कांदा निर्यातबंदीच्या विरोधात रस्त्यावर शरद पवार

केंद्र सरकारने अकस्मात लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीचे स्थानिक पातळीवर तीव्र पडसाद उमटत असताना या विरोधात माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे रस्त्यावर उतरणार आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातर्फे सोमवारी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवड येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे. या आंदोलनात पवार हे सहभागी होत असून अशाप्रकारे आंदोलनात उतरण्याची त्यांची पहिलीच वेळ असल्याचा दावा पदाधिकारी करत आहेत. निर्यात बंदीच्या मुद्यावरून स्थानिक पातळीवर उमटलेले तीव्र पडसाद व विरोधकांनी सुरू केलेली आंदोलने या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार या निर्णयाचा फेरविचार करेल असे संकेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहेत.
निर्यात बंदीच्या निर्णयानंतर व्यापारी संघटनेने लिलाव बेमुदत बंद केले आहेत. अकस्मात लागू झालेल्या निर्णयाने कांदा दरात मोठी घसरण झाली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी बाजार समितीत आणलेला माल विक्री न करता परत नेला. आधी ४० टक्के निर्यात शुल्क नंतर ८०० डॉलर किमान निर्यात मूल्य वाढवल्यामुळे मागील चार महिन्यात कांदा उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. आता संपूर्ण निर्यात बंदीमुळे आणखी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची व्यथा आम्ही मांडल्यानंतर शरद पवार यांनी आंदोलनात स्वत: सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी सांगितले. रास्ता रोकोसाठी राष्ट्रवादीने शुक्रवारी जिथे शेतकऱ्यांवर सौम्य लाठीमार झाला होता, त्याच ठिकाणाची निवड केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत