बुद्धांचा धम्म निराशावादी आहे काय? भाग २६

बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या ‘परिचय’ मध्ये चार प्रश्न उपस्थित केले. त्यापैकी एका प्रश्नात ते म्हणतात की, “चार आर्यसत्याचा भगवान बुध्दाच्या मूळ शिकवणीत अंतर्भाव होता काय, की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे कारण हे चार आर्यसत्य बुध्दाच्या आचारतत्वांना निराशावादी ठरवतात.”
त्याच ग्रंथात बौध्द धम्म निराशावादी आहे काय? या प्रश्नाला ते उत्तर देतांना म्हणतात की, “जगात दु:ख आहे असे पहिल्या आर्यसत्यात भगवान बुध्द म्हणतात. तसेच कार्ल मार्क्सही असे म्हणाला होता की, जगात शोषण सुरु आहे, आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत व गरीब लोक अधिक गरीब केले जात आहेत. तरीही कार्ल मार्क्सचा सिद्धांत निराशावादी आहे असे कोणी म्हणत नाही. तर मग भगवान बुध्दाच्या सिद्धांताबाबत निराळा दृष्टिकोन का?” भगवान बुध्दाच्या बाबतीत असा दृष्टिकोन बाळगणे चुकीचे आहे.
भगवान बुध्द जरी दु:खाचे अस्तित्व मान्य करीत असले तरी ते दुसर्या आर्यसत्यात दु:खाचा नाश केला पाहिजे यावर विशेष भर देतात. दु:खाचे निरसन करण्याचा मार्ग सुध्दा त्यांनी सांगितल्यामुळे त्यांना दु:खाचे अस्तित्व सांगावे लागले. असे असताना बुध्दांचा धम्म निराशावादी आहे, असे कसे म्हणता येईल ? भगवान बुध्दांच्या धम्मात मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोंचाही अंतर्भाव आहे.
जग आणि जीवन दु:खमय नाही तर जगात आणि जीवनात दु:ख आहे असा नवा विचार त्यांनी मांडला. या दु:खावर मात करता येते असे त्यांनी ठासून सांगितले. या दु:खावर मात करण्याचा उपायही त्यांनी सांगितला.
भगवान बुध्दाने सतत आयुष्याच्या अखेरपर्यंत सतत भ्रमण करुन विपश्यना विद्येच्या माध्यमातून लोकांना दु:खमुक्तीचा मार्ग सांगितला. परिनामस्वरुपत: त्यांच्या जीवनकाळामध्ये हजारो गृहत्याग करणार्या भिक्खु आणि भिक्खुंनी अरहंत झालेत, दु:ख मुक्त झालेत. तसेच अन्य भिक्खु आणि भिक्खुंनीसहित लाखोच्या संख्येत गृहस्थी जीवन जगणारे लोक सुध्दा सत्याचा साक्षात्कार होऊन स्त्रोतापन्न झालेत. दु:ख मुक्त झालेत. भगवान बुध्दाचा विपश्यना मार्ग या चार आर्यसत्याचा आधार घेऊन जगातील करोडो लोकांचे कल्याणाचा मार्ग प्रशस्त करुन याच जीवनामध्ये प्रत्यक्ष दु:ख-विमुक्तीचा अनुभव करुन देत आहेत.
विपश्यना शिबीरामध्ये चित्ताला निर्मळ करुन शेवटच्या दिवशी मंगल मैत्रीचा अभ्यास केला जात असतो. ‘भवंतु सब्ब मंगलं’ चा मंगलकारी घोषाने संपूर्ण आसमंतात मंगल-घोषाचे तरंगच-तरंग जिकडे-तिकडे पसरत असतात.
कोणी एखादा निष्णात डॉक्टर रोग्यांना सांगतो की, तुला अमुक रोग झाला आहे व त्यावर मी औषधी-उपचार करुन तुझा रोग बरा करु शकतो. तो रोगी त्यांच्या वैद्यकीय उपचाराने बरा होतो. मग त्या डॉक्टरला कोणी रोगवादी म्हणतील की निरोगवादी? तसेच चार आर्यसत्याच्या माध्यमातून दु:खाने पिडित असलेल्या लोकांना दु:ख मुक्तीचा मार्ग सांगून त्यांना भगवान बुध्द याच जीवनामध्ये दु:ख मुक्त करतात अशा भगवान बुध्दाला आणि त्यांच्या शास्त्रशुध्द तत्वज्ञानाला व शिकवणीला निराशावादी कसे म्हणता येईल ?
जो निराशावादी किंवा दु:खवादी असेल तो केवळ
दु:खाचा प्रचार करेल. तो लोकांच्या सुखाची कामना करणार नाही. मात्र ‘सब्बे सत्ता सुखी होन्तु’ अशा मैत्रीभावनेचे शिकवण देणारे भगवान बुध्द लोकांच्या सुखाची कामना करतात. गेल्या कित्येक वर्षे भगवान बुध्दाच्या विपश्यना साधनेच्या दूर असणारे लोक भगवान बुध्द किती धम्मवादी, सुखवादी व मंगलवादी होते ते भगवान बुद्धांचा धम्म निराशावादी आहे असे म्हणणाऱ्या लोकांना कसे कळणार ?
धम्मपदामध्ये सुख आणि दु:खाच्या बाबतीत खालील दोन पदे आहेत. पहिले पद असे आहे-
मनसा चे पदुट्ठेन, भासति वा करोती वा।
ततो नं दुक्खमन्वेति, चक्कं व वहतो पदं॥
याचा अर्थ अशुध्द चित्ताने जो कोणी व्यक्ती शरीर अथवा वाणीने कर्म करतो तेव्हा त्याच्या मागे जसे गाडीला ओढणार्या बैलाच्या मागे त्या गाडीचे चाके येत असतात तसे दु:ख त्याच्या मागे येत असतात.
दुसरे पद असे आहे-
मनसा चे पसन्नेन, भासति वा करोती वा।
ततो नं सुखमन्वेति, छाया व अनपायिनि ॥
याचा अर्थ प्रसन्न चित्ताने जो कोणी व्यक्ती शरीर अथवा वाणीने कर्म करतो तेव्हा त्याची सावली जशी त्याचा पिच्छा सोडत नाही तसे सुख त्याच्या मागे येत असते.
स्पष्ट आहे की मलीन चित्ताने जो कोणी व्यक्ती शरीर अथवा वाणीने कर्म करतो ते दुष्कृत्येच असेल आणि दुष्कृत्याचे फळ नेहमी दु:खदच असते. त्याचमाणे निर्मळ चित्ताने जो कोणी व्यक्ती शरीर अथवा वाणीने कर्म करतो ते सत्कृत्येच असेल आणि सत्कृत्याचे फळ नेहमी सुखदच असते.
यावरुन धम्मपदामध्ये पहिल्या पदामध्ये दु:खाचे व दुसर्या पदामध्ये सुखाचे अशा दोन्हिही दु:ख आणि सुखाचे विवेचन केले आहे.
जर धम्मपद हा ग्रंथ संपुर्णपणे वाचला तर त्यात धम्माच्या बाबतीत भगवान बुध्दाच्या शिकवणूकीचे निरनिराळ्या विषयावर २६ वग्गाचे संकलन केलेले दिसते. यामध्ये एक सुख वग्ग आहे. परंतु त्यात दु:खाचा एकही वग्ग नाही. म्हणून. भगवान बुध्दाचा धम्म निराशावादी व दु:खवादी आहे असे कसे म्हणता येईल?
भगवान बुध्दांने जसे दु:खाबाबत चर्चा केली तसे सुखाबाबत सुध्दा केली आहे. जेथे दु:खाबाबत चर्चा केली तेथे दु:खाचे कारणे प्रकाशात आणून ते दूर करण्यासाठी उत्साहित केले आहे. तसेच जेथे सुखाबाबत चर्चा केली तेथे त्याचे कारणे स्पष्ट करुन त्याचे सवंर्धन करण्यासाठी उत्साहित केले आहे. त्यामुळे भगवान बुध्दाचा धम्म निराशावादी व दु:खवादी आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल.
भगवान बुध्दाचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दु:खाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय. त्यात आशा आहे. कारण मानवी दु:खाचा अंत करण्याचा मार्ग ते दाखवितात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी `बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथामध्ये लिहिले आहे की, दारिद्र्य हे दु:खाचे उगमस्थान आहे. परंतु दारिद्र्य नाशाने सुख लाभेलच असे नाही. सुख लाभते ते उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे.
सिध्दार्थ गौतमाला ३५ व्या वर्षी बुध्दत्व प्राप्त झाले. त्यानंतर पंचेचाळीस वर्षे भगवान बुध्दांनी दु:ख आणि दु:खमुक्तीचा मार्ग याचीच शिकवण दिली आहे. भगवान बुध्दांचे उपदेश ह्या चार आर्यसत्यावर आधारलेले आहेत. ज्याप्रमाणे पृथ्वीतलावर चालणार्या प्रत्येक प्राण्याच्या पायाचा ठसा हत्तीच्या पायाच्या ठशात बसू शकतो, त्याचप्रमाणे भगवान बुध्दांची शिकवण या चार आर्यसत्यांच्या शिकवणीत सामावली आहे. बुध्द धम्म समजून घेण्यासाठी ही चार आर्यसत्य समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्रिपिटकात चार आर्यसत्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. ही चार आर्यसत्य भगवान बुध्दाच्या धम्माचा पाया आहे असे म्हटले जाते.
भगवान बुध्दांनी एखाद्या कुशल वैद्याप्रमाणे चार आर्यसत्याचे मुलभूत विश्लेषण केले आहे. त्यांनी प्रथम रोगाचे निदान करुन त्याचे कारण जाणले आहे. तो रोग कसा निर्माण होतो, हे त्यांनी जाणले आहे. नंतर तो रोग नष्ट करण्याचे निश्चित केले व शेवटी त्यावर उपाय सांगितला. दु:ख हा रोग आहे. तृष्णा हे त्या रोगाचे कारण आहे या रोगावर उपाय करता येतो. आर्यअष्टांगिक मार्गाने हा रोग कायमचा बरा करता येतो, हे सुत्र भगवान बुध्दांनी मांडले. म्हणूनच त्यांना अप्रतिम वैद्य आणि कुशल शल्यकार असे म्हटले जाते.
आजच्या काळात ‘आर्य’ या शब्दाचा अर्थ केवळ जातिवाचक झालेला आहे. मात्र भगवान बुध्दांच्या काळात ‘आर्य’ या शब्दाचा अर्थ गुणवाचक होता. व्यक्ती कोणत्याही जातिचा असो तो धम्माच्या मार्गाने, शील-समाधी व प्रज्ञेचा अभ्यास करुन मुक्तीच्या चार पायर्यापैकी पहिल्या स्त्रोतापन्न या पहिल्या पायरीपर्यंत जरी कोणी पोहचला तरी त्याला ‘आर्य’ असे संबोधल्या जात असे. त्यानंतर दुसरी सकृदागामी, तिसरी अनागामी आणि चवथी पायरी अहर्त येथपर्यंत प्रवास करणारे अर्थात आर्य म्हणूनच संबोधल्या जात असे. आर्यसत्य म्हणजे आर्याचे किंवा अहर्ताचे सत्य अशी व्याख्या वसुबन्धु आणि बुध्दघोष यांनी केली आहे. आर्य म्हणजे ज्यांचे सर्व अकुशल पापधर्म दूर झाले आहेत तो, अशी मज्झिमनिकायात व्याख्या केली आहे. तर जो पापकर्मापासून अत्यंत दूर गेला आहे तो आर्य असे अभिधर्मकोषभाष्यात म्हटले आहे. अशा आर्याचे सत्य म्हणजे आर्यसत्य. आर्य म्हणजे पवित्र, सर्वश्रेष्ठ असाही अर्थ होवू शकतो.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.८.१.२०२४
टीप- ‘भगवान बुद्धांची शिकवण’ हे माझं पुस्तक Amazon Kindle वर असून त्यावर आधारित ही लेखमाला सादर केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत