जादूटोणात’ डॉक्टरेट मिळवणारे महाराष्ट्रातले पहिले बौध्द प्राध्यापक

माणूस हा चिकित्सक आणि बुध्दिप्रामाण्यवादी असावा. त्याच्या जगण्याचा अन् जीवनाचा ‘सरनामा’ हाही विज्ञानवादी असावा. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी विशेषतः प्राध्यापकांनी यासंबधी तर अधिकच जागरुक असणं गरजेचं आहे. कारण प्राध्यापक काय शिकवतो, कसे शिकवतो यावरच नव्या पिढीची जगण्याची आणि जीवनाची विचारदृष्टी विकसित होऊन समृद्ध होत असते. त्यामुळे नवी पिढी घडविण्याच्या प्रक्रियेतला प्राध्यापक नामक घटक किती महत्त्वाचा आणि किती जबाबदार असला पाहिजे, हे इथे ध्यानात घ्यायला हवं
मुद्दा असा. मी महाराष्ट्रभर फिरत असतो. विविध विद्यापीठातील, महाविद्यालयातील प्राध्यापक कार्यक्रमाच्या संदर्भाने मला भेटत असतात. त्यांच्याशी माझा संवाद होतो. अनेक विषयांरील त्यांची भाषणे ऐकायला मिळतात. त्यामधून आवश्यक महत्वपूर्ण माहिती – संदर्भ मिळून जातात. बुध्द, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर विविध Dimensions मधून समजूनही घेता येतात. काही प्राध्यापक हे खरोखरच अभ्यासपूर्वक – विचारपूर्वक तेही ठोस आणि कणखरपणे भूमिका घेताना पहायला मिळतात. त्यांची वैचारिक बैठक, जीवननिष्ठा, नैतिक अधिष्ठान, मूल्याधिष्ठीत वर्तनव्यवहार हे सारे अलंकार त्यांच्या पारदर्शक अन् सच्चेपणाची साक्षसुध्दा देतात. अशा प्राध्यापकांची आगळीवेगळी आयडेंटिटी समाजमनांत आपसूक Establish होत राहते. अशीच एक आयडेंटिंटी क्रिएट करणारे प्राध्यापक व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. विलास खंडाईत
खरंतर डॉ. खंडाईत यांच्यासारखे प्राध्यापक पुरोगामी महाराष्ट्रात पावला पावला भेटायला हवेत, परंतु तसे होत नाही. जे भेटतात त्यांचे प्रमाण फारसे नसले तरी दिलासादायक आहे. कारण त्यांच्याकडे पाहिले की नव्या पिढीला परिवर्तनाचे सिध्दांत अन् क्रांतदर्शी दिशा गवसल्याशिवाय रहात नाही
प्रा. विलास खंडाईत हे असे एक तरणंबांड व्यक्तिमत्त्व आहे की जे गेली अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या मातीत क्रांतिसिंध्दांत पेरण्याबरोबरच विद्यार्थ्यांसह समाजसमुहाला वैज्ञानिक दिशा दाखवण्यासाठी धडपडत आहे. बुध्द, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांची नेमकी विचार चळवळ काय ? आणि ती चळवळ गतिमान करण्यासाठी नेमकं काय करायला हवं, याचं अचूक मूल्यभान असणारे आणि त्याअनुषंगाने पाऊले टाकणारे हे प्राध्यापक ! खरं म्हणजे प्रा. विलास खंडाईत महिन्याला लाख दीड लाख कमावून ऐशआरामत जीवन जगू शकतात. आपलीच गाडी आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची रंगीबेरंगी साडी यात ते रमू शकतात. पण समाज बदलाची आस आणि ध्यास असणारे हे प्राध्यापक स्वस्थ कसे बसतील ? महापुरुषांच्या विचारातून उत्सर्जित झालेली समग्र परिवर्तनाची चळवळ ‘रन’ करण्यासाठी जी तळमळ आणि कमिटमेंट असावी लागते ती प्रा. विलास खंडाईत यांच्या रक्ताच्या थेंबाथेंबात सळसळत आहे. किंबहुना म्हणूनच महाराष्ट्रातल्या कैक विद्यापीठात, चळवळीतल्या विविध स्तरात ‘कृतीशील बुध्दिवादी’ प्राध्यापक म्हणून विलास खंडाईत यांचे नाव आज आदराने घेताना पहायला मिळते
प्रा. विलास खंडाईत यांच्याबद्दल आज हे लिहिण्याचे कारण म्हणजे वैश्विक भूमीवरचा सर्वोत्तम भूमीपुत्र गौतम बुद्ध यांची विचार चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी, बुध्दिप्रामाण्य, प्रतित्यसमुत्पाद, अनित्यवाद, विज्ञानवाद या आजरामर सिध्दांताचा सरांनी ‘जागर’ केलाय. ‘जादूटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण कार्यक्रमाचे विकसन’ या विषयावर Ph,D. पूर्ण केलीय. अर्थात महाराष्ट्राच्या अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीतील ‘जादूटोणा विरोधी कायदा’ यात डॉक्टरेट मिळवणारे महाराष्ट्रातले ते पहिले प्राध्यापक ठरलेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कूलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येंच्या पार्श्वभूमीवर अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीत त्यांच्या या Ph.D माध्यमातून अत्यंत धाडसी पाऊल पडलेले आहे. म्हणून सरांच्या डॉक्टरेटला विशेष महत्व आहे, असे मला वाटते
सातारा जिल्ह्यातील वाई या ऐतिहासिक आणि टूमदार शहरात विसावलेल्या किसनवीर महाविद्यालयात प्राध्यापक असणा-या या सरांबद्दल लिहिण्यासारखे खूप आहे. विस्ताराने केव्हातरी लिहीन. तूर्त त्यांच्या क्रांतदर्शी वाटचालीला अशीच ऊर्ध्वगामी दिशा गवसत रहावी, अशा शुभेच्छा देतानाच त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन असो
सुयश मीडिया ग्रूप
संपर्क
9420742709
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत