भीम जयंती 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

करणीत भीम आणूया !

  • किशोर जाधव, सोलापूर
मो.नं.९९२२८८२५४१

  भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते

तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते
वाणीत भीम आहे ,करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते.
लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या काव्यातील या काव्यपंक्ती आहेत. वामनदादांना भीम म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसत्या वाणीत ( बोलण्यात)नव्हे तर आपल्या करणीत असावा हे अपेक्षित आहे.
सामान्य जन आपले जीवन तत्वहीन आणि स्वार्थीपणे जगत असतो. परंतु असामान्य लोक आपल्या विचार प्रणालीचे तत्वे घेऊन जगत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते. त्यांच्या विचारप्रणालीची तत्वे ‘करणीत आणली’ तर आपल्या सर्वांचे वर्तन चोख होणार आहे .या तत्त्वांनीच हजारो वर्ष गुलामीत खितपत पडलेल्या भारतातील एक पंचमांश लोकसंख्येला मुक्तीचा महामार्ग दाखवला. त्यांच्यातील न्यूनगंडाची भावना मुळासकट उखडून टाकली आणि या समाजात अस्मिता निर्माण केली. बाबासाहेबांच्या विचार प्रणालीतील तत्त्वे समजून घेऊया.
१)प्रचंड ज्ञानलालसा-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘माझे पहिले दैवत विद्या आहे. विद्ये शिवाय मानवाला कोणीही विचारत नाही. विद्या ही सर्वांना अवगत झाली पाहिजे. माणसाला जगायला जशी अन्नाची आवश्यकता आहे तशी विद्येचीही आहे.’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘symbol of knowledge’ म्हणजेच ‘ज्ञानाचे प्रतीक’ असं म्हणून ओळखलं गेलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये झाले. तर माध्यमिक शिक्षण गव्हर्नमेंट हायस्कूल, सातारा म्हणजेच आताच्या प्रतापसिंह हायस्कूल मध्ये झाले. पुढे त्यांचे सर्व कुटुंब मुंबईमध्ये आले.१९०७ मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा मुंबई मधील ‘एलफिस्टन हायस्कूल’ येथून उत्तीर्ण केली. पुढे त्यांनी एलफिस्टन महाविद्यालयात प्रवेश घेऊन १९१२ मध्ये ‘राज्यशास्त्र’ आणि ‘अर्थशास्त्र’ हे विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले शिक्षण कसे घेतले हे सांगताना म्हणतात, ‘मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आई, बाप भावंडे यांच्यासोबत राहून एक पैशाच्या घासलेट तेलावर मी अभ्यास केला आहे.’ अशा गरीब परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी ते १९१३ साली अमेरिकेत गेले. न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात दररोज अठरा-अठरा तास अभ्यास करून त्यांनी ‘प्राचीन भारतीय व्यापार’ या विषयावर १९१५ साली प्रबंध लिहून एम. ए. ही पदवी संपादन केली.पुढे त्यांनी १९२० मध्ये ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स’ या संस्थेत प्रवेश घेतला; त्याच बरोबर बॅरिस्टर चा अभ्यासही त्यांनी ‘ग्रेज इन’ मध्ये सुरू केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘लंडन म्युझियम’ मध्ये सकाळ सकाळी वाचनास जात. दिवसभर ते त्याच ठिकाणी वाचन करत. आपला वेळ वाचवण्यासाठी बरोबर आणलेले सँडविच चे दोन तुकडे ते तेथे हळूच खात. परंतु एक दिवस म्युझियम मधील नोकराने त्यांना तेथे बसून खाण्यास मज्जाव केला. त्यामुळे पुढील काळात त्यांना पोटाची भूक मारून पाच वाजेपर्यंत वाचीत बसावे लागत होते. येथे त्यांनी ‘इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स’ मधून आपली मास्टर डिग्री मिळवून दोन वर्षांनी त्यांनी आपली बार-ॲट-लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या देखील प्राप्त केल्या. उच्च शिक्षणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक बुद्धिमान आणि सामर्थ्यशाली पुरुष झाले. तीन विश्वविद्यालयात त्यांनी ज्ञानसंपदासाठी तपश्चर्या केली. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंश शास्त्र,धर्मशास्त्र ,निर्बंध शास्त्र , इतिहास व कायदा या विषयांमध्ये त्यांनी सखोल ज्ञान मिळवले. एवढे ज्ञान घेऊन देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले ,तरी विद्यासागरच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल.’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ‘शिक्षणाने माणसाला शहाणपण येते. म्हणून ‘शिका! संघटित व्हा !आणि संघर्ष करा!’

२) स्वाभिमान-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘माझे दुसरे दैवत म्हणजे स्वाभिमान होय.मी कण्याचा भात आणि कण्याची भाकरी खाल्ली. पण नोकरीसाठी कोणापुढे हात पसरले नाहीत. मी स्वतःचे पोट स्वतःच्या कष्टाने भरले आणि समाजाची सेवा केली. तेव्हा माझे सांगणे हेच की लाचार असू नये.’ हे खरंच होतं, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड स्वाभिमानी होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सर्व मानव मुक्तीची आंदोलने ही स्वाभिमानासाठी होती. ती कोणत्याही जातीच्या, व्यक्तीच्या विरोधात नव्हती.१९२७ च्या महाडच्या चवदार तळ्याच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,’ चवदार तळ्याचे पाणी पिऊन आम्हाला अमरत्व येणार नाही.’ म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा लढा समतेचा, मानवी मूल्यांचा आणि स्वाभिमानाचा होता. या लढ्याला काही तत्कालीन पुरोगामी संघटनांनी पाठिंबा देण्याचे मान्य केले, परंतु त्यांनी या चळवळीतील ब्राह्मणांना दूर करा,अशी अट घातली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, ‘माझा विरोध हा ब्राह्मणांना नसून ब्राह्मणवादाला आहे’, हे ठणकावून सांगितले. म्हणूनच या ठिकाणी मनुस्मृतीचे दहन करण्यात आघाडीवर सहस्त्रबुद्धे व चित्रे हे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय स्त्रियांना स्वाभिमानाचे जगणे बहाल केले. हिंदू कोड बिलासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. स्त्रियांना नोकरीमध्ये पगारी प्रसूती रजेची तरतूद केली.१७सप्टेंबर १९३८ रोजी शेतीतील खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक डॉ.आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळात मांडले होते . १० जानेवारी १९३८ रोजी २५०० शेतकऱ्यांचा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळावर नेण्यात आला. त्यांनी शेतकऱ्याच्या जातीचा विचार न करता सर्व जाती, धर्मातील शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाने जगण्यासाठी ही चळवळ उभारली होती. ७ नोव्हेंबर १९३८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘औद्योगिक विवाद विधेयका’ विरोधात भारतीय कामगारांच्या इतिहासातील सर्वात मोठा संप केला. त्यादिवशी सर्व कापड गिरण्या आणि इतर उद्योगातील आणि महानगरपालिकेचे सर्व कारखाने बंद होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश लढा हा तर स्वाभिमानाचे धगधगते पाऊल म्हणून इतिहासात अजरामर आहे. पहिल्या गोलमेज परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश सरकारला तुमच्या सरकारने आमच्यासाठी काय केले? असा खडा सवाल केला .१४ऑक्टोंबर १९५६ रोजी नागपूरच्या दिक्षा भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन या धम्माचे देशात पुनर्जीवन केले. हे त्यांचे पाऊल समाजाला स्वाभिमानाचे जगणे बहाल करणारे होते. म्हणून माणसांना उपाशी ठेवून मुंग्यांना साखर टाकणाऱ्या संस्कृतीला मोठ्या हिमतीने आणि हिकमतीने उभा काप देणारा स्वाभिमानी बाण्याचा कुशल समाज वैद्य म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले पाहिजे.

३)शील चारित्र्य-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,’ आयुष्यात मी कोणाची फसवणूक केली नाही. मी विलायतेला अनेक वेळा गेलो, पण मला नको ते कसले व्यसन लागू दिले नाही. पुस्तके आणि कपडे याचे काही ते व्यसन लागले. चांगली वागणूक जोपासण्याचा मी सतत प्रयत्न केला.’ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,’विद्येबरोबरच आमच्यात शील असलं पाहिजे. शीला शिवाय विद्या फुकाची( व्यर्थ) आहे. कारण विद्या ही एक शस्त्रासारखी आहे. एखाद्या जवळ विद्येचे शस्त्र असेल आणि तो शीलवान असेल, तर त्यायोगे तो एकाचे संरक्षण करेल. तोच इसम शीलवान नसेल तर विद्येच्या शस्त्राने दुसऱ्याचा घात करेल.लबाडी करण्यास चातुर्य व बुद्धी लागते;परंतु चातुर्य व बुद्धीहिला सदाचारांची अर्थात शीलाची जोड मिळाली, तर लबाडी अगर फसवाफसवी करावीशी वाटणार नाही आणि म्हणून शिकल्यासवरलेल्या लोकांत शीलाची अत्यंत जरुरी आहे.’ असे सांगून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुढे जो इशारा देतात तो आजच्या समाज व्यवस्थेला वास्तवाचे भान आणून देणारा आहे ‘शीलाशिवाय जर शिकले सवरलेले लोक निपजू लागले, तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे.’
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रणालीच्या तत्वांचे अनुकरण करून ‘करणीत भीम’ आणूया.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!