महाराष्ट्रमुख्यपान

मराठा समाजाची गरिबी , बेरोजगारी , शोषण व आरक्षण जबाबदार कोण?

ऍड अविनाश टी काले , अकलूज 
डॉ आंबेडकर चौक , तालुका
 माळशिरस जिल्हा सोलापूर 
मो न 9960178213

समग्र महाराष्ट्राची लोकसंख्या ही जवळपास 11कोटींचे आसपास आहे , तर देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे ,
स्वातंत्र्य पूर्व कालखंडात ब्रिटिश सत्तेपूर्व समग्र ग्रामीण अर्थव्यवस्था ही शेती आधारे व शेती पूरक व्यवसाय या आधारे अस्तित्वात होती ,
ग्रामीण भागातील कारागीर देशी अवजारे वापरून तेल , गूळ , खांडी साखर , पादत्राणे , कपडे , घोंगडी , उत्पादित करत होते , शेतकरी धान्य , तेलबिया , कापूस पिकवत होते फुले फळे , भाजीपाला निर्मिती होत होती , त्यांचा व्यापार होत होता ,
गावकुसातिल समाज , गाव कूसा बाहेरील समाज , आणि गावाचा थेट सबंध नसलेले जाती समूह असे वर्ग अस्तित्वात होते , लोकसंख्या चे प्रमाण अत्यल्प असल्याने व गाव खेडी स्वयंपूर्ण असल्याने जाती व्यवस्था असून ही समाजव्यवस्था चालत आली ,
हळू हळू यांत्रिकी करण , आणि सामाजिक सुधारणा याचा वेग वाढू लागला तशी तशी ग्रामीण अर्थव्यवस्था ढासळू लागली , कापड गिरण्या , रेल्वे हॉटेल संस्कृती याने सामाजिक संस्कृती ची पकड ढीली होत गेली
व्यावसायिक क्रांती ने पारंपारिक कारागीर यांना उध्वस्त केले , स्वातंत्र्यानंतर देश उभारणीला सुरुवात झाली ,
शिक्षण पद्धतीत आलेले नवीन बदल याने वैचारिक क्रांती समाजात आली पण कारागिरी नष्ट झाली आणि शेती क्षेत्रावर समाजाचे अवलंबित्व निर्माण झाले ,
म्हणूनच काकासाहेब कालेलकर या पहिल्या ओबीसी आयोगाच्या अध्यक्षांनी बेरोजगारी हे देशा पुढील सर्वात मोठे संकट असून ज्वालामुखी चे तोंडावर समग्र भारतीय समाज बसलेला आहे असे वर्णन केले
गावगाड्यात फारसे काम न उरलेला समाज मोठ्या शहराकडे स्वतःच्या उपजिविकेसाठी ग्रामीण भागातून स्थलांतरीत होऊ लागला , तो कलकत्ता , मुंबई , बेंगलोर , पुणे , हैद्राबाद , दिल्ली , सारख्या ठिकाणी गर्दी करू लागला , हा स्थलांतरित लोंढा थांबवणे आवश्यक होते , म्हणून गाव खेड्यात समृद्धी आणणे शासनाच्या दृष्टीने आवश्यक ठरले , यातून हरित क्रांती ने जन्म घेतला , त्याच समवेत “सहकार ” तत्वज्ञानाचा अंगीकार करून शासनाने सहकारी चळवळी ला गती देत ग्रामीण भागातील शेती मालावर प्रक्रिया करणारे उद्योग , पत पुरवठा करणाऱ्या बँका , पत पेढ्या , मार्केट कमिटी , दूध निर्मिती व विपणन संस्था यांना जन्म दिला ,
शासकीय अनुदान चे माध्यमातून प्रवर्तक नेत्यांनी अश्या योजनांची अंमलबजावणी केली , अनेक सभासद गाव पातळीवर जाऊन गोळा केले , साखर कारखाने , सुत गिरण्या , दूध संघ , अंडी उत्पादन संस्था , कुकुट पालन , शिक्षण संस्था अशा एक ना अनेक संस्था उभ्या राहिल्या ,
यातील वर्गाने मजूर संस्था ही निर्माण केल्या , अनेक गृह निर्माण संस्था सहकारी तत्त्वावर निर्माण झाल्या ,
पण सूक्ष्म रित्या या सर्वांचा अभ्यास केला तर असे दिसून येते की
या संस्था त्याच नेत्यांच्या , आणि वर्गाच्या निर्माण झाल्या , जे राजकारणात होते , तालुका , जिल्हा स्तरावर जे नेते म्हणून वावरत होते , आणि हे नेते त्याच बहुसंख्याक “मराठा”जातीतून निर्माण झालेले होते
याच समाजाच्या हातात ग्रामीण भागातील गाव पातळी पर्यंत ची राजकीय सत्ता हाती होती त्यांचे हातात दूध संकलन केंद्राच्या मालकी आल्या , गाव पातळीवरील सहकारी सोसायट्या त्यांच्या ताब्यात आल्या , ते शेतकऱ्यांना कर्ज रोखे देऊ शकत होते , आणि गाई खरेदी साठी लाख दोन लाख कर्ज ही देऊ शकत होते ,
हा ग्रामीण मराठा शेतकरी वर्ग या समग्र सहकार चळवळीचा लाभधारक बनवला गेला , जातीय अस्मिता यातून त्यांनी त्यांचे एक मुखी नेतृत्व वारसा हक्काने निर्माण करत एक नवे संस्थान निर्माण केले ,
हे संस्थानिक म्हणजे आजची प्रस्थापित राजकीय घराणी आहेत ,
ती आकाशातून टपकली नाहीत ,, ती याच समाजाने निर्माण केली , या संस्थानिकांच्या अवती भौवती समाज त्यांच्या छोट्या मोठ्या गरजांच्या पूर्ती साठी एकवटत गेला ,
शाळेत मुलाला प्रवेश घेण्या पासून , सुरू होत असलेला हा प्रवास , लग्न कार्यासाठी कर्जरोखे , ते दिवाळी साठी मिळणारा बोनस आणि सवलतीत मिळणारी साखर यापर्यंत सीमित झाला ,
शेतातील डी पी जळला तरी नेत्या कडे जावे , पोलीस स्टेशनचे काम असेल तरी ही त्यांचे साध्या फोन ने काम श्यक्य झाले , ते समाजाचे तारणहार बनले , भू लोकीचे देव बनले , कुणी बनवले ?
आज महाराष्ट्रात लोकशाही अस्तित्वात आहे काय? ती कागदावर अस्तित्वात असेल ही पण वास्तवात ती या संस्थानिक वर्गाच्या हाता तील कळसूत्री बाहुली आहे ,
ज्या लोकांचा वावर व थेट संपर्क या व्यवस्थेच्या वातावरणात आहे त्यांना यातील दाहकता ज्ञात आहे , ती पुस्तकात सापडत नाही , ती अनुभवावी लागते ,
हा संस्थानिक वर्गच सर्व प्रकारच्या शोषणाचे मूळ आहे , तो स्वतः चे समाजा कडे ही समाज बांधव म्हणून पाहत नाही तर कच्च्या मालाचा उत्पादक , राजकीय सत्तेचा वाहक म्हणून पाहतो , म्हणून कितीही विस्तारी करण केलेला सहकारी साखर कारखाना असला तरी त्याचा नफा कधी सभासदांना मिळाला नाही ,
ताळेबंद नावाची पुस्तिका कशी तयार केली जाते ? हे त्यांनी कधी जाणून घेतले नाही ,
तो खूश राहिला मिळणाऱ्या थोड्याशा लाभात
पण मुक्त जागतिक अर्थव्यवस्थेने या ही व्यवस्थे पुढे आव्हान निर्माण केले ,
इस्रो सारख्या संस्था , आणि मेडिकल , इंजिनियरिंग क्षेत्रातील ज्ञांनाच्या कक्षा विस्तारित झाल्या , कॉम्प्युटर क्रांती , आणि दूर संचार क्रांती ने शिक्षण क्षेत्रात ही बदल घडवून आणले ,
ग्रामीण भागातील फुगिरी अत्याधुनिक क्रांती पुढे फिकी पडली , शासकीय नोकरीत असलेली माणसे शेणात हात न बुडवता दरमहा लाखो रुपये वेतन घेऊ लागली ,
आरक्षित जागे मुळे ” लायकी ” नसलेले लोक साहेब होऊ लागले , ते सहकारी निबंधक बनून सहकारातील चोऱ्या शोधू लागले , जिल्हाधिकारी बनून प्रशासकीय राज्य करू लागले , आणि इथेच या व्यवस्था प्रमुखांचा “इगो” दुखावू लागला
मूळ आरक्षणाला विरोध करण्यासाठी त्यांनीच या आरक्षण मागणीस खत पाणी घातले ,
मी इथे एक वास्तवातील एक घटना सांगतो जी उद्बोधक व प्रासंगिक ठरेल
मी ज्या अकलूज गावात राहतो , ते गाव माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर मध्ये आहे ,
तालुक्याच्या पश्चिम भागात
“धनगर समाज” बहुल आहे , तो अकलूज व त्याच्या पूर्व भागात अल्पसंख्य आहे ,
आमच्या गावात साधारण 10वर्षा पूर्वी कांहीं धनगर युवकांनी अगदी मोक्याच्या जागी राजमाता अहिल्या देवी यांचा पुतळा रातोरात बसवला ,
तो काढणे प्रशासन आणि पोलीस यांच्या दृष्टीने ही आव्हानात्मक बनले ,
आणि अचानक अशी किल्ली फिरली , संपूर्ण गावात रस्त्याच्या मधोमध जिथे जागा दिसेल तिथे प्रत्येक जातीतील महा पुरुषांचे पुतळे बसवण्यास त्या त्या जातीचे समूह पुढे आले ,
एक चमत्कारिक वातावरण निर्माण झाले , सर्वत्र तणाव निर्माण झाला , आणि प्रशासनास कठोर भूमिका घेऊन सर्व पुतळे हटवावे लागले , ज्यात राजमाता अहिल्या देवी यांच्या ही पुतळ्याचा समावेश होता
आणि मला असे वाटत आहे की 50% वरील सर्व जागा ह्या आरक्षण मुक्त असताना ही या स्पर्धेत न राहता ज्यांच्या हातात शेती , व समग्र राज्य व्यवस्था आहे अश्या वर्गाला आरक्षणाच्या कोट्यातील लढाई साठी उद्युक्त करण्यात इथली व्यवस्था यशस्वी झालेली आहे ,
धनगर समाजाला राज्यकर्ता बनण्याची संधी या मंथनातून निर्माण झालेली असताना ही एस सी /
एस टी / ओबीसी/व्हीजे/ एन टी अश्या सर्व बहुजन जाती समवेत एकत्रित येऊन त्यांच्या लोकसंख्या ने बहुल असलेल्या पट्ट्यात नेतृत्व करून थेट राज्यकर्ते बनण्याची संधी ते गमावत आहेत , आणि पळत्याच्या पाठीमागे लागून ते प्रस्थापित शोषण कर्त्या वर्गाच्या सोईचे वर्तन करत आहेत
ऍड प्रकाश जी आंबेडकर साहेब “निजामी” संस्थानिक मराठा व गरीब किंवा गरजवंत मराठा म्हणून जे विभाजन कल्पनेत धरतात ती एक मधुर अशी बौद्धिक परी कल्पना आहे असे माझे स्पष्ट मत आहे
जात केंद्रीय मानसिकता जातीतील आर्थिक , राजकीय श्रेष्ठ नेतृत्वाच्या विरोधात उभी राहत नाही याचे कारण ते शोषण करतात हेच त्यांना मान्य नाही ,
भारतात वर्ग शत्रू नावाचा प्रकारचं निर्माण होत नाही याचे कारण जात अस्मिता हेच आहे , जात हाच घटक समूह म्हणून निर्माण करतो , व या समुहा अंतर्गत च तो त्या समूहाचा नेता ही निवडतो
गरजवंत मराठा , या जात समूहाच्या बाहेर असणाऱ्या व व्यवस्थेने निर्माण केलेल्या वर्ण व्यवस्था व जात व्यवस्था चे खालच्या पायरीवर असलेल्या उच्च कोटीच्या नेतृत्वास ही आपले म्हणून स्वीकारत नाही , ती त्यांची अस्मिता होऊ शकत नाही , म्हणून हा वर्ग वंचित कडे येईल हा भ्रम ठरणार हे मात्र तितकेच खरे आहे
जी चूक धनगर समाज करत आहे तीच चूक नवबौध्द ही करत आहेत , या सर्व आरक्षण लढाईत तो उघडपणे ओबीसी कडे ही नाही ,
म्हणूनच महाराष्ट्रात आरक्षण लढाईच्या कॅनव्हास वर भगवे पिवळे हे दोन रंग दिसतात परंतु या रंगात निळा रंग कोठेच नाही
परिवर्तनाच्या या मंथना पासून अलिप्त राहिल्याने भविष्यात ही नवबौध्द समाजाच्या हाती फारसे कांहीं लागेल असे मला वाटतं नाही
त्यांचे ओबीसी , भटके विमुक्त यांच्या समवेत राहणे नैसर्गिक दृष्ट्या योग्य ठरले असते , आणि गाव कुसातिल राजकीय शक्ती या निमित्ताने जोडली गेली असती ,
गरजवंत मराठा म्हणून समग्र मराठा एकिकृत झाला तरी तो शेवटी स्थानिक पातळीवरील त्यांच्या राजकीय नेत्या समवेत च राहणार हे वास्तव तुम्हास दिसून येईल ,
कळीच्या सामाजिक मुद्या आधारे गरजवंत म्हणून निर्माण झालेले नेतृत्व स्वतः चे डोक्यावर प्रस्थापित नेतृत्व कायमचे स्थापित करून घेतील अशी श्यक्यता नसल्याने हा लोक प्रियतेचा ग्राफ हळू हळू ओसरलेला दिसून येईल व ज्यांनी आजवर शोषण केले तोच वर्ग राज्यकर्ता म्हणून समग्र व्यवस्थेच्या उरावर बसलेला दिसून येईल
हा वर्ग सहकार मोडीत काढून त्याचे खाजगी करण करेल , शाळा खाजगी होतील , आणि खाजगी उद्योजकांच्या दरवाजावर समग्र बहुजन शिक्षण / नौकरी , या साठी उभा राहिलेला असेल
रासपा चे महादेव जी जानकर साहेब म्हणतात त्या प्रमाणे “डिमांडर बनण्या ऐवजी कमांडर बना “
ही बाब दुर्दैवाने बहुजन समाज जाणून घेत नाही , म्हणून तो मागण्याच्या मागे पळत राहतो , आणि शांत राहून कोणताही गाजावाजा न करता थेट केंद्रीय सचिव पदे भरून घेणारा समाज कायम स्वरुपी लाभार्थी राहतो

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!