….या विद्यापीठाने दिली वामनदादा कर्डकांना डिलीट

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत सोहळा शुक्रवारी (दि.१३) सकाळी १०.३० वाजता होणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सोहळ्यात ८६७ विद्यार्थ्यांना पदवी आणि महाकवी वामनदादा कर्डक यांना मरणोत्तर डी.लीट. पदवीने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एमजीएम विद्यापीठाच्या दुसऱ्या दीक्षांत सोहळ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला कुलगुरू डॉ. सपकाळ यांच्यासह कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, परीक्षा नियंत्रक डॉ. हरिरंग शिंदे, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, प्रा. परविंदर कौर यांची उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू डॉ. सपकाळ म्हणाले, २०१९ साली स्थापन झालेल्या विद्यापीठाला यूजीसीने २ (एफ) दर्जा दिला आहे. विद्यापीठात विविध विद्याशाखांमधील अभ्यासक्रम शिकविण्यात येत आहेत. या दीक्षांत सोहळ्यात ७ विद्याशाखांमधील पदवीच्या ३५३, पदव्युक्तर ४४३, पदविका ४२, पदव्युत्तर पदविका २० प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या ९ विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येणार आहे. त्यात पदवीच्या ४, पदव्युत्तरचे ६ अशा एकुण १० विद्यार्थ्यांना कुलपती सुवर्ण पदकाने सन्मानित केले असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासह कुलपती अंकुशराव कदम त्यांची विशेष उपस्थित असणार आहे. विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत सोहळा विशेष असा असल्याची माहिती कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी दिली.
एमजीएम विद्यापीठाने पहिल्या दीक्षांत सोहळ्यात महान साहित्यीक अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डी.लीट पदवी देऊन सन्मानित केले होते. त्यानंतर दुसऱ्या दीक्षांत सोहळ्यात महाकवी वामनदादा कर्डक यांना डी.लीट पदवीने सन्मानित केले जाणार आहे. परिवर्तनवादी चळवळीतील शिलेदारांची निवड डी.लीटसाठी एमजीएमकडून केली आहे.
वामन तबाजी कर्डक ज्यांना आपण सर्वजण वामनदादा कर्डक म्हणून ओळखतो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानीत त्यांनी आंबेडकरी चळवळीत आपले मोलाचे योगदान दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानावरच्या अविचल निष्ठेचं नाव म्हणजे वामनदादा! या निष्ठेन बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्व, त्यांची चळवळ आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाची उद्दिष्टपूर्ती सहज- सोप्या, साध्या पण परिणामकारक शब्दांनी त्यांनी दहा हजार गाण्यातून मांडली. त्यांनी चार कवितासंग्रह, ‘माझ्या जीवनाचं गाणं’ हे आत्मचरित्र आणि काही चित्रपट गीतेही लिहिलेली आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचे विचार महाराष्ट्रातील खेडोपाडी पोहचवले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत