सुज्ञ नागरिकांनी सत्तेचा लोभट धर्मधंदा बंद करावा डॉ. अनंत दा. राऊत

भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना आपापल्या धर्मानुसार पारलौकिक कल्याणासाठीची हवी ती उपासना पद्धती अवलंबण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. हे स्वातंत्र्य सर्व धर्मांचे भारतीय नागरीक मोकळेपणाने उपभोगतात. त्यावर कोणतीही सत्ता बंधने आणू शकत नाही.
सत्ताधारी अथवा विरोधी अशा सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांना आपापल्या व्यक्तिगत धर्मपालनाचे स्वातंत्र्य आहेच.सत्तेतल्या अथवा विरोधी पक्षातील लोकांनी धर्मामध्ये जाहीररीत्या लुडबुड वा हस्तक्षेप करू नये आणि धर्म संस्थांच्या प्रमुख मंडळींनी राजकारणात हस्तक्षेप करू नये हे भारतीय संविधानातील महत्त्वपूर्ण असे सेक्युल्यिरिझमचे तत्त्व आहे.वर्तमानात हे तत्त्व सत्ताधारी पक्षाने पूर्णपणे पायदळी तुडवले आहे. राजकीय सत्तेच्या लोभटपणातून विशिष्ट धर्मश्रद्धेचे भपकेबाज प्रदर्शन हा पक्ष करत आहे.ते इतके की विरोधी पक्षांना देखील फरफटत त्यांच्याच मार्गाने जावे लागत आहे. विकसित राष्ट्राच्या घडणीसाठी धर्म आणि राजकारणात जाणीवपूर्वक अंतर ठेवले पाहिजे हा विवेकी विचार करायला आज कुणीही तयार नाही.
श्रद्धावान धार्मिक असणे वेगळे आणि धर्म व धार्मिक प्रतीकांचा राजकीय धंदा करणे वेगळे. वर्तमानात धर्म आणि धार्मिक प्रतिकांचा राजकीय धंदा फार जोरात चालू आहे. या राजकीय धंद्यात भारतातील लोकांचे बेकारी, महागाई, अन्न, वस्त्र, निवारा, उत्तम आरोग्य, उत्तम शिक्षण हे प्रश्न बाजूला पडत आहेत. हिंदूसह सर्व धर्मातील गरिबांसाठी उत्तम शिक्षण देणाऱ्या सरकारी शाळा किती निर्माण केल्या? उत्तम शिक्षण देणारी नवी सरकारी महाविद्यालये किती निर्माण केल? गोरगरीब मुलांनाही परवडतील अशी उच्च शिक्षण देणारी सरकारी अनुदानावर चालणारी विद्यापीठे किती निर्माण केली? देशात नव्या नव्या संशोधन संस्था किती उभ्या राहिल्या? नवीन उद्योग किती उभे राहिले? सर्व नागरिकांना किती रोजगार उपलब्ध करून दिले? हे देशाच्या विकासाच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न असतात. सारे काही श्रीमंत हितधार्जीने खाजगीकरण हे या प्रश्नांचे बहुतांशी येणारे उत्तर आहे. या प्रश्नांची चर्चा अडगळीत टाकून वर्तमानातला सत्ताधारी पक्ष २०२४ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून धर्म आणि मंदिर मज्जिद इत्यादीची चर्चा देशपातळीवर केंद्रस्थानी आणू पाहात आहे. जुजबी विकासाचे भपकेबाज प्रदर्शन करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनाच पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे कामाला लावलेले दिसत आहे. ही विकासाच्या संदर्भातली धोक्याची घंटा आहे, हे भारतातील नागरिकांनी ओळखले पाहिजे. आणि सारी चर्चा धर्म, धर्मांधता, जात्यांदता यावर केंद्रित न होता भारतीय नागरिकांच्या विकासाच्या मूलभूत प्रश्नांवर केंद्रित व्हावी याचा प्रयत्न सुज्ञ नागरिकांनी केला पाहिजे. राजकीय पक्षांनी सुरू केलेला सत्तेसाठीचा लोभट धर्म धंदा बंद केला पाहिजे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत