावे लागते. परंतु यातही एक अभिमानाने नमूद करावे असे एक सर्वोच्च नाव आहे, ते म्हणजे भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. के आर. नारायणन! यांनी आपल्या बुद्धीमत्तेने आणि कार्यपद्धतीने राष्ट्रपती पदाची उंची अधिकच वाढवली आहे. आपल्या विद्वत्तेने, स्वतंत्र बाण्याने आणि तत्त्वनिष्ठ व स्वाभीमानी वृत्तीने त्यांनी भारतीय राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तत्कालीन राजकारणात या नावाचे एक वेगळेच वलय आणि दरारा होता.राष्ट्रपती पदाची प्रतिष्ठा आणि सर्वोच्चता बाधीत होणार नाही याबाबत त्यांनी विशेष दक्षता बाळगली. पुनर्विचारार्थ अनेक विधेयके त्यांनी सरकारकडे परत पाठवली. सरकारकडून सांविधानिक तरतुदींचे आणि लोकशाही संकेतांचे पालन व्हावे या संविधाननिष्ठ भूमिकेमुळे त्यांनी अनेकदा सत्ताधाऱ्यांचा रोष ओढवून घेतला.मा. राष्ट्रपती डॉ. के.आर. नारायणन यांच्याकडून अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हा वाजपेयी यांच्या डोळ्यात नारायणन यांच्याविषयी असलेला रोष आणि द्वेष इंडिया टुडेने काढलेल्या शपथग्रहण सोहळ्याच्या अंकावरील मुखपृष्ठावर कैद झाला आहे.परंतु डॉ.के.आर. नारायणन यांच्यातील स्वाभिमानाने आणि तत्त्वनिष्ठेने कुणाच्याही रागा-लोभाची पर्वा केली नाही. त्यांचे परम् आदर्श भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर होते ! ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्यक्ष भेटले होते. डॉ. बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाने ते अंतर्बाह्य प्रभावीत झाले होते.त्यामुळेच डॉ.के.आर.नारायणन यांचे वागणे,बोलणे,विचार करणे,निर्णय घेणे आणि भूमिका मांडणे हे लोकशाहीचे उन्नयन आणि संविधानाचे संवर्धन करणारे होते…तळागाळातील, मागासवर्गातील संविधाननिष्ठ आणि स्वाभिमानी व्यक्तीला सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी मिळाली तर,भारताच्या आणि भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने ते किती हितावह ठरणारे असते हे यावरून लक्षात येते. # लाचारी ही लव्हाळीसारखी असते. ती कधीही कशीही वाकते. कुठेही झुकते. फितुरी वाळवीसारखी असते. ती एकदा शिरली की, संपूर्ण समाज आणि देश पोखरून काढते.खिळखिळा करते. अलीकडे देशात लाचारांच्या फौजा झपाट्याने वाढू लागल्या आहेत. संपूर्ण समाज लाचार व्हावा,मानसिक गुलाम व्हावा अशी स्थिती सत्ताधारी निर्माण करीत आहेत. संपूर्ण समाजाला लाचार करण्यासाठी मनुवादी व्यवस्था काही निवडक व्यक्तींना हाताशी धरून त्यांना पैसा, खोटी प्रतिष्ठा व मोठी पदे देत आहेत. त्यांच्याकडूनच भारतीय संविधानाला व लोकशाहीला पोखरण्याकरिता त्यांना फितुरीस प्रवृत्त करीत आहेत.अलीकडे देशात फितुरीचा संसर्ग फार झपाट्याने पसरू लागला आहे.अनुसूचित जाती- जमाती,भटके-विमुक्त,अल्पसंख्यांक, इतर मागासवर्ग (ओ.बी.सी.) अशा सर्वच समाजघटकातील मोहरे त्यांनी फितुरीसाठी हेरले आहेत. त्यांच्याच खांद्यावर बंदुक ठेऊन त्यांना लोकशाहीची शिकार करायची आहे. लोकशाही नावापुरती ठेऊन त्यांना एकाधिकारशाही स्थापित करायची आहे. ज्यांच्या हितासाठी लोकशाही राजव्यवस्था निर्माण करण्यात आली तेच लोक व्यक्तिगत स्वार्थाकरिता लोकशाहीविरुद्ध फितुरी करू लागले आहेत. मनुवादी व्यवस्थेने या देशातील बहुजनांना अनेक शतकांपासून लाचार केले आहे. बहुजनांनी लाचारी पत्करली;परंतु फितुरी कधी केली नाही हे ऐतिहासिक सत्य आहे. तसा वैदिकांचा-मनुवाद्यांचा फितुरीचा इतिहास फार मोठा आहे. हाच फितुरीचा संसर्ग त्यांनी बहुजनांत पसरविण्याचा आणि लोकशाही बाधित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे .ही लाचारीची आणि विशेष म्हणजे फितुरीची कीड समाजस्वास्थ्याच्या आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने अत्यंत विघातक आहे. # व्यवस्थेला प्रत्येक समाजघटकांतील असे लाचारी पत्करणारे आणि फितुरी करणारे हवेच आहेत. अशांच्या साहाय्यानेच मनुवादी व्यवस्थेने अनेक शतकांपर्यंत या देशातील बहुजनवर्गावर निरंकुश पद्धतीने शासन करून बहुजनांचे सर्वांगीण स्वरूपाचे शोषण केले आहे. वर्तमान स्थितीत हा मनुवाद अशा लाचारांच्या आणि फितुरांच्या माध्यमातूनच या देशातील लोकशाहीला व संविधानाला दुर्बल करून भारतावर पुन्हा धर्मसत्ता स्थापण्याची तयारी करू लागला आहे … !
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत