
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अगदी धर्मांतराच्या आधीपासूनच अस्पृश्यांसाठी बौद्ध संस्कृतीचे वातावरण निर्माण करीत होते. याचा संदर्भ म्हणजे शे.का.फे.ला 1950 मध्ये तथागत बुद्धांची जयंती साजरी करण्याची सूचना त्यांनी केली. 2 मे 1950 रोजी भारतीय इतिहासात आणि अस्पृश्य जनतेच्या चळवळीत सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे. या दिवशी दिल्ली तथागत बुद्धांची 2494 वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य समाजाने साजरी केली. या बुद्ध जयंतीस जवळजवळ 20,000 अस्पृश्य बंधु-भगिनींचा समुदाय हजर होता. निरनिराळ्या राष्ट्रांचे परराष्ट्रीय वकीलांचा समुदाय सदर समारंभास प्रामुख्याने हजर होता. शिवाय बौद्धधम्मीय भिक्खूंचाही समुदाय हजर होता. सुमारे 22 वर्षांपूर्वी अस्पृश्य समाजाने महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते आणि गुलामगिरीत डांबणाऱ्या हिंदू धर्मात अस्पृश्य समाजाने राहू नये असा निश्चय जाहीर केला होता. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील बुद्ध जयंतीस विशेष महत्त्व प्राप्त झाले होते यात शंका नाही. 1950 मधील बुद्ध जयंतीच्या अनुषंगाने बाबासाहेबांनी कोलकत्याच्या महाबोधी सोसायटीच्या अंकात Buddha and the future of his Religion (बुद्ध व त्यांच्या धम्माचे भवितव्य) या शीर्षकाखाली लेख प्रकाशित केला होता. भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठीची योजना आखण्याची भूमिका ते या लेखात पार पाडत आहेत असे जाणवते. याच वर्षी व महिन्यात – 25 मे ते 6जून 1950 कोलंबो, श्रीलंका येथे भरलेल्या जागतिक बौद्ध परिषदेत उपस्थित राहून बौद्ध जीवनपद्धती – चालीरीती – गाथा पठण यावर त्यांनी बराचसा अभ्यास केला. डिसेंबर 1954 मध्ये रंगून, ब्रह्मदेश (आजचे म्यानमार) येथे भरलेल्या जागतिक बौद्ध परिषदेत भारतात बौद्ध धम्म चळवळ कशा रीतीने चालवावी याची एक ब्लू प्रिंट मांडली. त्रिपिटक व इतर बौद्ध वाॾमयातून मूळ बुद्ध तत्त्वांना शोधून ‘The Buddha and His Dhamma’ (बुद्ध आणि त्यांचा धम्म) या ग्रंथाचे लेखन केले. 1950 ते 1956 पर्यंतच्या काळात ते बौद्ध धम्माचा विषय घेऊन आपल्या भाषणांत व लेखनांत अस्पृश्य जनतेच्या जागृतीसाठी आपल्या सर्व ताकदीनिशी कष्ट घेत होते.
प्राचीन काळी गृहस्थी लोक भिक्खूंचे भोजन व आरामाची सोय करून स्वागत करीत. त्यामुळे बौद्ध भिक्खूंना त्यांच्या आवश्यक गरजांची व्यवस्था होऊन जात असे, गृहस्थी असलेल्या उपासक संघाची निर्मिती करणे आवश्यक नव्हते. जे उपासक त्याकाळी होते ते त्यांच्या पूर्वस्थितीत काही बदल करीत नसत. म्हणजे समजा एखाद्या ब्राह्मणावर बुद्ध तत्त्वांचा प्रभाव पडला तर तो उपासक बने, त्याला साधारणपणे पंचशील पालन करावे लागे, त्याच्या परंपरा व रीतीरिवाजालाही तो धरून राही. बाबासाहेबांनी बारकाईने यावर अभ्यास करून सामान्य माणूस बौद्ध धम्माशी बांधून घेण्याचा नवीन उपाय शोधला व ज्याला बौद्ध बनायचे आहे त्याला धम्मदीक्षा स्वीकारून उपासक संघात यावे लागेल. तदनंतरच तो माणूस बौद्ध समाजाचा भाग होईल. अर्थात बौद्ध धम्मात जाणीवपूर्वक – विधीपूर्वक प्रवेश केला पाहिजे व बौद्ध जीवन पध्दतीचे आचरण केले पाहिजे. झाडाला जसे जमिनीखालून मुळाद्वारे जीवनरस मिळतो तसे माणसाला धम्मतत्त्वांच्या प्रवाहात सदोदित ठेवले गेले पाहिजे, तरच अंतर्बाह्य सुसंस्कृत – सुसंगत माणूस विकसित होऊ शकतो. यासाठी बौद्ध संस्कृतीचे वातावरण माणसाच्या अवतीभवती असणे आवश्यक असते. आदर्श समाज निर्माण करण्यासाठी ते बौद्ध वातावरण अतिशय आवश्यक आहे.
आयु. बाळासाहेब गायकवाड
(द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत