उद्योजक, कार्यकारी संचालक आणि अर्थतज्ज्ञ महात्मा फुलेंचे राष्ट्र उभारणीतील आर्थिक योगदान

जोतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ – २८ नोव्हेंबर १८९०), महात्मा फुले नावाने लोकप्रिय असलेले महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले, हे सर्व श्रुत आहेच परंतु या सर्व सामाजिक कार्यासाठी लागणारा पै-पैसा त्यांनी कसा उभा केला, त्याची थोडक्यात आपण माहिती करून घेऊ.
शिक्षण पूर्ण झाल्यावर सरकारी नोकरी करण्याऐवजी जोतीरावांनी वडिलांना फुलांच्या व्यवसायात मदत करणे पसंत केले. आपल्या भावी आयुष्यातही जोतिरावांनी सरकारी सेवेची गुलामगिरी न स्वीकारता विविध प्रकारचे व्यवसाय करणे पसंत केले. विविध प्रकारचे व्यवसाय करून जोतीरावांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला. त्यांनी सादर केलेले सार्वजनिक उपक्रम आणि शाळांशी संबंधित लेखे त्यांचे स्वच्छ आणि पारदर्शक व्यक्तिमत्व दर्शवतात.
उदरनिर्वाहासाठी जोतिरावांनी विविध प्रकारचे व्यवसाय केले. त्यात त्यांनी भरपूर कमाई देखील केली कारण त्यांनी त्यांच्या व्यवसायात निष्ठा, प्रामाणिकपणा, मजुरांना प्रेरणा देने, मजुरांचे त्यांच्या मेहनतीसाठी कौतुक करणे व नेहमी कोणत्या न कोणत्या कामात व्यस्त रहाने या सवयी अंगी बाणल्या होत्या. शिवाय त्यांनी आपले संपूर्ण उत्पन्न सामाजिक कार्यासाठी खर्च केले. जोतिरावांनी उत्तम आणि शिस्तबद्ध पद्धतीने शेती केली. त्यांना फळाफुलांचे भरपूर पीक मिळत असे.
मुळा-मुठा धरणातील पाण्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे मत त्यांनी प्रामुख्याने मांडले होते. मुळा-मुठा येथील पाण्याचा स्वतः फायदा घेऊन त्यांनी सुंदर बागायती शेती विकसित केली होती. इतर शेतकऱ्यांसाठी ते एक उदाहरण ठरले होते. विदेशी वंशाची फुले, फळे, भाजीपाला लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज त्यांनी प्रामुख्याने दूर केले.
मुख्यतः फळे, भाजीपाला विकण्यासाठी त्यांची दुकाने होती.
शेतीसोबतच त्यांनी अनेक बांधकामाची कंत्राटेही घेतली होती. त्यांच्याकडे कात्रज बोगदा खोदण्याचे उपकंत्राट होते, त्यांच्याकडे मुळा-मुठा धरणावरील छोटे पूल बांधण्याचे कंत्राट होते. मुळा-मुठा धरणाखालील वाहिन्या खोदण्याचे कंत्राट त्यांच्याकडे होते. मोठमोठे दगड फोडून कृत्रिमरीत्या तयार केलेले खडे, चुना, विटा, गिट्टी विकण्याचे काम ते करत असत. पुण्याच्या बाजारपेठेत घाऊक दरात भाजीपाला आणि फळे विकण्यासाठी तसेच मुंबईला भाजीपाला आणि फळे पाठवण्यासाठी त्यांची एजन्सी होती.
जोतीरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचे अद्याप पुरेसे लक्ष गेलेले नाही. जोतीरावांच्या कंपनीने केलेली महत्त्वाची कामे म्हणजे कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरूस्थानी मानायचे आणि फुले यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानाने सांगायचे.
म. फुले ‘पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी’चे [Pune Commercial & Contracting Company] कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणे, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामे केली. स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून त्यांनी समाजकार्य केले. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते. त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत. मुंबई महापालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे सत्यशोधकांनी केलेली आहेत. राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि जोतीरावांच्या कंपनीचे भागीदारही होते. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेले आहे. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामे त्यांनी केली. त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकली.
जोतीरावांच्या कंपनीने पुस्तक प्रकाशनाचेही कामही केले. बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी 1865 साली लिहिले. जोतीरावांनी ते ‘जातीभेद विवेकसार’ प्रकाशित केले. या कंपनीचे पुण्यात पुस्तकविक्री केंद्र सुद्धा होते. सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतीरावांकडे होती. ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे. एक अव्वल दर्जाचे यशस्वी व्यापारी, उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतीरावांचा नावलौकिक होता. सामाजिक कार्यकर्ता आणि यशस्वी उद्योगपती असा फार विरळाच संगम जोतीरावांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतो.
कितीतरी मोठी कामे या कंपनीमार्फत त्यांनी केल्याच्या कागदोपत्री नोंदी आहेत. 150 वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतिरावांचेच प्रोत्साहन होते.
त्यांनी स्वत:चे पैसे सार्वजनिक आणि सामाजिक कार्यासाठी इतके खर्च केले की त्यांच्या शेवटच्या आजारपणात औषध घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते.
संकलन
संतोष पगारे
संदर्भ : १. आम्ही पाहिलेले महात्मा फुले, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1993
२. महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1998
३. महात्मा फुले – समग्र वांड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1991
४. प्रा. हरी नरके यांच्या फेसबुक पेजवरील संकलित माहिती
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत